परळीकरांना दिलासा नक्की पण हुरळून जाण्याची गरज नाही तर आणखी सतर्क राहण्याची गरज



⬛ बिनधास्त नाही तर बंदिस्त राहण्याला मोठेपणा समजावा ......!

----------------    -    ------------

 प्रा.रविंद्र जोशी

 परळी वैजनाथ  ......................

 परळीचे आजचे प्राप्त आहवाल निगेटिव्ह आल्याचे दिसून येते. खरंतर ही आनंदाची गोष्ट आहे मात्र एक दिवसाच्या अहवालानंतर आपण कोरोनासंसर्ग मुक्त झालो असं मानायची खरंच गरज नाही उलट यावर प्रत्येकाने गंभीर होण्याची गरज आहे.दिलासा नक्की पण हुरळून जाण्याची गरज नाही तर आणखी सतर्क राहण्याची गरज आहे.बिनधास्त नाही तर बंदिस्त राहण्याला मोठेपणा समजला गेला पाहिजे.

 - ----

  संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले. यामध्ये जग हळू हळू विळख्यात जात राहिले. महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर लाॅकडाउनचा पर्याय निवडण्यात आला. लाॅकडाउन पहिल्यांदाच आपण अनुभवत होतो. सर्वांसाठी हळूहळू आता ती जीवनशैली आपल्या अंगवळणी पडली आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोरोना लागण होण्याचे प्रमाण सुरुवातीला खुप कमी होतं. परळी तालुक्यात तर कोरोना प्रभावी लाटेमध्ये असताना परळी तालुका हा पुर्णतः सुरक्षित होता. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेजमध्ये परळीकर यांनी अतिशय जबाबदारीपूर्वक कोरोणाला दूर ठेवले होते. 

सर्व आलबेल आहे आता आपण बिनधास्त राहू शकतो अशी परिस्थिती असताना अचानक शहरातील मुख्य मध्यवर्ती ठिकाणची व वर्दळीचे ठिकाण असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मधील पाच कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळून आले. आणि बिनधास्त झालेल्या परळीकरांच्या पायाखालची वाळू हळूहळू घसरायला लागली. एसबीआयचे हे लोन पसरत गेल्याचे बघायला मिळाले. कल्पना केलेली नसतानाही कोरोना संसर्गाची साखळी मोठ्या प्रमाणावर परळी तालुक्यात सर्वदूर जोडली गेली असल्याचे दिवसेंदिवस लक्षात येऊ लागले. या टप्प्यामध्ये परळी तालुक्यातील शहरासह अनेक गावे कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडली. त्या त्या वेळेला येथील नागरिक प्रशासन आरोग्य विभागाने आवश्यक ती मोहीम राबवत व काळजी घेत साखळी खंडित करण्याचा प्रयत्न केला परंतु साखळी खंडित होताना दिसत नव्हती.

 बीड जिल्ह्याच्या दररोजच्या अहवालामध्ये परळीचे आकडे सतत दोन अंकी बघायला मिळत होते.हे आकडे कमी कधी होतील याची चिंता सर्वांनाच लागून राहिली होती. परळी शून्यावर कधी येते हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता आणि आज दिनांक 13 रोजी अचानक थोडासा दिलासा वाटावा असा अहवाल प्रशासनाने दिला .या आहवाला मध्ये बीड जिल्ह्यातील आकडेवारी कमी झालेली दिसून येत आहे.यातही परळीचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याचे दिसून येते. खरंतर ही आनंदाची गोष्ट आहे मात्र एक दिवसाच्या अहवालानंतर आपण कोरोनासंसर्ग मुक्त झालो असं मानायची खरंच गरज नाही उलट यावर प्रत्येकाने गंभीर होण्याची गरज आहे.

      दररोजच्या प्रमाणे आजचे ही covid-19 चे प्रशासकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये परळी तालुक्याचा अहवाल संपूर्ण स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. आनंदाची गोष्ट अशी आहे की आजच्या अहवालांमध्ये पॉझिटिव्ह च्या आकडेवारीत परळी तालुका निल दिसून येत आहे. मात्र हीच आकडेवारी नियमित सुरू राहणे आवश्यक आहे. दरम्यान आज आलेले अहवाल हे परवा दिनांक अकरा रोजी घेण्यात आलेल्या स्वॅबचे आहेत. दिनांक अकरा रोजी परळीत एकूण तीस स्वॅब घेण्यात आले होते. ते सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काल दिनांक 12 रोजी परळीतून एकूण 35 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचे अहवाल उद्या मिळणार आहेत. यामध्येही सुदैवाने सर्व अहवाल निगेटिव यावेत म्हणजे परळी तालुका शुन्य कोरोना लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करु शकतो असे म्हणता येईल.

   मुळात याबाबत विचार करण्याची खूप गरज निर्माण झाली आहे .याचे कारण असे की गेल्या काही दिवसात आरोग्य विभागाकडून येणारी आकडेवारी ही कमी होताना दिसत असली तरी त्या मागच्या कारणांचाही विचार करणे गरजेचे बनले आहे. स्वॅब कमी घेण्यात येत आहेत असे म्हटले जात असले तरी आरोग्य विभागाकडून जाणीवपूर्वक असे होत नाही. याला कारणीभूत आपण नागरिक आहोत. कारण स्वॅब द्यायला जाण्यात नागरिकांची उदासीनता दिसून येते. त्याच प्रमाणे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना नागरिक हवा तेवढा प्रतिसाद देत नाहीत हे वास्तव आहे. माहिती लपवून आरोग्य विभागाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये ते एका विशिष्ट साखळी पर्यंतच पोहता येत आहे त्याच प्रमाणे वारंवार सर्वेक्षण करताना नागरिकांचा प्रतिसाद हा मुद्दा महत्वाचा ठरत आहे. 

दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की गेल्या अनेक दिवसापासून प्रशासकीय यंत्रणेत कामांमध्ये काम करणारे आरोग्य कर्मचारी पोलीस शिक्षक व अन्य सर्व कर्मचारी त्याच त्याच रटाळलेल्या कामाला कंटाळून गेले आहेत. तसेच या काम करणाऱ्या लोकांसाठी सुरुवातीच्या काळात जो आदर आणि प्रतिसाद सामाजिक स्तरावर देण्यात आला तो आता काहीसा बोथट होताना दिसून येत आहे. त्यामुळे केवळ प्रशासकीय निर्देशांची पूर्तता करून कामाशी काम अहवाल तयार केले जात आहेत. त्यामुळे या गोष्टीकडे ही गांभीर्याने बघण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

 बिनधास्त नाही तर बंदिस्त राहण्याला मोठेपणा समजावा ......

     थोडं कडवट वाटेल परंतु हे वास्तव नाकारता येणार नाही. प्रत्येक जण स्वतः हलगर्जीने वागतो आणि त्याला बिनधास्तपणा चे गोंडस रूप दिले जाते. मात्र हेच जीवावर बेतणारे ठरते. कोरोनाच्या परिस्थितीत तर ही बाब अतिशय गंभीर बनलेली आपण पाहिले आहे. थोडेही ढिल्लेपण मिळाले की रस्त्यावर बिनधास्त फिरणे,तेही विनामास्क,ना सॅनिटायझर ना सार्वजनिक संकेतांचे पालन याला मोठेपणा समजण्यात येतो .कोरोनाविषयक सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन न करता "काही होत नाही" हे पालुपद जोडून स्वतः इतरांपेक्षा फार वेगळे असल्याचा आभास तयार केला जातो. हीच बाब सामूहिक जिवावर बेतणारी ठरते. त्यामुळे आकडे कमी होणे,ही दिलासादायक गोष्ट नक्कीच असली तरी यामधून अधिकाधिक सतर्क होणे आवश्यक आहे केवळ हुरळून न जाता जबाबदार व बंदिस्त जीवनशैलीचा अवलंब प्रत्येकाने करणे आता गरजेचे बनले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !