सहा महिन्यांनंतर धनंजय मुंडे सभागृहात बोलले; अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद मांडणी!
परळी वैद्यनाथ औष्णिक विद्युत केंद्रातील बंद संचांच्या जागेत उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प
नवीन नववा संच उभारण्यातील तांत्रिक अडचणी समजून घेत त्या दूर करण्यासाठी लवकरच व्यापक बैठक
धनंजय मुंडे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली विधानसभेत घोषणा
मुंबई (दि. ०८) - आज विधानसभेत आ. धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील बंद असलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्याचे घोषित केले आहे. त्याचबरोबर याच औष्णिक विद्युत केंद्रात शिल्लक असलेल्या जागेत नवीन नवव्या संचाची उभारणी करण्याबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यावर आज चर्चा झाली असली तरी या संदर्भात एक व्यापक बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वासनही श्री फडणवीस यांनी दिले आहे.
परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रात निष्कासित करण्यात आलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेवर अधिक क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्याद्वारे हरित ऊर्जा निर्मिती केली जावी, त्याचबरोबर संच क्रमांक ८ च्या तुलनेत अधिक वीज निर्मिती क्षमता असलेला संच क्रमांक ९ नव्याने उभारण्यात यावा अशी मागणी आज तारांकीत प्रश्नाव्दारे उपस्थित केली, त्यास श्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले.
नवव्या संचाची उभारणी करण्याबाबत धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार शासनाने विचार केला असता, विजेची मागणी, कोळसा खरेदी मधील भावाची तफावत, कोळसा वाहतुकीस लागणारा खर्च आदी तांत्रिक अडचणी असल्याचे श्री फडणवीस यांनी नमूद केले.
त्यावरून धनंजय मुंडे यांनी प्रचलित पद्धतीने कोळसा खरेदी करणे ऐवजी वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड किंवा महानंदी कोल्डफिल्ड लिमिटेड यांच्याकडून तोच कोळसा कमी दरात उपलब्ध केला जाऊ शकतो, शिवाय आवश्यक जमीन, पाणी आदी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध असून, याद्वारे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
यावेळी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीला मान्यता देत असल्याचे सांगत नवीन नवव्या संचाची उभारणी करणे संदर्भात एक व्यापक बैठक घेऊन त्यात सर्व मुद्दे व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून, योग्य सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे.
सहा महिन्यांनंतर धनंजय मुंडे सभागृहात बोलले; अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद मांडणी!
दरम्यान महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे सहा महिन्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात प्रथमच तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून भाषण केले; अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी, संयमी पण प्रखर बोलणे, मुद्द्याशी खिळून राहणे व ठेवणे, सभागृहाचा डेकोरम सांभाळणे या सर्वच बाबींची काळजी घेऊन सभागृह गाजविणारे धनंजय मुंडे आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा