दोन सत्रात होणार शिबीर
शेतकरी विरोधी कायदे समजावून घेण्यासाठी किसानपुत्रांचे ४ मे रोजी अंबाजोगाईत शिबीर
▪️ फक्त ५० शिबीरार्थींचीच व्यवस्था
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)--
शेतकरी आत्महत्यासाठी कारणीभूत ठरणारे शेतकरी विरोधी कायदे नेमके कोणते आहेत आणि शेतकरी स्वातंत्र्याची न्यायालयीन लढाई नेमकी कशी सुरु आहे हे समजावून घेण्यासाठी अंबाजोगाई येथे ४ में रोजी एक किसानपुत्राचे दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात फक्त ५० शिबीरार्थींना प्रवेश देण्यात येणार असून या शिबीरात सहभागी होण्यासाठी किसानपुत्रांनी अगाऊ नांव नोंदणी करावी, असे आवाहन संयोजक सुदर्शन रापतवार आणि अनिकेत डिघोळकर यांनी केले आहे.
राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण कमी व्हायला पाहिजे यासाठी किसानपुत्र आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. शेतकरी विरोधातील जाचक कायदे रद्द केल्यानंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल, असा दावा किसानपुत्र आंदोलन मागील काही वर्षांपासून सातत्याने करते आहे. हे शेतकरी विरोधी कायदे नेमके कोणते आहेत व ते रद्द करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली न्यायालयीन लढाई नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे, याची सामान्य शेतकरी, शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या लहानमोठ्या कार्यकर्त्यांना माहीत व्हावे, यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने राज्यभर किसानपुत्राच्या शिबीराचे आयोजन करणार आहे.
याचाच एक भाग म्हणून येत्या ४ में रोजी अंबाजोगाई येथे एक दिवसीय किसानपुत्राचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबीर चालणार आहे. मोजक्या ५० किसानपुत्रांना या शिबीराचे सहभागी होता येणार आहे. या कालावधीत शिबीरार्थींना दोन वेळेस चहा व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या शिबीरातील पहिले सत्र सकाळी ९:३० वाजता सुरू होणार असून "शेतकरी विरोधी कायदे" या विषयावर मुख्य मार्गदर्शक अमर हबीब हे मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर सकाळी ११:३० ते १२:३० या कालावधीत होणार असून या सत्रात "शेतकऱ्यांची न्यायालयीन लढाई" या विषयावर अमृत महाजन हे माहिती देतील.
दुपारी १२:३० ते १:०० या कालावधीत जेवण होणार असून दुपारी दुसरे सत्र १ वाजता सुरू होणार आहे. दुपारी १ ते ३ या कालावधीत "सर्जकांचे स्वातंत्र्य" या विषयावर अमर हबीब हे सर्जकांच्या स्वातंत्र्याविषयी बोलणार आहेत. तर ३ ते ४:३० या कालावधीत शिबीरार्थींची मनोगते, प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता प्रमाणपत्र वाटपाने शिबीराची सांगता होणार आहे.
हे शिबीर फक्त ५० किसानपुत्रां साठीच असणार असून १ ते ५० अनुक्रमानुसार नांव नोंदणी सुरु करण्यात आली आहे. १५ किसानपुत्रांनी आपली नांवे नोंदवली आहेत. उर्वरित किसानपुत्रांनी आपले नांवे त्वरीत नोंदवावीत असे आवाहन संयोजक सुदर्शन रापतवार आणि अनिकेत डिघोळकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा