सनराईज इंग्लिश स्कुल मधून सक्षम विद्यार्थी व उद्याचे सुजाण नागरिक घडतील - डॉ.अरुण गुट्टे
सनराईज इंग्लिश स्कुल मध्ये स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा
परळी वैजनाथ प्रतिनिधी:-
येथील परिवर्तन युवा मंच संचलित सनराईज इंग्लिश स्कुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.सनराईज इंग्लिश स्कुल मधून सक्षम विद्यार्थी व उद्याचे सुजाण नागरिक घडतील असे प्रतिपादन परळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण गुट्टे यांनी व्यक्त केले.ते सनराईन इंग्लिश स्कुल आयोजित स्वातंत्र्य दिन महोत्सवात बोलत होते .पुढे बोलतांना ते म्हणाले की,विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक, नैतिक, बौद्धिक, शारिरीक, सामाजिक कौशल्यांची सर्वसमावेशक पेरणी करून त्यांचा संतुलित व सर्वांगीण विकास साधणे ही शिक्षकांची मुख्य जबाबदारी आहे.मुलांचे मातीशी असलेले नाते, सामाजिक बांधिलकी, कौटुंबिक जिव्हाळा, संस्कार यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलात तो राहत असलेल्या प्रदेशाची, पर्यावरणाची जाणीव निर्माण होईल. असे सक्षम विद्यार्थी व उद्याचे सुजाण नागरिक सनराईज इंग्लिश स्कुल मधून घडतील असा विश्वास परळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण गुट्टे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री.झांबरे म्हणाले की,राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय जबाबदारीचे भान विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा निर्माण होईल तेंव्हा ते मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या व आपली आव्हाने ओळखून त्याचा सामना करण्यासाठी समर्थ होतील.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस.आज आपण स्वातंत्र्यात आहोत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय संविधानाने आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. अन्याय आणि अत्याचार सहन करू नका. त्याविरोधात वेळीच आवाज उठवा. कारण आज आपण जर गप्प बसू तर उद्या परत कोणी राज्य करेल कळणार नाही. आपल्यातील न्यायाची ज्योत कायम पेटत राहू द्या.असे मत प्रख्यात सिने-नाटय दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी व्यक्त केले.
संस्था सचिव सौ. प्रियतमा मुंडे यांनी
स्वातंत्र्य दिनाचे महत्व विशद करून सनराईन इंग्लिश स्कुल म्हणजे संस्कार केंद्र असून येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात असे प्रतिपादन आपल्या मनोगतात केले.
स्वातंत्र्य दिन सोहळ्यात विविध स्पर्धेत नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मनोभावे सत्कार करण्यात आला.भाषण, नृत्य, विविध रंगी वेशभूषा आदी विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.
हा सोहळा सनराईज इंग्लिश स्कुलचे संचालक गोविंदराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. विचारमंचावर श्री.लक्ष्मीकांत कराड,फुलचंद मुंडे ,संस्था सचिव सौ. प्रियतमा मुंडे,उद्धव कराड,प्राचार्य ए. एस. रॉय यांची विशेष उपस्थिती होती.
स्वातंत्र्य दिन सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालनअनिकेत गित्ते, शुभांगी मुंडे,स्वाती चौधरी मॅडम तर आभार प्रदर्शन पांडे मॅडम यांनी केले.विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा