आषाढी वारीनिमित्त हभप शामसुंदर सोन्नर यांची विशेष लेखमाला: क्रमांक -२

विठ्ठल जिवीचा जिव्हाळा



________________________

संपदा सोहळा नावडे मनाला l

लागला टकळा पंढरीचा l

अशी अवस्था वारक-यांची झाली आहे.  कोणत्याही अपेक्षेशिवाय,  लाभाच्या आशेशिवाय लाखोवारकरी दर वर्षी विठूरायाच्या भेटीसाठी येत असतात. हा विठ्ठल या वारकऱयांचा आहे तरी कोण, त्याचे वारकऱ्यांशी नाते आहे तरी नेमके कोणते, एवढा जिव्हाळा त्यांना या पांडुरंगाबद्दल का वाटतो. त्याचे एकमेव कारण आहे, आषाढी वारीनिमित्त जाणून घेतले पाहिजे.

पंढरीचा पांडुरंग एक आलौकिक दैवत आहे. इतर दैवतांचा विचार केला तर त्यांच्या हातात कोणते ना कोणते शस्त्र असते.  त्याने कोणत्या तरी दैत्याचा संहार केलेला असतो. अशा देवाबद्दल एक धाक असतो. वारकरी संतांनी देवाविषयी असलेला धाक, भीती पार पुसून टाकली. त्याला आई, बाप,  चुलता,  सखा  इतकेच  नव्हे तर पती म्हणूनही संबोधले. हे सर्व एका अलौकिक जिव्हाळ्यातून घडले.

देव कुणी तरी अगाध आहे. सर्व शक्तीमान आहे. त्याचा कोप झाला तर आपला तो विनाश करील. त्याची मर्जी सांभाळली पाहिजे. त्यासाठी यज्ञ, जप, तप केले पाहिजेत. त्यासाठी गृह त्याग करून वनात गेले पाहिजे. असा देवाविषयी प्रचंड धाक लोकमानसात होता. त्या देवाने केलेले पराक्रम, त्याने केलेली युद्ध, दुष्टांचा केलेला संहार अशा कथा कानावर आदळत होत्या. मात्र त्याच वेळी पंढरपूरचा पांडुरंग भेटला आणि देवाविषयी असलेला दरारच नाहीसा झाला. धाकाची जागा जिव्हाळ्याने घेतली. यज्ञ-यागात पशुहत्येसारखे प्रकार करून पुण्य संचय करण्याच्या प्रथेला धक्का देऊन सोपा नाम साधनेचा  पर्याय दिला.

Click:● विशेष लेखमाला: क्रमांक -१ वाचण्यासाठी क्लिक करा:

शक्तीच्या उपासकांनी आपल्या देवीचा धाक निर्माण केलेला होता. आदिमाया शक्तीची रूपे म्हणून जी प्रसिद्ध आहेत त्यात कालिका, दुर्गा, म्हैशासूरमर्दिनी यांचा समावेश होता. या देवीची रूपे आपण पाहिली तर ती भयानक दिसतात. त्यांचा जनमानसात एक धाक आहे. वारकरी संतांनी या देवींनाही विठ्ठलाच्या रूपात पाहिले. देवीची भयानक रूपे लोपपाऊन ती प्रेमळ झाली. या प्रेम भक्तीमुळे वारकरी संप्रदायात विठोबाची कधी विठाई माऊली झाली ते देव आणि भक्त दोघांनाही कळले नाही. विठाई माऊली जरी झाली तरी तिचे प्रेमळ रूप मात्र बदलले नाही. उलट भक्ताच्या भेटीने तिचा आपत्यभाव अधिकच उचंबळून येतो. भक्तीच्या भुकेने व्याकूळ झालेल्या भक्तांना ती प्रेम पान्हा पाजते. या आईच्या सानिध्यात प्रेमाचे भरते येते.


अंगी प्रेमाचे भरते।

न घे उतार चढते।।

अशी भक्तांची अवस्था होते. शक्तीपूजकांप्रमाणे वारकरी संतही या विठाई, किठाई, कृष्णाई, कन्हाईच्या नावाने गोंधळ घालतात. नामदेवारायांनी

 विठाई सावळे डोळसे रंगा येई वो' असे गोंधळाला येण्याचे आवाहन केले आहे. तुकाराम महाराजांनी थेट गोंधळच घातला.

जेथे विठूचे राऊळ। 

तेथे तुकायाचा गोंधळ। 

असा भाव त्यांनी व्यक्त केला. गोंधळा प्रमाणे विठोबाचा जागरही केला.

 देवाचे भरता वारे। 

अंगी प्रेमाचे फेफरे l

सर्व सामान्य तळागाळाच्या समाजात अशी दैवतांचे गोंधळ-जागरण घालण्याची प्रथा तिला प्रेम भक्तीचा पर्याय दिला. इतकेच नव्हे तर पुण्य संचायासाठी केल्या जाणाऱया यज्ञ-यागालाही वारकरी संतांनी नाम साधनेचा पर्याय सूचविला.

नामसंकिर्तन साधन पै सोपे।

जळतील पापे जन्मांतरीचे।।

विठ्ठलाच्या नामाचे संकिर्तन केले की सर्व पापांचा नाश होण्याचा मार्ग दाखविला आणि देवाबद्दलचा धाक कमी करून जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. तुकाराम महाराज तर जगातली सर्व नाती त्या विठ्ठलामध्ये पाहात होते.


विठ्ठल माय-बाप चुलता।

विठ्ठल बंधू आणि भ्राता।

विठ्ठलाविन चाड नाही गोता।

तुका म्हणे आता नाही दुसरे।।


विठ्ठलातच जगातली सर्व नाती सामावलेली आहेत. तोच सर्वस्व आहे हा प्रेम भाव वाढीस लागला. त्यामुळे देवाबद्दलचा धाक कमी होऊन पराकोटीचा जिव्हाळा निर्माण झाला. धाक कमी झाल्यास जसा जिव्हाळा वाढतो तसाच कधी कधी अनुरागही निर्माण होतो. त्यातून आपल्या प्रिय व्यक्तीसोबत भांडण तंटाही होतो. विठोबाबद्दलचा धाक कमी झाल्यामुळेच अनेक वारकरी संतांचे देवाशी लडिवाळ भांडण झाले. या भांडणात नामदेवमहाराज देवाच्या औदार्यावर शंका घेतात आणि देवाला सुनावतात- देवा तू पातीत पावन आहेस अशी ख्याती ऐकून तुझ्या दारात आलो, पण तू तसा नाहीस म्हणून मी माघारी जातो-

पतीत पावन नाव ऐकून आलो मी द्वारा।

पतीत पावन नव्हे तरी मग जातो माघारा।।


किंवा


घेशी तेव्हा देशी ऐसा आसशी उदार।

काय धरू देवा तुझे कृपनाचे द्वार।


या अनुरागाचा सर्वाधिक स्फोट कुणाच्या अभंगात पहायला मिळत असेल तर तो जनाबाईच्या. जनाबाई थेट देवाला कचकचीत शिव्याच हासडते-

अरे विठ्या विठ्या विठ्या।

मूळ मायीच्या कारट्या।

तुझी रांड रंडकी झाली।

जन्म सावित्रा चुडा ल्याली।

तुझे गेले की रे मडे।

तुला पाहूनी काळ रडे।।

उभ्या राहूनी अंगनी।

शिव्या देते दासी जनी।।


अशा अनुरागाने भरलेले अभंग सर्वच संतांच्या साहित्यात पहायला मिळतात. त्यातूनच देवाबद्दल असणारा दरारा कमी होऊन देव कुणा परलोकातला नाही तर आपल्यातलाच आहे. आपला सखा आहे, सोबती आहे, आपल्या मदतीला धावून येणारा आहे, असे वाटते. मग संसारिक जबाबदाऱ्या सांभाळतानाही तो आपल्या सोबत असल्याचा आधार मिळतो. जनाबाईला दळताना, सावता महाराजांना खुरपीताना, नरहरी सोनारांना दागिणे घडविताना आणि गेरोबा काकांना मडकी घडविताना इतकेच नव्हे तर सज्जन कसायांना मांस विकताना आणि चोखोबांना मेलेली जनावरे ओढतानासुद्धा तो आपल्यासोबत असल्याची जाणीव होते.


या जिव्हाळ्यातूनच मग पंढरपूर हे माहेर वाटू लागते, चंद्र भागा बहीण तर पुंडलिक बंधू वाटू लागतो. केवळ हे नाते बहीण भावापुरते मर्यादित राहात नाही, तर ते प्रिय सखा, पतीसारखे होते. तुकाराम महाराज आपले भगवंता विषयी असणारे नाते स्पष्ट करताना म्हणतात-

पतीव्रते जैसा भ्रतार प्रमाण।

आम्हा नारायण तैशापरी।

पतीव्रता स्त्रााला ज्या प्रमाणे आपला पती हाच प्रमाण आहे. तसाच जिव्हाळा आमच्या मनात निर्माण होतो. हा जिव्हाळा वारकऱ्यांमध्ये रुजलेला असल्यामुळे मोठ्या ओढीने ते पंढरपूरच्या दिशेने त्याच्या भेटीला निघतात. अर्थात वारकऱ्यांचे, संतांचे हे प्रेम एकतर्फी आहे काय? असा प्रश्न विचारला असता तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जितक्या आवडीने त्याच्या भेटीला जातो तितक्याच आवडीने तो आमची वाट पहातो-


वाट पाहे उभा भेटीची आवडी।

कृपाळू तातडी उतावेळ।।

म्हणूनच त्याची भेट झाली की बावीस दिवस केलेल्या प्रवासाचा शीण निघून जातो. 

भाग गेला शीण गेला।

अवघा झाला आनंद।

 अशी अवस्था होते. मात्र परत फिरतात तेव्हा देवालाही हूरहूर वाटते. पाडुरंग वारक-याना म्हणतो-


तुम्ही जाता गावा।

हुरहुर माझ्या जीवा।

भेटाल केधवा। मजलागी।

इतकेच नव्हे तर तुमच्याशिवाय या जगात माझे प्रेमाचे कुणी नाही. असे मला एकट्या सोडून जाऊ नका.

तीन्ही त्रिभूवणी।

मज नाही कोणी 

म्हणे चक्रपाणी नामयाशी।।


संतांनी रुजविलेला हा प्रेमभावच वारीकरी आज जीवा पाड जपत आहेत. प्रेमामध्ये कोणत्याही लाभाची अपेक्षा नसते. तशीच पांडुरंगाच्या दर्शनामध्ये कोणत्याही लाभाची अपेक्षा ठेऊन वारकरी जात नाहीत. अपेक्षाच नसल्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख होत नाही. म्हणूच तो प्रेमाचा झरा कधी आटत नाही. शेकडो वर्षानंतरही तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचाच विराट ओघ वेगवेगळ्या संतांच्या पंढरपूरकडे जाणा-या दिंड्यांमधून पहायला मिळतो. 

- शामसुंदर महाराज  सोन्नर

संपर्क:

9892673047

9594999409

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला