आषाढीवारी / प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे यांचा विशेष ब्लॉग: 'मी समतेचा वारकरी, सेवा हीच माझी पंढरी’ : हभप दशरथ महाराज सिनगारे

 'मी समतेचा वारकरी, सेवा हीच माझी पंढरी’ : हभप दशरथ महाराज सिनगारे




 महाराष्ट्रसह देशाला संतांच्या विचारांची गरज आहे. संतांनी दिलेला विचारच देशाला तारून नेईल. संत विचाराची आज खरी गरज आहे, असे "ह.भ.प. दशरथ महाराज सिनगारे" बर्दापूरकर यांचे मत आहे .महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर,संत नामदेव, ,संत एकनाथ,संत तुकाराम, संत सावता माळी, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सेना महाराज, संत नरहरी सोनार,संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आदी अनेक संत येथे होऊन गेले.आपला मराठवाडा तर अनेक साधू-संत-महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे. सध्या माणसा-माणसांमधील माणुसकी संपून जात असून अशा परिस्थितीत संतांचे विचार वाचा, त्याचे अनुकरण करा, तेच देशाला सद्य परिस्थितीतून दूरवर घेऊन जातील,खरा मार्ग दाखवतील आणि महाराष्ट्राच्या पूर्वीच्या आगळ्या-वेगळ्या परंपरेला पूर्ववत आणून ठेवतील.अशी "हभप दशरथ महाराज सिनगारे बर्दापूरकर "यांची धारणा आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील" बर्दापूर "या छोट्याशा गावात तुकाराम किसन सिनगारे आणि लक्ष्मीबाई तुकाराम सिनगारे यांच्या पोटी दशरथ सिनगारे यांचा जन्म झाला. लक्ष्मीबाई यांचे माहेरचे नाव लक्ष्मी विठोबा घोडके. 

"जाता पंढरीशी सुख वाटे जीवा!!" या अभंगाची ओढ असलेल्या सांप्रदायिक संस्कारात वाढलेल्या लक्ष्मीबाईंनी  पंढरी-आळंदीची नित्यनेमाने पंचवीस वर्षे वारी केली.ही वारीची परंपरा आजतागायत सुरू आहे."हभप दशरथ महाराजांचे वडील धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांच्यावर अध्यात्मिक संस्कार आपोआप झाले. त्यांचे आजोबा किसनराव साधू सिनगारे यांना संप्रदायाची विशेष गोडी होती. ग्रंथराज ज्ञानेश्वरी,हरिपाठ, संत तुकाराम गाथा, काकडा, भजन,अभंग आदी रोजच कानावर पडत असे. त्याची फलश्रुती म्हणूनच "हभप दशरथ महाराज "यांच्या सांस्कृतिक-अध्यात्मिक जाणिवा विकसित होऊ लागल्या. भजन-कीर्तनात रममाण होणारे सिनगारे कुटुंब आनंदाने उपजीविका करीत आहेत. त्यांच्या वडिलांनी शिक्षणाला महत्व दिले. त्यांचे आई-वडील शेती, मळा फुलवून काबाड कष्ट उपसून उदरनिर्वाह करीत असायचे. आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं हे स्वप्नं उराशी बाळगून त्यांनी मुलांचे संगोपन केलं.चारही मुलं अर्थातच संदीपान, प्रभू, दशरथ आणि विनायक यांना शिक्षण व संप्रदायाचे धडे दिले. दोन एकर शेती आणि मोठं कुटुंब. परिस्थितीशी दोन हात करीत आई- वडिलांनी मुलांना घडविले.कालांतराने वडिलांचे छत्र हरपलं.आई लक्ष्मीबाई यांनी न खचता मुलांचे संगोपन केले. शेती करून भाजीपाला विकून कुटुंबाचा सांभाळ केला. माऊलीने लेकरांना संस्कारित केले. सर्वच मुले चांगली निघाली. सर्वांनी मिळून मिसळून शेती

 सांभाळली.शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात तळेगावचे "श्री.बाळासाहेब गरड" गुरुजींचे बहुमोल योगदान लाभले.

"हभप दशरथ महाराज" यांची कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांनी हेरली. गरड गुरुजींनी पारंपरिक शिक्षण आणि भजन-कीर्तनाचे धडे दिले. आदरणीय गरड गुरुजींनी आपल्याला घडवून उभे केले असल्याची कृतज्ञता ते आजही व्यक्त करतात.त्यांनी अभंगाची गोडी लावली.रसाळ वाणीने ज्ञान दान केले. सूर-लय-ताल याचे प्रशिक्षण दिले.आदरणीय गरड गुरुजी यांना काही कारणास्तव गाव सोडून जावे लागले तेंव्हा छोट्या दशरथ महाराजांचे डोळे पाणावले ,हुंदका अनावर झाला. आपले शिक्षण पूर्ण होणार नाही ,पुन्हा असा गुरू लाभणार नाही या काळजीने  ते चिंताक्रांत झाले.अशा परिस्थितीत गुरुजी पुन्हा परतले. सर्वांचा आनंद गगनाला भिडला. गुरुजींनी दिलेले धडे रियाज करून "हभप दशरथ महाराजांनी" आत्मसात केले. आवाजातील गोडवा वाढला. नव्या उमेदीने संगीत साधना केली.भक्ती मार्ग अवलंबून जीवनक्रमण केले.

आईच्या आग्रहाने पानगाव येथील आबाराव घोलप(सुपेकर) यांची सुकन्या पद्मिनी यांच्याशी विवाह संपन्न झाला.त्यांच्या संसार वेलीवर उषाताई, संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे,प्रगतिशील शेतकरी ओमप्रकाश सिनगारे,वाचातज्ञ  सारिका ही फुलं उमलली. सर्व मुलांना सुशिक्षित-संस्कारित करून मुख्यप्रवाहात आणले."हभप दशरथ महाराजांचा" समृद्ध वारसा जपत त्यांचे सुपूत्र संगीत अलंकार प्रा.शंकर सिनगारे शैक्षणिक-सांस्कृतिक क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करीत आहेत. शैक्षणिक-सांगीतिक क्षेत्रात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.

 पद्मिनबाई सिनगारे यांनी हभप दशरथ महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट उपसले. माळरानावर नंदनवन फुलविले. नातवंडं म्हणजे दुधावरील साय. 

"विठू माझा लेकुरवाळा

संगे गोपाळांचा मेळा"

अनिकेत ,राधा ,सुरमयी, श्रीमई,स्नेहल, अस्मिता, अंशुमन, गोपिका, सिद्धी, समृद्धी आणि सर्वेश ही  नातवंडं अंगा खांद्यावर खेळवत त्यांचा जीवन प्रवास सुरू आहे.

 "कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, 

बघून घे सख्या त्या मूर्ती सावळ्या पांडुरंगाची!!"

वैष्णव धर्माची पताका खांद्यावर घेऊन विठू नामाचा गजर करीत "हभप दशरथ महाराज "नाम स्मरणात तल्लीन असतात. हभप गौतम महाराज हिंगणे यांच्या समवेत गायनाचार्य श्री. जायभाये आणि हभप दशरथ महाराज यांनी साथसंगत करून सेवा आरंभ केली. हभप अर्जुन महाराज उगले नांदेवलीकर यांच्या कीर्तनात सहभाग घेऊन बहारदार रचनांचे सादरीकरण केले. वयोवृद्ध भजनी मंडळ कलावंत म्हणून त्यांना मानधन मिळते.हा पांडुरंगाचा प्रसाद असल्याचे ते सांगतात.

पंचक्रोशीत प्रख्यात असलेले हभप अर्जुन महाराज लाड होळकर यांच्या कीर्तनात चाली गायन केले. हभप विजयानंद महाराज सुपेकर यांच्या समवेत साथ संगत करत उत्तम चाल गायन केले तसेच हरिभक्त परायण रंगनाथ महाराज राडीकर यांच्या समवेत कीर्तनात सहभागी होऊन साथ संगत केली. अरुण महाराज बर्दापूरकर यांच्या समवेत गीत गायन केले. वारकरी शिक्षण संस्था  अंतर्गत सामाजिक-अध्यात्मिक क्षेत्रात कार्य सुरू आहे.हभप अशोक महाराज पुरी या गुरूंचे आपणास मार्गदर्शन लाभले .हरिभक्त परायण अमित महाराज पुरी बर्दापूरकर यांच्या समवेत आपण नित्यनेमाने कीर्तनामध्ये गायन सेवा केली आहे .हरिभक्त परायण पांडुरंग महाराज कोकाटे नांदगावकर यांच्या समवेत चाल गायन करून कीर्तन सेवा अविरतपणे सुरू आहे .या सांप्रदायिक सेवेत खरा आनंद लाभतो. असे आपले मत आहे. नामस्मरणाने दुःखाचे निवारण होते विठू नामाच्या गजराने मन आनंदी होते आणि जीवनात समाधान लाभते अशी हरिभक्त परायण दशरथ महाराज सिनगारे बर्दापूरकर यांची धारणा आहे. गुरुबंधू श्री. सूर्यकांत पांचाळ गुरुजी यांच्या समवेत पंचक्रोशीत कीर्तन ,भजन, गायन सेवा आपण करीत आहात.संत परंपरा, वारकरी संप्रदाय,अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार यातून आपणास आत्मिक आनंद मिळतो. सांप्रदायिक सेवे बरोबरच आपणास सामाजिक कार्यातही विशेष अभिरुची आहे. आपण अनेक गरजवंतांना नेहमीच सहकार्य व सढळ हस्ते मदतकरीत असतात.पखवाज वादक हरी भक्त परायण मुकुंद अप्पा सिनगारे यांचीही आपणास साथ संगत लाभली आहे.त्याचबरोबर प्रभाकर चिंचोळे यांचीही गायनात साथ आपणास सातत्याने मिळते.

" पंढरीची वारी आहे माझे घरी

 अनेक न करी तीर्थव्रत 

वृत्त एकादशी

 करेन उपवासी

 गाईन अहरनिशी

 मुखी नाम "

या याची प्रचिती आपणास" हरिभक्त परायण दशरथ महाराज सिनगारे बर्दापूरकर" यांच्या आचरणातून पहावयास मिळते.

" भेटी लागी जीवा

 लागलीसी आस

 पाहे रात्रंदिवस वाट तुझी "

आषाढी-कार्तिकी निमित्त सावळ्या पांडुरंगाची भेट घेण्याची ओढ यातून प्रतीत होते.  विठू माऊलीचा गजर करीत वारीमध्ये सहभागी झाल्यास भूक तहान हरवते .अवघे जीवन विठूमय होते. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने पाय आपोआप चालू लागतात. मनी ध्यानी फक्त विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठलच.! सद्यस्थितीत पैसा कमावणे या लालसेपोटी काही मंडळी व्यस्त आहेत. पण आपण सत्याची कास धरून केवळ नामस्मरणात लीन होऊन सांप्रदायिक वाटचाल करावी. अशी आपली तत्वप्रणाली आहे.

मराठवाड्यातील बर्दापूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील ग्रामस्थांना सोबत घेऊन आपण सावतामाळी मंदिर परिसरात भजन कीर्तन यात रममान झालेले आहात. 'महिला भजनी मंडळ 

बर्दापूर' याची स्थापना करून आपण नित्यनेमाने त्यांना मार्गदर्शन करीत आहात. आपली ही सेवा एका तपापासून सुरू आहे. यामध्ये आपण हरिपाठ ,भजन ,काकडा ,अभंग नित्यनेमाने सादर करत असतात.

"आमची माळीयाची जात 

शेत लावू बागायत...

 आम्हा हाती मोट नाडा,

पाणी जाते फुल झाडा"

 संत सावता माळी यांच्या अभंग रचनेची उक्ती नव्हे तर कृतीयुक्त सेवा आपण करीत आहात. 

 महिला भजनी मंडळाच्या मार्फत आपण सेवा देत आहात. महिला भजनी मंडळात  सौभाग्यवती अनुसया सिनगारे ,वेणूबाई सिनगारे, पद्मिनी सिनगारे, वैशाली सिनगारे ,सीताबाई शिनगारे, पार्वती सिनगारे ,पार्वती उत्तम सिनगारे, रुक्मिणी सिनगारे, अर्चना चिंचोळे ,सविता चिंचोळे ,हिरकणी चिंचोळे, रंजना सिनगारे, कावेरी चिंचोळे, आयोध्या सिनगारे, शालुबाई पांचाळ, यमुना चिंचोळे,बिटू देशमाने, अनुसया पुरी, शोभा चिंचोळे, विमलबाई काळे, जानकी चिंचोळे आदी महिला भगिनींचा सक्रिय सहभाग आहे.सर्वश्री प्रल्हाद चिंचोळे ,सावन चिंचोळे, संभाजी सिनगारे, रामकिशन महाराज घोडके, हरीओम ज्ञानेश्वर पांचाळ, बालासाहेब सिनगारे आदी समविचारी बांधवांना सोबत घेऊन आपले कार्य निरंतर सुरू आहे.

 महात्मा ज्योतिराव फुले यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव आपल्या एकूणच व्यक्तिमत्त्वात आढळतो.कर्मकांड फेटाळून नाम साधनेचे महत्व अधोरेखित   करण्यासाठी बहुतेक संतांनी हरीपाठ लिहिला. त्यातील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हरीपाठ तर वारकरी नित्यपाठ करतात.जगत गुरू तुकाराम महाराज म्हणतात,

"ठाईच बैसोनी करा एक चित्त

आवडी आनंत आळवावा,

न लगती सायास जावे वनांतरा

सुखे येतो घरा नारायण!!

मनोभावे नामस्मरण केल्यास सुख लाभते.हीच शिकवण वारकरी संप्रदायाने अंगिकरून चालले मार्गक्रमण करावे असे "हभप दशरथ महाराज" सांगतात.

आम्हां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥१॥

शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥

तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥

जगतगुरु तुकोबांच्या अभंगाने शब्दांची शक्ती अधोरेखित केली आहे. आपण शब्द तोलून-मोलून वापरले पाहिजेत. थोरामोठ्यांचा आदर करावा अशीही शिकवण हभप दशरथ महाराज देतात.

"होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी"

पंढरीची वारी ही भगवंताच्या नामाचा गजर करीत चालत असल्यामुळे आपल्या प्रत्येक पावलावर सुख-समाधान लाभते. वारीचा आनंद शब्दातीत. आपण सर्वांनी ती अनुभूती घ्यावी असा ते आग्रह धरतात.हभप दशरथ महाराज वारकरी परंपरा वाढविण्याचे काम, कीर्तन, भजन, अभंग रचनाच्या माध्यमातून करत आहेत. 

‘मी समतेचा वारकरी,

 सेवा हीच माझी पंढरी’ 

या नीतीने मार्गक्रमण करणारे "ह.भ.प . दशरथ महाराज सिनगारे "यांचे विचारधन मोलाचे आहे.समतेचा विवेकी जागर घालणाऱ्या "ह.भ.प. दशरथ महाराज सिनगारे" बर्दापूरकर यांचे चरणी माझा दंडवत!.. ...


© प्रा.डॉ. सिद्धार्थ आबाजी तायडे

(लेखक कला साहित्य संस्कृतीचे अभ्यासक आहेत)

9822836675

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !