MB NEWS-लेख:महिला सक्षमीकरण व समाजोपयोगी उपक्रमावर भर देणारी प्रशासक डॉ. रेखा परळीकर✍️संजय देशमुख,अध्यक्ष-कै.ल.दे.महिला महाविद्यालय,परळी वैजनाथ.

 महिला सक्षमीकरण व समाजोपयोगी उपक्रमावर भर देणारी प्रशासक डॉ. रेखा परळीकर



कै .लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या , डॉ .रेखा परळीकर हे नाव विद्यापीठ परिक्षेत्रात सर्वपरिचित असं नाव होतं. त्यामुळे या परिक्षेत्रात आमच्या महाविद्यालयाची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.विद्यापीठाच्या सिनेट मेंबर व विद्या परिषद सदस्य म्हणूनही काही काळ त्यांनी उत्कृष्ट कार्ये केलं. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यापीठात त्यांचा दबदबा होता .एक वेगळे वजन होते.  

      आमच्या महाविद्यालयात त्या २००३पासून कार्यरत होत्या . या दीड तपाच्या कालावधीत महाविद्यालयात काही धाडसी निर्णय त्यांनी घेतले . त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न , विद्यार्थ्यांचे प्रश्न सुव्यवस्थित मार्गी लागण्यास त्यांच्या भूमिकांची चांगलीच मदत आम्हाला झाली. त्यांच्या उत्तम कार्यशैलीमुळे ' नॅक ' मूल्यांकनात महाविद्यालयाने दोनदा ' बी ' दर्जा प्राप्त केला . ही आमच्यासाठी भूषणावह बाब आहे . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे वडील आदरणीय स्व . श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेतलेली 'आंतरविद्यापीठीय वादविवाद स्पर्धा ' ही मराठवाड्यात कौतुकाचा विषय ठरली होती . या यशात प्राचार्या डॉ . रेखा परळीकर यांचा मोठा वाटा होता . अर्थशास्त्र परिषदेच्या माध्यमातून पाणीप्रश्नावर चर्चा घडवून आणली व पाण्याचे महत्त्व सर्वांना पटवून दाखवले . विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे त्या सातत्याने म्हणत असत ;आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी उपयोगी विविध उपक्रम त्यांनी महाविद्यालयात राबवले .विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांचा भावनिक , शारीरिक , सामाजिक , सांस्कृतिक अंगाने विकास होण्यासाठी या दीड तपाच्या कालावधीत त्यांनी उल्लेखनीय कार्ये केले.विद्यार्थिनीकरिता त्यांच्याकडून स्वातंत्र्यही असायचं आणि बंधनही ;पण ही बंधनं फक्त संस्कारासाठी होती. त्यामुळे महाविद्यालयातील मुलीमध्ये एक शिस्त आमच्या प्रत्ययाला येत असत.विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन प्रामाणिकपणे करून पदव्या मिळवाव्यात हा त्यांचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या हिताचा होता . त्या दृष्टीने सर्व संस्थाचालक , प्राचार्य , पत्रकार , पुढारी यांना सोबत घेऊन राबवलेला ' कॉपीमुक्ती अभियान ' हा केवळ परळी पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला . या अभियानाची परिणिती अनुकूल झाल्याचा अनुभव आजही परळीकर घेत आहेत.

       महाविद्यालयात राबवत असलेले उपक्रम हे केवळ महाविद्यालयापुरते सीमित न ठेवता, ते उपक्रम समाजोपयोगी कसे होतील ?हा त्यांचा कटाक्ष असायचा. संवेदनशील विषयावर महाविद्यालयाच्या वतीने विविध रॅली काढून जनजागृती करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न याचीच साक्ष ठरतात . 'स्त्रीभ्रूण हत्या ' हा आमच्या समाजव्यवस्थेला लागलेला कलंक आहे. हा कलंक पुसला जावा . स्त्रीला जगण्याचा अधिकार आहे . अशी भूमिका घेऊन रॅली व पथनाट्याच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली . ते परळीकर कधीच विसरणार नाहीत . ' स्त्रीभ्रूण हत्या ' या विषयावर परळीच्या चौकाचौकात सादर केलेल्या पथनाट्याने परळीकरांना अंतर्मुख केले. महिला सक्षमीकरणावर प्राचार्या डॉ.परळीकर यांचा विशेष भर होता. महिला ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहिली पाहिजे म्हणून त्यांनी त्या दृष्टीने महाविद्यालयात व बाहेरही उपक्रम राबवले.

        ' हे नारी, घे भरारी

        व्यापून टाक, क्षितिजे सारी '

असा संदेश त्या सर्व महिलांना देत असत. हा मूलमंत्र घेऊन कितीतरी महिलांनी यशाची शिखरे गाठली . याचे प्रत्यक्ष साक्षीदार आम्ही आहोत. मुलींनी.... महिलांनी ' चूल आणि मूल ' या क्षेत्रापुरते सीमित राहू नये. त्यांनी उंच आकाशात झेप घ्यावी , उगीच पिंजऱ्यात फडफडू नये , अन्याय झाला म्हणून मुलींनी रडू नये . तर तिने प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध पेटून उठावे . असे संस्कार त्या सातत्याने करत असत. हे संस्कार करताना प्रत्यक्ष कृती करता येईल असे उपक्रम त्या राबवत . त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ' कराटे शिबीरा 'चे केलेले आयोजन हा एक महत्त्वाचा उपक्रम होता. त्यांचा हा उपक्रम मला सातत्याने कवी शेख शबीरच्या -

      " पाय उचलण्याआधी सांगतो

      पावलो पावली असतील काटे

        ब्युटीपार्लर जावू नको पण

        शिकून घे ज्युडो कराटे

         तयारीने तू उतर मैदानी

        घरातच आता दडू नको

         ऐक मुली तुला सांगतो

          पेटून उठ तू रडू नको ... "

    या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत .अगदी हाच बाणा , हीच वृत्ती , हाच स्थायीभाव घेऊन समाजोयोगी उपक्रम राबविण्यात त्यांचा विशेष हातखंडा होता. ' तलवारबाजी , काठी प्रशिक्षण व कराटे शिबीर ' केवळ महिला महाविद्यालयापुरते सीमित न ठेवता ते परळी तालुक्यातील पाचवीपासूनच्या मुलींसाठी खुले ठेवण्यात आले होते. आम्हाला विश्वासात घेऊन असे समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असल्यामुळे आम्हालाही त्यांचा व महाविद्यालयाचा सार्थ अभिमान वाटत असे.

      लोकशाही बळकट झाली पाहिजे . त्यासाठी मतदानाचा टक्का वाढणे अत्यावश्यक आहे . ही भूमिका घेऊन जी भव्य रॅली जनजागृती केली . ती परळीकरांच्या आजही स्मरणात आहे. रक्तदान शिबीर असेल , आरोग्यविषयक जनजागृती स्वच्छतेचा मूलमंत्र असेल , वृक्ष लागवड असेल .... याविषयी कृतीयुक्त उपक्रम त्यांनी राबविले.

         महाविद्यालयात गणेशोत्सव घेताना तोसुद्धा समाजोपयोगी कसा करता येईल याकडे त्यांचे व आमचे विशेष लक्ष होते . त्याला मूर्त रूपही आम्ही त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे देऊ शकलो. गणेशोत्सव राबवताना लो. टिळकांचे विचार येथील समाजात बिंबविण्याचा प्रयत्न लोककलावंतांचं रुप धारण करणाऱ्या विद्यार्थिनींच्या माध्यमातून केले. या गणेशोत्सवातील प्रत्यक्ष विद्यार्थिनींनी ढोल वाजवणे , लेझिम खेळणे , काठी फिरविणे, तलवारबाजी याचे जे प्रात्यक्षिक केले . ते सर्व कौतुकार्ह होते.

        'आंतरराष्ट्रीय संबंध ' राज्यशास्त्रामधील विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. या विषयातील बारीक -सारीक संदर्भ अचूक त्या सांगत असत. राजकीय चर्चा हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय . या विषयावर चर्चा करताना राजकारणाच्या पाठीमागे समाजकारण असावं .याकडे त्यांचा विशेष कल होता. कलेच्या त्या भोक्त्या होत्या . कविसंमेलनाला जाऊन कविता ऐकणे , नाटक पाहणे यातही त्यांना विशेष अभिरुची होती .

      महाविद्यालय हे एका कुटुंबाप्रमाणे असलं पाहिजे . त्यातील प्रत्येक सदस्य आनंदी असावा . मतभेद असले तरी मनभेद होऊ नयेत . अशी त्यांची विचारसरणी होती . वार्षिक स्नेहसंमेलन हा तर आनंदाचा सोहळा सर्वांनी आनंदाने साजरा केला पाहिजे . म्हणून त्यात महाविद्यालयाच्या सर्वच घटकांना त्या सामावून घेत असत. वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिवस म्हणजे विद्यार्थिनींसाठी स्वातंत्र्याचा मुक्त अनुभव होता . अशा सर्वांना आनंद देणाऱ्या प्राचार्या आम्हाला अकाली दुःख देऊन जातील . असे कधीच वाटले नव्हते . त्यांचे जाणे महाविद्यालयासाठी, देशमुख परिवारासाठी व एकूणच व्यवस्थेसाठी हानी करणारे आहे. त्यांनी बसवलेली घडी पुन्हा बसविणे आमच्यासमोर एक आव्हान आहे. तुमच्या स्वभावातील निर्भिडपणा व कणखरपणा घेऊन महाविद्यालयाची घडी सुव्यवस्थि करण्याचा प्रयत्न करु . त्याचबरोबर तुम्ही समजोपयोगी उपक्रमाचा जो वसा घेतला होता . त्याचा जागर यापुढेही घालत राहू . हीच तुम्हाला खरी श्रध्दांजली ठरेल !




     श्री. संजय श्यामराव देशमुख

     अध्यक्ष , कै .ल. दे . शि . प्र . मं .परळी वै .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !