डॉ.जे.जे. देशपांडे अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन. .......


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिलेल्या शुभेच्छा................!
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

*परळी नगरी चे शासन नियुक्त तात्कालिन लोकल बोर्ड (नगर परीषद) चे अध्यक्ष,वैद्यनाथ देवल कमेटीचे निझाम स्टेट मधील अध्यक्ष,कृषी उत्पन्न बाजार समितीचे शासन नियुक्त तात्कालिन प्रशासक परळी शहरातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व स्व.जीवनराव देशपांडे यांचा कर्तृत्ववान वारसा समर्थपणे जोपासणारे परळी शहरातील पहिले MBBS,MD डॉक्टर,शहरात सर्वप्रथम गणेशपार भागात नगर पालिकेचे आरोग्य केंद्र स्थापित करणारे डॉक्टर,प्रवरानगर वैद्यकीय महाविद्यालाय,लातुर येथील MIT मेडीकल कॉलेज च्या उभारणी मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे परळीचे भूमिपुत्र,जागतिक पातळीवर वैद्यकीय क्षेत्रमध्ये ज्यांचे अभ्यासपर,संशोधनपर प्रबंध प्रकाशित झाले,स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामधून ज्यांच्या मार्गदर्शानाखाली असंख्य डॉक्टर्स निर्माण झाले असे सरस्वतीपुत्र,जुन्या पिढी सोबतच नविन पिढीशीही एकरूप होणारे लोभस व्यक्तिमत्व आदरणीय डॉ.जे.जे.देशपांडे आमचे लाडके "जज्जुकाका" आज अमृत महोत्सवीवर्षात पदार्पण करीत आहेत आज त्यांचा 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवस असून त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दीक अंतःकरणपुर्वक शुभेच्छा..!*
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●





डाॅ. जे. जे-- एक विनम्र सेवाव्रती-----------  
          
         वैद्यकीय व्यवसायातला सेवाभाव लाेपत चालला आहे, असे एक मत तयार झालेले आहे. मात्र त्याला काही प्रभृती निश्चितच अपवाद असतात. ज्यांचा संवेदनशील स्पर्शच अर्धा आजार दूर करतात, असेही हात आपल्या समाजात आहेत अजून. त्यातले एक नाव म्हणजे डाॅ. जगदीश जीवनराव देशपांडे (डाॅ. जे. जे.). असे प्रसिद्धी परांङमुख आणि विन्रमता, शालिनता व सेवाव्रती वृत्तीने वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक कार्यातून परळीचे नाव महाराष्ट्रासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाेहाेचवलेल्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा आढावा.....
-नितीन देशपांडे परळी वैजनाथ 

      परळीतले एमबीबीएस हाेऊन एम.डी. झालेले पहिले डाॅक्टर म्हणजे जे. जे. देशपांडे. जे. जे. काकांना त्यांच्या वडिलांकडूनच डाॅक्टरी पेशाचा वारसा लाभला. खरं तर याला वारसा म्हणता येणार नाही. कारण डाॅक्टरकी वारशाने नाही तर अथक अभ्यास करून घेतलेल्या शिक्षणातून मिळवावी लागते. त्या अर्थाने वारसा म्हणता येणार नाही. मात्र तशी पार्श्वभूमी घरात हाेती. त्यांचे वडील डाॅ. जीवनराव देशपांडे हेही जुन्या  परळीतले डाॅक्टर. त्यांनी कलकत्त्याहून वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण घेतले. परळीत दवाखाना सुरू केला. पण त्याला व्यवसायाचे रूप येऊ दिले नाही. त्यात निखळ सेवाभाव त्यांनी जपला हाेता. व्रतस्थाप्रमाणे ते आपल्या वैद्यकीय क्षेत्राशी प्रामाणिक राहिले. तेच संस्कार जे. जे. काकांवर झाले. त्याकाळात परळीत एखादे भले माेठे हाॅस्पिटल तेही बांधू शकले असते. मात्र त्यांनी वैद्यकीय ज्ञानाचे कधी भांडवल केले नाही. या व्यवसायाची प्रतारणा हाेणार नाही, याची पूर्णपणे त्यांनी दक्षता घेतली हाेती. डाॅक्टरांनी पित्याचा संस्कारही आदराने जपला. ताेच संस्कार मुलगा- श्री. डाॅ. गुरुप्रसाद यांच्यावरही रुजवला. डाॅक्टरांचे परळी व परिसरात वैद्यकीय सेवा पुरवण्यात माेठे याेगदान आहे. तळावरील ग्रामीण रुग्णालयानंतर परळीची वाढती लाेकसंख्या पाहून अन्य एक उपकेंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. सावता माळी मंदिर परिसरात एक ग्रामीण रुग्णालयाचे उपकेंद्र सुरू  केले. तेथे वैद्यकीय अधिकारी असताना त्यांचा मूळचा वैद्यकीय विद्यार्थी घडवण्याचा पिंड कायम हाेता. डाॅक्टरांनी आैरंगाबादच्या घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून काम केलेले हाेतेच. रुग्णालयातही विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत असत. मला आठवतेय एकदा माझा लहान भाऊ बिपीन याला नागवेडा झालेला हाेता. घराच्या अगदी जवळच उपकेंद्र असल्यामुळे त्याला डाॅक्टरांकडे पाठवले. तेथे डाॅक्टारांनी सर्वप्रथम वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना बाेलावले. आजाराबाबत प्रश्न विचारले. त्याबाबत मार्गदर्शन केले. बिपीनला  उपचार करून पाठवले. डाॅक्टरांनी कालांतराने स्वेच्छा निवृत्ती घेतली. लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे (अधिष्ठाता) डीन म्हणून रुजू झाले. तेथे काम करीत असताना ३० सप्टेंबर १९९३ ची पहाट काळरात्र म्हणून उजाडली.  अनंत चतुर्दशीनंतरचा ताे दिवस हाेता. सारा महाराष्ट्र साखर झाेपेत असताना पहाटे महाप्रलंयकारी भूकंप किल्लारी व परिसरात झाला. ७.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाने जग हादरले. हजाराे लाेक मृत्यूमुखी पडले. सर्वत्र हाहाकार माजला. मृतदेहांचे अक्षरशः ढीग पडलेले हाेते. चिरेबंदी वाडे, घरे उदध्वस्त झाल्याने हजाराे लाेक जमिनीखाली गाडले हाेते, जखमी झाले हाेते. डाॅक्टर आपल्या चमूसह तत्काळ किल्लारी व परिसरात रुग्णसेवेसाठी धावून गेले. बीड जिल्ह्यातील मामला या गावात प्लेगसदृश रुग्ण आढळून येताच तेथे डाॅक्टारांनी भेट दिली. तेथील परिस्थितीचे अवलाेकन विद्यार्थ्यांच्या मदतीने केले. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित असे अमेरिकेतील दी लान्सेट या मॅगॅझिनमध्ये लेख लिहिला. आजपासून २४ वर्षापूर्वी हा लेख प्रकाशित झाला. त्यामाध्यमातून डाॅ. जे. जे. काका यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पाेहाचेले. मात्र याची माहिती ना परळीकरांना आहे ना त्यांच्या निकटवर्तीयांना. कुठेही बडेजाव त्यांच्या वागण्या-बाेलण्यातून झळकत नाही. बीड, लातूर, गुलबर्गा, अहमदनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिष्ठाता म्हणून काम केलेल्या डाॅक्टारांनी आपल्या वडिलांचा वैद्यकीय वारसा जसा जपला तसाच आध्यात्मिक संस्कारही ते जपत आले आहेत. मागील ५६ वर्षांपासून नैकाेट वाडीेचे माधवाश्रम स्वामींची पुण्यतिथी ते दरवर्षी अखंडितपणे साजरी करतात. गतवर्षी स्वामींवरील एक वेबसाईट सुरू केली. अशा अत्यंत निगर्वी, विनम्र, शालीन, प्रसिद्धी परांङमुख डाॅ. काकांना दीर्घायु लाभाे, हीच प्रभु वैद्यनाथ, माधवाश्रम स्वामींच्या चरणी प्रार्थना....
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


*कृतार्थ जीवनाचा मानदंड डाॅ. जे. जे. उपाख्य  दादासाहेब देशपांडे* !

             हैदराबादच्या निजामशाहीतील कसबे परळीच्या सरंजामी रीतीरीवाजाच्या वजनदार घराण्यांच्या मोजक्या कर्तुत्ववान व्यक्तींच्या यादीत स्वतःचे नाव समाविष्ट करून पुढच्या पिढीच्या स्मरणात आपले स्थान निर्माण करणे तसेच सहज शक्य नसते. कर्तुत्ववान  पूर्वजांची विरासत समर्थपणे चालवत बदलत्या काळाशी व पिढीशी आपले नाते घट्ट करीत इतिहास वर्तमान आणि भविष्याचा वेध घेऊन कृतार्थ जीवन जगण्याचे भाग्य फार थोड्या व्यक्तींना लाभते. डॉ. जे.जे. देशपांडे तथा आमचे आदरणीय दादासाहेब देशपांडे हे अशा थोड्या मधील एक भाग्यवंत. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शब्दसुमनांनी अभिष्टचिंतन.

                                 - श्रीकांत मांडे                                            परळी वैजनाथ.

     डाॅ. जे. जे. उपाख्य दादासाहेब देशपांडे यांच्या कर्तृत्वाचा संक्षिप्त परिचय स्वतंत्रपणे करण्याऐवजी वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या प्रतिष्ठित आणि वजनदार देशपांडे घराण्याचा संक्षिप्त इतिहास लक्षात घेतला तर आजच्या आधुनिक जडणघडणीत त्यांचे व त्यांच्या पूर्वजांचे किती ठळक योगदान होते हे वाचकांच्या लक्षात येईल.  निजामशाहीतील कसबे परळीचा कारभार ज्या प्रमुख देशमुख- देशपांडे वतनदार घराण्यातील व्यक्ती चालवीत असत त्यात डॉ.जे.जे. देशपांडे यांच्या पूर्वजांकडे परळी व परिसरातील जहागिरीत तिसगावे  होती. मिरवट, खडका,  पट्टीवडगाव, मूर्ती, वाकडी, जिरेवाडी या गावांमध्ये त्याकाळी रुसूम नावाची एक सारा वसुलीची पद्धत असे. जहागिरीतील या रूसुमचा कारभार देशमुख- देशपांडे संयुक्तपणे करीत असत. त्यावेळचे बुरुजावरचे देशमुख म्हणजे माजी आमदार कै. लक्ष्मणराव देशमुख यांचे घराणे. त्यांचे ज्येष्ठ बंधू कै बापूसाहेब नेहमी म्हणायचे की, देशमुख देशपांडे हे एकमेकांचे पक्के बिरादरच आहेत.
    इ.स. १८५०च्या सुमारास कसबे परळीच्या देशपांडे घराण्यातील नानासाहेब देशपांडे यांच्या अधिपत्याखाली गाव कारभार चालत असे. सरंजामी रितीरिवाजांचा पगडा त्याकाळी खूप घट्ट होता. सामान्य गावकऱ्यांवर व पंचक्रोशीतील समाजात देशमुख- देशपांडे या जहागीरदार- वतनदारांचा जबरदस्त दरारा असे. अदबीने,  मुलाहिजा राखण्याची कडक  शिस्त आणि इमाने-इतबारे कष्ट करण्याचा तो काळ होता.  जुलूम-जबरदस्ती ची वहिवाट असलेल्या त्या काळात कसबे परळीचे कारभारी नानासाहेब देशपांडे मात्र एका वेगळ्या धाटणीचे व्यक्ती होते. कुशल प्रशासक, संघटक आणि दातृत्वशिल  स्वभावाने त्यांनी सर्व समाजाला भयमुक्त करून एकोप्याने गावगाडा चालविण्याची रीत  घालून दिली.  त्यांच्याच काळात गावातील समस्त लहान थोर मंडळींना एकत्र करून त्यांनी श्री वैद्यनाथ मंदिरातील लाकडी सभामंडपाचे काम सुरू केले. या सभामंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या लाकडी खांबांना जमिनीचा आधार नाही. लोकसहभागातून इ.स. 1885 मध्ये या भव्य सभामंडपाचे काम नानासाहेबांनी पूर्णत्वाकडे नेले. झुरळे गोपीनाथाचे भुयारातील मंदिर परळी शहरात प्रसिद्ध आहे. या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या हस्ते करण्यात आल्याचा उल्लेख अनेक जुन्या कागदपत्रात आढळतो.  स्वतः मातब्बर  देशपांडे असूनही नानासाहेब त्याकाळी लोकप्रिय गावकारभारी होते. वैद्यनाथ मंदिरातील दीपमाळेच्या पश्चिमेस या कर्तुत्ववान देशपांडेंची समाधी बांधण्यात आली आहे.


    कर्तुत्ववान नानासाहेबांचे पुतणे कर्मयोगी जीवनराव देशपांडे यांना जवळून पाहण्याचा, त्यांच्या सानिध्यात काही काळ घालवणाऱ्या अगदी शेवटच्या पिढीतील व्यक्तींपैकी मी  एक आहे.  डॉ. जीवनराव म्हणजे डाॅ. जे.जे. यांचे वडील. निजामशाहीच्या अस्ताचा तो काळ ; इसवी सन 1938 मध्ये त्यांनी कलकत्ता येथून एम.जी.सि.ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवली व परळी येथे खाजगी प्रॅक्टिस सुरू केली. अर्थार्जन हे गौण होते. स्थावर जंगम मालमत्तेची मुबलकता होती. त्यांचा कल अध्यात्माकडे जास्त असल्यामुळे उदारता आणि कर्तव्यपरायणता ही त्यांच्या जीवनाची वैशिष्ट्ये ठरली. निर्भय, सत्यनिष्ठ, चिकित्सक वृत्ती व लोकसंग्रहाचा ध्यास यामुळे त्यांच्याकडे तत्कालीन परळीच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्राचे नेतृत्व स्वतःहून चालत येत असे. त्यांच्याच काळात इ. स.1940 मध्ये परळीत बाजार समितीची स्थापना झाली. या समितीचे शेतकरी प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. वैद्यनाथाच्या मंदिराचा विकास व्हावा म्हणून त्यांनी त्याकाळी बाजार समितीने शेकडा 2 आणे  वैद्यनाथ फंड  द्यावा असा ठराव मांडला होता.पुढे 1942 साली डॉ. जीवनराव  देशपांडे वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव झाले व वैद्यनाथ फंडाची सुरुवात झाली.

     परळी शहरातील आडत व्यापार ज्या  गोलाई मध्ये आहे ती  बाजारपेठ डॉ. जीवनराव देशपांडे यांच्या काळातच सुरू झाली. विशेष म्हणजे या बाजारपेठेत जेव्हा व्यापाऱ्यांसाठी फ्लाॅट्स तयार केले ते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली; पण त्यांनी स्वतःच्या किंवा नात्यातील एकाही व्यक्तीच्या नावे एकही प्लॉट घेतला नाही. याच सुमारास परळीचे रुपडे  बदलत होते. तेव्हा सरकारने (नगरपालिका) लोकल बोर्डाची स्थापना केली होती. या बोर्डाचे ते सदस्य होते. वैद्यनाथ देवल कमिटीच्या इतिहासात सलग सोळा वर्षे सचिव म्हणून काम करणारे ते एकमेव व्यक्ती होते. त्यावेळच्या हैदराबाद राज्याचे मुख्यमंत्री ना.बी. रामकृष्ण राव यांनी सन्मानपत्र देऊन डॉ. जीवनराव देशपांडे यांचा गौरव केला होता. निजामशाहीच्या अस्ताचा हा  काळ त्यांच्यादृष्टीने खूपच धकाधकीचा होता. हैदराबाद मुक्ती आंदोलन ,पोलीस ॲक्शन, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा उदय, गोवा मुक्ती आंदोलनाचे वारे अशा काळात डॉ. जीवनराव देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वातील अध्यात्मिक, सामाजिक, धार्मिक ,राजकीय ,सांस्कृतिक क्षेत्रातील नेतृत्वगुणांची खडतर परीक्षा पाहणारा तो काळ होता. दत्तवाडी नैकोटा येथील परमपूज्य माधवाश्रम स्वामींचे भक्त नव्हे  दत्तवाडी चे नियमित वारकरी असलेल्या डॉ. जीवनराव देशपांडे यांनी येथील भुयाराचा आपल्या राजकीय कार्यासाठी उपयोग केला. स्वातंत्र्यसैनिकांना भूमिगत राहण्याचे एक ठिकाण म्हणून त्यांनी नैकोटवाडीच्या या भुयारांचा उपयोग केला. तसेच परळीतील त्यांच्या जुन्या वाड्यातील लादण्यांचाही ते या कार्यासाठी उपयोग करीत. स्वातंत्र्य चळवळीतील काॅ.चंद्रगुप्त चौधरी, कॉम्रेड व्ही. डी. देशपांडे, हुतात्मा वसंतराव राक्षसभुवनकर ,तेलंगणातील अनेक वांटेड कॉम्रेड्स यांना डॉ. जीवनराव देशपांडे यांचा एकमेव आधार होता. पुढे 1950 झाली डॉ. जीवनराव देशपांडे हे परळी नगरपालिकेचे पहिले शासननियुक्त अध्यक्ष झाले. रुग्णसेवा, धर्मकारण, समाजकारण, राजकारण, संगीत साधना ते वैराग्यजीवनाचा स्वेच्छेने स्वीकार करणारे डॉ. देशपांडे यांची चरित्रकथा ही एका लेखात समाविष्ट होऊ शकणार नाही. याचे भान ठेवून त्यांचे सुपुत्र डॉक्टर जे. जे. देशपांडे तथा दादासाहेब यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख करणे उचित ठरेल.
          डॉक्टर जगदीश जीवनराव देशपांडे यांचा जन्म 7 सप्टेंबर 1943 साली झाला. परळीतील राष्ट्रीय शाळा म्हणून लौकिक असलेल्या वैद्यनाथ विद्यालयात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.  योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई येथे महाविद्यालयीन शिक्षण तर औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस पूर्ण करून तेथेच त्यांनी एम. डी. केले. ते परळीतील पहिले एमबीबीएस एमडी डाॅक्टर  होत. अधिव्याख्याता, प्रपाठक, सहयोगी प्राध्यापक अशा विविध पदावर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे प्रदीर्घ काळ सेवा केली. अंबाजोगाई येथे एस. आर. टी. वैद्यकीय महाविद्यालयात त्यावेळचे अधिष्ठाता डाॅ.  व्यंकटराव डावळे यांनी स्वतःहून त्यांची औरंगाबादहून  बदली करून घेतली व त्यांच्यावर परळी येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी सोपवली.  त्यांच्या कार्यकाळातच 1980 साली त्यांनी तत्कालीन आमदार गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून परळी येथे खंडोबाचा मळा येथे  ग्रामीण आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र इमारत मंजूर करून घेतली.  या केंद्राचा विस्तार करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेऊन ग्रामीण भागातील जनतेला शासकीय वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या. 1977 ते 1991 पर्यंत सलग 14 वर्षे त्यांनी वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात शासकीय सेवा दिली. या काळात त्यांनी स्वतःचा खाजगी वैद्यकीय धंदा केला नाही. कारण त्या काळात डॉक्टर होणे म्हणजे समाजाचा सेवक होणे, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा अशी धारणा व श्रद्धा असलेली ही एक पिढी होती. आजच्या सारखे वैद्यकीय सेवेला रूग्णसेवेला गल्लाभरू धंद्याचे स्वरूप त्याकाळी नव्हते.
    किल्लारीचा भूकंप असो, अतिवृष्टी असो, तीव्र उन्हाळा असो अशा जनतेचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या प्रसंगी डाॅ.देशपांडे हे सेवाभावी वृत्तीने अखंडपणे काम करीत असत. 1991 साली त्यांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. वैद्यकीय सेवा, महाविद्यालयीन कर्तृत्व आणि निस्पृह  वृत्तीमुळे त्यांना कोणी स्वस्थ बसू देत नसत.
 1993 साली लातूर येथे नव्यानेच सुरू झालेल्या डॉ.वि.दा. कराड यांच्या माईर्स  संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी डॉ.जे.जे देशपांडे यांना अधिष्ठाता प्राचार्य म्हणून जबाबदारी स्वीकारावी म्हणून तयार केले.
      1994 साली बीड जिल्ह्यातील मामला  या गावात प्लेगचा रुग्ण आढळल्याचे समजताच डॉ. जे.जे .देशपांडे यांनी एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना घेऊन या गावाला भेट दिली. रुग्णाची तपासणी करून 'आउट ब्रेक'  कसा असतो ते दाखवले. यासंबंधी अभ्यास करून त्यांनी संशोधनात्मक लेख लिहिला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अमेरिकेतील मॅगझीन 'दी लान्सेट' मध्ये तो प्रकाशित झाला.
       इसवी सन 2000 मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री तथा शिक्षण महर्षी ना. बाळासाहेब विखे-पाटील यांना अहमदनगर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावयाचे होते. त्यासाठी एका अनुभवी अधिष्ठाताची आवश्यकता होती. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यासाठी विखे पाटील यांना डॉ.जे.जे देशपांडे यांचे नाव सुचवले व हे वैद्यकीय महाविद्यालय उभे  करण्याची जबाबदारी सोपवली.  या कार्याबद्दल त्यांना 'ग्रेट अॅचिव्हर्स  ऑफ इंडिया' हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अत्यंत मृदू स्वभाव, शांत व कार्यमग्न असलेले आमचे आदरणीय दादासाहेब देशपांडे यांना डॉक्टर्स डे निमित्त परळी मेडिकल असोसिएशनच्या वतीने 2018 या वर्षाचा 'वैद्यनाथ जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने देशपांडे घराण्याची विरासत चालवणाऱ्या एका उमद्या वारसदारास आमच्या कोटी कोटी शुभेच्छा.!
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●




----------------------  2  ------------------------
*डॉक्टरांचे डॉक्टर : जे. जे. देशपांडे* 
         डॉ. जे. जे.  देशपांडे यांचा 75 वा वाढदिवस आज संपन्न होत आहे. डॉक्टरांचे जीवन हे अतिशय कृतार्थ  जीवन आहे. त्यांच्या संपूर्ण जीवन चरित्रातून एक प्रकारची प्रेरणा मिळते. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

                       - *अशोक भातांब्रेकर* 
                      माजी गटशिक्षणाधिकारी
                        परळी वैजनाथ.


      डॉक्टर जे. जे. देशपांडे यांच्या जीवनाची सुरुवात हे परळी इथूनच झाली. देशपांडे घराण्याचा संपन्न वारसा त्यांना लाभला. त्यांचे शालेय शिक्षण जि. प. हायस्कूल परळी येथे झाले आहे. ते दरवर्षी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत असत. शालेय जीवनातच त्यांना संस्काराचे धडे मिळाले. पुढील शिक्षण व वैद्यकीय शिक्षण त्यांनी औरंगाबाद येथे पूर्ण केले आहे. आजही त्यांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार आहे. साडेपाच फूट उंची, नीम गोरा वर्ण, बोलण्यात वेग  आणि स्पष्टपणा सतत जाणवतो.  ते सतत हसतमुख असतात. त्यांना संपन्न वडिलोपार्जित संस्काराचा वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील कै. जीवनराव देशपांडे हे परळीचे पहिले शासन नियुक्त नगराध्यक्ष  व देवल कमिटीचे अध्यक्ष होते. देशपांडे यांनी धर्मार्थ दवाखाना सुरू केला होता. अनेक वर्ष मोफत रुग्णसेवा त्यांनी केली. वडिलांचे हेच संस्कार घेऊन डॉक्टर जे. जे. देशपांडे यांनी आपल्या जीवनात वाटचाल केली.
        परळी वैजनाथ येथे जे. जे. देशपांडे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे युनिट अधिष्ठाता डॉक्टर ढवळे यांच्याकडून परळीत आणले. व रुग्णांना आरोग्य सेवा प्राप्त करून दिली. हे युनिट जुन्या तहसीलमध्ये कार्यरत होते. प्रोफेसर म्हणून अंबाजोगाई, औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी काम केले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून नगर, गुलबर्गा, बीड, लातूर येथे त्यांनी जबाबदारी स्वीकारली. लातूर येथे ते सेवानिवृत्त झाले. ते अधिष्ठाता असताना त्यांनी हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली. रेनापुर, लातूर, पानगाव, परळी येथे अनेक वैद्यकीय शिबिरे घेतली.
      या रुग्णसेवेबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे डॉक्टर जगदिष देशपांडे हे उपजत साहित्यिकही आहेत. ते कवी, लेखक आहेत. त्यांच्या कविता व लेख खूप गाजले.  त्यांचे लेख  जागतिक पातळीवर गाजले. त्यांच्या  लेखाला जागतिक  मान्यता देण्यात आली व आयोडीनयुक्त मिठाचा वापर तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर सुरू झाला.  गतवर्षी त्यांनी लिहिलेला लेख 'मंदिराची पुनर्बांधणी व  परळीतील देशपांडे कुटुंबीयांचे त्यातील योगदान' हा गाजला. वैद्यनाथ मंदिराचे वैभव त्यातूनच कळाले. संस्कृती क्षेत्रात आदर्श त्यांनी निर्माण केला. ब्राह्मण सभेच्या माध्यमातून त्यांनी परळी-वैद्यनाथ मंदिराच्या सभागृहात वीस वर्षे व्याख्यानमाला चालवली. अनेक विद्वानांना यानिमित्ताने आमंत्रित करण्यात येऊन परळीकरांना वैचारिक मेजवानी त्यांच्यामुळे मिळाली.
           डॉक्टर देशपांडे यांचे आराध्यदैवत माधवाश्रम स्वामी. माधवाश्रम स्वामींचे मंदिर त्यांनी आपल्या मळ्यात बांधले आहे. वडिलांची व स्वामींची पुण्यतिथी दरवर्षी ते त्याच ठिकाणी साजरी करतात. या ठिकाणी मराठवाड्यातील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली. संगीत क्षेत्रातील सर्व वाद्ये यांचे परिपूर्ण ज्ञान त्यांना आहे.  अनेक कलाकार त्यांचे मित्र आहेत. जुन्या काळी त्यांच्या घरी देशपांडे गल्लीत संगीत विद्यालय होते. त्या ठिकाणी  डॉक्टर देशपांडे यांचा वारसा व  पुढे चालून स्वातंत्र्य चळवळीत व राजकारणात, सांस्कृतिक क्षेत्रात  समाजसेवक डॉक्टर जगदीश देशपांडे यांना बाळकडू मिळाले. समाजसेवा बरोबरच तालुका पेन्शनेर असोसिएशन मध्ये सध्या ते मार्गदर्शक म्हणून काम करतात.
       डॉक्टर जगदीश देशपांडे जगी सर्व सुखी असा कोण आहे त्यापैकी एक आहेत. त्यांच्या जनसेवेचे व्रत त्यांचे चिरंजीव डाॅ.  गुरुप्रसाद देशपांडे हे सुद्धा सामाजिक भान ठेवून चालवत आहेत. दुसर्‍यांना आनंद देण्याचा सद्भाव, सत्यनिष्ठा व पवित्र अशा गुणांची जोपासना करणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा. शेवटी 'दिव्यत्वाची  जेथे प्रचिती,  तेथे कर माझे जुळती' असेच म्हणावे लागेल.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●



----------------------  3  ------------------------
*वैद्यकिय क्षेत्राला सामाजिक कार्याची जोड
देणारे व्यक्तीमत्व डॉ.जगदिश देशपांडे*

            डॉ.जगदीश जीवनराव देशपांडे, परळी वैजनाथ, जि.बीड. हे आज दि. 7 सप्टेंबर 2018 रोजी अमृतमहोत्सवी वर्षे पुर्ण करीत आहेत. त्यानिमीत्त त्यांचा अल्पसा परिचय करून देत आहे.           

                       -अनंत कुलकर्णी*                                            परळी वैजनाथ 



त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1943 रोजी परळी येथे झाला. त्यांचे वडील कै. डॉ. जीवराव देशपांडे हे परळीतील पहिले खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे क्वालिफाईड डॉक्टर. कलकत्याहून वैद्यकीय  पदवी 1938 घेऊन परळीमध्ये खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. 25 वर्षे रूग्णसेवा केली. व्यवसायातुन अर्थाजन गौण होते. रूग्ण सेवा महत्वाची होती. त्यावेळी परळी शहर खुपच छोटे होते. साधारण दहा हजार जोकसंख्या असावी. दररोज सकाळी आठ वाजता रूग्णसेवा सुरू होई. जे रूग्ण अतिशय अस्वस्थ आजारी असायचे व जे रूग्णालयापर्यंत येऊ शकत नसत त्यांची घरी जाऊन (डॉटरांजवळ साधी सायकलही नव्हती) तपासणी व औषधोपचार करीत व बरोबर नऊच्या ठोक्याला दवाखान्यात हजर. वैद्यकीय सेवेसाठी 24 तास तत्पर असत. डॉ. जीवनराव देशपांडे यांनी गरीबाकडुन औषधोपचाराचे कधीहि पैसे घेतले नाहीत व श्रीमंतानी त्यांना पैसे दिले नाहीत.  हे उद्गार आहेत परळी नगर परिषदेचे अध्यक्ष, बडे व्यापारी व प्रतिष्ठीत नागरीक श्री. गुरूलिंगआप्पा मेनकुदळे यांचे.

शिक्षण ः- प्राथमिक शिक्षण परळी येथील राष्ट्रीय शाळा वैद्यनाथ विद्यालय, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण शासकीय विद्यालय परळी. महाविद्यालयीन(झ.ण.उ, झझउ) शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय. अंबाजोगाई येथे. वैद्यकीय शिक्षण एम.बी.बी.एस, डी.पी.एच, एम.डी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे पूर्ण केले. डॉ.जे.जे.देशपांडे हे एम.डी. पास करणारे परळीतील पहिले नागरीक

वैद्यकीय सेवा ः- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे अधिव्याख्याता व प्रपाठक रोग प्रतिबंधक व सामाजिक वैद्यकशास्त्र विभाग. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मोबाईल हॉस्पिटल प्रमुख व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, पैठण प्रमुख म्हणुन काम केले.   मोबाईल हॉस्पिटल सिल्लोड तालुक येथे कार्यरत असताना-डोंगरगाव या गावचे सर्वेक्षण केले व तेथे असलेल्या थॉयराईड ग्वायटरचा शोध लावला. ज्याची नोंद आय.सी.एम.आर, दिल्ली या शासकीय संस्थेनेे घेतली. मराठवाडयातील पहिले थायराई ग्वायटर बेल्ट शोधण्याचो श्रेय डॉ. देशपांडे व त्यांचे सहकारी डॉक्टर्स यांना मिळाले व त्यांना ग्रेट ऍचिर्व्स आफ इंडिया या ऍवार्डने सन्मानीत केले. एस.आर.टी.आर. वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे बदली. सययोगी प्राध्यापक या पदावर अंबाजोगाई येथे कार्यरत असतानाचा परळी येथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार ठरला.

कै. डॉ. व्यकंटरावजी डावळेसाहेब यांच्या अविरत, अथक प्रयत्नाने अंबाजोगाई येथे भारतातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. शहरातील वैद्यकीय महाविद्यालयातुन प्राध्यापक वर्ग अंबाजोगाईस येण्यास उत्सुक नसत परंतु डॉ. डावळेसाहेब वैयक्तीक संपर्क करून प्राध्यापकांना अंबाजोगाई आणीत असत. त्यावेळीचे महाराष्ट्राचे मुख्यामंत्री कै. शंकरराव चव्हान व डॉ डावळीसाहेब यांची खास मैत्री असल्यामुळे शासकीय स्तरावरून अनेक कामे सुलभ होत असत.

एक दिवस डॉ डावळेसाहेब डॉ देशपांडे यांची भेट घेण्यासाठी औरंगाबाद येथे गेले व डॉ. देशपांडे  परळीचे रहिवाशी व त्यांचे वडील कै. जीवनराव देशपांडे यांचा चांगला परीचय असल्यामुळे अंबाजोगाई येतील असे वाटल्यामुळे ते डॉ देशपांडे यांच्याकडे गेले. डॉ देशपांडे यांनाही आपल्या गावाजवळ येत असल्यामुळे त्यांनी होकार दिला.कै. डॉ.डावळेसाहेब स्वतः मुबंईस गेले व अंबाजोगाई बदलीची ऑर्डर काढली. जानेवारी 1977 ला डॉ. देशपांडे एस.आर.टी.आर. वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक या पदावर रूजु झाले.

ग्रामीण आरोग्याविषयी माहिती भावी डॉक्टरांना व्हावी या उद्देशाने देशातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक ग्रामीण प्राशिक्षण केंद्र असणे बंधनकारक असते त्यानुसार अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे ग्रामीण प्रशिक्षण केंद्र परळी येथे सुरू करावे असे ठरले. परळी नगर परिषदेचे त्यावेळीचे नगराध्यक्ष मा.श्री.एन.के.देशमुख, डॉ डावळेसाहेब, डॉ देशपांडे व नगरसेवक बैठक यांनी एक घेतली व परळी व परिसरातील खेडयांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळाव या हेतुने केंद्राची स्थापना परळी येथे करण्याचे ठरविले. नगर परिषदेने केंद्रासाठी इमारत, कर्मचारी व इतर सुविधा देण्याचे आश्वासन दिले. वैद्यकीय महाविद्यया स्टाफ, नगरपरिषदेचा स्टाफ एकत्र काम करण्याचे ठरले. पूर्वीचा सिव्हील डिस्पेनरीच्या कँपसमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू झाले (इ.स.1977). प्रशिक्षणार्थीनी राहण्यासाठी एक इमारत नगर परिषदेने दिली.

प्रथम परळी जवळील तीन खेडी उपकेंद्र म्हणुन निवडली. वडगाव (दादाहरी),नंदागौळ,नागापुर. एक आठवाडयातुन प्रशिक्षणार्थी प्रत्येक उपकेंद्रास दोन वेळा भेटी देत असत. प्रशिक्षणार्थी ओ.पी.डी चालवत असत व अधै प्रशिक्षणार्थी गावातील कुटुंबाना भेटी देऊन सवैक्षण करीत असत. उपकेंद्रासाठी ग्रामपंचातची जागा ओ.पी.डी. साठी वापरत असत. ग्रामपंचायतचा सहभाग असावा म्हणुन त्यांचाकडुन फर्निचर, स्टोव्ह इत्यादी सामान उपलब्दा करून घ्यायचे कारण. जनतेला ही त्यांचा गावचा सहभाग आहे असे वाटले पाहिजे म्हणजे अधीक सहकार्य मिळायचे. उपकेंद्रची वेळ सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत असे. दुपारी 3 ते 5 पर्यंत परळी येथील प्रशिक्षण केंद्रात ओ.पी.डी, रोग प्रतिबंधक लसी देणे, पाच वर्षाखालील बालकांची तपासणी करणे व प्रत्येक  बालकाची वाढ व विकास त्यांच्या वैयक्तीक फाईलमध्ये नोंद करणे प्रत्येक बालकाला एक महिण्यानंतर भेटीस बोलवुन आरोग्याची तपासणी करून नोंद करणे. आठवडयातुन दोन दिवस वैद्यकीय महाविद्यालयातुन वेगवेगळया विषयाचे विशेषज्ञ (मेडीसिन, सर्जरी, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, नाक.कान घसातज्ञ) येत असत. प्राशिक्षणार्थी रूग्णाविषयी त्यांच्या अडचणी सोडवुन घेतअसत व पुढील ट्रिटमेंटची गरज असल्यास केंद्राच्या गाडीमधुन वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले जाई.

केंद्राच्या कामाची व्याप्ती वाढतच होती व केंद्राची इमारत कमी पडत होती म्हणुन डॉ देशपांडे यांनी मा.गोपीनाथराव मुंडे यांना इमारत उपलब्ध करून द्यावी म्हणुन विनंती केली व 1980 मध्ये जुन्या गावात देशपांडे गल्लीत नवीन मोठी इमारत केंद्रासाठी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री श्री राजनारायण यांनी भारतातील प्रत्येक वैद्यकाय महाविद्यालयासाठी ग्रामीण जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी सेवा देण्यासाठी ब्रिटीस शासनाकडुन विषेश मोठया गाडया उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती केली व केवळ ग्रामीण जनतेला वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातच मिळावा या काहिही शुल्क न घेता गाडया डोनेट केल्या. अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन गाडया मंजुर झाल्या. डॉ देशपांडे यांनी स्वतः  मुंबईला जाऊन दोन गाडया आणि एक गाडी प्रशिक्षण केंद्रासाठी आणली. ही गाडी आकारानी खुपच मोठी होती व सर्व वैद्यकीय सुविधा त्यात उपलब्ध होत्या उदा. शत्रक्रियागार प्रयोग शाळा, आपतकालीन सोई- ऑक्सिजन- रक्त देण्याच्या सुविधा वगैरे ही गाडी उपलब्ध झाल्यामुळे डॉ. देशपांडे यांनी आधिक उपकेंद्र सुरू केली. परळी जवळीक खेडयामध्ये लोणी, पांगरी, मिरवट, या गावी नवीन उपकेंद्र सुरू केली.

ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राअंतर्गत एक महिला डॉक्टर व एक पदउत्तर शिक्षण घेण्यासाठी असलेले डॉक्टर यांची नेमनुक होती. डॉ. देशपांडे 1984 पासुन एम.डी,डी.एच.साठी मार्गदर्शक म्हणुन विद्यापिठाचे मान्यता प्राप्त शिक्षक होते म्हणुनच ते विद्यार्थी प्रशिक्षण केंद्रामध्ये काम करीत असत. त्यांचे प्रबंधासाठी ग्रामीण आरोग्याचे विषय असायचे उदा,डॉ इनामदार यांनी मिरवट व मांडवा या गावामध्ये थॉयईड ग्वायटर या वियषयावर प्रबंध यशस्वीरित्या पुर्ण केला. तसेच डॉ कोंडिबा पवार यांनी परळीजवळील 26 लमाण तांडयाचा अभ्यास करून डेमोग्राफीक, पे्रफाईल ऑफ लमाणी कम्युनिटी हा विषय घेऊन प्रबंध लिहील. डॉ देशपांडे यांनी ग्रामीण आरोग्य केंद्र, परळी येथे 1977 ते 1991 अशी चौंदा वर्षे वैद्यकीय व आरोग्य सेवा केली. या चौदा वर्षांच्या काळात त्यांनी खाजगी व्यवसाय थाटला नाही व कुणल्याहि रूग्णाकडुन एक रूपयाहि घेतला नाही ते म्हणायेच मला सरकारी पगार आहे.

इ.स.1991 ला त्यांनी शासकीय पदाचा स्वच्छेने राजीनामा दिला. लातुर येथे नव्यानेच सुरू झालेल्या एम.आय.एस.आर. वैद्यकीय महाविद्यलयात रूजु झाले या वैद्यकीय महाविद्यलयासाठी खुप कष्ठ सेासले. प्राचार्य असुन देखीली कुठल्याही कामास कमी न मानता आपले वैघकीय  महाविद्यालय  म्हणुन  काम  केले .दरम्यान  30  सप्टेंबर  1993  ( अनंत  चतुर्थ)  लातुर जिल्ह्यातील  किल्लारी  येथे   महाकाळ   विनाश काली  भूकंप  झाला   साधारण  आठ  ते  नऊ हजार  नागरीक  मृत्यू मुखी  पडले  सकाळी  चार  वाजण्याच्या  सुमारास   पोलिस  मुखालयाकडुन  वायरलेस  आला   की  किल्लारी  या  गावात  मोठा  कहाकाय  भुकूंप  झाला  आहे    वैगकीय  मदत  हवी  आहे   डॉ  जगदीश  देशपांडे  यांनी   क्षणांची   विलंब  न  करता  वैघकीय  महाविद्यालयातील  सर्व  डॉवटरांना   बोलाविले   गाडीतून  सर्व  साहीत्य  वैद्यकीय  मदतीसाठी  तयारी  करून  किल्लारी कडे  प्रस्थान केले होते

सकाळी  पाच  वाजता  ओसा  मार्गावरील  किल्लारी  फाटा  जवळ  पोहोचले    किल्लारी  गावातून  अनेक  जीवंत  राहिलेली  नागरिक  मुख्य  रस्त्याकडे  धावु  लागले   रूग्णवाहीकेत  किल्लारी  फाटयाजवळ   बराच  वेळ  रोखून  धरले   व  सांगण्यात आले  किल्लारी  गावाचा  मागे  असलेले  मोठे  धरण  फुटले  आहे   तरीही  रुग्णवाहिका   डॉवटरांसहीत  सकाळी   सहा  वाजता  गावात  पोहचले   ढिगार्‍याखाली  मृतदेह  काढण्याची  सुरूवात  झाली  होती    एम  आय एम  एस  आर   वैद्यकीय  महाविघालयाचे   डॉवटरांची  टिम  ही  पहिली  टिम  होती  जी  प्रथम  किल्लारी  गावात  पोहचली . तेथील  शाळेतील  ईमारीती  मधून  डॉवटरांनी  टेबल  खुर्च्या  ईत्यादी  सामान  बाहेर  काढले  व  रुग्णांची  तपासणी  व  ऊपचार  सुरू केले.वैघकीय  महाविघालयातुन   वैघकिय  विघाथी  व  ईतर  स्टाफ  बोलावून  घेतला  व  मुतयूदेह  ढिगार्‍याखाली  काढण्यात  सुरूवात  केली.  एम  आय  एम  एच  आर   वैघकीय  महाविघालयाचे  रूग्णालयात  सहाशे  भूकंप  ग्रसतांना  आडमिट  करण्यात  आले  होते   रूगणावर  ओषध  व  जेवणाची  सोय  केली होती

तातडीची  वैघकिय  मदत  भूकंप  ग्रसतांना  मदत  केल्याबद्दल मा  शिवराज  पाटील चाकूरकर  यांच्या हस्ते  जगदीश  देशपांडे  यांचे  कौतुक  करून  सत्कार करण्यात आला होता. साधारण 1994 मध्ये बीड जिल्हयातील महाविद्यालय म्हणुन काम केले.मामला या गावात प्लेग सदृष्य रूग्ण दिसुन आल्याचे कळताच डॉ देशपांडे आपल्या शेवटच्या वर्षांत शिकणार्या एम.बी.बी.एस च्या विद्यर्थ्यांना घेऊन मामला गावास भेट दिली व रूग्णाची तपासणी करून पुर्ण ऑऊट ब्रेकचे दृष्टीने अभ्यास केला व त्यावरील संशोधनात्मक  लेख लिहीला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अमेरिकेचे मॅगझिन दी लान्सेट यामध्ये प्रकाशित झाला.

इ.स.2000 मध्ये त्यावेळेचे केंदिय अर्थमंत्री व शिक्षण महर्षी मा.बाळासाहेब विखे पाटील यांना अहमनगर येथे नवीन वैद्यकीय महविद्यालय सुरू करावयाचे होते व त्या वैद्यकीय महाविद्यालयाचा पहिला अधिष्टठाता म्हणुन डॉ देशपांडे यांची निवड केली.आज ते वैद्यकीय महाविद्यालय विकद-घाट, अहमदनगर येथे थाटात उभे आहे.एकुण 13 वर्षे प्राचार्य अधिष्ठाता म्हणुन लातुर, गुलबर्गा, अहमदनगर व शेवटी आदित्या मेडिकल कॉलेज बीड याठिकाणी वैद्यकीय महाविद्यलाय सुरू करण्याचा प्रयत्न केला स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा डॉ, देशपांडे याच्यावर विश्वास व योग्यामाणुस बीड जिल्हासाठी वैद्यकीय महाविद्यालय ही तळमळीची ईच्छा असल्यामुळे डॉ.देशपांडे यांना त्याच्यासाठी बीड येथे अधिष्ठाता म्हणुन जाण्याची विनंती केली होती. असो तेा प्रयत्न अयशस्वी ठरला.
       डॉ.जे.जे.देशपांडे यांना पुढील आयुष्यातील शुभेच्छा.! वैद्यनाथाचरणी प्रार्थना !

                ■■■■■■■■■■■■■■■●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
"क्षणा क्षणाने आनंद वाढो 
वाढदिवसाने वाढो 
आरोग्य धन सुख संपदा! 
हिच सदिच्छा सदा सर्वदा, 
                       सदा सर्वदा!!
      डाॅ. जगदीश देशपांडे यांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस.
पाऊण शतकाचे सुंदर ,सर्वार्थाने जीवन समृध्द  करत जाणारे डाॅक्टरांचे आयुष्य म्हणजे एक आदर्शच आहे डाॅक्टरां साठी , डाॅक्टर असलेल्या त्यांच्या मुलासाठी ,सुनेसाठी , कुटूंबिया साठी आणि तुम्हा-आम्हा साठी ही.
     दोन वैद्यकीय महाविद्यालयात डीन सारख्या मोठ्या जबाबदारीच्या पदावरून कार्य करताना त्यांनी आपल्या स्वतःमधील डाॅक्टर तर जिवंत व कृतिशील तर ठेवलाच शिवाय एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, स्वतःला सतत अपडेट व अपग्रेड करणारा ,अभ्यासू शिक्षक अशी आपली ओळख ही जगदीश यांनी निर्माण केली होती.
  आपल्या मेडिकल काॅलेज मधील मुला-मुलींचे प्रवेश सहज कसे होतील यावर त्यांचे विशेष लक्ष असे.
  प्रत्येक ठिकाणी डीन म्हणून त्यांनी सदैव स्मरणात राहील असे कार्य केले.
    महाविद्यालयातील प्रत्येक विभाग सतत प्रगत करणे , नवनवीन मशीन्स मागवून आपले महाविद्यालय उत्तम व दर्जेदार कसे राहील या कडे त्यांनी प्राधान्याने लक्ष दिले.
 लातूर व प्रवरानगर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. विकास ही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे.पण डाॅ. जगदीश देशपांडे यांनी या दोन्ही ठिकाणी विकास व प्रगतीचे बीज पेरून ठेवले .
  सेवा निवृती नंतर पुन्हा दवाखाना, पुन्हा तेच असे न करता , व्यावसायातून पूर्ण निवृत्ती घेऊन डाॅ जगदीश एक समृद्ध, शांत,समाधानी गृहस्थी  जीवनातील आनंद उपभोगित आहेत. आई वडिलांच्या व अध्यात्मिक गुरू प.पू .माधवाश्रम स्वामी यांच्या बद्दल असलेल्या श्रध्ये तून ,डाॅ. जगदीश यांनी, नंदागौळ रस्त्यावरील त्यांच्या शेतात चिरंतन स्मारक उभारले आहे. दर गुरूवारी सायंकाळी आपल्या समवयस्क स्नेही व माधवाश्रम स्वामी भक्ता बरोबर ते तिथे हमखास भेटतातच. ह्याच पावन ठिकाणी, आमचे स्नेही श्री नारायण पोहनेरकर गुरूजी मुळे माझा त्यांच्याशी परिचय झाला.  व  परिचयातून थोडी मैत्री ही झाली. काही विशेष प्रसंगी इथे संगीत, गाणं,भजन असे कार्यक्रम ही होतात.
सर्वांशी अगदी मनमोकळा संवाद साधणे व मैत्रीचे नाते निर्माण करणे हे त्यांचे विशेष होय.
  त्यांचे चिरंजीव डाॅ गुरूप्रसाद यशस्वी बालरोगतज्ज्ञ तर आहेतच पण मला ते एक संवेदनशील माणूस वाटतात. प्रेमळ , नाजूक असं त्यांचं व्यक्तिमत्त्व वाटते.
  अमृत महोत्सवा निमित्त, डाॅ जगदीश यांना  आरोग्यपूर्ण, सुखी समाधानी आयुष्या साठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!


टिप्पण्या

  1. मी व माझे कुटुंब डाॕ.जे काकांकडूनच ट्रिटमेंट घेत असु, काकांचा शांत स्वभाव रुग्णांचं अर्ध दुखणं कमी करतं, अतिशय शांत स्वभाव.
    या अमृतमहोत्सवी काकां दिर्घायुष्य लाभो हिच माधवाश्रम स्वामी,नारायण दत्तानंद स्वामी माहाराजांच्या चरणी प्रार्थना

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?