MB NEWS: ● चिंतनिय लेख:रस्त्यांची ऐशीतैशी......!

 रस्त्यांची ऐशीतैशी......


र्‍याच दिवसांनी स्वतःची गाडी घेऊन सहकुटुंब पुण्याला जाण्याचा योग आला. कोणत्या मार्गाने जायचे यासाठी मित्रांकडे विचारणा केली असता परळी - बीड - अंमळनेर - नगर - पुणे असे जायचे ठरले. तसे परळीहून पुण्यास जाण्यासाठी जामखेड, पाथर्डी मार्गे जाता येते पण रस्त्याची दुर्दशा पाचवीला पुजलेली म्हणून यातील बर्‍या अशा अंमळनेर मार्गे जाण्याचे ठरवले. दुपारी 1.00 वा. निघून रात्री उशीरा (बीड ते अंमळनेर फाटा रस्ता खराब असल्यामुळे) पुणे येथे सुखरूप पोहोचलो. 


दुसर्‍या दिवशी तेथील कामे आटोपून निघण्यास उशीर झाला. सौ. सोबत असल्यामुळे आणि रस्ता वळणाचा, घाटाचा असल्यामुळे आणि रहदारीचा नसल्यामुळे अंमळनेर रोडने रात्रीचा प्रवास टाळावा असा निर्णय घेतला. मग राहिले पाथर्डी मार्ग आणि जामखेड मार्ग. दोन्हीही रस्ते खराबच, परंतु रात्रीची वेळ आणि रहदारी असते म्हणून जामखेड मार्गे बीड जाण्याचे ठरविले. नगर संध्याकाळी 6.30 वा. सोडले. टाकळी काझी गावापासून अंमळनेर फाटा आल्यावर त्या मार्गे जाण्याची इच्छा झाली पण सौ सोबत असल्यामुळे हिम्मत झाली नाही. जामखेड मार्गे प्रवास सुरू केला. चिचोंडी पाटील च्या पुढे निघालो. तेथून 10 - 15 किमी पुढे गेल्यावर कड्याच्या अगोदर पासून खराब रस्ता सुरू झाला. एवढा खराब की रस्ता आहे की खड्डे समजतच नव्हते. त्यामध्ये अजून एक अडचण म्हणजे गाड्यांचे Headlights. पांढर्‍या LED लाइटला RTO साहेबांनी किंवा परिवहन मंत्रालयाने परवानगी कधी आणि कशी दिली हेच कळत नाही. त्या लाईटचा प्रकाश डोळ्यावर आला तर ड्रायव्हरला समोरचे काहीच दिसू शकत नाही. लाईटचा त्रास आणि खराब रस्ता यावरून जीव मुठीत धरून बीडपर्यंतचा हा दिव्यप्रवास कसाबसा सुखरूप रित्या पूर्ण केला. समजा अशा खराब रस्त्यामुळे आणि प्रखर लाईट मुळे अपघात होऊन नुकसान झाल्यास ती जबाबदारी कोणाची?  कडा आष्टी जामखेड सौताडा रोहतवाडी फाटा हे 60 किमी अंतर पार करण्यासाठी जवळपास 3 तास लागले. मी कसाबसा खराब रस्त्यामुळे रात्री 12.00 वा. बीडला सुखरूप पोहोचलो. नगर बीड हा प्रवास फक्त 3 तासाचा असताना 5.30 ते 6 तास लागले.


यासाठी खालील गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे.


1. पाटोदा - जामखेड - आष्टी - कडा - अहमदनगर या रोडचे टेंडर एकदाच निघाले असेल. ते काम ज्या गुत्तेदारास मिळाले त्याने काम पूर्ण का केले नाही? याचा विचार करणे आवश्यक आहे आणि त्याला सरकारने जाब विचारणे आवश्यक आहे. 


2. कोणत्याही रोडचे काम पूर्ण करण्यासाठी गुत्तेदारास कालावधी दिलेला असतो. त्या कालावधीत काम पूर्ण केले नाही तर कारवाई केली जाते. या गुत्तेदारावर काय कारवाई केली? 


3. काम कोणी व का आडवले? याचाही विचार होणे आवश्यक आहे. सहसा स्थानिक प्रतिनिधी जनतेस हाताशी धरून गुत्तेदारास त्रास देतात. अवास्तव मागण्या करतात. गुत्तेदाराकडून पूर्तता झाली तर काम व्यवस्थित पार पडते, आणि पूर्तता झालीच नाही तर काम असे बंद करण्यात येते. येथे नागरिकांच्या रोजच्या त्रासाचे नेत्यांना काहीच सोयरसुतक नसते. 


खरेतर जनताच मूर्ख आहे, जनतेने नेत्याच्या मागे फिरून स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतलेला असतो. यापेक्षा गुत्तेदारास त्याचे काम व्यवस्थित करू दिले तर काम लवकर आणि चांगले होऊ शकते. नेत्यांना कामाशी काहीही देणेघेणे नसते, फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात. 


मला तर असे वाटते की ज्या स्थानिक प्रतिनिधींनी, नेत्यांनी कामामध्ये व्यत्यय आणला आहे, विरोध केला आहे अशा सर्वांना एका ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये बसवून या रस्त्यावर फिरवून आणावे मग त्यांना तेथील नागरिकांना आणि त्या रोडवरून प्रवास करणाऱ्या माझ्यासारखा प्रवाशांना किती त्रास होत असेल हे लक्षात येईल. त्यांच्या मनामध्ये थोडीफार माणुसकी शिल्लक असेल आणि समाजसेवा करण्याची किंचीतशी इच्छा असेल तर त्यांनाच स्वतःची लाज वाटेल आणि यापुढे तरी अशा जनतेच्या हिताच्या कामामध्ये व्यत्यय आणून नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करण्याची हिम्मत करणार नाहीत. 


माझा राज्य शासनावर पण रोष आहे कारण अंमळनेर फाटा अहमदनगर रोड व्यवस्थित आहे तरीसुद्धा त्या रस्त्याचे सध्या मेंटेनन्सचे काम चालू आहे, असे का? यापेक्षा बीड ते अंमळनेर फाटा मेंटेनन्स केलेतर प्रवाशांना त्रास कमी होईल याचा विचार का केला जात नाही? जो रस्ता चांगला आहे त्याचेच मेंटेनन्स का काढले जाते? याचे गौडबंगाल काही लक्षात येत नाही. 

ही फक्त एका रस्त्याची हालत आहे असे नाही तर जवळपास सर्वच रोडची हकिकत अशीच आहे. याचा सरकारने विचार करून निर्णय घ्यावा. नाहीतर स्थानिक जनता आणि प्रवासी यांना वर्गणी करून रस्त्याचे कामे करून घेण्याची व जेवढा खर्च झाला तेवढीच टोलवसुलीची परवानगी द्यावी. तुमच्यासारखा अव्वाच्यासव्वाही टोल जनता घेणार नाही कारण जनतेलाच जनतेबद्दल कळवळा असतो एवढे सरकारने लक्षात ठेवावे.


याचा विचार करून सरकारने जनतेप्रती आणि प्रवाशाबद्दल सहानुभूती असेल तर योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.


✍️डाॅ दिपक पाठक.

परळी वैजनाथ.

-----------------------------------------------

टिप्पण्या

  1. डॉक्टर साहेब तुम्ही खूप छान रस्त्याची व्यथा मांडली आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?