नामविस्तार दिन :✍️प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष ब्लॉग >>>> डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार : लढा अस्मितेचा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार : लढा अस्मितेचा


हाराष्ट्रात राज्य स्थापन करणाऱ्या बहुतेक राजांनी आपल्या राजधान्या मराठवाड्यात किंवा त्याच्या आसपास स्थापन केल्या होत्या. अनेक संत विद्वानांच्या पदस्पर्शाने या मराठवाड्याचा प्रदेश पावन झाला आहे .महाराष्ट्राच्या सामाजिक-धार्मिक- सांस्कृतिक -राजकीय जडणघडणीत मराठवाड्याचे फार मोठे योगदान आहे .त्या अर्थाने मराठवाड्याचा इतिहास दैदिप्यमान आणि स्फूर्तीदायक मानला पाहिजे.  ऐतिहासिक दृष्ट्या मराठवाडा हे नाव फार जुने नाही इसवीसन १८६४ च्या कागदपत्रात या प्रदेशाला "मराठवाडी" असे संबोधलेले आढळते. मराठी शब्दकोशात उपरोक्त नोंद उद्धृत केलेली आहे .डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांच्या मते," मराठवाडा हे प्रादेशिक नाव असून त्याचा अर्थ मराठी बोलांचा भूप्रदेश असा होतो." पूर्वीच्या हैदराबाद राज्यात बहुभाषिक भूप्रदेशाचा समावेश होत होता. त्या भागांना त्यांच्या बोलीभाषे वरून ओळखले जात होते. त्यावरून मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक असे भिन्न भाषिक भूप्रदेश साकार झाले .वास्तविक या प्रदेशाच्या परिसीमा इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात निश्चित नव्हत्या. वरील प्रमाणे मराठवाडा या नामा संबंधी मतभेद दिसून येतात .तरी आजमितीला मराठी बोलणाऱ्यांचा प्रदेश म्हणजे मराठवाडा एवढे मात्र मान्य करावे लागते.

मराठवाडा आणि दलित समाज:-

 तत्कालीन दलित समाज एकीकडे अज्ञान दारिद्र्य खितपत पडलेला होता तर दुसरीकडे सरंजाम व्यवस्थेचे मानेवर 'जू' घेऊन जगत होता. सर्व हक्कांपासून वंचित असलेल्या या दलित जातींना उच्चनीचतेच्या रोगानेही अधिकच पछाडलेले होते .विसाव्या शतकात सुधारणेची लाट आली .परंतु दलित अंतर्गत जातिव्यवस्थेची पाळेमुळे उन्मळून पडली नाहीत. हिंदू समाज व्यवस्थेत एका मोठ्या जनसमूहाला अस्पृश्य किंवा मागासवर्गीय संबोधले जाते. सायमन कमिशनने यांना 'शेड्युल कास्ट' असे नामाभिधान दिले .आपल्या जातीच्या सामाजिक आणि पारंपारिक मूल्यांना टिकवून ठेवण्यासाठी दलित समाज कोणतीही किंमत देण्यास तयार असे. परंपरेने चालत आलेल्या रूढी -परंपरा जाती शुद्धता व मर्यादा टिकवून ठेवण्याचे काम गाव पंचायत व जात पंचायती करीत होत्या.


 मराठवाड्यातील शैक्षणिक संघर्ष:-

 माणसाच्या व समाजाच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने तत्कालीन पारंपरिक शिक्षण केवळ कुचकामी होते असे नाही तर ते माणसाला परंपरावादी बनवित होते. दलित समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी आपली आहे असे भारतीय सत्ताधीशांना कधीच वाटले नाही. त्यामुळे तळागळातील वंचित वर्ग शिक्षणापासून वंचित राहिला. मराठवाड्यातील शैक्षणिक विकासाची गती बरीच काळ थांबून राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात," मुसलमान व ख्रिस्ती लोक धर्म वृद्धीसाठी इतरांना शिक्षण व संस्कार देतात त्यात त्यांचा स्वार्थ असला तरी ते हिंदूं सारखे शूद्र मनोवृत्तीचे नाहीत." कालांतराने अस्पृश्य नेत्यांच्या सततच्या मागण्या, निवेदने या सर्वांचा एकंदर परिणाम होऊन दलितांच्या शिक्षणाकरिता काही तरतुदी करण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविले .त्यावेळी 'डिप्रेस्ड क्लास वेल्फेअर फंड' यामधूनच कर्जाची मागणी केली होती .त्यानुसार २३ मे १९४९ रोजी एज्युकेशन सोसायटीस बारा लाख रुपये कर्ज मंजूर झाले. आणि पुढील काळात मिलिंद महाविद्यालय उभे राहिले. शिक्षण हे माणसाच्या उन्नतीचे एकमेव साधन आहे शिक्षणामुळे माणसात आत्मविश्वास उत्पन्न होतो .आत्मविश्वास ही उन्नतीची पहिली पायरी आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद रोटरी क्लब येथील भाषणात मराठवाड्याच्या विकासाचा संबंधी काही प्रश्न उपस्थित केले व काही उपाय योजना मांडल्या. त्यात औरंगाबादला मराठवाड्यासाठी स्वतंत्र असे विद्यापीठ स्थापन करण्यात यावे व शिक्षणाच्या बाबतीत मराठवाडा स्वयंपूर्ण करावा हे त्यांनी अधोरेखित केले.लढा नामविस्ताराचा कथन करतांना ‘पँथर्सनी जेल भोगले, मार खाल्ला, संसार सोडले, नोकऱ्या सोडल्या, सर्वस्वी त्याग केला. दलितांचे आक्राळ विक्राळ रूप पाहून सरकारला नामांतर करणे भाग पडले. म्हणून स्वताकदीवर जिंकलेल्या या स्वाभिमानी लढाईचा प्रत्येक दलितास अभिमान वाटतो’ असे नामांतर लढ्याचे अग्रणी व माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांनी सांगितले. अनेकांच्या बलिदानाने हा नामांतर लढा यशस्वी झाला.


नामांतर चळवळ आणि दलित युवक आघाडी:- 

 मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर प्रश्नावर सर्वच दलित संघटना संघर्ष करीत होत्या .त्यामध्ये "दलित युवक आघाडीची" आगळीवेगळी भूमिका होती . प्रत्येक मोर्चामध्ये त्यांची पहिली मागणी नामांतरा संबंधीची असे. नामांतर विरोधी मंडळी नामांतराला विरोध करीत असत.त्यामुळे दलित युवक आघाडीने या आंदोलनात उडी घेतली. मिलिंद महाविद्यालयातील पहिल्या पिढीतील दलित तरुण बदलत्या अस्थिर घडामोडीवर  सतत चर्चा विचारविनिमय करत असत. आंबेडकरी विचारांनी सर्वजण भारावलेले असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांचा चुराडा होताना ते पाहू शकत नव्हते. अन्याय- अत्याचाराविरुद्ध 'जशास -तसे  ठोशास ठोसा' या विचाराने प्रेरित होऊन इसवी सन १९७०-७१ मध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरात जुन्या नेतृत्वाला झिडकारून  तरुणांनी एक  संघटन निर्माण केले ते म्हणजेच 'दलित युवक आघाडी' होय.यात   प्रा. अविनाश डोळस,प्रा. एस. के. जोगदंड,प्रा. प्रकाश शिरसाट ,डॉ. सुखदेव थोरात,प्रा. रायमाने,  सुखदेव भुंबे  ,ऍड. अनंतराव जगतकर ,प्रा. डी. जी. धाकडे,श्रीराम सोनवणे ,संभाजी जोगदंड प्रा. मधुकर इंगोले ,प्रा. मधुकर बडे,अभिमान सोनवणे, दासू चव्हाण,गरुड ,श्याम थोरात, बाबू वैरागे, श्रीरंग थोरात ,डॉ. अशोक मजमुले, ऍड. पाखरे, प्रभाकर कांबळे, प्रा. मोतीराज राठोड, बलभीम तरकसे,भारत जोगदंड ,वसंत उगले,बाबासाहेब सरवदे, भीमराव वाघचौरे,शिवाजी वाघमारे, मोतिराम चोपडे, दशरथ मकासरे  इत्यादीसह  मंगलताई मोरे, सुचिता सोनवणे,सुधाताई जोगदंड, कोंडबाई वाघचौरे या महिलांचाही  समावेश होता. या सर्वांनी दलित युवक आघाडीत मोलाचे योगदान दिले .रिपब्लिकन पक्षात खुर्ची आणि पदावरून फूट पडली तो अनुभव लक्षात घेऊन दलित युवक आघाडीने अध्यक्ष, सरचिटणीस वगैरे पदवी ठेवलीच नाहीत .मात्र संयोजक पद निर्माण करून त्याच्या नेतृत्वाखाली सर्वांनी काम करण्याचे ठरविले.

     औरंगाबाद मध्ये स्थापन झालेल्या या आघाडीचे केंद्र मात्र प्रा. माधव मोरे यांच्या नेतृत्वामुळे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ठरलेले दिसते. पण दलित युवक आघाडीचे कार्यक्षेत्र तेवढेच राहिले नाही तर ती महाराष्ट्रातील औरंगाबाद ,बीड ,परभणी, नांदेड ,बुलढाणा ,वाशीम, अकोला आणि नाशिक इत्यादी शहरात विस्तारले.दलित युवक आघाडीचे नेतृत्व उच्चशिक्षित होते .कार्यकर्तेही सुशिक्षित. तळागाळातून आलेले होते. काही विद्यार्थी होते. दलित पँथरच्या अगोदर स्थापन झालेल्या दलित युवक आघाडीने मराठवाड्यातील सामाजिक ,आर्थिक ,सांस्कृतिक आणि शैक्षणिक समस्यांवर आंदोलने उभी केली. प्रा. एस.के. जोगदंड यांच्यामते," दलित युवक आघाडी नॉन पोलिटिकल संघटना होती." दलित दलित युवक आघाडीने उच्चवर्णीयांचाही नामांतराला जोरदार पाठिंबा मिळविला होता. त्यात ऍड. पांडे, सोहनी ,कॉम्रेड राम मुकदम, कॉम्रेड गंगाधर (आप्पा) बुरांडे,डॉ. द्वारकादास  लोहिया, ऍड. देशपांडे, आमदार रघुनाथराव मुंडे, प्राचार्य सबनीस ,भास्कर लोमटे, किशनराव देशमुख,अशोक लोमटे, नरहर कचरे, व्ही. डी.देशपांडे इत्यादींचा समावेश होता .त्यांच्यापैकी कित्येक जण तुरुंगातही गेले होते. 

       दलित युवक आघाडीने सवर्णांना चळवळीत आणले.ओबीसी व भटकी मंडळीही नामांतर चळवळीच्या प्रवाहात आणली.  इतकेच नव्हे तर रंगमंदिरात नामांतरवाद्यांची परिषद घेऊन दलित युवक आघाडीने 'नामांतरवादी कृती समिती' स्थापन करण्यास पुढाकार घेतला.दिनांक २७ जुलै १९७९ रोजी दलित युवक आघाडीच्या निघालेल्या मोर्चाच्या निवेदनात पहिलीच मागणी नामांतर ठरावाच्या अंमलबजावणीची दिसते. दलित युवक आघाडीने एक अभिनव मोहीम राबविली. पत्र पाठविताना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ' असे पत्र लिहित. दलित युवक आघाडीने आपल्या कार्यक्षेत्रात अन्याय कर्त्यांना कायद्यान्वये शिक्षा केल्यामुळे बीड जिल्ह्यात नामांतर काळात दलितांना दिलासा मिळाला. दलित आघाडीचे कार्यकर्ते या विभागात पोलिसांसोबत फिरत होते. दलित युवक आघाडीने मराठवाडा विद्यापीठ प्रश्नावर सातत्यपूर्ण लढा दिला. 

        आंबेडकरी विचारांनी प्रेरित होऊन कार्य करणारे आंबेडकरी चळवळीचे आधारस्तंभ बीड जिल्हा परिषदेचे अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले पहिले सदस्य आयुष्यमान रामचंद्र (आप्पा) इंगळे भारजकर यांचेही नामांतर लढ्यातील योगदान मोलाचे आहे .त्यांनी समविचारी समाज बांधवांना संघटीत करून नामांतर लढ्यात  योगदान दिले. यात पुंडलिक भालेराव, छत्रभुज गंडले ,भानुदास भागवत ,सोपान वेडे ,दशरथ जोगदंड, ढवारे, व्हावळे ,पांडुरंग सावंत ,मुकुंद भागवत ,भारत सातपुते,नागोराव भागवत, वाल्मीक जगताप ,दशरथ जगताप, व्यंकट जगताप, रामभाऊ कसबे ,केवळबाई इंगळे, जनाबाई वेडे ,सगुणाबाई जोगदंड, सरुबाई जगताप, कस्तुराबाई सरवदे ,यमुनाबाई भालेराव आदी मंडळींनी नामांतर लढ्यात योगदान दिले.

      ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते एन. के. (आप्पा) सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ व परिसरातील युवकांनी नामांतर लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे नेते गंगाधर रोडे, भास्कर (नाना )रोडे, वैजनाथ जगतकर,धम्मानंद मुंडे,प्रा. दासू वाघमारे,सुभाष वाघमारे, प्रा. विलास रोडे, माधव ताटे,दशरथ शिंदे, राम किरवले,झिंझुर्डे, डी. जी. जोगदंड,माधवराव कांबळे, आचार्य,दिलीप उजगरे,मिलिंद घाडगे,संजय जाधव,माधव ताटे, विनोद जगतकर,रानबा गायकवाड,राजकुमार सरवदे, माधव रोडे,  यांनीही विशेष योगदान दिले. या लढ्यात युवकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेतला.  या नामांतर लढ्याचे पडसाद सर्वदूर पसरले होते. दलित युवक आघाडीने सांस्कृतिक चळवळ देखील उभी केली. 

   दलित युवक आघाडीने स्वतंत्र 'कला विभाग' स्थापन करून नामांतर चळवळीला पोषक असे संस्कृतिक कार्यक्रम सादर केले .यात कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दलित युवक आघाडीच्या कला विभागाचे प्रमुख देविदास सोनवणे हे होते. जगन जगन सरवदे ,शाहीर वडमारे ,शाहीर आत्माराम साळवे आदी कलावंत शाहीर यांनी नामांतर चळवळ बुलंद केली.अर्जुन गोरे पिंपळा,शाहीर गायक व्यंकट जोगदंड गिरवली ,शाहीर गायक,त्र्यंबक वाघमारे निरपणा, शाहीर गायक, कार्यकर्ते संपत तरकसे (भोकरंबा),रामदास ससाणे (लखमापूर),सुधाकर सुर्यवंशी शाहीर (परळी),भारत सरवदे पाटील (उस्मानाबाद), यशपाल सरवदे (उस्मानाबाद),चक्रे रेणापूर, मोहन माने,चंद्रकांत चिकटे, माजी आमदार टी.एम.कांबळे,(लातुर),विजय वाकोडे,गौतम मुंडे,भीमराव हत्तीआंबीरे (परभणी), मारोती रंजवे सोनपेठ,गौतम दादा भालेराव,रुकमाजी घोबाळे, माजी खासदार टी.एम.सावंत (गंगाखेड), रामभाऊ हजारे ( केज),बाबुराव मस्के (बीड),जगन्नाथ शिनगारे (बीड),टाकणखार,बाबुराव पोटभरे (माजलगाव),मारोती सरपते (गेवराई),मनोहर वंजारे (येळंबघाट)सुरेश दादा गायकवाड (नांदेड) आदींनी नामांतर लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.


नामविस्तार :लढा अस्मितेचा:-


मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ हे सर्वात प्रदीर्घ आंदोलन आहे. नामांतर प्रश्न इतका ज्वलनशील होता की कित्येकांना आपले सर्वस्व त्यासाठी गमवावे लागले. नामांतर लढ्याची फलश्रुती म्हणजेच  तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरद पवार यांच्या पुढाकाराने मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा झाला. नामांतराच्या श्रेयात अनेकजण वाटेकरी असल्याचा दावा करीत असले, तरी त्या श्रेयाचा फार मोठा वाटा नामांतरासाठी ज्यांनी प्राणार्पण केले ,ज्यांच्या घरादारांची -संसाराची धूळधाण झाली त्यांना जाते. जे तळहातावर प्राण घेऊन लढले, हातात निळे झेंडे घेऊन गळा फाटेपर्यंत ज्यांनी "जयभीम"च्या घोषणा दिल्या, मुलाबाळांची तमा न बाळगता तुरुंगवास पत्करला त्या सर्व भीमसैनिकांच्या त्यागाची नोंद घ्यावीच लागते .त्याशिवाय नामांतर प्रकरणाला  पूर्णत्व मिळत नाही.

          नामांतर लढा केवळ लढाच नव्हता तो दीनदलितांच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. पुरोगामित्व आणि प्रतिगामीत्व त्यातील संघर्ष होता. राज्यघटनेतील आधुनिक तत्त्वे व पारंपारिक विषमतावादी विचार यापैकी जनता काय स्वीकारणार यांचा निर्णायक असा निकाल होता.या लढ्याचा इतिहास असाच प्रेरणादायी आहे. तसेच तो दिल्या-घेतल्याचा हिशेब मांडणारा आहे. हा लढा कुणाच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारा नव्हता. कुणाचा दुस्वास करणारा तर मुळीच नव्हता.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यापीठाला नाव असण म्हणजेच विद्यापीठामध्ये, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या त्या पिढीला ज्ञानाच्या आदर्शाची जाणीव होणं होय हे खऱ्या अर्थाने लक्षात घेण्याची गरजआहे.मराठवाड्याच्या मातीतील ऐतिहासीक दिवस १४ जानेवारी मानला जात असून या दिवशी औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्यात आले आणि सलग १७ वर्ष भीम सैनिक अनुयायानी दिलेल्या संघर्ष लढयाला यश प्राप्त झालं हा नामांतराचा लढा स्वातंत्र्य , बधुत्व आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी होता.

     ज्या डॉ. बाबासाहेबांनी झोपडी-झोपडीत ज्ञानाचा प्रकाश आणला, त्या महामानवाला अभिवादन करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता.नामांतर लढा  चळवळीतील सर्व शूरवीरांना त्रिवार वंदन..!


✍️ प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे

   (९८२२८३६६७५)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !