MB NEWS-स्व. दिनकरराव गित्ते यांचे पुण्यस्मरण: प्रासंगिक लेख-✍️ किरणकुमार गित्ते (IAS)

शिक्षणावर अपार श्रद्धा असणारे आमचे वडील : स्व. दिनकरराव गित्ते 



आदरणीय दादांना १६ व्या पुण्यतिथदिनी भावपुर्ण श्रद्धांजली !

-----------------------------------------------------------

            १९७० च्या दशकातील कॅामर्सचे पदवीधर, आधुनिक शेतकरी,   १९८० मध्ये स्वत: खेड्यात राहून मुलांना इंग्लिश मेडीयम शाळेत पाठवणारे, सुरूवाती पासून भालचंद्र वाचनालयाचे सभासद, इंडीया टूडे साप्ताहिक वाचून देशातील अद्यावत माहीती ठेवणारे, क्रिकेटचे शौकीन, स्पष्टवक्ते अशी अनेक विशेषणे लावली तरी आमचे वडील स्व दिनकरराव गित्ते यांचे संपुर्ण व्यक्तिमत्व रेखाटता येणार नाही. 


केवळ ५२ वर्षाच्या आयुष्यात मागच्या दोन पिढ्यांच्या समस्या सोडवल्या, स्वत: गरीबीत दिवस काढताना चांगले विचार न सोडता पुढच्या अनेक पिढ्यांना पुरेल एवढी शिदोरी मागे ठेवून गेले. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करताच बॅंकेत नोकरी सहज उपलब्ध असताना ‘उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ प्रमाणे शेतीकडे वळले. दोन विहीरी खोदून बागायत शेती सुरू केली. उस, केळी, मिरची असे भरघोस उत्पन्न घेवून एकत्रित कुटुंब स्थीर केले. मात्र चार भावंडांची लग्न झाल्यानंतर विचार वेगळे झाले, कुटुंब विभक्त झाले आणि ३० एकरची शेती ६ एकर वर आली. त्यानंतर काही वर्ष अत्यंत हालाकीचे गेले. 


गावात घर नव्हते; नविन घर बांधण्याच्या ऐवजी गावापासून दूर शेतात पंधरा वर्ष राहिले पण मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होवू दिले नाही. गावाबाहेर शेतात रहाण्याचा दुसरा फायदा म्हणजे कुटुंबाचा एक विचार राहिला. भाऊबंदकीच्या कलह व हेवागाव्यापासू अलिप्त राहिलोत. जोड उत्पन्नासाठी दुभती जनावरे पाळली, परळी, गंगाखेड, सोनपेठ बाजारात बसून भाजीपाला विक्री केली. अनेक वेळी हात आखडला पण विचार आणि ध्येय कधीच खुजे झाले नाहीत. 


इंग्लिश मेडीयम शाळेची फीस जास्त असायची. दोन दोन वर्ष फीस भरणं झालं नाही. काही वेळा स्व मुंडे साहेबांनी माझ्या शिक्षणाचं नुकसान नको म्हणून स्वत: फीस भरली. इंजिनियर नेमकं काय काम करतो हे मला माहीत नसतानाही त्यांनी माझ्यासमोर स्वप्न उभा केलं आणि साकार करण्यासाठी नेहमी प्रोत्साहीत केलं. शाळेत असताना कधी परीक्षेत मार्क्स कमी जास्त झाले असतील पण मला दादांनी रागावल्याचं आठवत नाही. परिक्षांपेक्षा आपली आकलनशक्ती व ज्ञानाच्या कक्षा वाढवा असा त्यांचा अग्रह असायचा. 


११९० च्या सुमारास लातूर पॅटर्नची सुरूवात झाली होती. दहावीनंतर मी लातूरला शिकवं असा दादांची इच्छा होती. जवळ उत्पन्नाचे काहीच साधन नाही. परळी कृषी उत्पन्न बाजार समिती कडून जनावरांचा चारा खरेदी विक्रीचं लायसेंन्स काढून आडत चालवली. मला महिन्याला लागणारे ४००-५०० रुपये दादांनी एक-एक रूपया गोळा करून दिला याची मला सदैव जाणीव राहीली. 


दयानंद विज्ञान महाविद्यालयात प्रवेशासाठी मला थोडे मार्क कमी पडले तर फक्त गणिताचे मार्क बघा आणि प्रवेश द्या हा एका शेतकऱ्याचा प्रामाणिक अग्रह प्राचार्य के एच पुरोहीत सरांना मोडता आला नाही. बारावी नंतर माझा प्रवेश BITS Pilani व NIT Warangal या नामांकीत संस्थांमध्ये निश्चित झाला होता. केवळ १५,००० रुपये वार्षिक फिस न भरू शकल्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. या कॅालेजमधूनही तू चांगला इंजिनिअर होवून टाटा मोटर्स सारख्या कंपनीत जॅाब मिळवू शकशील हा दादांचा विश्वास पुढे खरा ठरला.


परंतु थोड्याशा यशाने हूरूळून जायचे नाही हीच तर दादांची शिकवण. टाटा मोटर्स मध्ये नोकरी करत करत प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली. इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस, तहसिलदार या पदांवर निवड झाली होती. मध्यंतरी महेंन्द्रा ब्रिटिश टेलेकॅाम कंपनीकडून इंग्लंडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण UPSC परीक्षेत यश मिळवून आयएएस होत नाही तो पर्यंत स्वस्थ बसू नये असं दादा म्हणत. इंग्लंडमध्ये नोकरी करत असतानाही मी आयएएस ची तयारी करत होतो. 


मला वाटायचं ५ लाख उमेदवारातून फक्त १०० जण आयएएस होतात, आपल्याला आयपीएस किंवा इतर सेवा मिळाली तर काय करायचं. परंतु, दादा म्हणत की तूझी तयारी खुप चांगली आहे आणि तू डायरेक्ट आएएस होशील. आणि झालंही तसंच. ११ मे २००५ अक्षय तृतिया दिवशी निकाल लागला. मी दादांना लॅंडलाईन वर फोन केला तेंव्हा मी एक शब्दही बोलायच्या आगोदर दादांनी माझं अभिनंदन केलं. हा असतो पालकांचा आपल्या मुलांवरचा विश्वास. 


परंतु, दैवाला सगळं चांगलं कसं बघवेल. महाराष्ट्रात माझे सर्वत्र सत्कार सुरू असतानाच ६ जून २००५ रोजी दादांना फुफुसाच्या कर्करोगाचं निदान झालं. आम्हां सगळ्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला. पुण्यात दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात ट्रिटमेंट सुरू केली. शौर्यचा जन्म १५ ॲागस्टला झाला. २२ ॲागस्टला मी मसुरीला प्रशिक्षणाला गेलो. कुठेच मन लागत नव्हतं. दादांशिवाय जगायचं हा विचार सुद्धा मनाचा थरकाप उडवायचा. त्यांना आयुष्यात कधी साधा ताप किंवा सर्दी-खोकलाही झाला नाही. कर्करोगाची तर कल्पनाही मनाला कधी शिवली नाही. 


उपचार सुरू असतानाच दादा त्रिपुराला आले. शौर्यचा पहिला वाढदिवस दहिहंडीच्या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरा केला. आम्हाला वाटू लागलं दादांनी कर्करोगाला जिंकलं. पण क्रुर शत्रु लपूनच हल्ला करत असतो. दादा आम्हाला १० ॲाक्टोबर २००६ रोजी सोडून गेले.


दादांचा शिक्षणावर असलेला प्रचंड विश्वासामुळं मला या क्षेत्रात काहीतरी करावं असं वाटायचं. योगायोगाने डी वाय पाटील त्रिपुराचे राज्यपाल झाले आणि मला अजून प्रेरणा मिळाली. महाराष्ट्रात पाच वर्ष असताना थोडा वेळ मिळाला. २०१५ साली विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीची उभारणी झाली. पत्नी उषा वेळात वेळ काढून दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल, जम्बो किड्स, आयएएस ॲकॅडमी चालवते. आई बेलंबा गावच्या सरपंच आहेत. दादांच्या स्मृती प्रित्यर्थ गावात वाचनालयाची स्थापना होतेय. 


ग्रामीण भागातील होतकरू आणि बुद्धीमान मुलांना राष्ट्रीय पातळीचं शिक्षण आपल्या तालूक्यातंच मिळतंय. परळीची मुलं शैक्षणिक आदान प्रदानाच्या माध्यमातून सिंगापूरच्या शाळेत जावून येतात. एक चांगली शाळा समाजाला ३०-४० वर्ष पुढे घेवून जाते. स्पर्धा परीक्षेच्या मुलांना पुणे दिल्लीला जाण्याची गरज पडत नाही. 


एक प्रेरणा, एक चांगला विचार केवळ आपलं कुटुंबाचा विकास नाहीतर आसपासचा समाज व परिसर बदलून टाकू शकतो हेच दादांच्या शिक्षणावरील प्रेम आणि विश्वासातून आपण अनुभवत आहोत. ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दात, 


इवलेसे रोप लावियेले द्वारी ।

तयाचा वेलु गेला गगनावरि ।।


आदरणीय दादांना १६ व्या पुण्यतिथीदिनी भावपुर्ण श्रद्धांजली !

✍️किरण गित्ते IAS

----------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !