MB NEWS:अर्थो रक्षति रक्षित: किं घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने..

 अर्थो रक्षति रक्षित: किं घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने..

डॉक्टरांना रूग्णांची नाडी तपासून निदान करता येते, हा दृढ विश्वास अनेकाबाबत आजही कायम आहे. आरोग्यदायी समाजनिर्मितीत डॉक्टरांचे योगदान मोलाचे ठरते. त्या दृष्टीने विचार करायचा तर आरोग्य साक्षरते बरोबरच अर्थ साक्षरता देखील महत्वाची ठरत आहे. हाच वसा डॉ.दिगंबर जनार्धन दंडे यांनी घेतला. रूग्णांना उपचाराद्वारे दिलासा देतानाच त्यांच्या आर्थिक गरजांच्या पुर्ततेसाठी प्रयत्न करण्याचे मनोमन ठरवले आणि यातूनच डॉ.दंडे यांचा बँकींग क्षेत्रात प्रवेश झाला. दीनदयाळ नागरी सहकारी बँक म.अंबाजोगाई या बँकेत संचालक ते अध्यक्ष हा डॉक्टरांचा प्रवास लक्षात घेण्याजोगा आहे. संघाच्या संस्कारातून पुढे आलेल्या डॉ.दिगंबर दंडे यांनी कायम समाजाच्या सर्वांगिण हिताचा विचार केला. बँकेच्या निरंतर प्रगतीबरोबरच समाजातील विविध घटक या बँकेशी कसे जोडले जातील यावर भर दिला. डॉ.दंडे यांच्या या कार्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप...


‘आरोग्यदायी जीवन’ ही मोठी देणगी समजली जाते. समाज हा व्यक्ती-व्यक्तिंचा असतो. त्यादृष्टीने विचार करायचा तर व्यक्तीगत आरोग्य उत्तम राखल्यास निरोगी समाजनिर्मिती शक्य होते. अर्थातच, यात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सार्यांचे योगदान मोलाचे ठरते. खरे तर वैद्यकीय व्यवसायाचा समावेश सेवा क्षेत्रात होतो. ही समाजाची एक प्रकारची सेवा असते. त्यामुळेच डॉक्टर्स तसेच त्यांच्या सहकार्यांमध्ये सेवाभाव असणे गरजेचे ठरते. या सेवाभावाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. दिगंबर जनार्दन दंडे. वैद्यकीय व्यवसाय हा तसा क्लिष्ट, प्रसंगी गुंतागुंतीचा आणि काळ-वेळेची मर्यादा नसणारा समजला जातो. त्यामुळे या क्षेत्रात काम करणे अनेकांसाठी कठीण ठरते. तरिही या क्षेत्रातील बहुतांश जण हसतमुखाने आपले कर्तव्य पार पाडत असतात. पण वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना बँकींग क्षेत्राची आवड असणे, बँकींग व्यवसायाच्या उन्नतीसाठी झटणे हे विशेष गुण म्हणावे लागतील. ते डॉ. दिगंबर दंडे यांच्या अंगी होते. त्यातूनच त्यांना बँकींग क्षेत्राविषयी गोडी वाटू लागली. त्यांना ‘दिनदयाळ नागरी सहकारी बँक’ मर्यादित, अंबेजोगाई या बँकेविषयी जिव्हाळा वाटू लागला. ते बँकेच्या कार्यात मनापासून लक्ष देऊ लागले, बँकेच्या कार्यविस्तारासाठी प्रयत्नशील राहू लागले.



 ही प्रामाणिक तळमळ पाहून 1977 मध्ये त्यांनादीनदयाळ बँकेच्या संचालक मंडळात घेण्यात आले. या जबाबदारीचे भान राखत त्यांनी बँकेच्या कामासाठी अधिकाधिक वेळ देण्याचा प्रयत्न केला. वक्तशीरपणा हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. बँकेच्या संचालक मंडळांच्या वेळोवेळी होणार्या बैठकांना ते नियोजित वेळेपूर्वी हजर असत. डॉ. दिगंबर दंडे हे बैठक सुरू झाल्यानंतर आले, असे त्यांच्या एकूण कार्यकालात कधीही घडले नाही. त्यांनी जणू इतरांसमोर वक्तशीरपणाचे आदर्श घालून दिला. बँकेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहत.




संघाच्या संस्कारातून पुढे आलेल्या डॉ. दिगंबर दंडे यांनी कायम समाजाच्या सर्वांगिण हिताचा विचार केला. समाजातील विविध घटक या बँकेशी कसे जोडले जातील, यावर भर दिला. कायम संस्थेचे हीत डोळ्यासमोर ठेवले. एखाद्या प्रश्नाची उकल ही त्या प्रश्नाच्या सर्व बाजू अभ्यासल्याशिवाय नीट होत नसते. यात आपला विचार प्रसंगी एकांगी ठरू शकतो. त्यामुळे दुसर्यांचे विचार जाणून घेतल्याशिवाय काही निर्णय घेणे उचित ठरत नाही, याची डॉ. दंडे यांना जाण होती. त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क खूप मोठा होता. त्यांच्या सहवासातील प्रत्येकाला त्यांच्याविषयी प्रेम, जिव्हाळा वाटत असे.



बँकेच्या ग्राहकांची अडचण होऊ नये, त्यांची कसलीही गैरसोय होऊ नये, याकडे त्यांचे सतत लक्ष असायचे. ग्राहकही आपली अडचण थेट डॉ. दंडे यांना भेटून मोकळेपणाने सांगत. बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष श्री. सत्यनारायण लाहोटी यांच्या अचानक मृत्यूनंतर उपाध्यक्षपदी डॉ. दिगंबर दंडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बँकेच्या कार्याचा आलेख चढता राहिला.पुढे त्यांच्याकडे बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा आली. या कार्यकालातील त्यांचे बँकेसाठीचे योगदान खूप मोलाचे ठरले. विशेषत: अहमदपूर, औरंगाबाद, बीड आदी ठिकाणी बँकेच्या शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली. अंबेजोगाई शहरात बँकेची स्वत:ची मध्यवर्ती इमारत उभी करण्यातही डॉ. दिगंबर दंडे यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकालात बँकेतील कर्मचार्यांची आर्थिक स्थिती आणि त्यांचे आर्थिक नियोजन याकडे विशेषत्वाने लक्ष दिले. कर्मचार्यांच्या वेतनवाढीला मान्यता देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला.



 डॉ. दिगंबर दंडे हे दरवर्षी मकर संक्रांतीला स्वत:च्या घरून खास तिळाचे लाडू बनवून आणून, ते स्वत:च्या हाताने बँकेतील प्रत्येक कर्मचार्याला देत असत. ही परंपरा त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली होती. सामान्य माणूस डोळ्यापुढे ठेवून सहकारी बँका सुरू करण्यात आल्या. त्यादृष्टीने शासनावर अवलंबून न राहता सामान्य माणसाला त्याच्या विकासासाठी विविध आर्थिक सुविधा उपलब्ध करून देणे व माणसाला माणूस म्हणून जगविणारी व्यवस्था या बँकेच्या माध्यमातून निर्माण करणे

शक्य झाले अशा स्वरूपाचे मोलाचे विचार डॉ. दिगंबर दंडे यांनी व्यक्त

केले होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत 1910-1911 च्या प्रारंभीच

बँकेच्या कार्यकर्तृत्त्वात मोलाची भर पडली. ती म्हणजे बँकेला बीएसआय ह्या

आंतरराष्ट्रीय कंपनीचा ‘गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आयएसओ 9001:2008 प्रमाणित बँक’ हा बहुमान प्राप्त झाला. यात आणखी एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मराठवाड्यातील टायर-1 बँकांमध्ये ‘दिनदयाळ नागरी सहकारी बँक मर्यादित, अंबेजोगाई’ या बँकेस प्रथमच हे प्रमाणीकरण प्राप्त झाले. याद्वारे बँकेच्या विश्वासार्ह सेवेवर जणू काही शिक्कामोर्तब झाले. कोणत्याही क्षेत्राच्या वाटचालीत कुशल मनुष्यबळ विकासाचा भाग महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने बँकेचा कर्मचारी ही बँकेची जमेची बाजू असते. किंबहुना समाधानी, प्रशिक्षित, सद्गुणी व चारित्र्यसंपन्न कर्मचारी हा बँकेचा अविभाज्य घटक आहे, याची जाणीव या बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह संचालक मंडळाला राहिली आहे. त्यानुसार बँकेच्या कर्मचार्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन मनुष्यबळ विकासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्याच बरोबर बँकींग क्षेत्रातील मुलभूत बदलांची जाणीव ठेवून त्यानुसार धोरणे आखणे आणि बँकेचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न करणे यावर भर देण्यात आला. यात सहकार भारती, यशदा पुणे, सहकार प्रशिक्षण केंद्र, लातूर, भारतीय रिझर्व्ह बँक कृषी बँकींग, पुणे यांच्यातर्फे आयोजित प्रशिक्षण वर्गात या बँकेच्या कर्मचार्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला.




डॉ. दिगंबर दंडे यांचे ‘दिनदयाळ नागरी सहकारी बँक’ मर्यादित, अंबेजोगाई या बँकेशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. बँकेची प्रगती तसेच कर्मचारी, खातेदार, ठेवीदार, कर्जदार यांची उन्नती हा त्यांचा ध्यास होता. या संदर्भातील आपल्या भावना त्यांनी वेळोवेळी भाषणातून, लिखाणातून व्यक्त केल्या. ‘ईवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ या शीर्षकाच्या लेखात डॉ. दंडे यांनी व्यक्त केलेल्या भावना सार्यांसाठी प्रेरणादायी आणि पथदर्शक आहेत.

या लेखात डॉ. दंडे म्हणतात, मित्रहो, सहकार ही फार मोठी शक्ती आहे. या समूह शक्तीतून अपेक्षित यशप्राप्ती होते. विश्वासार्हता हाच सहकारी बँकेचा आधार आहे. सहकारी चळवळीच्या तत्त्वज्ञानात कोणत्याही प्रकारचा दोष नाही. त्यामुळे ही चळवळ देशभर वाढत गेली. सहकारी क्षेत्रामध्ये महत्त्वाचा भाग म्हणून नागरी सहकारी संस्थांनी आर्थिक क्षेत्रामध्ये पदार्पण केले. पहिल्या 15 वर्षांत जेमतेम 13 नागरी सहकारी बँका अस्तित्त्वात आल्या. आजमितीस केवळ महाराष्ट्रामध्ये अंदाजे 700 च्या आसपास नागरी सहकारी बँका कार्यरत आहेत. तर संपूर्ण भारतात अंदाजे 2,100 नागरी सहकारी बँका कार्यरत आहेत. सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून ह्या सहकारी बँका सुरू करण्यात आल्या. आज बँकेच्या क्षेत्रामध्ये मुलभूत बदल झाले आहेत. सरकार व रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण यामध्ये परवाना पध्दत उदार केली आहे. व्याजदराचे स्वातंत्र्य दिले आहे, त्याच बरोबर बँका नफ्यातच चालल्या पाहिजेत, असा संकेतही दिला आहे. आता रिझर्व्ह बँकेकडे बोट दाखवून चालणार नाही. स्वत:च्या पायावर शर्यत धावावी लागणार आहे. आमच्या दीनदयाळ बँकेमध्ये संपूर्ण संगणकीकरण झाले आहे. त्यामुळे विनाविलंब कामे होतील. आमचा सर्व कर्मचारी वर्ग सक्षम आहे. ग्राहक आता जागरूक झाला आहे. त्याला आपल्याकडे आकर्षित करून रोखून ठेवणे हे व्यावसायिक कौशल्य अत्यावश्यक ठरत आहे. जे आमच्या कर्मचारी वर्गामध्ये आहे.



आमच्याकडे सचोटी आणि पारदर्शकता ठेवण्यात येईल. जनसामान्यांचा विश्वास संपादन केला जाईल. त्यांची अडवणूक न करता झटपट कामे केली जातील. ग्राहकांनी ही आपली बँक आहे असे समजून कर्जाची परतफेड वेळेवर करावी. कोणतीही बँकेच्या यशस्वी वाटचालीसाठी निस्पृह, प्रामाणिक, अभ्यासू व एकजीव असलेले संचालक मंडळ, योग्य माणसाची शाखाधिकारी म्हणून नेमणूक, त्यांच्यावर टाकलेला विश्वास, दोघांचेही परस्पर सहकार्य या सर्व गोष्टी आमच्याकडे अनुकूल आहेत. आम्ही सर्व एका ध्येयाने प्रेरित आहोत. सामान्य माणसाच्या आयुष्यात बचतीचा फार मोठा वाटा असतो. त्याद़ृष्टीने सामान्य माणसाचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी आमची बँक सतत प्रयत्न करीत असते. एका कवीने म्हटल्याप्रमाणे -

चला उघडू या आज नव्याने आनंदाचे खाते

दिव्या दिव्याची ज्योत सांगते - समृध्दीचे नाते.

डॉ. दिगंबर दंडे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी

बँकेच्या केवळ तीन शाखा होत्या. काही तांत्रिक अडचणींमुळे आरबीआय नवीन शाखा देण्यास तयार नव्हती. अशा स्थितीत सततचा पाठपुरावा, प्रबळ इच्छाशक्ती आणि बँकेचे उपाध्यक्ष, संचालक, अधिकारी यांचे वेळोवेळी लाभलेले सहकार्य, सर्वांनी घेतलेले परिश्रम यातून बँकेच्या शाखा विस्तारास चालना मिळत गेली. डॉ. दंडे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा बँकेच्या ठेवी 50 कोटींच्या आसपास होत्या. त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली आणि अल्पावधीतच ठेवींची रक्कम 150 कोटींच्या आसपास पोहोचली. बँकेच्या शाखा विस्ताराबरोबर आणि कार्य विस्ताराबरोबरच कर्मचार्यांच्या संख्येतही वाढ होत राहिली. एकंदर बँकेची उत्तरोत्तर प्रगतीपथावर वाटचाल सुरू राहिली. या काळात बँकेच्या सर्व शाखा ‘नॅशनल फायनान्स स्वीच (एनएफएस)ला जोडणे, एटीएम सेंटर्सची संख्या वाढवणे, बँकेच्या खातेदारांना क्रेडिट/डेबिट कार्डची सुविधा तसेच एसएमएस अलर्टची सुविधा देणे, प्रत्येक चेकधारक खातेदारास त्याच्या वैयक्तिक नावाने छपाई करून चेकबुक देण्याची सुविधा उपलब्ध करणे, छोट्या व मध्यम व्यावसायिकांना तत्काळ कर्ज देणे, कर्मचार्यांना प्रशिक्षित करण्यासाठी मासिक प्रशिक्षणाची सुविधा, कर्मचार्यांना तज्ज्ञ व्यक्तींकडून दर महिन्याला वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन तसेच करस्पॉन्डट बँकिंग प्रतिनिधी नियुक्त करून ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग सुविधा देण्याचा प्रयत्न करणे आदी उद्दीष्ट्ये समोर ठेवण्यात आली होती. 

डॉ. दिगंबर दंडे यांनी बँकेचे संचालक कसे असावेत, याबाबत काही मोलाचे विचार वेळोवेळी मांडले होते. आपल्या एका मनोगतात त्यांनी सांगितले होते की, बँकेच्या संचालकाची भूमिका ही विश्वस्ताची असावी. ही संस्था कायम राहणार आहे. पण आपण संचालक म्हणून कायम राहणार नाही, याची जाण संचालकांना असावी. संचालकांनी संस्थेच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील रहावे. कुटुंब प्रमुख ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, तशीच काळजी संचालकांनी आपल्या बँकेची घ्यावी. अशा बँका सामान्य माणसाच्या आर्थिक आरोग्यासाठी अतिशय मोलाचे योगदान देते असतात. त्यादृष्टीने सबलता आणि आर्थिक विकासासाठी संचालकांना वेळोवेळी काही महत्त्वाचे निर्णय, काही क्रांतीकारी निर्णय घ्यावे लागतात. याचीही जाणीव संचालकांना असायला हवी. विकासाच्या आणि सबलतेच्या गोष्टी करताना त्यात माणसाची नितीमत्ता, प्रामाणिकपणा या बाबी अतिशय गरजेच्या ठरतात. ‘विकास, विश्वास व विनम्रता’ हे आपल्या बँकेचे घोषवाक्य आहे आणि या तत्त्वावरच आपल्या बँकेची वाटचाल सुरू आहे. आपल्या बँकेच्या यशाचे रहस्य म्हणजे 1. नि:स्वार्थ, नि:स्पृह व अभ्यासू संचालक मंडळ, 2. अधिकारी व कर्मचारी यांच्यामधील प्रगाढ विश्वास आणि 3. प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी व कर्मचारी वर्ग. आपल्या ‘दीनदयाळ बँके’चे कार्य हा जणू जगन्नाथाचा रथ आहे व यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. डॉ. दिगंबर दंडे यांनी बँकेविषयी काढलेले गौरवोद्गारही लक्षात घेण्याजोगे आहेत. ते म्हणाले की, दीनदयाळ नागरी सहकारी बँक केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात आपल्या उत्कृष्ट कार्यप्रणाली, तत्पर ग्राहक सेवा व समृध्द सहकारीता याच तत्त्वावर कार्यरत आहे. प्रगतीचे एक पाऊल नेहमीच पुढे असणारी, सामान्यांचा आधार असणारी, सहकारी क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणारी ही बँक आहे. प्रगती करण्याच्या काळात सहकार टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, ही आमची तळमळ आहे. दीनदयाळ नागरी सहकारी बँक ही बीड जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील पहिली संगणकीकृत बँक आहे. अंबेजोगाई स्थित मुख्यालय असणार्या

या बँकेने आतापर्यंत सातत्याने लेखापरिक्षण वर्ग (अ) मिळविला आहे.

दीनदयाळ बँकेच्या नुतन वास्तुच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी डॉ.

दिगंबर दंडे यांनी व्यक्त केलेले मनोगत बँकेच्या सुरूवातीपासूनच्या वाटचालीवर पुरेसा प्रकाश टाकणारे होते. त्या प्रसंगी डॉ. दंडे म्हणाले की, या बँकेच्या स्थापनेपासून मोठा इतिहास आहे. माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांनी सर्वप्रथम महिला बँकेसाठी शेअर्स जमा केले. पण आरबीआयने महिला बँकेसाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे गोपीनाथरावांनी सर्वांचे शेअर्स परत केले. पुढे दोन वर्षांनी ‘दीनदयाळ बँके’साठी शेअर्स जमा केले. या बँकेच्या स्थापनेच्या पूजेसाठी गोपीनाथराव उपस्थित होते. या नुतन वास्तुचे भूमीपूजन गोपीनाथरावांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी गोपीनाथराव आपल्या भाषणात म्हणाले की, डॉक्टर, या वास्तुचे भूमीपूजन माझ्या हस्ते झाले. बँकेची ही वास्तू तयार झाल्यानंतर माझ्या हस्तेच उद्घाटन करा. आज दुर्दैवाने गोपीनाथराव नाहीत. पण त्यांच्या कन्या ना. पंकजा मुंडे च्या शुभ हस्ते या वास्तुचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे पंकजा ही 10 वर्षांपासून बँकेची संचालक आहे. एवढेच नव्हे तर, पंकजाच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा दीनदयाळ बँकेपासून झाला. ‘दीनदयाळ’मधील पहिल्या भाषणासाठी मी गोपीनाथरावांना आणले होते. 

डॉ. दंडे पुढे म्हणाले की, या नुतन वास्तुचे बांधकाम सुरू केल्यानंतर अनेक अडचणी आल्या. बांधकामासाठी 12 फूट खोल खणलेला खड्डा रात्री अतिवृष्टीमुळे संपूर्ण पाण्याने भरला. सतत पाणी काढून सुध्दा ते कमी होईना. बांधकामासाठी बोअरचे काम रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत सुरू होते. या काळात माझे सहकारी श्री. किरण फडणीस, श्री. के. पी. मुंडे, श्री. कोपले, बनवसकर, श्री. गौतमशेठ व पुरूषोत्तम भुतडा त्या ठिकाणी बसून होते. बोअरला पाणी लागल्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितले. बँकेविषयी नितांत पे्रम असणारे असे सहकारी मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो. अब तक की कामीयाबी तुम्हारे नाम करता हूँ

हर एक की लगन का झुककर सलाम करता हूँ

आज दीनदयाळजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे.

मुख्य म्हणजे सभागृहाला गोपीनाथरावांचे नाव देण्यात येणार आहे. दीनदयाळ बँकेचे बांधकाम, नोकरभरती हे सर्व कार्य अत्यंत पारदर्शकरित्या झाले व पुढे ही पारदर्शकता सांभाळली जाईल. दोन दिवसांपासून ताप येत असतानासुध्दा पंकजा या कार्यक्रमासाठी आली. आम्ही सर्व तिचे आभारी आहोत. तिचे व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावरील एक दैदिप्यमान उगवता तारा आहे. तिच्या हातून महाराष्ट्राचीच नव्हे तर भारतमातेची सेवा घडावी, ही परमेश्वराकडे प्रार्थना. डॉ. कुकडे तर माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत.

त्यांच्याविषयी एवढेच म्हणेन -

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्

मला ज्ञात मी एक धुळीकण

अलंकार ज्याला परि पाय तुझे

धुळीचेच आहे मला भूषण

या मनोगतातून डॉ. दंडे यांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. सहकारी संस्थांच्या वाटचालीत विविध घटकांचे योगदान मोलाचे असते, त्यातूनच संस्था नावारूपाला येऊ शकते, याची डॉ. दंडे यांना जाणीव होती. म्हणूनच ते त्याबद्दल वेळोवेळी ऋण व्यक्त करत. बँकेच्या प्रगतीमध्ये उपाध्यक्ष, उपाध्यक्षा, बँकेचे सर्व संचालक, सर्व शाखांचे स्थानिक सल्लागार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक सरव्यवस्थापक, मुख्य वसुली अधिकारी, सर्व शाखाधिकारी, कर्मचारी, दैनिक ठेव प्रतिनिधी यांनी निष्काम वृत्तीने बँक यशस्वी व प्रगतीपथावर नेण्यासाठी जे बहुमोल सहाय्य केले त्यासाठी मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो असे ते आवर्जून नमूद करत.

डॉ. दिगंबर जनार्दन दंडे यांची श्रीकृष्णावर अपार श्रध्दा होती. श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे -

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतूर्भुर्मा ते संग्ङोऽस्त्वकर्मणि॥

असाच त्यांचा जीवन प्रवास राहिला.

दिनदयाळ नागरी सहकारी बँक मर्यादित, अंबेजोगाई या बँकेच्या

वाटचालीत डॉ. दिगंबर दंडे यांचे कार्य निश्चितपणे उठून दिसणारे आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून, त्यांचे विचार आचरणात आणत या बँकेची यशस्वी वाटचाल निरंतर सुरू राहील यात शंका नाही.


*साभार*

*श्री कृष्णार्पणमस्तू, गौरव ग्रंथ*

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !