कृषी प्रदर्शनास सोमवार एक दिवसाची मुदतवाढ
कृषी महोत्सव परळी : शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कृषी प्रदर्शनास सोमवार एक दिवसाची मुदतवाढ - धनंजय मुंडे यांचा निर्णय
कृषी महोत्सव आता 5 ऐवजी 6 दिवसांचा
आज चौथ्या दिवशीही राज्यभरातून हजारो शेतकऱ्यांची कृषी व पशु प्रदर्शनास भेट, सर्वच स्टॉल्स वर दिवसभर प्रचंड गर्दी
आजच्या तांत्रिक सत्रात ड्रोन द्वारे फवारणीची प्रात्यक्षिके, कीड रोग नियंत्रणावर सखोल मार्गदर्शन
परळी वैद्यनाथ, दि. 24: परळी वैद्यनाथ येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवास राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून, या प्रदर्शनास आता एक दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. चौथ्या श्रावण सोमवारी देखील आता कृषी महोत्सव सुरू असणार असून, हा महोत्सव आता 5 ऐवजी 6 दिवसांचा करण्यात येत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचावे, शासकीय योजनांची माहित्ती शेतक-यापर्यंत पोहोचावी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत व्हावी व शेतमालाला चांगला बाजार भाव मिळावा तसेच शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे संकल्पनेतून व प्रमुख मार्गदर्शनाखाली दि.२१/०८/२०२४ ते २५/०८/२०२४ या कालावधीत परळी वै. जि. बीड येथे 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आज कृषी महोत्सवाचा चौथा दिवस आहे. आजही राज्यभरातून हजारो शेतकरी बांधव परळीत दाखल झाले असून, कृषी व पशु प्रदर्शनास प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्टॉल च्या समोर खरेदीदारांची प्रचंड गर्दी दिसत असून, मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल होताना दिसत आहे.
परळी हे 12 ज्योतिर्लीगांपैकी 5 वे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे शहर असल्याने श्रावण महिन्यात व विशेषकरून सोमवारी राज्यासह देशातुन लाखो भाविक दर्शनासाठी परळीत येत असतात. सोमवारचा दिवस कृषी प्रदर्शनास मुदतवाढ दिल्याने याचा लाभ दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना देखील मिळावा अशी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची संकल्पना असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक टी. एस. मोटे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी दिली आहे तसेच वाढवलेल्या एक दिवसाचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
*तांत्रिक सत्र*
*तांत्रिक चर्चा सत्र ०३*
*दिनांक २४/०८/२०२४*
अध्यक्ष : डॉ. भगवान आसेवार, संचालक
विस्तार शिक्षण, व. ना. म. कृ. वि., परभणी
उपाध्यक्षः डॉ. तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक संचालक, छत्रपती संभाजीनगर
प्रमुख उपस्थिती: डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, कृषि महाविद्यालय, लातूर
संकलक : डॉ. एस. डी. सोमवंशी, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर.
*सोयाबीन कापूस व तुर पिकावरील किडीचे व्यवस्थापन*
डॉ. पुरूषोतम नेहरकर, विभाग प्रमुख / डॉ. अनंत लाड, सहाय्यक प्राध्यापक, किटकशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी यांनी कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकातील कीड व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
कपाशी मध्ये रसशोषक किडी जसे मावा, तुडतुडे पांढरी माशी, फुलकिडे हे प्रादुर्भाव करतात. ढगाळ हवामान आणि आर्द्रता हे याच्या प्रादुर्भावास पोषक असते. ऑगस्ट सप्टेंबर मधील पावसाची उघडीप हे यासाठी मुख्य कारण आहे.
या किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
*मशागतीय पद्धत*
शेत तण विरहित ठेवावे.
नत्र खताचा अंतुलित वापर टाळावा.
मित्रकीटकांचे संवर्धन करावे.
*यांत्रिक पद्धत*
पाते व बोंडे जमा करून नष्ट करावीत.
पिवळे चिकट सापळे १०-१२ प्रति हेक्टरी लावावेत.
डोमकळया दिसल्यास त्या अळीसहित नष्ट करावीत.
सर्वेक्षणासाठी ४-५ कामगंध सापळे लावावेत.
*जैविक पद्धत*
- ढालकिडा ही मित्र किटक मावा किडीचा बंदोबस्त करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा.
५% निंबोळी अर्क /अझाडीरेक्टीन १०००० पीपीएम १ मिली प्रति लिटर / १५०० पीपीएम २.५ मिली प्रति लिटर फवारणी करावी.
शिवाय, रस शोषण करणाऱ्या किडी साठी व्हर्टीसिलीयम लेखकांनी १.१५% डब्लूपी ५० ग्राम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी
*रासायनिक किटकनाशके*
तुडतुडे पांढरी माशी फुलकिडे मावा या किडी साठी फ्लोनीकामीड ५० डब्लुजी, थायोमिथोक्झाम २५% डब्लुजी, फिप्रोनील ५% बूप्रोफ्रेझीन यापैकी एका किटकनाशकांची फवारणी करावी.
बोंड अळीच्या नियंत्रणासाठी - प्रोफिनोफॉस ५०% ईसी, क्विनॉलफॉस २०% एएफ, क्लोरपायरीफॉस २०%ईसी, ईमामेक्टीन बेंझोएट ५% ईसी, यापैकी एका किटकनाशकांची फवारणी करावी.
*सोयाबीन* या पिकामध्ये तंबाखू वरील पाने खाणारी अळी, उंट अळी, घाटे अळी, पाने पोखरणारी अळी, चक्री भुंगा, पाने खाणारी अळी आणि शेंगा पोखरणारी अळी ई. किडीचा प्रादुर्भाव होतो.
*व्यवस्थापन*
*यांत्रिक पद्धत*
रोगग्रस्त पाने, खोड आदि गोळा करून नष्ट करावीत. सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे लावावेत.
टी आकाराचे पक्षी थांबे लावावेत.
*जैविक पद्धत*
एस एल एन पी व्ही ५०० एल ई २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
नोमुरिया रिली ही जैविक कीडनाशकांची ४ ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
*सोयाबीन पिकातील हिरवा आणि पिवळा मोझॅक किंवा केवडा*
हा रोग दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या नियंत्रणासाठी रोग ग्रस्त झालेल्या झाडे उपटून काढून नष्ट करावीत. नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा.
शेत तण विरहित ठेवावे.
१०-१५ पिवळे चिकट सापळे एक एकरात लावावेत.
५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
मावा आणि पांढरी माशी या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य त्या रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.
*तूर* या पिकांमध्ये
पाने गुंडाळणारी अळी, घाटे अळी, ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी, आणि शेंगा पोखरणारी अळी ई. किडीचा प्रादुर्भाव होतो.
या किडीचे व्यवस्थापन वरील प्रमाणे नमुद केल्याप्रमाणे करावे.
*शेतीसाठी ड्रोन चा वापर* या विषयावर
डॉ. गोपाळ शिंदे, सहयोगी प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी, कृषि यंत्र व शक्ती विभाग, कृ.अ.त.म. वनामकृवि, परभणी आणि
डॉ. सचिन नलावडे, विभाग प्रमुख, कृषि यंत्रे व शक्ती, अभियांत्रिकी विभाग, मफुकृवि, राहूरी
यांनी मार्गदर्शन केले.
ड्रोन हे एक मनुष्य विरहित यंत्रणा असुन त्याला चार किंवा सहा भुजा किंवा बाजू असुन त्या पंखांच्या सहाय्याने ते उडते. याच्या सहाय्याने या मध्ये जोडलेल्या कॅमेरा च्या मदतीने आपल्याला पिकातील रोग कीड यांचे सर्वेक्षण करून वेळीच प्रतिबंधक उपाय करता येऊ शकते.
यावेळी, ड्रोनच्या वापराचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. यावेळी, शेतकरी बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला.
ड्रोन हे रिमोट च्या मदतीने नियंत्रित केले जाते. जीपीएस प्रणाली द्वारे हे कार्य करत असते. यामध्ये फ्रेम, पाती (प्रोपेलर), मोटार, कंट्रोलर, स्पीड कंट्रोलर, रिमोट कंट्रोलर, आणि जीपीएस हे महत्त्वाचे भाग आहेत.
मल्टी रोटर ड्रोन वापरण्यास सर्वात सोपा आणि किफायतशीर आहे.
ड्रोन हे पुढीलप्रमाणे आहेत जसे की, फवारणी ड्रोन, नकाशे तयार करण्यारे ड्रोन, विमान नकाशे तयार करण्यासाठी VTOL, हायपर स्पेक्ट्रल नकाशे तयार करणारे ड्रोन, फवारणी/धुरळणी ड्रोन आणि प्रशिक्षण
ड्रोन.
ड्रोनचा वापर - पाण्याचा ताण, रोग आणि किडीचा प्रादुर्भाव, उगवलेली तणे, गवत यांचे निरीक्षण करणे यासाठी करता येतो.
कमी वेळात, कमी श्रमामध्ये ड्रोनच्या मदतीने शेतीमधील कामे करता येऊ शकतात. याच्या वापरामुळे ९०% पाणी, ४०% रासायनिक किटकनाशके यांची बचत होऊ शकते. याच्या मदतीने प्रति तास ४.११ हेक्टर क्षेत्रावर कामे करता येऊ शकतात.
राहुरी विद्यापीठाने यांच्या वापराचे माहिती संकलित करण्यासाठी फुले सॅम नावाचे एक मोबाईल ऍप तयार केले आहे.
यावेळी, ड्रोनच्या वापराचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. यावेळी, शेतकरी बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला.
कुमारी श्रध्दा मुळे संशोधन सहयोगी, नाहेप, वनामकृवि, परभणी यांनी या केंद्रामार्फत ड्रोनच्या वापराचे ५ दिवसीय, २१ दिवसीय आणि ६ महिने कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्या अनुषंगाने आवश्यक बाबी याबाबत माहिती दिली.
*कृषि मालाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान व निर्यात* या विषयावर डॉ. पी. एच. बकाने, विभाग प्रमुख, कृषि प्रक्रीया अभियांत्रिकी, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला यांनी
पिकाची काढणी झाल्यानंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी करावयाचे नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री. संजय मुटकुळे, जैन इरिगेशन, जळगाव यांनी सुक्ष्म सिंचनाची गरज आणि त्या अनुषंगाने जैन इरिगेशन यांनी शेतकरी बांधवांसाठी आणलेले तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली
श्री. आशिष मुडावतकर, समन्वयक, जैविक शेती मिशन, अकोला यांनी नैसर्गिक शेतीची आजच्या काळातील गरज आणि त्या अनुषंगाने जैविक निविष्ठाचा शेती पद्धतीमध्ये वापर करावा याबाबत विवेचन केले.
डॉ. वसंत सुर्यवंशी, विस्तार कृषि विद्यावेत्ता, अंबाजोगाई यांनी जवस या पिकाबाबतचे लागवड तंत्रज्ञान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण गुट्टे, विस्तार कृषि विद्यावेत्ता, लातूर तर आभारप्रदर्शन डॉ. सचिन सोमवंशी, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर यांनी केले. तसेच कृषी विभाग बीड यांच्या वतीने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत गळीतधान्य व तेलताड विभागस्तरीय कार्यशाळेच्या द्वितीय दिवसाचे सत्र व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना(PMFME) अंतर्गत खरेदीदार-विक्रेता संमेलन पार पडले.
होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा