MB NEWS-आषाढी एकादशी निमित्त ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचा विशेष लेख➡️ खेळ मांडियेला

------------------------------------------------------

     खेळ मांडियेला...

------------------------------------------------------



महाराष्ट्रीयन समाज मनावर संत विचारांचा खोलवर परिणाम झालेला आहे. संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा,परंपरा इतकेच नव्हे सामाजिक चळवळीमध्येही पहायला मिळते. आणखी स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर महाराष्ट्रीयन समाज मनाची मशागत समताधिष्टित संतविचाराने केली. म्हणूनच इथे सामाजिक बदलांच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी समृद्ध महाराष्ट्र उभा केला. या संत विचारांचा जागर आपण करणार आहोत.

मध्ययुगीन प्रबोधन चळवळीचा भाग म्हणून संत परंपरेकडे पाहिले जाते. हे संत आंदोलन काही सहज उभे राहिले नाही तर समाजाची एक नीकड म्हणून ते उदयास आले. साधारण बाराव्या तेराव्या शतकाच्या आसपास हे संत आंदोलन उभे राहिले. खरे तर पूर्वापार चालत आलेल्या भक्ती परंपरेला या संत चळवळीने काही धक्के दिले. अर्थात त्यावेळी त्यांनी जे धक्के दिले त्याचे परिणाम तत्काळ जाणवले नसले तरी सामाजिक बदलाची पायाभरणी त्यानी त्यावेळी केली असे म्हणता येईल. त्यांनी त्यावेळी रुजविलेल्या प्रकाश बीजांची फलश्रुती आज आपल्याला काही प्रमाणात दिसू लागली आहे. अज्ञाने अंधारलेल्या समाज मनाला ज्ञानाच्या उजेडात योग्य वाटा दाखविण्याची किमया संतानी केली. म्हणून नामदेव महाराज आपल्या कीर्तनाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणतात -

नाचू कीर्तनाचे रंगी l

ज्ञानदीप लावू जगी l

तर संत तुकाराम महाराजही अंधारलेल्या वाटा उजळून सत्य असत्याचा निवाडा करण्यासाठी  आपण आलो असल्याची ग्वाही देताना म्हणतात -

उजळावया आलो वाटा l

खरा खोटा निवडा ll

ज्या काळात कर्मकांडे, जातीय, धार्मिक कट्टरतेचे स्तोम माजलेले होते. चातुर्वण व्यवस्थेच्या टाचेखाली समाज रगडला जात होता. असे वातावरण कधीही परकीय आक्रमकांना आपली सत्ता रुजविण्यासाठी अनुकूल असते. याच काळात परकीय आक्रमकांनी आपली मुळे इथे रुजवायला सुरुवात केली. म्हणजे परकीयांचा सत्तालोलूप मस्तवालपणा आणि स्थानिक वर्चस्ववाद्यांची मग्रूरी यात समाज भरडला जात होता. त्यावेळी संतांची प्रबोधन चळवळ उभी राहिली.

तामिळनाडूमध्ये अलवार, कर्नाटकात लिंगायत तर महाराष्ट्रात वारकरी संत परंपरा रुजली. आज सातशे वर्षे वारकरी संतांनी उभी केलेली ही भागवत धर्माची भक्कम इमारत उभी आहे. जात व्यवस्था हा इथला स्थायी भाव असतानाही वारकरी संतांनी उभ्या केलेल्या भागवत धर्माच्या इमारतीत सर्वांनाच समान अधिकार मिळाला. गेली सातशे वर्षे या वारकरी परंपरेने सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत यांना सारख्याच प्रेमाने आपल्यात सामावून घेतले. पंढरपूरच्या वाळवंटात मांडलेल्या या खेळात सर्वच इतके रंगून गेले की सर्व भेद आपोआप गळून पडले. किंबहूना त्यासाठीच आम्ही पंढरपूरच्या वाळवंटात हा जात-धर्म विरहित भागवत धर्माचा खेळ मांडलेला आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. या मांडलेल्या खेळामुळे भेदा भेदातून निर्माण होणार क्रोध आणि कुणाला तरी कनिष्ठ समजून आपण श्रेष्ठ असल्याचा अभिमान याला आम्ही पावटणी केली आहे.  परिणामी आता कुणीच उच्च किंवा नीच रहात नसल्याने सर्वजण एकमेकांच्या पायाला लागतात,  असे एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात. ज्या अभंगातील काही भाग प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायल्याने तो अभंग घराघरात पोहचलेला आहे. तो अभंग असा - 

खेळ मांडियेला वाळवंटी घाई l

नाचती वैष्णव भाई रे l

क्रोध अभिमान केला पावटणी l

एक एका लागतील पायी रे ll1ll

या खेळामध्ये कोणतेही अवघड कर्मकांड नाहीत. कोणेतेही बाह्य उपचार नाहीत.  गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदनाचा टीळा लावला की, अन्य कोणताही देखावा करावा लागत नाही.  टाळ-मृदंगाच्या तालावर आम्ही पवित्र नामावळी गातो तेव्हा आपोआपच आनंदाचाकल्लोळ निर्माण होतो. या आनंद कल्लोळात पंडित, ज्ञानी, योगी, महानुभाव, सिद्ध, साधक, मूढ इतकेच नव्हे तर स्री आणि पुरुष हे सर्व भेद गळून पडले आहेत. हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात- 

लुब्धली नादी लागली समाधी l

मूढजन नर नारी लोका रे ll

पंडित साधक योगी महानुभाव l

एकचि सिद्ध साधका रे ll

ज्याला मूढ म्हणजे बुद्धू समजले जाते, अशा बौद्धिक क्षमता कमी असलेल्यांपासून ते वेदशास्रांचा अभ्यास करून एका बौद्धिक उंचीवर पोहचलेले पंडित, मौक्ष-मुक्तीच्या लालसेने साधना करणारे साधक, योगाच्या माध्यमातून समाधी अवस्थेच्या स्वानंदात तल्लीन होणारे योगी, मानुभाव या सर्वांचा अधिकार, क्षेत्र वेगवेगळे आहेत. एरवी समाजात वावरताना आपल्या उपाधीच्या श्रेष्ठत्वाचा डोलारा घेऊन मिरवणारे एकदा का पंढरपूरच्या वाळवंटात मांडलेल्या खेळात सहभागी होतात तेव्हा त्यांच्या या सर्व उपाध्या गळून पडतात तेव्हा उरत ते केवळ निखळ माणूसपण! 

या अभंगाचे पूढचं चरण तर खूपचं महत्वाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो पंढरपूरच्या वाळवंटात आम्ही जो खेळ मांडलेला आहे ना त्यामुळे वर्णाचा अभिमान गळून पडला. खरं तर इथल्या वर्णव्यवस्थेने भेदाभेदाचा कळस गाठलेला होता. त्यालाच या खेळाने सुरुंग लावला आहे. खरं तर वर्ण व्यवस्थेने निर्माण केलेल्या उच-नीच व्यवस्थेत खालच्या वर्गातल्या लोकांनी उच्च वर्णीयांच्या पायावर लोटांगण घालावे, अशी प्रथा होती. पण तुकाराम महाराज सांगतात आम्ही  मांडलेल्या या खेळामुळे वर्णाचा अभिमान गळून पडला आणि त्याचा परिणाम सर्वजण एकमेकांच्या पाया पडू लागले आहेत. केवढी मोठी क्रांती केली. उच्च-नीच भेदाने जे चित्त गढूळ झाले होते. ते चित्त आम्ही मांडलेल्या खेळामुळे इतके निर्मळ झाले की, दगडालाही आता पाझर फुटले आहेत.

वर्णाभिमान विसरली याती l

एकमेका लोटांगणे जाती ll

निर्मळ चित्ते झाली नवनीते l

पाषाणा पाझर फुटती रे  ll

निर्मळ मनाने उचनीचतेच्या गढूळपणा वारून स्वच्छ समाज निर्मितीची वाट संत चळवळीने मोकळी केली. अवघड दुस्तर वाटा मोडून टाकून भक्तीपंथ बहुसोपा केला.



         ✍️

ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर

          ✍️

संपर्क सूत्र: 98926 73047

###############################

  ■ लेखक ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार, व्याख्याते म्हणून ओळखले जातात. त्यांची चिंतनपर पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. पत्रकार, कवी म्हणूनही त्यांची ख्याती आहे.

                                                 -संपादक

###############################


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !