MB NEWS: प्रा.सिद्धार्थ तायडे लिखित प्रासंगिक लेख:जागतिक रंगभूमी: नवसर्जनाची अंत:प्रेरणा

 जागतिक रंगभूमी: नवसर्जनाची अंत:प्रेरणा

दर वर्षी दि. २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमीदिन साजरा केला जातो. सर्वप्रथम १९६१ मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस जाहीर केला. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. भारतीय रंगभूमीने आजपर्यंत वेगवेगळी स्थित्यंतरे अनुभवली आहेत.

रंगभूमी (नाटक) हे वर्तमानातील क्षण जगताना आनंद आदान-प्रदान करण्याचे एक सामर्थ्यशाली माध्यम आहे. माणूस म्हणून जगताना भोवतालचा अनुभव व्यक्त करण्यासाठी अव्याहत चालणारी जादूमय प्रक्रिया आहे. अनेकांवर चटकन गारुड करणारे, परंतु खडतर साधनेशिवाय खऱ्या अर्थाने साध्याच्या जवळही पोहोचता न येणार ध्येय्य आहे. काळाच्या कसोटीवर लेखन उतरवणे हे नाटककाराच्या सर्जनशीलतेचे लक्षण असते,


आज समांतर प्रवाहाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.लोकप्रिय रंगभूमीचा वेग, पसारा, अर्थकारण, प्रसिद्धी हे सगळे दीपवणारे आहे. ती सतत झगमगत राहण्यासाठी दर वर्षी किमान दोन-तीन लोकप्रिय नाटके येणे पुरेसे असते. पण, या झगमगाटाचा निकष लावून मुंबई-पुण्याबाहेरच्या समांतर रंगभूमीकडे पाहू नये. नागरी जीवनापलीकडच्या बुचकाळ्यातील ग्रामीण-नवशहरी जगण्याचा सार घेऊन येणाऱ्या नाटकांना लोकप्रियतेच्या-चालण्याच्या निकषावर तोलून पाहिले जाते नि मग ती नाटके बाजूला पडतात. याला अपवाद फार कमी वेळा घडतात. पण, जेव्हा जेव्हा असे अपवाद मुख्य प्रवाह हिमतीने स्वीकारतो, तेव्हा तेव्हा ही कथित मुख्य प्रवाहातील रंगभूमी झळाळून गेली आहे! पण, प्रादेशिक समांतर प्रवाहाकडे तरीही फार लक्ष दिले जात नाही. सुविधा नाहीत. गावोगावी थिएटर उभारले जाण्याच्या घोषणा वल्गनाच ठरताहेत. जेव्हा हे होईल तेव्हा प्रादेशिक रंगभूमीची श्रेष्ठ-अश्रेष्ठता ठरविण्याचे कथित मुख्य प्रवाहाकडील 'अधिकार' गळून पडतील आणि तेही इकडे नाटक बघायला गर्दी करू लागतील!


मराठी रंगभूमीला जागतिक दर्जा मिळवून द्यायचा असेल तर राजकीय पाठबळ गरजेचे आहे. मराठी रंगभूमीला आता जागतिक दर्जा प्राप्त करून घ्यायचाय. त्यासाठी सर्व रंगकर्मीं प्रयत्न करीत आहेत. आज कलाकार व्यावसायिक, प्रायोगिक आणि थिएटर ऑलिम्पिकच्या निमित्ताने जागतिक स्तरावर पोहोचले आहेत. यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सर्व सहकारी रंगकर्मींचा मोलाचा वाटा आहे, याचा अभिमान वाटतो. 

मराठी रंगभूमी श्रीमंत व समृद्ध होण्यासाठी सर्वस्त्रांतून प्रयत्न व्हावे.मराठी रंगभूमी ही जगातली प्रायोगिक रंगभूमी आहे. इतर कोणत्याही भाषेतल्या रंगभूमीमध्ये इतके प्रयोग होत नाहीत. मराठी नाटकाचा प्रेक्षक अतिशय सुज्ञ आहे. नाटकाला जेव्हा हा सुज्ञ प्रेक्षक येतो तेव्हा कोठे टाळ्या द्यायच्या व कोठे विराम घ्यायचा हे त्यांना अगदी बिनचूक कळते. मराठी रंगभूमी श्रीमंत आहेच, परंतु कलाकारांना आणखी काम करण्याची गरज आहे. इतर भाषांतील थिएटर्स शोरूमसारखे आहेत. परंतु, मराठी भाषेचे थिएटर्स म्हणजे अभिनयाची शाळा आहे.

नवीन कलावंतांना चित्रपट किंवा सीरियल्सचे जे आकर्षण वाटते अशांनी रंगभूमीपासून सुरुवात करावी, तरच यश मिळेल, असे मार्गदर्शनपर शिबिर किंवा व्याख्यान रंगभूमीदिनाला आयोजित व्हावे, असे मला वाटते.

मराठी रंगभूमीकडून मला काय अपेक्षा आहेत यापेक्षा माझ्याकडून तिला काय अपेक्षा आहेत, हा विचार मला नेहमी महत्त्वाचा वाटतो. आपल्या रंगभूमीवर वेगवेगळ्या धाटणीचे विषय हाताळले गेले. यातूनच वेगळेपण जपण्याचा प्रयत्न होत आहे.

'काहीतरी वेगळे करू या' हे स्वप्न उराशी बाळगून गेली अनेक शतके ही रंगभूमी सक्षमपणे अविरत उभी आहे. काहीतरी वेगळे लिहिण्याची लेखकाची अस्वथता. एखादा वेगळा प्रयोग करावा म्हणून दिग्दर्शक अस्वस्थ असतो. एखादी वेगळी व्यक्तिरेखा मिळावी म्हणून नट अस्वस्थ असतो. एखादा वेगळा नाट्यानुभव पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेले असतात. हे 'वेगळेपण' जपण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्नशील असतो आणि म्हणूनच सिनेमा, दूरचित्रवाणी या चलचित्रांच्या आक्रमणातून रंगभूमी आपल्या अस्तित्वासाठी खिंड लढवत आहे. ही वेगळेपणाची नित्यसेवा अशीच घडत राहावी, हीच रंगभूमीदिनाला मनापासून प्रार्थना.

रंगभूमीवर अविरत काम करता करता नाटक माझा श्वास झाले आहे. प्रत्येक वेळी मला नव्याने घडविण्याचा प्रयत्न व वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न रंगभूमीने केलाय. नाटक हे स्वत:च्या अंतरंगातला सुखांत आहे. या प्रवासाच्या माध्यमातून त्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याची प्रचंड ओढ एकलेखक, दिग्दर्शक, नट व समीक्षक म्हणून मला अस्वस्थ करते. अजून बरेच शिकायचेय, आत्मसात करायचेय व मिळवायचेय. ज्याच्या स्पर्शाने माझ्या जीवनाला नवा अर्थ मिळाला, त्या ग्रीन-विंगेपासून रंगमंचावरच्या प्रत्येक सजीव अस्तित्वाला माझे शतश: अभिवादन!

मराठी रंगभूमीवर सध्या अनेक प्रयोग होताहेत. परंतु, ते फक्त नाटक या संकल्पनेपुरते मर्यादित आहेत. कादंबरीच्या भागांचे अभिवाचन, ज्येष्ठ कवींच्या कवितांवर आधारित नाट्यप्रयोग-नाट्यरुपांतर. छोटे-मोठे स्कीट्स, इतर भाषेतल्या साहित्यकृतींवर आधारित नाट्यप्रयोग, लेखन आणि अभिनयाचा कस लागेल अशा कसदार कलाकृती रंगभूमीवर येणे बंद झालेय. व्हाइट रॅबिट रेड रॅबिटसारखी असामान्य संकल्पना, संगीतनाटक स्पर्धा, काही निवडक रंगकर्मीं करीत असलेले प्रायोगिक नाटक या गोष्टी आजघडीला काही प्रमाणात दिलासादायक आहेत. परंतु, प्रायोगिकतेची पोकळी मोठी आहे.


मराठी रंगभूमी ही जगातील अजरामर अशी एकमेव रंगभूमी आहे. माणूस म्हणून जगलो, रंगमंच कलाकार म्हणूनच मरायचं आहे.ही भावना अनेकांच्या मनात असते.

रंगभूमी आमचे दैवत आहे. रंगभूमीने आम्हाला खूप काही दिले आहे. आम्ही ऋणी आहोत. रंगभूमीमूळे आम्ही आयुष्य जगत आहोत. आमचे रंगभूमीप्रेम शब्दातीत आहे.

रंगभूमी आणि काम करणारे रंगकर्मी यांच्यासाठी येणारा काळ फार मोठा महत्त्वाच्या संधी उपलब्ध करणारा आहे. त्याची प्रचीती आज आपल्याला दिसतेय. व्यावसायिक निर्माते नवीन नाटककारापासून नट, तंत्रज्ञांना संधी देताहेत. निर्मात्यांना यशही मिळतेय आणि हे सर्व तरुण झपाटलेले रंगकर्मी आठ-दहा वर्षांत महाराष्ट्रातील नाटक आणि रंगभूमी सकारात्मकदृष्ट्या बदलवतील, नाटकाचे एक भक्कम मार्केट तयार करतील. हे रंगकर्मी थांबणारे नाहीत. त्यांच्या या ऊर्जेचे श्रेय महाराष्ट्रभर होणाऱ्या एकांकिका स्पर्धा असून, त्यातून तावून सुलाखून निघालेले हे सर्व रंगकर्मी आहेत. ही सत्य परिस्थिती आपण अनुभवतो आहोत.

मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन विषय आणि तेही तरुण रंगकर्मींकडून येत आहेत. अनेक नाटकांचे प्रयोग ज्येष्ठ रंगकर्मींना भावत असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.नाटक जपणारा व नाटक जगणारा माणूस म्हणून वेगळी ओळख निर्माण करणे हेच रंगकर्मींचे ध्येय असावे.नवीन पिढीसाठी हा सांस्कृतिक, सामाजिक वारसा आहे. मराठी रंगभूमी समृद्ध होती, आहे आणि अधिकाधिक ऊर्जित अवस्थेकडे वाटचाल करीत राहील, अशी आशा आहे.

✒️ प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे,      मो.९८२२८३६६७५


-------------special report ----------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !