MB NEWS- चित्रपट समिक्षा:*"जय भीम' केवळ नारा नव्हे, 'अस्मितेचे प्रतीक"*

 *"जय भीम' केवळ नारा नव्हे, 'अस्मितेचे प्रतीक"*



           -  प्रा. डॉ. धम्मपाल एन. घुंबरे.


            जय भीम चित्रपट पाहिला, संपूर्ण चित्रपटात जय भीम नावाचा कुठेही उल्लेख नाही, कोठेही वाक्य लिहिलेले नाही, जय भीम नावाची पाटी देखील नाही, मग काही लोकांना असा प्रश्न पडला असेल की जय भीम हे नाव या चित्रपटाचे देण्यामागचे कारण काय आहे. त्याचे उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर समजेल. थोडक्यात सांगायचे झाले तर, जय भीम हा चित्रपट तामिळनाडू येथील 1993 मधील झालेल्या आदिवासी कुटुंबातील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या सत्य घटनेवर आधारीत आहे. म्हणून या चित्रपटाचे नाव जय भीम आहे.

जय भीम या नावाचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर....


*जय भीम म्हणजे अन्यायाला वाचा फोडणे.....*

*जय भीम म्हणजे एक आशेचे किरण.....*

*जय भीम म्हणजे क्रांतिकारी चळवळ.....*

*जय भीम म्हणजे मुक्यांना बोलतं करणे.....*

*जय भीम म्हणजे अन्याया विरुद्धचा हुंकार.....*

*जय भीम म्हणजे दुबळ्यांना बळ देणे.....*

*जय भीम म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे.....*

*जय भीम म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे.....*

*जय भीम म्हणजे समता प्रस्थापित करणारी व्यवस्था.....*

*जय भीम म्हणजे संविधानिक लढाई.....*

*जय भीम म्हणजे स्वाभिमानाने जगण्याचे क्रांतिकारी पाऊल....*

*जय भीम म्हणजे असत्यावर सत्याचा विजय.....*

*जय भीम म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय....*

*जय भीम म्हणजे मानव अधिकार.....*

*जय भीम म्हणजे अस्मितेचे प्रतीक.....*

असे अनेक कार्य जय भीम या घोषणेत समावलेली आहेत.

            

            जय भीम चित्रपटाबद्दल खूप जणांनी स्वतःची मते मांडलेली असतील. परंतु या चित्रपटाची कथा एक सत्य घटनेवर आधारित आहे. म्हणून या सत्य घटनेचा खरा नायक ऍड. के. चंद्रू (मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश) यांच्या आयुष्यावर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय.

             

              ऍड. के.चंद्रूचा यांचा जन्म तिरुचिरापल्ली जिल्हा तामिळनाडू येथील श्रीरंगम येथे झाला. ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चे माजी विद्यार्थी कार्यकर्ते होते. चेन्नईच्या लॉयोला कॉलेजमधून विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाची सुरुवात केली. त्यांचे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याने महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षात मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पदवीनंतर, त्यांनी 1988 पर्यंत सामुदायिक सेवा आणि पूर्णवेळ सीपीआय (एम) चे राजकीय कार्य केले. नंतर ते 1973 मध्ये विधी महाविद्यालयात दाखल झाले, त्यावेळी त्यांना वसतिगृहात राहण्यासाठी रूम देण्यास नकार दिला, म्हणून त्यांनी कॉलेज कॅम्पससमोर बेमुदत उपोषण करुन स्वतःला वस्तीगृहात राहण्याची जागा मिळवून घेतली. त्यानंतर ऍड. के. चंद्रूने रो अँड रेड्डी या लॉ फर्ममध्ये आठ वर्षे काम केले. श्रीलंकेच्या गृहयुद्धात भारतीय हस्तक्षेपाला विरोध केल्याबद्दल त्यांना 1988 मध्ये पक्षातून काढून टाकण्यात आले. कारण सी.पी.आय ने त्याला पाठिंबा दिला होता.


           ऍड. के. चंद्रू यांनी वकील म्हणून मद्रास उच्च न्यायालयात फौजदारी आणि दिवाणी दोन्ही बाजूंनी सराव केला.1993 मधील झालेल्या आदिवासी समूहाला न्याय मिळवून दिल्यामुळे त्यांची जास्त ओळख प्रचलित झाली. तत्कालीन भारताचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 31 जुलै 2006 रोजी त्यांना मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. त्यानंतर 9 नोव्हेंबर 2009 रोजी त्यांना कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले.

              

           न्यायमूर्ती के. चंद्रू हे न्याय व्यवस्थेतील एक प्रतिष्ठित न्यायाधीश होते. त्यांच्या निर्णयांमुळे अनेक गोर-गरीब, शोषित, पीडित, दलित, आदिवासी तसेच इतर सर्वच अन्यायकारक लोकांना न्याय देणारे न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या न्यायालयीन कारकिर्दीत न्यायमूर्ती के. चंद्रू यांनी 96,000 (शहाण्णव हजार)पेक्षा जास्त निकाल दिले. तसेच त्यांनी तामिळनाडूतील जातीय भेद-भाव विरुद्ध आणि मागासलेल्या समुदायांच्या हक्कांसाठी लढणारे न्यायमूर्ती होते. न्यायमूर्ती के. चंद्रू 2013 मध्ये न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले.

            जय भीम हा चित्रपट ऍड. के. चंद्रू यांनी 1993 मधील झालेल्या आदिवासी समूहाला जाणून बुजून केलेल्या अन्यायावर आधारित आहे. चित्रपटाचे "जय भीम" हे शीर्षक घेऊन तामिळ चित्रपट सृष्टीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कारण काही लोकांना "जय भीम" हे नाव ऐकल्यावर तळपायाची आग मस्तकाला जाते, पायाखालची जमीन सरकते, कपाळावरती अठ्या येतात, पित्त खवळते, खूप अस्वस्थता निर्माण होते किंवा ऐकावे वाटत नाही. त्यांना एवढेच बोलू इच्छितो, हा चित्रपट कोणत्या जाती पुरता मर्यादित नसून भारतीय राज्यघटनेने दिलेल्या नैतिक मूल्य आणि मानवाधिकार यावर अवलंबून आहे. त्यासाठी स्वतःचे वाचन वाढवा, काही वाचले नाही तरी चालेल पण भारतीय संविधान जरूर वाचा.

            

          जय-भीम या चित्रपटाचा नायक सूर्या शिवकुमार (चंद्रू) यांनी वकिलाची भूमिका साकारली आहे. तसेच मनिकंदन (राजाकंनु) हा काला चित्रपटांमधील लेलीन नावाच्या अभिनय केलेला अभिनेता आहे, त्याची पत्नी अभिनेत्री लिजो मोल जोस, (संगिनी), प्रकाश राज (पोलीस आई. जी. पीरुमल स्वामी) तसेच सिनेमातल्या सर्वच कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे. या चित्रपटाची निर्मिती ज्योतिका आणि सूर्या शिवकुमार यांनी केली, व या चित्रपटाचे लेखक तसेच दिगदर्शक टी.एस. गनानवेल यांनी हा सिनेमा अधिक प्रभावी चित्रित केला आहे. 

           

               जय भीम या चित्रपटाचा सारांश म्हणजे, तामिळनाडू राज्यातील अनुसूचित जमाती या समूहाला कशा पद्धतीने खोट्या आरोपाखाली जबरदस्ती करुन, अमानुष छळ करून मारतात. या चित्रपटातील काही घटनांवर आवर्जून उल्लेख करावा वाटतो. राजाकंनु, त्याचा भाऊ आणि मेव्हणा या तिघांना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा कबुल करण्यासाठी मारहाण केली जाते. त्या मारहाणीला कंटाळून त्याचा भाऊ राजाकंनुला असे म्हणतो की आपण गुन्हा कबूल करू, नाहीतर हे आपल्याला मारून टाकतील. त्यावर राजाकंनु असे म्हणतो मेले तरी चालेल पण जे आपण गुन्हा केलाच नाही तो कबूल करणे म्हणजे स्वतःचा स्वाभिमान विकणे होय. एका प्रसंगांमध्ये राजाकंनु ची बायको संगीनीला पोलीस स्टेशन मधून घरी सोडण्यासाठी गाडीमध्ये बसण्याचा आग्रह करतो, पण ती चालत चालत जाते आणि पोलीस तिला घरी सोडण्यासाठी तिच्या मागे मागे पोलिसांची गाडी जात असते. हा प्रसंग पाहण्यासारखा आहे. त्याच प्रमाणे संगीनीला पोलीस अधिकारी असा म्हणतो तू तुझी फिर्याद मागे घे, या केस मध्ये काहीच सत्य नाही, तू ही केस जिंकू शकत नाही, तुला वाटेल तेवढे पैसे मिळतील, तुला मुलांचा सांभाळ करण्यासाठी पैसे कामी येतील. त्यावर संगीनी म्हणते, या येणाऱ्या बाळाला मी त्याच्या वडिलांना भेटवू सुद्धा शकत नाही, माझ्याकडे पैसे भरपूर असतील, त्या पैशाने मी त्यांचे पोट भरेल, पण जेव्हा ते मला विचारतील, एवढे पैसे कुठून आले, तर त्यांना मी सांगेल तुझ्या वडिलांना ज्यांनी मारले त्यांनी दिले. पुढे संगीनी म्हणते *"हमे अगर मार भी देंगे तो, पूछेनेवाला कौन है! लेकिन इसका मतलब यह नही, के हम अपने स्वाभीमान को बेच दे! ये केस हार गयी तो भी परवा नही. बच्चो से कहुंगी की, लढाई हार गयी. हो सके तो उन पोलीसवाले को सजा दिलाये!"* या वाक्यातून असे जाणवते की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेला स्वाभिमान आणि आत्मसन्मान दृढ होत जातो. या चित्रपटामध्ये  पोलीस यंत्रणा व उच्चवर्णीय आधिकारी, पोलीस कोठडी तसेच न्यायालयीन कोठडी मध्ये जबरदस्तीने कोंडतात व त्यांना मताधिकारा पासून कश्या प्रकारे वंचित ठेवले जाते. किंवा उच्चनीचतेच्या द्वेषातून तेथील पोलीस अधिकारी, गावातील सरपंच किंवा स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्यानी केलेल्या अंन्यायावर प्रकाश टाकलेला आहे. ते अन्याय आपण पाहू शकत नाही, तर ते लोक अन्याय  सहन कसं करत असतील हा विचार स्वतःला माणूस म्हणून घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडणे सहाजिक आहे. तेथील लोकांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ऍड. चंद्रू यांनी केलेले युक्तिवाद पाहण्यासारखे आहेत. ऍड. चंद्रू यांनी तेथील आदिवासी समाजावरील टाकलेले गुन्हे कसे बेकायदेशीर आहेत हे पटवून सांगितले आहे. जय भीम या चित्रपटांमधील ऍड. चंद्रू यांनी न्यायाधीशांना केलेले हे वाक्य *"कानून तो अंधा है ही, पर आज ये कोर्ट गुंगा हो गया, तो मुश्किल हो जाएगी"* या वाक्यावरून असे जाणवते की काही गोष्टी दिसत नसतील तरीही त्या खऱ्या  असतात, त्या ऐकून घेऊन त्याची चिकित्सा करणे गरजेचे आहे. या चित्रपटांमध्ये या सर्व घटनेचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी पिरुमल स्वामी यांनी इमानदारीने या सर्व घटनेचा तपास योग्य पद्धतीने केलेला आहे हे पाहायला मिळते. यातील सर्व कलाकारांचे अभिनय हे पाहण्यासारखे आहेत.

             

            जय भीम या चित्रपटाच्या सर्व बाबींचा विचार करता या चित्रपटामध्ये दाखवलेले लाल कलरचे झेंडे, त्यावर असलेले चिन्ह, आदिवासींच्या बाजूने बोलणारे नेत्यांचा पोशाख, सभोवताली परिस्थिती पाहून असे वाटते की हा चित्रपट कम्युनिस्ट विचारधारेवर आधारित असेल. परंतु माझ्या मते कोणत्याही विचारधारेवर असलेल्या सामाजिक, राजकीय, नैतिक मूल्य किंवा संविधानिक प्रश्नाचे उत्तर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानातच मिळते. त्यामुळे प्रत्येक मानवाला स्वाभिमानाने जगण्यासाठी आंबेडकरवादा शिवाय पर्याय नाही. 

म्हणूनच "जय भीम' केवळ नारा नव्हे, 'अस्मितेचे प्रतीक" आहे.

                      प्रा.डॉ. धम्मपाल घुंबरे (बीड)

                      मो. ९९२३०००३५८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !