MB NEWS: DIGITAL PAGE- दिवंगत प्राचार्या डॉ.आर.जे.परळीकर प्रथम पुण्यस्मरण

 DIGITAL PAGE- दिवंगत प्राचार्या डॉ.आर.जे. परळीकर प्रथम पुण्यस्मरण 

दूर गेलेली माझी सावली !

रेखा...

माझी सहचारिणी... जाऊन आज एक वर्ष झाले. प्रत्येक क्षण तिच्याविना जगताना मला झालेल्या यातना तीव्र आहेत. हा एक वर्षाचा •काळ एखाद्या युगासारखा वाटतो आहे. असा एकही क्षण नाही की ज्या क्षणाला तिची आठवण आली नाही. वक्तशीरपणा, कामाबाबतची निष्ठा, शिक्षण क्षेत्रातील योगदान, नवनिर्मितीचा ध्यास अशा तिच्या व्यक्तिमत्वाच्या कितीतरी बाबी सांगता येतील. एका महाविद्यालयाची यशस्वी प्राचार्या म्हणून तिने ठसा उमटवला पण मर्यादित चौकटीत काम करणे तिला मान्य नव्हते. तिच्याकडे असंख्य नवनव्या कल्पना असायच्या. या कल्पनांच्या परिपूर्तीसाठी अविश्रांत परिश्रम घेण्याची तिची तयारी होती. केवळ प्राचार्यपदात अडकून न पडता तिच्याकडे असलेला जो नवनिर्मितीचा ध्यास होता त्या ध्यासातून शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रकल्प तिने यशस्वीपणे राबवले. कोणतीही बाब गुणवत्तापूर्ण करणे याकडे तिचा कल होता. तिचा पीएचडीचा प्रबंध याचे उत्तम उदाहरण मानता येईल. राजकीय जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या या ज्ञानाचा मला उपयोग होत गेला. अद्यावत राजकीय संदर्भ देण्यापासून ते प्रत्येक राजकीय सामाजिक घडामोडीत स्वतःचे मत आणि आकलन मांडणे पर्यंत तिचे सहकार्य असायचे. निर्णयप्रक्रियेत मला या बाबीची निश्चितपणे मदत व्हायची. माझ्या दिनचर्येकडे बारीक लक्ष देऊन आरोग्य आहार याबाबतच्या उपयुक्त सूचना तिने वारंवार केल्या. या बाबतीत ती माझी खऱ्या अर्थाने सावली होती. व्यक्त करण्यासारखे खूप आहे. पण शब्द पदोपदी अडखळतात... स्तब्ध होतात. तिच्या जाण्याची वेदना कधीच शब्दात सांगता येणार नाही. तिच्या आठवणींची शिदोरी हेच माझ्यासाठी मोठे संचित आहे.



✍️अॅड. विजयराव गव्हाणे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस


पुण्यस्मरण:कै.प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर : परळीच्या शैक्षणिक क्षेत्रातील अविस्मरणीय 'रणरागिणी' !

           प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर परळीच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अविस्मरणीय व्यक्तीमत्त्व आज एक इतिहास बनले आहे.हे वलयांकित व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड जरी गेलेलं असलं तरी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा तमाम परळीकरांच्या व शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाच्या गाठीशी स्मृती ठेवून गेलेलं आहे.एक वर्षाचा काळ लोटला परंतु आजही परळीकर मॅडम आपल्यात नाहीत यावर मन विश्वास ठेवत नाही.

          
   रेखाताई जनार्दन परळीकर तथा डॉ.आर.जे. परळीकर यांनी अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. २००१ पासून परळी येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून त्या रुजु झाल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. परळीतील काॅपीमुक्त पॅटर्न च्या त्या प्रमुख होत्या. परळीभुषण म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे.शैक्षणिक क्षेत्रातील जबाबदार्यांबरोबरच विविध सामाजिक स्तरावरील उपक्रमांत अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. विविध शैक्षणिक परिषदा, अधिवेशनांमध्ये त्यांनी अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले होते. परळीत स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र बीसीएस,बीसीए महाविद्यालय  स्थापन केले.त्याचबरोबर डॉ.जे.आर.शिंदे सीबीएससी ज्यु.काॅलेज,रेन्बो व केंब्रिज इंग्लिश स्कूल आदी संस्थांच्या त्या संस्थापिका आहेत. महाराष्ट्रात  सर्वदुर शैक्षणिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्तीमत्व म्हणुन त्यांची ओळख आहे. त्यांची वक्तृत्वाची वैशिष्ट्यपूर्ण शैली होती. त्यांनी आपल्या अमोघ आणि सडेतोड भाषणांनी अनेक सभा गाजवल्या होत्या. निर्भिड आणि स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा विशेष गुण होता. परळीतील अनेक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.  अनेक महत्वाच्या शैक्षणिक, सामाजिक उपक्रमातचे त्या सक्रीय सहभागी असायच्या. अनेक विषयांवर त्यांनी प्रबंध सादर केलेले आहेत.मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच रशियन भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्यातील अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले होते. अनेक विषयांवरचा त्यांचा व्यासंग होता. 


       

    
  कै.प्राचार्या डॉ. आर.जे.परळीकर यांचा सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असायचा. वंचित, उपेक्षित घटकांना प्रसिद्धीपासून दुर राहत त्या आधार देण्याचे काम नेहमीच करत असत.शिक्षणापासुन कोणी वंचित राहत असेल तर त्याला आवश्यक ती मदत परळीकर मॅडम आवश्य करत असायच्या.विशेष म्हणजे आणि आजपर्यंत कोणालाही न सांगता त्यांनी केलेले उदात्त काम म्हणजे दरवर्षी एक गरजु विद्यार्थी त्या शैक्षणिक दत्तक घेत.त्या विद्यार्थ्यांना रोजगार लागेपर्यंत त्याची संपूर्ण जबाबदारी परळीकर मॅडम पार पाडत होत्या.एक कणखर व्यक्ती म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या प्राचार्या डॉ. रेखाताई जनार्दन परळीकर या मुळच्या परळीच्याच. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर धर्माबाद येथील वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नौकरीस सुरुवात केली. या महाविद्यालयात जवळपास १६ वर्षे नौकरी केल्यानंतर आपल्या जन्मगावी प्राचार्य होण्याची संधी त्यांना मिळाली. ते पण तालुक्यातील एकमेव महिला महाविद्यालयात.  प्राचार्या म्हणून त्यांचे कार्य या महाविद्यालयात बहरत गेले.परळी तालुक्यातील जास्तीत जास्त मुलींनी महाविद्यालयात येवून शिक्षण घेतले पाहिजे. फक्त प्रवेश घेऊन घरी बसता कामा नये असा कायम त्यांचा हट्ट असायचा. महाविद्यालयात विद्यार्थिनी आल्या नंतर विद्यार्थिनींने अभ्यासाबरोबरच इतर सर्व कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे असा प्रयत्न त्या करत असत. विद्यार्थिंनीनी कोणालाही घाबरता कामा नये. मुलांसारखे राहिले पाहिजे. यासाठी त्या मुलींना प्रोत्साहन देत असत. 

                 विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असत. परळी शहराच्या इतिहासात प्रथमच मुलींचे ढोल पथक त्यांनी तयार केले. त्याचबरोबर लैझिम, वारकरी संप्रदाय असे अनेक देखावे तयार करुन शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.शहरातील सांस्कृतिक वातावरण बदलवणारी ही घटना होती. सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबरच शहरातील शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी त्यांनी खूप यशस्वी प्रयत्न केले.  त्यांनी शहरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी यांना एकत्र केले. परळीतील परीक्षा काँपी मुक्तीसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.कै . लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या , डॉ .रेखाताई परळीकर हे नाव विद्यापीठ परिक्षेत्रात सर्वपरिचित असं नाव होतं. त्यामुळे या परिक्षेत्रात आमच्या महाविद्यालयाची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.विद्यापीठाच्या सिनेट मेंबर व विद्या परिषद सदस्य म्हणूनही काही काळ त्यांनी उत्कृष्ट कार्ये केलं. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यापीठात त्यांचा दबदबा होता .एक वेगळे वजन होते.  


   त्यांच्या कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे.त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेकांना उभे केले.महिला सक्षमीकरण असो की सामाजिक जडणघण विविध क्षेत्रात त्या अनेकांच्या मार्गदर्शक राहिल्या.त्यांच्या उत्तुंग कार्याला सादर प्रणाम. डॉ.आर.जे. परळीकर मॅडम हे नाव कायमच स्मृती जागृत ठेवणारे आहे व राहील.त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!!
          
                  -  प्रा.रविंद्र जोशी,
             पत्रकार,परळी वैजनाथ.





सकारात्मक दृष्टिकोनातून कार्यतत्परअसणाऱ्या डॉ. रेखा परळीकर

काळ अनुकूल असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत माणूस तो काळ अनुकूल करण्याचा प्रयत्न करत असतो . तरीही काही काही वेळेला काळाची अपरिहार्यता आपल्याला स्वीकारावीच लागते.'काळ तर मोठा कठीण आला'अशी दुष्काळावर आधारित ह. ना.आपटे यांची सर्वपरिचित कथा आहे. त्या कथेत त्यांनी दुष्काळाचे भयावह चित्र रेखाटले आहे ;पण या भयावह काळापेक्षाही भयावह काळ या दशकातील पहिल्या दोन वर्षात आम्ही प्रत्यक्ष अनुभवला.अगदी आपल्याला हवीहवीशी वाटणारी जवळची माणसं कोरोनाच्या महामारीत आमच्यापासून कायमची दूर गेली.त्यांचं जाणं हे अपरिमित हानी करून जाणं ठरलं.तो अवकाश कशानेही सहजासहजी भरून काढता येत नाही.जगाच्या नकाशावर असं एकही गाव नसेल ज्या गावात कोरोनाने माणूस हिरावला नाही.विशेषतः पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये त्याने अक्राळविक्राळ रूप धारण केले ;आणि अनेकांचा श्वास गुदमरून टाकला.दवाखान्यात स्वतःहून चालत जाणारी माणसं पुन्हा कधीच चालत परत आली नाहीत.आमच्या महाविद्यालयाच्या निर्भय प्राचार्या म्हणून ओळख असलेल्या डॉ. रेखा परळीकर यांच्या बाबतीतही असंच घडलं. ०१ मे २०२१ ला कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या प्राचार्या मॅडमना उपचारासाठी औरंगाबादला दाखल केले.उपचार घेऊन दोन दिवसात , चार दिवसात परत येतील अशी भाबडी आशा आम्हाला होती ; पण ती आशा भाबडीच राहिली. १७ मे हा आमच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख परिवारासाठी काळाकुट्ट दिवस उजाडला.
प्राचार्या डॉ. आर. जे.परळीकर या आमच्यापासून कायमच्या दूर गेल्या. आरोग्याच्या बाबतीत नेहमी सजग व दक्ष असणाऱ्या डॉ. परळीकर यांचा कोरोनासारखा विषाणू घात करेल असे कदापिही वाटले नव्हते. पण विषाणूने विजय मिळविला ; आणि आमचं कणखर नेतृत्व हिरावून घेतलं. आता उरल्या त्या फक्त त्यांच्या आठवणी आणि आठवणीच ... दीड तपापेक्षा जास्त काळ त्यांच्या सहवासात गेल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलेल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आजही मनावर कायमच्या कोरलेल्या आहेत.प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्या गोष्टी शब्दरूपाने मांडण्याशिवाय आमच्याजवळ आता उरलेच काय आहे ?म्हणूनच या शब्दप्रपंचाच्या साह्याने प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांना आदरांजली वाहण्याचा हा अल्पसा प्रयत्न 



    आमच्या वैयक्तिक जीवनात काही आनंदाचे क्षण त्यांनी आणले.केवळ प्राचार्य म्हणूनच ते आमच्याशी वागत नसत. तर कधी कधी वैयक्तिक जीवनात उपयोगी पडतील असे मोलाचे सल्ले त्या देत असत. विशेषतः कोणत्याही गोष्टीकडे नकारात्मकतेने पाहण्यापेक्षा सकारात्मकतेने पाहण्यासाठी स्वतःबरोबरच इतरांनाही त्या उद्युक्त करत असत . त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक , मानसिक , सामाजिक , आर्थिक विकास होण्यामध्ये त्यांच्या भूमिकांची भूमिका अतिशय मोलाची ठरलेली आहे.अर्थातच आमचे हे बंध आणि अनुबंध कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामुळे निर्माण झाले होते.परळी पंचक्रोशीत त्या सर्व परिचित होत्याच; पण त्याचबरोबर प्राचार्या , डॉ .रेखा परळीकर हे नाव विद्यापीठ परिक्षेत्रात सर्वपरिचित असं नाव होतं. त्यामुळे या परिक्षेत्रात आमच्या महाविद्यालयाची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.विद्यापीठाच्या सिनेट मेंबर व विद्या परिषद सदस्य म्हणूनही काही काळ त्यांनी उत्कृष्ट कार्ये केलं. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यापीठात त्यांचा दबदबा होता .एक वेगळे वजन होते.त्यांच्या अशा या विशेष ओळखीमुळे विद्यापीठाच्या परिक्षेत्रात आमचीही कामे सहजतेने होत होती.अगदी सुरुवातीच्या काळात ओरिएंटेशन साठी आमचा नंबर लागत नसतानासुद्धा त्यांनी स्वतः फोन करून आमचा नंबर लावला.इतकंच काय तर पीएच्.डी. करण्यासाठीही त्यांनी तगादा लावला म्हणूनच आम्ही शिक्षण क्षेत्रातील सर्वात उच्च पदवी लवकर मिळवू शकलो.

आठवणीतील व्हिडिओ......

      आमच्या महाविद्यालयात त्या २००३पासून कार्यरत होत्या . या दीड तपाच्या कालावधीत त्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामरावजी देशमुख यांनी पाहिलेल्या स्वप्नाला मूर्तरूप देण्यास प्राधान्य दिले. त्याबरोबरच संस्थेचे संचालक अनिलरावजी देशमुख, अध्यक्ष संजयजी देशमुख , सचिव रवींद्रजी देशमुख , कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात काही धाडसी निर्णय घेतले . त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न , विद्यार्थ्यांचे प्रश्न सुव्यवस्थित मार्गी लागण्यास त्यांच्या भूमिकांची चांगलीच मदत आम्हाला झाली.विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे त्या सातत्याने म्हणत असत ;आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी उपयोगी विविध उपक्रम त्यांनी महाविद्यालयात राबवले .विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांचा भावनिक , शारीरिक , सामाजिक , सांस्कृतिक अंगाने विकास होण्यासाठी या दीड तपाच्या कालावधीत त्यांनी उल्लेखनीय कार्ये केले.


विद्यार्थिनीकरिता त्यांच्याकडून स्वातंत्र्यही असायचं आणि बंधनही ;पण ही बंधनं फक्त संस्कारासाठी होती. त्यामुळे महाविद्यालयातील मुलीमध्ये एक शिस्त आमच्या प्रत्ययाला येत असत.विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन प्रामाणिकपणे करून पदव्या मिळवाव्यात हा त्यांचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या हिताचा होता . त्या दृष्टीने सर्व संस्थाचालक , प्राचार्य , पत्रकार , पुढारी यांना सोबत घेऊन राबवलेला 'कॉपीमुक्ती अभियान' हा परळी पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला . या अभियानाची परिणिती अनुकूल झाल्याचा अनुभव आजही परळीकर घेत आहेत.त्यामुळे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण गुणवत्तापूर्ण होण्यास खूप मोठी मदत झालेली आहे.
       महाविद्यालयात राबवत असलेले उपक्रम हे केवळ महाविद्यालयापुरते सीमित न ठेवता, ते उपक्रम समाजोपयोगी कसे होतील ?हा त्यांचा कटाक्ष असायचा. संवेदनशील विषयावर महाविद्यालयाच्या वतीने विविध रॅली काढून जनजागृती करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न याचीच साक्ष ठरतात . 'स्त्रीभ्रूण हत्या ' हा आमच्या समाजव्यवस्थेला लागलेला कलंक आहे. हा कलंक पुसला जावा . स्त्रीला जगण्याचा अधिकार आहे . अशी भूमिका घेऊन रॅली व पथनाट्याच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली . ते परळीकर कधीच विसरणार नाहीत . ' स्त्रीभ्रूण हत्या ' या विषयावर परळीच्या चौकाचौकात सादर केलेल्या पथनाट्याने परळीकरांना अंतर्मुख केले. महिला सक्षमीकरणावर प्राचार्या डॉ.परळीकर यांचा विशेष भर होता. महिला ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहिली पाहिजे म्हणून त्यांनी त्या दृष्टीने महाविद्यालयात व बाहेरही उपक्रम राबवले.

        ' हे नारी, घे भरारी
        व्यापून टाक, क्षितिजे सारी '
असा संदेश त्या सर्व महिलांना देत असत. हा मूलमंत्र घेऊन कितीतरी महिलांनी यशाची शिखरे गाठली . याचे प्रत्यक्ष साक्षीदार आम्ही आहोत. मुलींनी.... महिलांनी ' चूल आणि मूल ' या क्षेत्रापुरते सीमित राहू नये. त्यांनी उंच आकाशात झेप घ्यावी , उगीच पिंजऱ्यात फडफडू नये , अन्याय झाला म्हणून मुलींनी रडू नये . तर तिने प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध पेटून उठावे . असे संस्कार त्या सातत्याने करत असत. हे संस्कार करताना प्रत्यक्ष कृती करता येईल असे उपक्रम त्या राबवत . त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ' कराटे शिबीरा 'चे केलेले आयोजन हा एक महत्त्वाचा उपक्रम होता. त्यांचा हा उपक्रम मला सातत्याने कवी शेख शबीरच्या -
      " पाय उचलण्याआधी सांगतो
      पावलो पावली असतील काटे
        ब्युटीपार्लर जावू नको पण
        शिकून घे ज्युडो कराटे
         तयारीने तू उतर मैदानी
        घरातच आता दडू नको
         ऐक मुली तुला सांगतो
          पेटून उठ तू रडू नको ... "
    या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत .अगदी हाच बाणा , हीच वृत्ती , हाच स्थायीभाव घेऊन समाजोयोगी उपक्रम राबविण्यात त्यांचा विशेष हातखंडा होता. ' तलवारबाजी , काठी प्रशिक्षण व कराटे शिबीर ' केवळ महिला महाविद्यालयापुरते सीमित न ठेवता ते परळी तालुक्यातील पाचवीपासूनच्या मुलींसाठी खुले ठेवण्यात आले होते. आम्हाला विश्वासात घेऊन असे समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असल्यामुळे आम्हालाही त्यांचा व महाविद्यालयाचा सार्थ अभिमान वाटत असे.

      लोकशाही बळकट झाली पाहिजे . त्यासाठी मतदानाचा टक्का वाढणे अत्यावश्यक आहे . ही भूमिका घेऊन जी भव्य रॅली काढून -
   ' मतदार राजा जागा हो ,
     लोकशाहीचा धागा हो' 
    असा संदेश देत जनजागृती केली . ती परळीकरांच्या आजही स्मरणात आहे. रक्तदान शिबीर असेल , आरोग्यविषयक जनजागृती , स्वच्छतेचा मूलमंत्र असेल , वृक्ष लागवड असेल .... याविषयी कृतीयुक्त उपक्रम त्यांनी राबविले.
         महाविद्यालयात गणेशोत्सव घेताना तोसुद्धा समाजोपयोगी कसा करता येईल याकडे त्यांचे व आमचे विशेष लक्ष होते . त्याला मूर्त रूपही आम्ही त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे देऊ शकलो. गणेशोत्सव राबवताना लो. टिळकांचे विचार येथील समाजात बिंबविण्याचा प्रयत्न लोककलावंतांचं रुप धारण करणाऱ्या विद्यार्थिनींच्या माध्यमातून केले. या गणेशोत्सवातील प्रत्यक्ष विद्यार्थिनींनी ढोल वाजवणे , लेझिम खेळणे , काठी फिरविणे, तलवारबाजी याचे जे प्रात्यक्षिक केले . ते सर्व कौतुकार्ह होते.


        'आंतरराष्ट्रीय संबंध ' राज्यशास्त्रामधील विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. या विषयातील बारीक -सारीक संदर्भ अचूक त्या सांगत असत. राजकीय चर्चा हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय . या विषयावर चर्चा करताना राजकारणाच्या पाठीमागे समाजकारण असावं .याकडे त्यांचा विशेष कल होता. कलेच्या त्या भोक्त्या होत्या . कविसंमेलनाला जाऊन कविता ऐकणे , नाटक पाहणे यातही त्यांना विशेष अभिरुची होती .
      महाविद्यालय हे एका कुटुंबाप्रमाणे असलं पाहिजे . त्यातील प्रत्येक सदस्य आनंदी असावा . अगदी कवयित्री संगीता झिंजुर्के कदम म्हणतात -
" कुणाचाही कुठे वाद नसावा ,
   ये हृदयीचा ते हृदयी संवाद असावा. "
     याप्रमाणे भूमिका घेऊन कर्मचार्‍यांना वागणूक देत असत.
मतभेद असले तरी मनभेद होऊ नयेत . अशी त्यांची विचारसरणी होती . त्यामुळे कर्मचारीसुद्धा छोट्या छोट्या गोष्टी विसरून विसंवादापेक्षा संवादाचा सूर आळवत असत.

     अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धेला विशेष महत्त्व त्यांच्या जीवनात होतं ;त्यांची श्रद्धा डोळस होती.एखाद्या गोष्टीचा अन्वयार्थ लावण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याकडे त्यांचा कल होता.अगदी वास्तुशास्त्र व संख्याशास्त्र याला त्या प्राधान्य देत असल्या तरी त्या प्राधान्य देण्यापाठीमागे त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता.वास्तुशास्त्र व संख्याशास्त्राच्या बाबतीत त्या जे काही विधान करत असत ते तर्काच्या पातळीवर इतकेच काय तर वैज्ञानिकतेच्या दृष्टिकोनातून पटवून दाखवत असत.त्यामुळे ऐकणाऱ्यांचाही त्यांच्या या भूमिकेवर विश्वास बसत होता.माणसाने स्वतःहून केलेल्या विधानाशी ठाम राहावे व त्याप्रमाणे कृती करावी अशी जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी होती.
      आमच्या महाविद्यालयातील प्रशासनाबरोबरच परळी नगरीत त्यांनी स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळ सुरू केली होती. त्यातही त्या यशस्वी ठरलेल्या होत्या. कारण आपल्याला माजी आमदार अँड. विजयरावजी गव्हाणे यांची खंबीर साथ होती. त्याचबरोबर आपलं खंबीर नेतृत्त्वही त्याला कारणीभूत होतं.त्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे काम त्यांनी केलं होतं.

     आमच्या महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन हा तर आनंदाचा सोहळा ... सर्वांनी आनंदाने साजरा केला पाहिजे . म्हणून त्यात महाविद्यालयाच्या सर्वच घटकांना त्या सामावून घेत असत. वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिवस म्हणजे विद्यार्थिनींसाठी स्वातंत्र्याचा मुक्त अनुभव होता . अशा सर्वांना आनंद देणाऱ्या प्राचार्या आम्हाला अकाली दुःख देऊन जातील . असे कधीच वाटले नव्हते . त्यांचे जाणे महाविद्यालयासाठी, कै.लक्ष्मीबाई देशमुख परिवारासाठी व एकूणच व्यवस्थेसाठी हानी करणारे आहे. त्यांनी बसवलेली घडी पुन्हा बसविणे आमच्यासमोर एक आव्हान आहे. तुमच्या स्वभावातील निर्भिडपणा व कणखरपणा घेऊन महाविद्यालयाची घडी सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न आम्ही सामूहिक रीतीने करत आहोत. संस्थेचे अध्यक्ष मा. संजयजी देशमुख , सचिव रवींद्रजी देशमुख , कोषाध्यक्ष प्रा. प्रसादजी देशमुख यांनी शोकसभेत 'आपल्याला प्राचार्या डॉ . रेखा परळीकर यांची उणीव भरून काढावी लागेल ' अशी भूमिका मांडली होती. अगदी त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये आम्ही तत्परतेने वागत आहोत. त्याचबरोबर तुम्ही समजोपयोगी उपक्रमाचा जो वसा घेतला होता . त्याचा जागर यापुढेही घालत राहू . हीच तुम्हाला प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त खरी आदरांजली ठरेल !

     ✍️ प्रा.डॉ.राजकुमार किशनराव यल्लावाड
कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय , परळी वै .














प्राचार्या डॉ. रेखाताई परळीकर यांचे प्रथम पुण्यस्मरण...

     तालुक्यातील एकमेव महिला महाविद्यालय असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखाताई परळीकर यांचे मागच्या वर्षी १७ मे ला कोरोनामुळे दुखःद निधन झाले. बघता बघता या घटनेला एक वर्षे पूर्ण झाले. प्राचार्या डॉ. रेखाताई परळीकर यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्य भावपूर्ण आदरांजली.







        एक कणखर व्यक्ती म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या प्राचार्या डॉ. रेखाताई जनार्दन परळीकर या मुळच्या परळीच्याच यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर धर्माबाद येथील वरिष्ट महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नौकरीस सुरुवात केली. या महाविद्यालयात जवळपास १६ वर्षे नौकरी केल्यानंतर आपल्या जन्मगावी प्राचार्य होण्याची संधी त्यांना मिळाली. ते पण तालुक्यातील एकमेव महिला महाविद्यालयात मग काय प्राचार्य म्हणून त्यांचे कार्य या महाविद्यालयात बहरत गेले. आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त मुलींनी महाविद्यालयात येवून शिक्षण घेतले पाहिजे. फक्त प्रवेश घेऊन घरी बसता कामा नये असा कायम त्यांचा हट्ट असायचा. महाविद्यालयात विद्यार्थिनी आल्या नंतर विद्यार्थिनींने अभ्यासाबरोबरच इतर सर्व कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे. असा प्रयत्न त्या करत असत. विद्यार्थिंनीनी कोणालाही घाबरता कामा नये. मुलांसारखे राहिले पाहिजे. यासाठी त्या मुलींना प्रोत्साहन देत असत. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असत. महाविद्यालयात जास्तीत जास्त इतरही कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यासाठी प्राध्यापकांनाही मदत करत. सुरुवातीच्या काळात शहरात मुलींच्या शिक्षणासाठी ऐवढे काही वातावरण चांगले नव्हते. पण प्राचार्या परळीकर यांनी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून शहरातील वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला गणेशोत्सव.. या गणेशोत्सवामध्ये शहराच्या इतिहासात प्रथमच मुलींचे ढोल पथक तयार केले. त्याचबरोबर लैझिम, वारकरी संप्रदाय असे अनेक देखावे तयार करुन शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. ढोल पथक ते पण मुलींचे हे शहरातील नागरीकांसाठी अचंबित करणारी व उत्साह वाढवणारी,शहरातील सांस्कृतिक वातावरण बदलवणारी ही घटना होती. 



मँडमने एखाद्या कार्यक्रम घेयचे ठरवले तर त्या यशस्वीपणे तो कार्यक्रम आयोजित करत असत. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच शहरातील शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी प्राचार्य मँडमनी खूप यशस्वी प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळात १२ वी बोर्डची परिक्षा असली की, शहरात १२ वीच्या सर्व  केंद्रावर विद्यार्थ्यांबरोबर पालक वर्ग, काँप्या पुरवणारी मित्र मंडळी असायची हे वातावरण बदले पाहिजे, यासाठी त्यांनी शहरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी यांना एकत्र केले. या कार्यक्रमात मँडमना वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईप्पर, नवगण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बांगड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. व कधी नाही ते परिक्षा केंद्रावर फक्त विद्यार्थी दिसू लागले. पालक फक्त आपल्या पाल्याला केंद्रावर सोडून निघून जावू लागले. तीन वर्षे या काँपीमुक्तीसाठी मँडमनी सर्वांना एकत्र करत प्रयत्न केले. परळी सारख्या शहरात आज परिक्षा केंद्रावर पहिल्या सारखी जत्रा आपल्याला पाहावयास मिळत नाही. याचे कारण प्राचार्या परळीकर मँडम आहेत. यासाठी अनेक अपप्रवृत्तीच्या युवकांनी मँडमला धमकावण्याचा प्रयत्न केला. पण मँडम कधी घाबरल्या नाहीत. प्रत्येक अडचणीत मँडम खंबीरपणे उभे राहत असत. ऐवढेच नाही महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांच्या अडचणी समजून घेत व कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असत. तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी द टर्निंग पाँईंट का कार्यक्रम आयोजित करत असत. मँडम आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी स्वतः या मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जात असत. याचा परिणाम म्हणून महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत यशस्वी झाले आहेत. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध विषयात विद्यापीठात सर्वप्रथम येवून गोल्ड मेडल मिळवले आहेत. दोन विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पारितोषिके मिळाली आहेत. तर राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थी २६ जानेवारीला देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात परेडसाठी निवड झालेली आहे.
















दरम्यान आपल्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात शहरातील ८ ते १२ वीच्या विद्यार्थिनीसाठी आठ दिवसाचे कराटे शिबीराचे आयोजन केले होते. विद्यार्थिनींनी सक्षम बनले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. त्याचबरोबर त्या आपल्या समाजासाठी तत्पर असत. समाजासाठी आवश्यक मदत त्या तात्काळ करत असत तसेच त्यांनी समाजातील अत्यंत गरजू,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच बरोबर समाजातील काही धार्मिक कार्यक्रम असतील तर त्या तन मन धनाने मदत करत असत.कार्यक्रमांना हजेरी लावत. जिल्ह्यातील पहिल्या वधूवर पालक परिचय मेळाव्यात त्या हिरीरीने सहभागी झाल्या,मेळाव्यास आर्थिक मदत तर केलीच पण सातत्याने कार्यक्रमादरम्यान मोलाचे मार्गदर्शन समाजातील आम्हा युवक मंडळींना केले.




 त्याचबरोबर आपल्या शहरातील समाजाचा मेळावा उत्तमरितीने पारपडवा व वेगळे काही तरी असावे यासाठी पती माजी आमदार विजयराव गव्हाणे यांना सांगून पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास तुतारी पथक बोलावले यामुळे कार्यक्रमाला चारचांद लागले. यापध्दतीने संपूर्ण शहरातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या प्राचार्या डॉ रेखाताई परळीकर यांना त्यांचे पती माजी आमदार, भाजपचे ज्येष्ठ नेते अँड विजयराव गव्हाणे यांची मोलाची साथ लाभली. 

संबंधित लेख:⬛ _लेख:✍️प्रा.प्रविण फुटके_ ⬛ 💢 *आधारवड....!!!!!!!*

त्याच्या शहरातील व महाविद्यालयातील शैक्षणिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ऐवढेच नाही तर शहरातील मानाचा असणारा परळी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इतरही अनेक पुरस्कार डॉ. परळीकर मँडम यांना प्रदान करण्यात आले होते. इतर सर्व ठिकाणी खंबीर, कणखर भूमिका घेणाऱ्या प्राचार्या डॉ रेखाताई कोरोना सोबतची लढाई मात्र हरवू शकल्या नाहीत. या आजाराने १७ मे २०२१ सायंकाळी त्यांचे दुखःद निधन झाले. मँडम महिला महाविद्यालया बरोबर शहरातील शैक्षणिक,सामाजिक क्षेत्राला पोरक्या करून गेल्या. आमच्या परिवारासोबत समाजातील अनेकांचा आधारवड कोसळला. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने, महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने कर्तव्यदक्ष प्राचार्या डॉ रेखाताईंना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली..



                        शोकाकुल ः

                 प्रा.प्रविण महालिंग फुटके

             कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला          

            महाविद्यालय, परळी वैजनाथ.


आठवणीतील व्हिडिओ: प्राचार्या डॉ.आर.जे.परळीकर मॅडम यांचे जीवनातील शेवटचे भाषण.......

चतुरस्त्र व्यक्तिमत्व : प्राचार्या डॉ.आर.जे. परळीकर
जागतिक दृष्टिकोनातून इसवी सन 2021 हे अत्यंत वाईट वर्ष म्हणावे लागेल. यावर्षी कोरोनाच्या भीषण अग्नीमध्ये अनेक जण होरपळून निघाले. त्यापैकी आम्ही एक आहोत. या प्राणघातक रोगाने आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आर. जे. परळीकर यांना आमच्यापासून हिरावून नेले. डॉ. परळीकर या एक व्यक्ती नसून विचार संस्था होत्या. त्यांच्या अकाली निधनाने आम्ही एक प्राचार्य नव्हे तर एक कुशल प्रशासक, पुरोगामी विचारवंत, फुले शाहू आंबेडकरी व डाव्या विचारसरणीचा एक अभ्यासू भाष्यकार, उत्कृष्ट वक्ता व मनाची श्रीमंती असलेल्या एका अत्यंत चांगल्या व्यक्तीला आम्ही  गमावले आहे. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. इसवी सन 2003 ते 2021 या त्यांच्या प्राचार्य कारकिर्दीचा मी एक अत्यंत जवळचा दृक-श्राव्य साक्षीदार होय. 

डॉ. परळीकर यांचे वडील डॉ. ज. रा. शिंदे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख एक अभ्यासू राजकीय विचारवंत म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या वैचारिक बाळकडू पासून डॉ. परळीकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झालेली होती. डॉ. शिंदे हे हाडाचे साम्यवादी विचारवंत होते. आपल्या वडिलांच्या या विचारधारेशी त्या आयुष्यभर प्रामाणिक राहिल्या होत्या. तीन भगिनी व एक भाऊ यामध्ये डॉ परळीकर या जेष्ठ होत्या. त्या अत्यंत कुटुंबवत्सल होत्या. त्यांची एकुलती एक कन्या आज अमेरिकेआहे. ती उच्च विद्याविभूषित असून मोठ्या पदावर काम करत आहे. माजी आमदार  विजयराव गव्हाणे यांच्या सहचारिणी असलेल्या डॉ. परळीकर  अनेक राजकीय संघर्षात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या होत्या. 


एखाद्या महाविद्यालयाच्या उत्कर्षामध्ये प्राचार्यांचा सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा असतो. सलग दोन वेळा त्यांनी नॅक संस्थेकडून महाविद्यालयास बी -ग्रेड प्राप्त करून देण्यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा उचलला होता. संस्था व कर्मचारी यांच्यामध्ये योग्य समतोल कसा राखावा याच्या त्या उत्तम उदाहरण होत्या.  आमच्या महाविद्यालयाच्या संस्थाप्रमुख  असलेल्या देशमुख परिवाराशी त्यांचे संबंध शेवटपर्यंत सौहार्दपूर्ण राहिले होते. एखादी गोष्ट करायची अशी मनाशी खूणगाठ बांधल्यानंतर ती अधिकाधिक उत्तम कशी करावी याची त्यांच्याकडे विलक्षण हातोटी होती. 

योग्यतेनुसार जबाबदारी देणे, त्या कर्मचार्‍यांकडून काम करून घेत असताना त्याला त्रास होणार नाही याचीही काळजी घेणे या बाबतीत त्यांचा हातखंडा होता. प्रशासनामध्ये करारी स्वभावाच्या असणाऱ्या डॉ. परळीकर या स्वभावाने मात्र अत्यंत प्रेमळ व संवेदनशील मनाच्या होत्या. विद्यापीठीय राजकारणातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची अमिट अशी छाप सोडलेली आहे. त्या विद्यापीठात विद्या परिषदेच्या सदस्य होत्या. परळी शहरातील सर्व परीक्षा या कॉपीमुक्त व्हाव्यात याकरिता त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची परळीकरांना निश्चित कायमस्वरूपी आठवण राहील. शहरातील सर्व प्राचार्य व प्राध्यापकांना सोबत घेऊन त्यांनी कॉपीमुक्त परळी हे अभियान यशस्वीपणे राबविले होते. अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने त्या विभूषित होत्या. "परळी भूषण" या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले गेले होते. स्त्री भ्रुण हत्या विरोधी रॅली, महिला सक्षमीकरण अभियान, युवतीकरिता स्वसंरक्षण शिबीराचे केलेले आयोजन परळीकरांच्या कायम स्मरणात राहतील. परळी शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक अशा अनेक उपक्रमात त्या समरस झालेल्या दिसून येतात. अत्यंत वेगाने गाडी चालवणे, हिंदी जुन्या चित्रपटातील गाणी ऐकणे, देश-विदेशात फिरायला जाणे, उत्कृष्ट खाद्यपदार्थ तयार करून इतरांना खायला देणे. वाढदिवस किंवा तत्सम स्वरूपाच्या कार्यक्रमांमध्ये सर्व कुटुंबियांना सहभागी करून घेणे, इतकेच नव्हे तर महाविद्यालयातील सहकाऱ्यांनाही अगत्याने बोलावून सर्वांसमवेत आनंद सोहळा आयोजित करणे हे त्यांचे काही आवडीचे छंद होते. 
मनसोक्त जीवनाचा आनंद घेणे जुन्या बुरसटलेल्या विचारांना थारा न देणे ही त्यांची काही खास स्वभाववैशिष्ट्ये होती. आधुनिक भारता च्या इतिहासात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे  "ओन्ली वन मॅन इन कॅबिनेट" असे वर्णन केले जाते. असाच काहीसा कणखरपणा डॉ. परळीकर यांच्या मध्ये मला सातत्याने दिसून आला. त्यांच्या सहवासामध्ये आम्हाला अनेक चांगले गुण आत्मसात करता आले. परळीतून सुरू झालेला त्यांचा जीवन प्रवास अखेर परळी मध्येच थांबला  धर्माबाद येथे लालबहादूर शास्त्री महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक तसेच पूर्णा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अशी महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी लीलया पेलली होती अशा या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा प्रवास अचानकपणे थांबावा हे अत्यंत दुर्दैवी आहे त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या जाण्याने व्यक्तिशः माझी देखील फार मोठी हानी झाली आहे. शेवटी आनंद चित्रपटातील राजेश खन्नाचे ते लोकप्रिय वाक्य अधोरेखित करावेसे वाटते , "बाबूमोशाय, जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए |" हे वाक्य डॉ. परळीकर यांच्या कारकीर्दीला साजेसे ठरते. भावपूर्ण आदरांजली.
                   - प्रा. डॉ.विनोद जगतकर
                     कै.ल.दे.महिला महाविद्यालय, परळी वैजनाथ.
-------------------------------------------------------------------

संबंधित लेख:⬛ _लेख:✍️ संजय देशमुख_ ⬛ *महिला सक्षमीकरण व समाजोपयोगी उपक्रमावर भर देणारी प्रशासक डॉ. रेखा परळीकर*

DIGITAL PAGE- दिवंगत प्राचार्या डॉ.आर.जे. परळीकर प्रथम पुण्यस्मरण 

आवश्य पहा:🏵️ *DIGITAL PAGE*🏵️ *_दिवंगत प्राचार्या डॉ.आर.जे. परळीकर प्रथम पुण्यस्मरण_*

      

हे देखील वाचा/पहा🔸

Click & watch -🔸 *लक्षवेधी:परळीचे अभिजीत देशमुख राजकारणात "कम बॅक" करतायत का?* • *पहा: लाईव्ह संवादातून काय मांडली भूमिका.* युट्युब वर MB NEWS ला नक्की Subscribe करा._

         

🌑 *समाजातील विखारी विचार संपविण्यासाठी संतांचे विचार जनमानसात रुजविणे गरजेचे —ह.भ प.शामसुंदर सोन्नर महाराज*


*स्वतःच्या घरात चार्जिंग ला लावलेला पन्नास हजाराचा मोबाईल नेला चोरुन*


🟥 *धडाका:आयपीएस पंकज कुमावत यांनी उस्मानाबाद शहरात टाकल्या अकरा ठिकाणी धाडी*


🛑 *परळीकरांनी वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रातील भगवान नृसिंह मंदिरात केला जन्मोत्सव;दर्शनाला गर्दी.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?