MB NEWS-वैद्यकीय जीवनातील अपूर्वाई !

 वैद्यकीय जीवनातील अपूर्वाई !



*लॅन्सेट* या वैद्यकीय क्षेत्रातील जगविख्यात नियतकालिकात *"प्लेग लाईक बॅसिलस"* हा लेख प्रकाशित झाला होता. साल साधारण १९९४ चे असणार. राज्यात त्यावेळी बहुदा शिवसेना-भाजपचे पहिल्यांदाच  सत्तेवर आलेले युतीचे शासन असावे. उंदरांमुळे प्लेगची साथ पसरत असल्याची चर्चा टिपेला होती. गुजरातच्या सूरतेत प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. सर्वत्र भयभीत वातावरण पसरलेले होते. या दरम्यानच लॅन्सेटमध्ये "प्लेग लाईक बॅसिलस" हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखामध्ये तत्कालीन बीड तालुक्यातील मामला (ता. वडवणी) गावात जाऊन उंदरांच्या लि०हरसह अन्य अवयवांच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासण्यांनंतरचे सूक्ष्म निरीक्षण नोंदवले होते. यासाठी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक पथक गावात गेले होते. ज्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये हे पथक प्लेगचा अभ्यास करण्यासाठी मामला गावात गेले होते त्यात होते डॉ. जगदिश जीवनराव उर्फ जे. जे. देशपांडे !

डॉ. देशपांडे यांनीच तो "प्लेग लाईक बॅसिलस" हा सूक्ष्म निरीक्षणातून केलेल्या संशोधनातून लेख लिहिला होता आणि जगविख्यात लॅन्सेटने तो प्रकाशितही केला होता. तेव्हापासून मामला व साळींबा (ता. वडवणी) या गावांमध्ये आजही प्रत्येक महिन्याला राष्ट्रीय प्लेग संशोधन केंद्राचे पथक येऊन उंदरांची तपासणी करून काही

नमुने घेऊन जाते.

परळीचे भूमिपुत्र असलेल्या डॉ. देशपांडे यांच्या त्या लेखाचे तेव्हा वैद्यकीय क्षेत्रात मोठे कौतुक झाले होते. हा लेख प्रकाशित होऊन आता दोन तपांपेक्षाही अधिकचा काळ लोटला. तत्पूर्वी १९९३ सालच्या किल्लारी येथील महाभयंकर भूकंपादरम्यान सर्व प्रथम वैद्यकीय पथक घेऊन दाखल होणारे डॉक्टर जे. जे. काकाच होते. केवळ दाखलच नाही तर डॉक्टर आठवडाभर तेथेच तळ ठोकून होते. मृत्यूच्या जबड्यात अडकलेल्या अनेकांना जीवदान मिळाले. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) येथे कार्यरत असताना सिल्लोडजवळील गावे थॉयरॉईडने  बाधितपट्टा म्हणूनही समोर आणून वैद्यकीय क्षेत्राचे सर्व प्रथम लक्ष वेधणारेही डॉक्टरच होते. 

माणूस कालचे आज विसरतो. प्लेगची साथ आणि लेखही इतिहासाच्या पानांमध्ये बंद झालेला असला तरी त्याची नोंद आणि स्मरण परळीकरांनी ठेवणे आवश्यक आहे. परळीकरातूनही कधीकाळी लॅन्सेटसारख्या जगविख्यात नियतकालिकात लेख छापून आलेले आहेत, याची आठवण आजच्या पिढीला सांगणे कर्तव्यच मानायला हवे. 

यानिमित्ताने आज याचा संदर्भ किंवा प्रासंगिक काय ? असा प्रश्न उपस्थित होईल. त्याचे उत्तर म्हणजे डॉ. जे. जे. देशपांडे काकांचा आज (७ सप्टें.) वाढदिवस. ऐंशीव्या वर्षात त्यांचे पदार्पण. परळीतील पहिले एमडी डॉक्टर, अशी त्यांची आणखी एक चिरओळख !

केवळ सेवाभावनेतून वैद्यकीय क्षेत्रासाठी स्वतःला समर्पित ठेवून आयुष्याला अर्थगर्भ करणाऱ्या डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून परळीत तर लातूर, राहुरी, विजापूर आदी ठिकाणच्या प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता (डीन) म्हणूनही निगुतीने जबाबदारी सांभाळून कामाचा ठसा उमटवलेला आहे. आज ते त्यांच्या पुढच्या पिढीतील मार्गदर्शकच्या भूमिकेत वावरत आहेत. 

जे. जे काकांचे वडील जीवनरावजी हेही डॉक्टर. जुन्या म्हणजे स्वातंत्र्य मिळाले त्या काळातील. मुलगा डॉ. गुरूप्रसादही परळीतील प्रथितयश बाल-शिशू तज्ज्ञ. नातू - चि. अमेयलाही नुकताच वैद्यकीय क्षेत्रातच प्रवेश मिळाला. दोन्ही मुलींची पुढची पिढीही डॉक्टरच झालेली आहे. हा विलक्षण आणि निःसंशय कृतकृत्य योगायोग जसा आहे, तसाच आणखी एक योग असा की, डॉक्टर काकांसोबत त्यांचा नातू चि. अमेय व डॉक्टर कन्येचा वाढदिवस एकाच तारखेला म्हणजे ७ सप्टेंबरलाच असावा, ही वैद्यकीय जीवनातील अभूतपूर्व अपूर्वाईच म्हणावी लागेल ! डॉक्टर काकांचे मनःपूर्वक अभीष्टचिंतन ! त्यांच्या आरोग्यदायी आणि सुखदायी जीवनासाठी प्रभुचरणी प्रार्थना ! ! 

अनंत  कुलकर्णी  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार