प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख...

अष्टपैलू बडे नाना: एक माणुसकीचं झाड ज्यांनी आपल्या अष्टपैलू प्रतिभेने आणि निरपेक्ष वृत्तीने अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले आहेत असे व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ(नाना)बडे. नाना हे केवळ एक नाव नाही, तर ते उत्तम शिक्षक, उपक्रमशील केंद्रप्रमुख, तरल कवी, भावस्पर्शी कथाकार, हरहुन्नरी कलावंत, एक चांगला माणूस, कुशल संघटक, पक्षीमित्र, आदर्श पिता, पती, पुत्र, सासरा, आजोबा, बंधू, सुहृदयी मित्र आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचं झाड आहेत. त्यांच्या या विविध भूमिकांमधून त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांवर आपला अमिट ठसा उमटवला आहे. *प्रतिभावंत ग्रामीण साहित्यिक:* महाराष्ट्राला ठाऊक असलेलं नाव नागनाथ बडे, हे नाव महाराष्ट्राला प्रतिभावंत ग्रामीण साहित्यिक म्हणून परिचित आहे. मराठवाड्यात नवसाहित्यिकांची एक मोठी पिढी ज्यांच्यामुळे उभी राहिली, त्यात नानांचं नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या लेखनात एक सोज्जवळ व सात्विक वृत्तीचा अभ्यासक दडलेला दिसतो. समाजातील आपला भवताल सुखी, समृद्ध आणि समाधानी रहावा यासाठी नाना नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. आपल्या स्नेह्यांना सर्व प्रकारची ...