MB NEWS:कामगार साहित्य संमेलन मिरज

 माणसातील सृजनशक्ती असे पर्यंत साहित्यही असणार 

संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण

कामगार साहित्य संमेलन मिरज


नमस्कार! महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कामगार मंत्री व पालकमंत्री सांगली जिल्हा आणि कामगार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.नामदार डॉ.श्री.सुरेश (भाऊ) खाडे साहेब, संमेलनाचे उद्घाटक नवभारत या वैचारिक नियतकालिकाचे विद्यमान संपादक, इतिहास अभ्यासक आणि माझे स्नेही डॉ. राजाभाऊ दीक्षित, कामगार विभागाच्या प्रधान सचिव मा.विनिता वेद-सिंगल, कामगार कल्याण आयुक्त मा.रविराज इळवे व मंचावरील सर्व मान्यवर आणि मित्र मैत्रिणीनो.

आजच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित साहित्य संमेलन अध्यक्षपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल धन्यवाद. पण यासाठी माझी निवड का केली हे मात्र मला अजून कळत नाही. मात्र मला निमंत्रण देण्यासाठी प्रथम दूरध्वनीवरुन संपर्क साधणारे आणि नंतर घरी येऊन निमंत्रित करणारे मा.रविराज इळवे साहेब यांच्या परम सौजन्यशील बोलण्या वागण्याने मी सहजपणे होकार दिला. हे संमेलन कामगारांच्या साहित्यासंदर्भात आहे हे सूत्र धरुनच मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. पण साहित्य, मग ते कोणाचंही, कोणत्याही काळातलं असू देत, निर्माण करणारा माणूसच असतो. आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते साहित्य त्याच्या जगण्यातून निर्माण होत असतं. म्हणजे साहित्याचा विषय हा नेहमी माणूसच असतो.  आणि मग माणसाचं जगणं, तो ज्या कुटुंबात , समाजस्तरात जन्माला येतो, ज्या वातावरणात वाढतो. त्या वातावरणातलं राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, शिक्षणव्यवस्था, सांस्कृतिक वातावरण या सगळ्या सगळ्या ताणाबाणांच्या मिश्रतेचा साहित्यात आविष्कार होत असतो. कामगार साहित्यातही हेच होत असतं. तसं पण आत्ता आपण. म्हणजे आपण संयोजक, तुम्ही , मी सगळेच  धरून चाललो आहोत की भारतात आणि जगातही यंत्रयुगोत्तर गिरण्या कारखान्यांमधून जो कामगार वर्ग अस्तित्वात आला आहे तोच कामगार. त्याचं साहित्य हे कामगार साहित्य. ही गोष्ट तर खरीच आहे. गिरण्या कारखान्यातला कामगार हा कळत नकळत एकाच प्रकारच्या वातावरणात, एका आर्थिक, सामाजिक पर्यावरणात जगत असल्याने त्याचं जगणं एकसारख्या अनुभवातनं घडतं.  तो अविष्कार त्याच्या वागण्याबोलण्यातून आणि तो लिहू- वाचू लागला की लेखनातून साहित्यातून होतो. त्या संवेदना, त्या वर्गाच्या असल्यामुळे त्याच्या मनाला भिडते. म्हणूनच 68 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ स्नेही नारायण सुर्वे जेंव्हा हे भान आणून देतात की, “मी कामगार आहे तळपती तलवार आहे, सारस्वतांनो मी थोडासा गुन्हा करणार आहे! “ म्हणजे लिहिणार आहे. गिरण्या कारखान्यात काम करतांना आलेल्या या एकसंघ अनुभवातून आलेले, हे भान आहे. आणि म्हणून “मी एकटाच आलो नाही तर युगाचीही साथ आहे.!“ कामगार साहित्य हे या काळाचं अपत्य आहे हे नारायण सुर्वे बोलून गेले. कारण कामगार म्हणजे केवळ शारीरिक कष्ट  करणारा आणि भारतातील आणि सर्व जगातील समाजात शारीरिक कष्ट हे दुय्यम मानले जातात. गिरण्या कारखान्यातल्या एकाच प्रकारच्या अनुभवी संघभावनेने कामगाराला नवी दृष्टी दिली व नवंभान दिलं. नवी अस्मिता, अभिमान आणि विश्वास दिला. लेखन वाचनाने ती क्षितिजे विस्तारायला अवकाश दिला. तसंच तर सर्व समाजात जगण्यासाठी शारीरिक कष्ट हेच आदि साधन होतं. आहे. असेल. यंत्रयुगातल्या एकानुभवी समूहाला कष्टाचंही सामूहिक एकीकरण झालं. पण या यंत्र युगात कष्ट करवून घेणारा म्हणजे मालक, तिसराच कोणीतरी असल्याचं भान आलं. बाजारसंस्कृती आली कमी दरात भरपूर काम हे मालक हिताचं ठरल. आणि आपल्या कष्टावर, आपल्या वेळेवर आपला अधिकार का नाही? हे प्रश्न छळू लागले. त्यातूनच भविष्यवेधी धडाडीचे कामगार पुढारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्यासारखे नेते पुढे आले. आणि कामगार वर्ग संघटित होऊन त्याला चळवळीचं स्वरुप आलं. यंत्रयुगानंतर कामगार चळवळ पश्चिमेकडून कामगार विषयक सर्वांगिण अभ्यासाचं तत्वज्ञान घेऊन आली हे खरं. नवयुगाचं अर्थकारण मालक - मजूर संबंध, संघर्ष, मजुरांचे हक्क इत्यादी बाबींच्यामधून नवभान आलेला कामगारवर्ग निर्माण झाला. आणि तो अनुभव व्यक्त करतांना “मला मोर्चात प्रथम मार्क्सबाबा भेटला“ असं म्हणणारा, रुढ अर्थाने अल्पशिक्षित पण उच्च प्रतिभा आणि जाण असलेला नारायण सुर्वे सारखा कवी निर्माण झाला. नवभान आलेला कामगार साहित्यिक, भांडवलशाहीचं नवं अर्थभान घेऊन लिहू-वाचू लागला. चळवळीने नवतत्वज्ञान, नवी दृष्टी दिली. उत्पादन साधनांची मालकी ज्याच्याकडे आहे तो गिरणमालक प्रत्यक्ष उत्पादक असलेल्या मजुरांच्या कष्टमूल्यांचं अपहरण करतो, चोरी करतो, लूट करतो आणि नफा कमावतो. मजुराला माणूस म्हणून किमान सोयी मिळाव्या, मानवी प्रतिष्ठेने जगता यावे, या आकांक्षेतून कामगार वर्गाची नवी संघटितशक्ती निर्माण होऊन संप, त्याद्वारे मागण्या, मोर्चे यामुळे कामगार चळवळीचं अस्तित्व समाजाला जाणवू लागलं. त्याचा आविष्कार त्याच्या लेखनातूनं होऊ लागला. नवयुगाच्या विविध चळवळीतुन कामगार चळवळ ही पुढे येत गेली. त्या त्या गटातल्या साहित्याची निर्मिती त्यातून झाली. त्याची आणखी उदाहरणे म्हणजे स्त्रीवादी साहित्य स्त्रीवादी चळवळीमधून स्त्रीवादी साहित्यही निर्माण झालं. तसेच डॉ.आंबेडकरांच्या प्रेरणेतून, दलितांच्या चळवळीतून दलित साहित्यही आले. कोणत्याही चळवळीतूनं निर्माण होणाऱ्या साहित्यात एक धोका असतो. प्रचारकी होण्याचा!  प्रचारकी होण्याचा साहित्यात काही फायदे आहेत पण ते त्या काळापुरतंच साहित्य राहतं. चिरकाळ टिकणारं साहित्य, स्थलकालातीत संवेदना व्यक्त करणारं साहित्य त्यात क्वचितच असतं, आणि त्यामुळे मुंबई सारख्या नवउद्योगाचा पाया घालणाऱया नगरीत सरळसरळ गिरणगांव म्हणजे, परेल, लालबाग आणि गिरगांव म्हणजे प्रस्थापित मध्यमवर्ग असे स्वतंत्र दोन गट झाले. साहित्य संस्कृती सगळ्याच दृष्टीने! तसेच गिरगावी आणि गिरणगांवी साहित्य आलं. या विशेषत गिरणगांवी साहित्य कामगार रंगभूमीवर व्यक्त होत गेलं. कामगार साहित्याची वाटचाल कलापथकातूनं होत गेली. फ्र

प्रारंभी कलापथकं हीच प्रभावी ठरली हे सर्वांना माहीत आहे. आपल्या सर्वांना हे माहीत आहेच पण त्याच्या आधी काय होतं? कष्ट करणारा वर्ग नेहमीच मोठा होता आणि आहे.त्यावर्गाला पिळवणुकीचे भान होतं की नाही? तो वर्ग कधी अभिव्यक्त झाला की नाही? निश्चित व्यक्त झाला.

 यंत्र युगानंतर बदलत्या अर्थव्यवस्थेत वर्ग ही संकल्पना अर्थशास्त्रामध्ये नवीन आली असं म्हंटल गेलं, तरीसुध्दा  भारतात वर्णव्यवस्थेत वर्गसंकल्पनेतले भेद होतेच. भारतात वर्णवर्गव्यवस्था परस्परव्यावृत एकमेकांत गुंतलेली आहे. त्यामुळे आजच्या वर्गव्यवस्थेतही जो चौथ्या वर्ग जो बराचसा चौथा वर्णव्यवस्थेत असलेला आहे.  आर्थिक, सामाजिक उपेक्षा तो भोगत  होता. त्यातच सर्व स्त्रियाही होत्या आणि अज्ऴानही त्यात फार फरक पडलेला नाही. यंत्रयुगोत्तर नागरीकरणामुळे अर्थफ्रा

प्राप्तीचा नवा मार्ग सापडला. शिवाय शिक्षण व्यवस्था सार्वत्रिक झाली.  यामुळे निश्चित कांही फरक पडला आणि शिक्षणानुभवामुळे हा वर्ग आणि स्त्रियाही अधिक फ

प्रमाणात व्यक्त होऊ लागल्या हे खरं पण त्याआधीही विशेष संवेदनशील असलेल्या व्यक्तीही त्यांच्या पातळीवर मुखर होतच होत्या. सार्वत्रिक शिक्षण झाले तेव्हा श्री म. माटे  म्हणाले होते की, निरनिराळ्या जातीव्यवस्थेतले आणि व्यवसायातले लोक जेव्हा लिहू लागतील, तेव्हा आपली मराठी अधिक संपन्न होईल त्याचे सहअनुभव व शब्द लेखनात येतील. खरं तर विविध जाती जमाती आजच्या भाषेत साहित्य म्हणतात ते निर्माण करत होत्या. स्त्री वा पुरुष सर्वच. मौखिक, ग्रामीण, जानपदसाहित्य, लोकसाहित्य असं त्याला आज म्हंटलं जातं. ते निर्माण होत होतं. विशेषत कविता! जगाच्या पाठीवरची आद्य आणि आदिअभिव्यक्ती कवितेमधूनच झालेली आहे. कारण त्याला एक ताल-लयबध्दता असते. त्याचा औपचारिक लेखन, वाचन शिक्षणाशी संबंध नाही. स्त्रियांची, कष्टकऱ्यांची कविता, त्यांची अभिव्यक्ती श्रमाशी बांधलेली श्रमाच्या शारीरिक लयीशी बांधलेली असते आणि होती. परंपरेत असंख्य प्रकारची स्त्रीगीते आहेत. अगदी आदिवासी स्त्रियांच्यापासून जात्यावरच्या ओव्या, बाळगीतं, देवाधर्मांची गाणी, रानाशेतातली पुरुषांची गाणी, स्त्रियांची गाणी, समुद्रात, नदीत नाविकांची गाणी, वाळवंटी फ्रदेशात त्या रंगीबेरंगी तारसफ्तकातली गाणी, डोंगर पठारावरच्या धिम्या लयीतली गाणी, ही सगळी अनक्षरांची निर्मिती आहे. अडाण्यांची नव्हे. त्यांना अक्षर ओळख नसेल परंतु त्यांना संवेदना होती आणि बुध्दी होती. आणि तो त्यांच्या जगण्याचा, अनुभवाचा सर्वार्थाने श्रीमंत असा आविष्कार होता आणि असतोच. अगदी आमची लोकपरंपरा आणि अठरापगड जाती-जमातीतून आलेली संत परंपरा, शाहिरी परंपरा, या शाब्द मौखिक परंपरा. त्यातून कष्टकरी हे अभिव्यक्त होतच होते. आजच्या भाषेत हा कष्टकरी वर्ग असंघटित होता. म्हणून त्याचा आवाज वर्चस्व गाजवणारांच्या सत्तेच्या गदारोळात अंतस्तरात दबूनच राहिला. संतांचे आवाज देवाधर्मामुळे व्यक्त झाले. सर्वज्ञात झाले. पण तेही लोकसाहित्याच्या शैलीने! फार तर त्याला आपण परमार्थीकृत लोकसाहित्य म्हणू. त्यांनी अभिव्यक्तीसाठी जे छंद, रचनाबंध वापरले ते सगळे परंपरागत लोकछंद आहेत. ओवी, अभंग, भारुड, लावणी,पोवाडा, वह्या, भेदिकं, गीतं, स्त्रीगीतं, अनंत फ्रकारचे लोककलेतील छंद त्यांची आदिगीतं. विशेष म्हणजे आधुनिक यंत्र युगोत्तर कामगार साहित्यात अभिप्रेत अशी कष्टकऱयांची अस्मिता आपल्या उपेक्षेची जाणीव या सर्व अभिव्यक्ती त्या मौखिक परंपरेतही दिसते. विशेषत गाण्यातूनं, म्हणी उखाण्यातूनं, आणि लोकभाषेतल्या जाती पुराणातूनही! “जाती पुराण“ आपल्या फारशी माहीत नाहीत. पण त्या त्या जातींच्या अस्मिता आणि त्याचे इतिहास यांच्या बोली भाषेतून जतन केलेल्या असतात. हे सगळे आवाज उच्चस्तरीयांच्या झगमगाटात लपलेले राहिले. निदान आज ज्याला चळवळ म्हणतो, त्या चळवळीतल्या साहित्यप्रेमींनी नवीन जाणीव झालेल्या अभ्यासकांनी त्याचा शोध घ्यायला पाहिजे. असंघटित पिळवणूक होणाऱ्या समाज व्यवस्थेत हे साहित्य निर्माण झालेले आहे. याचे भान असले पाहिजे. उदाहरणं टाळण्याचा शक्यतो विचार करत होते. पण काही उदाहरणं दिल्याशिवाय पुरेशी स्पष्टता येणार नाही. 

नुकतेच यंत्रयुग आलेले होते. गिरण मजूर अस्तित्वात येत होता. श्रमिकांच्या डाव्या चळचळी आकार घेत होत्या. अशा कालात आण्णाभाऊ साठे म्हणाले होते. 

“ सन 1860 साली 

इंग्रजांनी अटक बघा केली 

टिळकांना कारागृही नेले 

मुबंईचा कामगार खवळले 

 निषेध संपाचे वादळ उठल 

 हिंदच्या मुक्तीचे भले शिंग वाजल 

रशियामध्ये लेनिन वदले 

    जी...जी...जी...!“

   आता संप हे हत्यार असं सगळं त्या पश्चिमेकडूनं, डाव्या चळवळीमधूनं, विशेषत रशिया मधूनं आयात झालं, असं सगळं वातावरण होतं. आणि त्या संकल्पना कामगार चळवळीच्या, डाव्या विचारसरणीच्या होत्या. संप हे हत्यार कशासाठी? समाज परिवर्तनासाठी! आपल्याला पाहिजे ते बदल घडविण्यासाठी,कामगारांच्या चळवळीमध्ये त्यांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी, मग त्या आर्थिक मागण्या असतील, भौतिक सुखाच्या मागण्या असतील, त्यांचे नोकरीचे तास निश्चित करणाऱ्या मागण्या असतील. जगाच्या पाठीवरच्या कामगार मुक्तीचा आणि माणसाच्या गुलामगीरीच्या मुक्तीचा काळ साहित्यात निर्भयपणे अवतरला होता. आणि प्रत्यक्षात त्या कृतीही व्हायला लागल्या होत्या. संप मोर्चे व्हायला लागले होते. 

थोडसं आडबाजूला जाऊन पण मला जे जाणवलं ते सांगावसं वाटतं. की संप हे निषेधाचं हत्यार प्रथम जर कोणी वापरलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुल्यांनी वापरलं. ते सुध्दा कामगारांच्या कल्याणासाठी वगैरे नव्हते. तर ज्यांचं त्यात उलट अकल्याण आहे. अशा लोकांना त्यांनी संप करायला लावला आणि कशासाठी तर सांस्कृतिक परिवर्तनासाठी. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी परिवर्तनासाठी ज्या ज्या भूमिका घेतल्या त्यातली एक महत्वाची भूमिका ती स्त्रियांची प्रतिष्ठा आणि स्त्रियांना सन्मान मिळवून देणं. आणि त्यात ज्या स्त्रिया उच्चवर्गीय आणि वर्णीय होत्या. त्या वाट चुकल्या किंवा त्यांना भरीला घातलं आणि त्यांच्यावर अतिप्रसंग केले तर त्यांना जबरदस्त शिक्षा तो समाज देत असे, उच्चवर्णीयांचा! स्त्री विधवा झाली की तिचं केशवपन करुन तिला कुरुप केलं जात होत. तरुण स्त्रीला लहान मुलीला ती विधवा झाल्यावर न्हाव्यांच्या समोर बसवणं. आणि तिचे केशकर्तन करणं ही अतिशय क्रूर आणि स्त्रियांची विटंबना करणारी पध्दत त्यांच्या मध्ये होती.  महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कल्पकतेचं आणि धडाडीचं कौतुक अशासाठी वाटतं. की त्यांनी यांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला नाही. स्त्रियांना उपदेश करुन काही फायदा नाही, कारण सर्वाथांनं त्या दुबळ्याच होत्या. म्हणून त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी नाभिकांचा संप घडवून आणला. केशकर्तन करणाऱ्या जमातीचा संप घडवून आणला. त्यांच्या  मनामधून ते परिवर्तन केलं आणि तुम्ही जर हे काम केलं नाही स्त्रियांच केशवपन करण्याचं, तर स्त्रियांची दुर्दशा संपेल. हे त्यांना पटवून दिलं. वास्तविक त्याच्या मध्ये केशकर्तन करणाऱ्यांच आर्थिक नुकसान होतं. पण ते नुकसान सहन करुन सुध्दा कुणाच्या तरी प्रतिष्ठेच्या कारणांसाठी त्या नाभिकांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना सुध्दा साथ दिली. जगाच्या पाठीवरचा हा अनोखा संप होता. कामगार मुक्तीचे संप तर पुढील काळात झालेच. माणसाच्या गुलामगीरीच्या मुक्तीचा काळ साहित्यातूनं निर्भयपणांने अवतरला. त्याचा आणखी एक नमूना, त्या काळातला आणि लोक परंपरेतल्या एका कवीने लिहले.. .

“1946 साली फेब्रुवारीला 

मुंबई बंदराला 

बंडाचा खलाशांनी केला. 

गुलामी श्रृंखला तोडण्याला.“

 आता नाविकांचं बंड 1946 मधलं, म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधी एखाद वर्ष. ही फार मोठी घटना होती. इतिहासाच्या दृष्टीनं होती. की नाविकांच्या सारख्या असंघटित लोकांनी संघटित होण्याची ती प्रक्रिया सुरु झालेली होती. आणि त्यांच्या अस्मितेच्या अभिव्यक्तीचा भाग होता. म्हणून कामगारांचा संप नाविकांचा संप किंवा खलाशांचा संप हा इतिहासात महत्वाचा मानला गेला. नाविकांच बंड ही अस्मिता अभिव्यक्तीची मोठी घटना शाहिरांना स्फूर्ती देणारी ठरली. तसंच हैद्राबादला झालं. रझाकारांचे अत्याचार वाढले जनतेवरचे. तेंव्हा बायकांच्या ओव्यांमधूनं त्या अन्यायाच्या विरुध्द पडसाद उमटले. 

“निजामाचे रझाकार करताती हल्ला..!

लेकी सुना नेल्या गर्जत करी कल्ला..!!

मातले रझाकार करिती लूटमार..!

गोरगारीब बिचारे हिंडती रानोमाळ..!!“

ही असंघटितांची कविता आहे. ती त्या काळाची निर्मिती आहे. या शिवाय 1908 मध्ये म्हणजे अजून आपल्याकडे या चळवळी मोठ्या प्रमाणावर सुरु झालेल्या नव्हत्या. या काळामध्ये मुंबईच्या कामगारांचाही संप झाला. तो मोडण्यासाठी इंग्रजांनी केलेला जुलुम मोडीत काढला. समाजवादी विचाराने प्रेरित झालेले कामगार चळवळीचे आवाजा शाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, वामनदादा कर्डक अशा कलावंतानी लिहून गाऊन सादर करुन कामगारांच्या अस्मिता व जाणिवा जाग्या केल्या. अगदी स्वातंत्र्योत्तर काळातही म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या 1950 मध्ये.

“50 साली ऑगस्ट 14 तारखेला बोनससाठी कामगार खवळला.“

आम्हाला बोनस पाहिजे ही मागणी ही आर्थिकदृष्ट्या एक नवं भान होतं. मालक जर फायदा कमवतो तर तो आम्हांला ही हवा कारण आमच्या कष्टातून तो कमावतो. आणि तो जर फायदा कमवत असेल तर आम्हांला आमच्या कष्टाचा वाटा मिळाला पाहिजे. त्याला बोनस असं म्हंटलं जात. नेहमीच्या कामाच्या वेतनाच्या व्यतिरिक्त हा अधिकचा फायदा केवळ एकट्या मालकाला मिळता उपयोगी नाही. ही एक अस्मितेची मागणी, हक्काची मागणी अत्यंत विश्वासाने बोनसच्या संपातूनं केली गेली. उन्मत्त गिरण मालकाला कडक दम दिला. असे बरेच आविष्कार त्या काळात केले. किंबहुना त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कामगारांमध्ये ही अस्मिता जागविली. अण्णाभाऊ साठे म्हणाले,

“बा कामगारा तुजं ठायी अफाट शक्ती !,

ही नांदे मुंबई तव तळहाता वरती.!!“

            ही मुंबईची जी कांही रचना चाललेली आहे. यंत्रयुगांनंतरची गिरण्या कारखाने भरभराट करु लागले, तर ती तुझ्यामुळे झाली आहे. कारण अण्णाभाऊंनीच म्हंटलेलं आहे एका कवीने की ही पृथ्वी शेषाच्या टाळुवर नाहीतर, ती कामगारांच्या कष्टाच्या तळहातावर व खांद्यावर आहे. म्हणून “ही नांदे मुंबई तव तळहातावरती“ आणि म्हणून मुंबईच नव्हे तर दुनिया ही त्या कामगाराच्या कष्टावर चाललेली आहे. याचे प्रेणेते कोण आहेत? कोण होते? तर कवी पुढे सांगतो हे भान जागे करुन देणारे, सुरुवातीचे कामगार चळवळीतले विचारवंत नेते, 

“ डांगे मिरजकर आणि ब्रॅडले, नेते लाभले हिंमतवाले!

उठविला त्यांनी सारा कामगार, वर्गयुध्दाचा करुन निर्धार!!

भांडवलदारी केली बेजार. “

दोन वर्ग प्रमुख एकमेकांच्या समोर उभे राहिले. भांडवलदार आणि कामगार. आणि भांडवलदाराला बेजार करणारी अशा प्रकारची एक अस्मिता, कष्ट करणाऱ्या ज्यांना कोणीही मान देत नव्हतं त्यांना चळवळीने मान दिला. मी आपल्या हिंमतीवर पृथ्वी निर्माण केली. ती संघटनेच्या द्वारे केली अशी जाणीव दिली. असे एक ते दोन, ती अनेक अंगानी वर्षानुवर्षे मूक असलेली कष्टकऱ्यांची जाणीव, आत्मविश्वास साहित्यिकांनी, कवींनी, नाटककारांनी, कलापथकांनी जागा केला. त्यातूनं कामगारांची नाट्यचळवळ ही आली. मयेकर, वरेरकरांच्या सारखे नाटककार झाले. गिरणगावाच्या रंगभूमीने महाराष्टःात स्वतंत्र कामगार नाट्य स्पर्धा सुरू केल्या त्या आजही चालू आहेत. या रंगभूमीबद्दल थोडसं बोलायचं तर, कामगार रंगभूमीमध्ये कामगारांच्या चळवळींचं प्रतिबिंब पडत राहिलं. कारण आम्ही मालकापेक्षा कमी नाही आम्ही त्यांच्या बरोबरीचेच आहोत. ही अस्मिता जागी झाली. मामा वरेरकरांची एक कादंबरी होती. “ धावताधोटा “ या नावाची त्या कादंबरीवर आधारित नाटक आलं “ सोन्याचा कळस!“ 

त्यातला एक महत्वाचा मुद्दा की, तो कामगार आणि त्यांचा नेता या गिरणमालकाच्या समोर उभा राहतो. त्याच्या मागण्या मांडण्यासाठी आणि मालक त्याला उभाच ठेवतो. त्याला तो अपमान वाटतो. आणि तो सरळ मालकाच्या समोर कोचावर, खुर्चीवर बसतो. हे गिरणमालकासमोर खुर्चीवर बसून वाटाघाटी करण्याचं धाडस, संघटनेमुळे आणि चळवळीमुळे नव्या आर्थिक तत्वज्ञानामुळे कष्टकरी चळवळीत आलं. ते मामा वरेरकरांना दाखवायचं होतं. याच मामा वरेरकरांने या कामगार स्त्रियांमध्ये जे धाडस निर्माण झालं, त्याच एक उदाहरण त्यांच्या नाटकामधून दिसतं. त्या कामगार चळवळीच्या नाटकामध्ये बिजली नावाचं पात्र आहे. हल्लीच्या लोकांच्या भाषेत बोलायचं झालं तर, स्त्रीवादी चळवळीची ती आद्य उद्गाती होती की काय असे वाटावे. कारण ती एका विधवा स्त्रीच्या संदर्भात काय म्हणते?  तिने कुंकू लावू नये अशाप्रकारचे तिथल्या वस्तीतल्या लोकांनी विधवेवर आक्षेप घेतला. त्यावेळेस ही बिजली, फटकळ बोलणारी म्हणून प्रसिध्द होती  तिने पटकन प्रश्न विचारला, “ नवऱ्याचा आणि कुंकवाचा संबंधच काय? कारण कुंकू आम्ही लहान वयापासून कुमारी असल्यापासून लावतो. आणि आमच्या आईने आम्हाला पहिल्यांदा कुंकू लावलेलं असतं. नवऱ्यानं नाही आणि त्यामुळे कुंकू ही आमच्या आईची देणगी आहे. आणि ते पुसायचा अधिकार कोणालाही नाही “ नवऱ्याचा आणि कुंकवाचा संबंधच काय?“ हा युक्तिवाद आजही कुणालाही सुचलेला नाही. उलट अलीकडच्या काळामध्ये विधवांना सौभाग्यालंकाराच्या नावाखाली महिलांना कुंकू लावण्याचे उद्योग जोरात चाललेले आहेत. त्या सगळ्या तथाकथित पुरोगामी लोकांनी ही बिजली समजून घेतली तर फार बरं होईल. कारण ते कुंकू हे मातृपरंपरेचं फ्रतीक आहे. त्या पुरूषप्रधान परंपरेने आापल्याला पाहिजे तसं वळवून घेतलेलं आहे. ही गोष्ट कामगार रंगभूमीवरच नोंदली गेली आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. ती कामगार चळवळीची नायिका बिजली आहे. कष्टकरी कामगारांच्या मध्ये सगळ्यात महत्वाची स्त्री. पण तिच्याबद्दल फार अभिव्यक्ती झाली नाही. तरी एक नवभान कांही लोकांना आलेलं होतं. आणि त्यांची एकदोन उदाहरणं फक्त समोर ठेवते. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची एक छक्कड प्रसिध्द आहे.

“ माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली “

ग्रामीण भागातुन आलेला हा कष्टकरी मजूर, आपलं कुटुंब गावाकडे ठेवतो. आणि त्याच्या दृष्टीनं त्याच्या घरची कारभारीण, कष्ट करणारी आणि ती काय फार सुंदर बिंदर, हल्लीच्या दृष्टीकोणातून असेल किंवा नसेल, परंतु तिच्याबद्दलचे प्रेम व तिच्याबद्दलचा आदर या गाण्यातून व्यक्त होतो. इतकंच नाही तर नारायण सुर्व्यांनी एक ठिकाणी म्हंटलेय, की बायको दमलेली आहे, दिवसभर काम करते आहे. भले ती गोरी नसेल. तिची वस्त्रे मळलेली असतील. पण थकून ती झोपलेली आहे. त्या पत्नीला उद्देशून त्यांनी म्हटलंय. 

“ आक्रूरा तुझे सैनिक नको धाडूस.

माझी गा दमून निजलीय खुराड्यात चंद्रावळ “

लावणीमध्ये चंद्रावळ ही अतिशय सुंदर आणि पुरुषांना लुभावणारी स्त्री म्हणून येते. या ठिकाणी ही कामगाराची बायको, कष्ट करणारी, थकून निजलेली या कामगाराला चंद्रावळ वाटते. श्रमिकांच्या प्रणयभावनेचा, शृंगाराचा ऱ्हदयाला हात घालणारा हा अविष्कार. किंवा आणखी एक उदाहरण नारायण सुर्व्यांचंच, स्त्रियांच्या बाबतीत की, उकिरड्यावर ज्यांनी त्यांना जन्मताच टाकून दिलं होतं. त्या आईबद्दल एक ’ बाई “ म्हणून अपार कणव सुर्व्यांच्या अभिव्यक्तीमध्ये आहे. कारण समाजाला अमान्य पध्दतीने त्यांचा जन्म झालेला होता ती आई कोण माहिती नाही. की उकिरडयावर टाकून दिलेलं जन्मलेल्या या बाळाला. आणि कुणीतरी उचलून नेऊन त्याचं पालनपोषण केलं. त्या आईबद्दल त्यांनी म्हंटलेलं आहे. “ ही माझी जन्मदात्री आई. नाळ कापून माझ्यापासून विलग झाली  असेल तेव्हा तिच्या डोक्यावर आभाळ कोसळलं असेल “ या स्त्रीविषयक अशा जाणिवा अनेक ठिकाणी प्रत्यक्षातही व्यक्त होतात. उदाहरणार्थ एखादया देहविक्रय करणाऱ्या स्त्रीबदद्लही नारायण सुर्व्यांनी णम्हंटलेय एका कवितेत. कवितेचं नाव आहे.

 “ नेहरू गेले तेव्हां “ त्या कवितेत तर या वर्गातल्या स्त्रियांनी देहविक्रय करणाऱ्या वर्गातल्या स्त्रियांनी आापला व्यवसाय एक दिवस बंद ठेवला, कारण त्या व्यथित झालेल्या होत्या. हे निरीक्षण, ही नोंद अत्यंत आत्मीयतेने आणि सहानुभावाने नोंदवणारा असा हा कामगार कवी. कारण जळतं त्याला पोळतं त्या अनुभवातून तो जातो त्यामुळे त्याला त्याची जाणीव होते आणि हे सगळं मुळात वाचायला हवं. यांच्या उलट पांढरपेशा लेखक, कवींनी असं जन्मजात टाकून दिलेल्या मुलांच्या आई विषयी तर आतिशय वाईट पध्दतीने उद्गार काढलेले आहेत. विशेषत कर्णाला जे टाकून दिलेलं आहे, त्या बद्दल पांढरपेशा कवींनी नाटकं कविता लिहिलीत त्याच्या मध्ये त्या कर्णाच्या तोंडून अतिशय वाईट पध्दतीने स्त्री निंदा केलेली आहे. अतिशय हिणकस भाषा वापरली आहे व महाभारतातही, त्या कुंतीबद्दल कर्ण अतिशय वाईट उद्गार काढतो आहे. हिने मला जन्मजात का टाकून दिलं? एक बाई म्हणून तिची कोंडी कोणीही समजून घेतली नाही. ते नारायण सुर्वेंसारख्या अल्पशिक्षित पण अतिशय मोठया मनाच्या फ्रतिभावंताने समजून घेतली. स्त्रियांच्या बद्दलची ही व्यापक समज कामगार चळवळीतून त्यांना मिळाली आहे, हे ही महत्वाचं आहे. 

अशातच जात्यावरच्या ओव्यांच्यातूनही एरव्ही इथल्या कुटुंब व्यवस्थेचे नाते संबंधांचे, बाप, भाऊ, पुत्र, पती, या पुरुष घटकांचे कौतुक करणारी बाई ही नाती ज्यावेळेला जाचक होतात. तेव्हा किती परखडपणे फटकारते आहे हे आमच्या लोकसाहित्त्याच्या पुरुष अभ्यासकांना आणि संशोधकांना दिसलंच नाही. त्यांनी ते कुठे नोंदवले नाही. मग ते त्यांना जाणवलंच नाही की त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. हे कळायला मार्ग नाही. पिळवणूक करणाऱ्या पुरुषकेंद्री व्यवस्थेने  ही जी बाई आहे. तिची दखलच घेतली नाही, ती  बाई अडाणी नाही, अनक्षर आहे. त्या अडाणी समजल्या बाईला, तिला पक्क ठाऊक आहे की आपल्या स्वार्थासाठी  ही सगळी पुरुषांची नाती आपल्याला राबवून घेत असतात आणि म्हणून ज्यावेळेला ती त्याला दाद देत नाही त्यावेळेला पुरुष तिच्या विरोधातही उभा राहतो. आणि कुठल्याही नात्याने उभा राहतो. बाप, भाऊ, पती, पुत्र या सगळ्या नात्यांनी, आणि म्हणूनच ती म्हणते. . .

“ कडु इंद्रावन, डोंगरी त्याचा रहावा, पुरुषाचा कावा मला येडीला काय ठाव्वा? “

असं वेड पांघरुन पेडगावला जाताजाता अन्याय करणारा बाप, भाऊ, नवरा, मुलगा तिच्या फटकाऱ्यातूनं सुटलेला नाहीय.  वेळेअभावी इथं जास्त उदाहरणं देता येत नाहीत.पण आपल्या विषयासंदर्भातल्याच दोन चार ओव्या सांगितल्याशिवाय राहवत नाही. बायकांच्या जात्यावरच्या ओव्यांच्या कौतुकांच्या गोड ओव्यांचे वर्णन करणारे आमचे लोकसाहित्यातले पुरुष बांधव, बायकांना कष्ट किती होतात, याबद्दल फारसे कधी जाणीव बाळगताना दिसत नाहीत. त्यांच्या गोड ओव्या ऐकत आम्ही मोठे झालो म्हणून गळे काढतात. परंतु त्या बाईचं त्यावेळेस काय होत होतं हे त्यांनी बघितलं नाही का, त्यांना सोयीस्कर ऐकू गेलं नाही? कारण त्या ओव्या एकाही पुरुष अभ्यासकांनी नोंदवलेल्या नाहीयत. ती बाई म्हणतेय, की हे जातं ओढणं ही कांही सुखाची गोष्ट नसते. रोज काही मला हौस आली नाही, मध्यरात्री उठून कमरेचा काटा ढिला होईपर्यंत दगड ओढायची. मग ती म्हणतीय. . .

“ जातं ओढतांना काळा कुरुंद जाई जड, सये सांगते गं हाताला येती फोडं !! “

हे हाताला आलेले फोड तिच्या नवऱ्याला, मुलाला कधी दिसले नाहीत. 

“  जातं ओढतांना हाताला येती गोळं, मातामाउलीचं मन ऐकून कळवळं. . . “

फक्त माझ्या आईला कळवळ येते कारण ती त्याच परिस्थितीतूनं गेलेली आहे. बाईचं दुःख बाईला कळलेलं आहे. कारण त्या दोघी समदुःखी आहेत. मग जेव्हा वाफेवरची पिठाची गिरणी आली, तेव्हा बायकांना फ्रचंड आनंद झाला. यंत्रयुग आल्यानंतर बाईच्या आयुष्यात काय परक पडला हे सांगण्यासाठी या ओव्या नोंदवतेय. आत्ता त्या बाईंनी यंत्रयुगाचं स्वागत केलं. पुरुषांना कापडाच्या गिरण्या कारखान्याने त्यावेळेला आनंद झाला. कारण ग्रामीण भागातूनं बाहेर जाण्यासाठी उपभोगाचं आणि नवीन साधन मिळालं. पण बाईचं काय झालं. तिनं स्वागत कसं केलं कारण तिला दळणाची गिरणी मिळाली होती.

“  दळण दळतांना शिणली माजी काया, माझ्याव बंदवाची गिरण आली अनसया !! “

ती गिरण तिला अनसया, अनसया म्हणजे सखी. जीवाच्या सखी सारखी वाटली. कारण माझे दळणाचे कष्ट वाचले. हे इतर कोणीही नोंदवलं नाही. हे फक्त बाईच नोंदवते.  आणि मग त्या गिरणीचंही कौतुक करते, 

“  गिरणीवर जळं बाई आगीन ढणाढणा,... “  

सुरुवातीला आगीवरची गिरण आली.  वाफेवरची. त्याचा एक आवाज यायचा वाफेवरचा. 

“  गिरणीवर जळं बाई आगीन ढणाढणा, माझ्या बाई बंधुजीला दुवा देती लेकी सुना. . !! “  

कारण त्यांनी गिरणी आणली आणि बाईचे कष्ट कमी झाले. सासु सासऱ्यांचे राज्य आणि त्याच्यामध्ये बाईला भरल्या घरामध्ये नांदायला कसा आनंद वाटत होता. वगैरे वगैरे वर्णनं केलेली आहेत. तो खरोखर तिला आनंद वाटत होता का? की नाही? की तिचा नाईलाज होता? हे आपल्याला इथे कळतं. कारण ज्यावेळेला नवीन परिवर्तन होतं. त्यावेळेला ती बाई त्याचं स्वागत कसं करते ते महत्वाचं.

“  सासु सासऱ्याच्या राज्यात बाई दळणाचा आलाय ईटं, “

सासु सासऱ्याच्या राज्यात दळून दळून मला कंटाळा आला,

“  गिरण माझी अनसया धाड बंधवा तिच पीठ, “

आता तू त्या गिरणीचचं पीठ पाठव मी नाही दळत मी कंटाळले आता. आणि मग तरी एखादी खवट सासू म्हणते की, जात्यावर दळलं की बरं असतं. पण आता ती सून धीट झालिय की तिला नवं साधन मिळालं. 

यंत्रयुगाने माणसाला शारीरिक कष्टातून मुक्तीची साधने मिळाली, म्हणून माणूस जास्त मुखर झाला. गिरणी कामगार संघटनेतुन बोलायला लागला. ती बाईही बोलायला लागली. का तर तिच्या हातामध्ये एक साधन आलं तिला मुक्ती देणारं. कष्टातूनं मुक्ती देणारं. आणि मग ती म्हणायला लागली.

“  जळू सासुबाई जळू तुमचं जातं, दळ म्हणायला तुमचं काय जातं.? “

कारण का तर, माझ्या सासु आत्याबाई दळुदळु मेल्या, आत्याबाई म्हणजे सासूचं.

“  सासु आत्याबाई दळुदळु मेल्या, आमच्या राज्यात गिरणाबाई आल्या “

हा आनंद जो आहे. की नवीन यंत्र जे आलं. त्यामुळे माझ्या कष्टातून मुक्ती मिळाली. हा मुक्तीचा आनंद एकीकडे यंत्राने दिला. संस्कृतीने एक नवीन वळण घेतलं. 

          खरंतर सगळं साहित्य हा माणसाचा सांस्कृतिक अविष्कारच असतो. यंत्राने माणूस तारला, सुखावला हे खरं. पण यंत्र युगाचं दुसर टोकही येऊ पाहतयं. अति तांत्रिकतेने माणूस माणसांपासून दुरावत चालला नाही ना, याचा शोध भविष्य काळातील साहित्यिक घेतील. आणि तो घ्यायला पाहिजे. जात्यावरच्या ओवीच्या कालाच्या पुढे गेलेले आजच्या आणि उद्याच्या आमच्या कष्टकरी कामगार भगिनी आणि बंधु, समाजाकडून आणि व्यवस्थेकडून आणखीन काय काय अपेक्षा असतील? 

आता बायकांच्या बाबतीत विशेषत आमच्या कामावर पाळणागृह पाहिजेत, स्वच्छतागृह पाहिजेत, काही रजा पाहिजेत. अशा मागण्या होताना आजही दिसतायत. ते क्षीण आवाज कदाचित उद्या जास्त मुखर होतील आणि त्यांच्या जगण्याचं फ्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उतरत राहील. वाहत्या काळाबरोबर साहित्य, कविता, कला ही माणसाची सांस्कृतिक श्रीमंती वाढवतील. ती वाढवत जातील अशी अपेक्षा आहे. पण हे खरंच शक्य आहे का? येथून पुढे या साहित्याचं भवितव्य काय राहणार आहे. कारण यंत्रयुगानंतर आता तंत्र वैज्ञानिक युगात आपण फ्रवेश करतो आहोत. माणसाचं जगणंच बदलतं आहे. मग कला आणि साहित्य यांच भवितव्य नेमकं काय असेल याच्याकडे एक थोडक्यात दृष्टिक्षेप शेवटी टाकण्याचा एक फ्रयत्न आहे. 

कामगार साहित्यातले आजचे आणि उद्याचे हे विषय. निमित्त झालयं नुकत्याच झालेल्या कोविड महामारीची साथ जगामध्ये येऊन गेली. भारतामध्ये आणि विशेषत मुंबईसारख्या उद्योग नगरीत संघटित असंघटित मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न अत्यंत प्रकर्षाने उभा राहिला. क्रूरपणाने या समस्येने त्यांचे विलक्षण हाल केले. त्यांच्या स्थलांतरासाठी वाहनं, अन्न, आरोग्य, स्त्रियांना मदत यांच्या यंत्रणा कोठेही पुरेशा उपलब्ध झाल्या नाहीत. ज्या होत्या त्या तुटपुंज्या होत्या. त्या शासनाने द्यायच्या की मालकांनी द्यायच्या? असेही फ्रश्न निर्माण झाले. पण श्रमकऱ्यांचे हाल हे अपरंपार झाले. दुहेरी अनुभव आले. काही वेळेला ज्या समाजाचा संबध नाही, त्या समाजाने मदत केली. आणि ज्यांच्या कडे ते वर्षांनुवर्ष काम करीत होते, त्यांनी त्यांची उपेक्षा केली. अपवाद म्हणून काहीजणांनी त्यांना सहकार्य केलं हेही नोंदवल पाहिजे. फ्रश्न असा आहे की त्यानंतर जी भीषणता अनुभवायला लागली. त्याच्याकडे कामगार संघटना आणि कामगारांच्या व्यवस्था इथून पुढे कशाफ्रकारे पाहणार आहेत? कारण त्यानंतर कामाचा तुटवडा, नोकऱया मिळेनाशा झाल्या. काही कुशल कामगारही बेघर झाले, बेकार झाले. काही मालकांचे विशेषत इमारती बांधकाम करणाऱयांनी आपले मजुर, कुशल मजुर बांधून ठेवण्यासाठी त्यांना सहकार्य केलं त्याबद्दल वाद नाहीच. कारण ती त्यांची निकड आहे. शेती आणि शेतमजुर त्यातल्या त्यात तगला. ही गोष्टही खरी आहे. पण नोकरीमध्ये नियमित रोख आवक असलेले बरेच लोक बेकार झालेले आहेत. अचानक ज्यावेळेला या आपत्ती येतात. त्यावेळेला रोजगाराच्या संधी या नगण्य होत जातात. आज सगळीकडे केवळ कष्टकरीच नाही तर बुध्दिजीवी सुध्दा कंत्राटी पध्दतीने काम करीत आहे. शेती हमाल, माथाडी हमाल सगळेच हे त्या वर्गामध्ये जातात. एक फ्रचंड अनिश्चितता सगळीकडे भरुन राहिली आहे. संपासाठी ज्या संघटना होत्या. त्या संघटनांच्यावर फ्रचंड फ्रतिबंध आलेले आहेत. त्यामुळे महागाई भत्ता, बोनस, वगैरे साठी जे संप चालत असत त्याच्यावर बंधन आलेली आहेत. संपाव्दारे व्यक्त होणं हे आता दुरापास्त होत चाललेलं आहे. कंत्राटी कामगारांच्या मध्ये वाढ होत चाललेली आहे. त्यांना कुठलीही शाश्वती मिळत नाही. आणि त्यामुळे बुध्दीजीवींची नोकरी विषयक संस्कृतीही उणावतेय. कंत्राटी पध्दतीत अगदी शाळेतील शिक्षक,माध्यमिक शिक्षक, विद्यापीठ, अध्यापक कोणालाही शाश्वती राहिलेली नाही. संस्थांची स्वायत्तता उणावत चालल्यामुळे एक लादलेपण वाढत आहे. श्रमजीवींची तर अवस्था अधिक बिकट होत चालली आहे. आणि त्यामुळे माणसांमाणसामधले नातेसंबध हे परात्म होत चाललेले आहेत. परकेपणा येत चालला आहे. हे ज्यावेळेला यंत्रयुग आलं त्याच वेळेला कलावंतांना ते जाणवलेलं होतं. त्यावेळेस मर्ढेकरांनी सांगितलेलं होतं. की या यंत्रयुगामध्ये माणसांला माणूस विचारत नाही. त्याची अवस्था किड्या मुंग्यासारखी झालेली आहे, हे त्या वेळी मर्ढेकरांना जे जाणवलं होत, ते आज जास्त भगभगीतपणाने पुढे येत आहे. कारण माणूस हा सुटा सुटा, आपल्या समस्यांना भिडण्याचा फ्रयत्न करतो आहे. तो एकाकी झाला आहे. दुरावलेला समाज आहे. माणसं माणसांपासून तुटत चाललेली आहेत. संवेदनशीलता उणावत चाललीय आहे. आज शिक्षण, बँका, पोष्ट या खात्यात कंत्राटी पध्दतीचे परिणाम होत आहेत. तात्पुरतेपणामुळे आत्मीयता, सामाजिक, कौटुंबिक पातळीही उणावते आहे. स्त्रियांना, अल्पशिक्षितांना जगणं मुश्किल होत चाललयं. उत्तरोत्तर तंत्रज्ञान, विज्ञानाचा विकास, डिजिटलायजेशन, ऑटोमेशन या सगळ्या व्यवस्थेमधून व्यक्ती माणूस उपरा ठरतो आहे. कारण कचेरीमध्ये यंत्रासमोर बसलेल्या लोकांनी खिडकीच्या पलिकडच्यांच माणूसपण संपवलं आहे. अशावेळेला आठवण येते, गोदावरीबाई परुळेकर नांवाच्या एक कार्यकर्त्या बाईंची डाव्या चळवळीतल्या त्या फार जुन्या काळामध्ये आदिवासींच्या मध्ये काम करत होत्या. त्याचं पुस्तक आहे. आत्मकथनपर “  आणि माणूस जागा झालां “  माणूस जागा झाला म्हणजे काय ? तर माणसाला त्या आदिवासी समाजामध्ये सावकारी व्याजामुळे आदिवासी पिळले जायचे आणि त्यांना जनावरापेक्षा सुध्दा हिणकस वागणूक दिली जायची. त्यांच्या या चळवळीमुळे त्यांच्यातलं हे माणूसपण जागं केलं. ’तुम्हीही माणसं आहात, तुम्हाला हक्क आहे. “  अशा फ्रकारे जनावरांतलं माणूसपण जागं केलं. दुसऱ्या अर्थाने त्यांना पिळणारे जे सावकार होते त्यांनीही माणुसकी घालवलेली होती. तेही जनावरांसारखेच वर्तन करत होते क्रूरपणाचं. त्यांच्यामधला माणूस जागा केला. आणि तुमच्यासारखीच तीही माणसे आहेत हे सावकारांना, भांडवलदारांना त्या चळवळीतूनं समजावण्याचा उद्योग केला. मग दोघांच्याही मधला माणूस जागा करणं, हे या चळवळीचं काम झालेलं होतं. ही सुरुवातीची गोष्ट झाली. आणि त्यामुळे आज त्याच्याही पलीकडे आपण गेलेलो आहोत. माणूसपण जागं ठेवणं ही समस्या आहे. हा समतोल राखण्याचं काम, आणि तशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम, तसे कायदे, त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, शासनसंस्था, कायदेसंस्था आहेत. सुव्यवस्था राखणारी पोलिसयंत्रणा, फ्रसिध्दी माध्यमं या सगळ्या संस्थांच्यामध्ये समतोल राखून ठेवण्याचे काम शासनाला व प्रशासनाला करणं आवश्यक आहे. हे दोन्ही अर्थाने माणूसपण जागं ठेवणारे आहे. कारण विकल होऊन जीवजंतूपेक्षा हिणकस जीवन माणसाने जगू नये किंवा दुसरीकडे माणसाने क्रूरकर्मा होऊन त्यांना चिरडू नये हे पहाणं महत्वाचं आहे. असं मला वाटतं. यांत्रिकीकरण तंत्रज्ञानाची जर  पराकाष्टा झाली तर, कृत्रिम बुध्दिमत्ता, कृत्रिम साहित्य निर्मिती होत आहे याचा सद्या उदो उदो होतो आहे. लेखन, भाषांतर हे आत्ता तंत्रज्ञान करतंच आहे. उद्या माणसांचं मन आणि बुध्दी आणि त्यातील नाती यांचं काय होणार? कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे आणि कृत्रिम रचनेमुळे माणूसपण संपणार का? हे साहित्याचे फ्रश्न होतील का? विज्ञानकथामध्ये थोडे थोडे व्हायला लागलेल्या आहेत. सगळेच श्रम हे यंत्र करायला लागलं तर चिमूटभरांच्या हाती निर्णयक्षमता जाईल. कारण चिमूटभर लोक निर्णय घेतील आणि बाकीच्यांना बाजूला टाकलं जाईल, जातंच आहे. मग माणसांच्या जगण्याचं काय होणार? हे साहित्याचे विषय होतील की नाही? आत्ता जसे व प्रत्यक्ष आपण एकत्र जमलेलो आहोत, विचारांची देवाणघेवाण करतो आहोत, एकमेकांच्या सहवासाचा आनंद उपभोगतो आहे. अशी साहित्य संमेलनं तरी भविष्यकालात होतील की नाही असाही प्रश्न आहे. त्यासाठी परस्परसंवाद, सादरीकरण, आस्वाद याचा आनंद आपण या गाठीभेटीतूनं घेतो आहोत. आजच ऑनलाईन सेमिनार्स आणि चर्चासत्र, कविसंमेलनं इत्यादी सुरु झालेलं आहे. शिक्षणव्यवस्थेत तर हे मोठया प्रमाणावर आलेलं आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे जैविक संबंध संपत चाललेले आहेत. त्याच्यातूनं एक परात्मता येते आहे. एक तुटलेपण येत आहे. आणि मग याच्यामधल्या माणसाचं काय होणार? माणसाची सदैव सोबत व मदत यांची गरज राहील का? माणसं ही यंत्रमानवासारखी, रोबोट होतील. असा प्रश्न निर्माण होतो. रोबो म्हणजे यंत्रमानव. याला मन नाही. असं म्हणतात की यामध्ये बुध्दी घालण्याचे आणि भावना घालण्याचे प्रयत्न चाललेल आहेत. पण जैविक माणसामध्ये असलेल्या भावना या यंत्रमानवामध्ये घालता येतील का? अशा प्रकारचे कांही प्रश्न निर्माण होतील आणि ते साहित्यामध्ये येतील का? येत आहेत.

कारण एक जुनी कांदबरी या ठिकाणी आठवते. 1950 च्या सुमारासची हिंदीमध्ये आहे. खूप वर्षापूर्वी कृष्णचंद्र नावाच्या लेखकाने लिहिलेली ही फँटसी आहे. त्याच्यामध्ये त्याने आजच्याच या अतिरिक्त तंत्रज्ञान युगाचं वर्णन, त्याच्याहीपेक्षा पुढच्या टप्प्याचे वर्णन केलेलं आहे. काय दाखवलंय त्यांनी त्याच्यात? की एक लहाण मुलगा आहे. त्याचे वडील अतिश्रीमंत उद्योगपती  आहेत. आणि त्यांना अतिशय अभिमान आहे. इथून पुढे सगळ्या यंत्रणा या यंत्रजनित होतील. माणसाला काही करायची गरज नाही. एक बटण दाबलं की अमुक होईल, दुसरं बटण दाबलं की तमुक होईल आणि तिसरं बटण दाबलं की तमुक होईल. आणि माझ्या मुलाला इथून पुढे संपूर्ण सुख मिळालं पाहिजे. कारण शेवटी माणूस धडपडतो कोणासाठी? पुढल्या पिढीसाठी. त्यांना स्वास्थ्य मिळावं म्हणून. माझ्या मुलाला या यांत्रिकीकरणाचे, तंत्रज्ञानाचे सगळे फायदे मिळाले पाहीजेत. म्हणून तो त्या मुलाला एक सुंदर घर बांधून देतो. तिथे त्याला आरामशीर बैठक देतो. त्याच्या समोर सगळी यंत्र ठेवतो.  आणि त्याने फक्त बटणं दाबायची. परिणाम असा होतो की, बाकीच्या कुठल्याच अवयवाचा त्याला उपयोग करायचा नाहीय. त्याला उठायंचं नाही, हलायचं नाही, कांही करायचं नाही. आपल्या हाताने घाससुध्दा तोंडात घालायचा नाही. यंत्र दाबलं की ते त्याच्या तोंडात जातं. परिणाम असा होतो की, निसर्ग असा आहे की ज्या गोष्टीचा उपयोग नाही ती शरीरातनं गळून जाते. त्यामुळे माणसाची शेपटी गळून गेली असे म्हणतात. तसं त्या मुलाचं होतं. त्याच्या शरीरातल्या सगळ्या शक्ती क्षीण होत जातात. आणि हाताचं फक्त एक बोट, अंगठयाजवळचं ज्यांनी बटनं दाबलीत तेव्हडंच शिल्लक राहतं. आणि बाकीची बोटं नाहीशी होतात. एक दिवशी फ्रचंड मोठा भूकंप होतो. आत्ता तुर्कीमध्ये भूकंप झाल्यावर मला ही कथा फ्रकर्षाने आठवली. आणि पत्त्याच्या सारख्या मोठमोठया इमारती कोसळून पडतांना माणसांनी निर्माण केलेल्या या सगळ्या यंत्रणा भुईसपाट होतात. जमिनीमध्ये मोठमोठे ख•í पडतात. आणि त्याच्यामध्ये हा मुलगा अडकला जातो. त्याच्यासाठी निर्माण केलेली यंत्र ही खडयामध्ये जाताहेत. आत्ता प्रश्न पडला की, या मुलाने जगायचं कसं? कारण त्याला कांहीच येत नाही. या मोकळ्या जगामध्ये, मातीमध्ये काय करायचं हे त्याला कळत नाही. त्याचवेळेला बाहेर एक श्रमिक मुलगा आहे. तो त्याला फक्त काचेमधून दिसतो आहे. तो श्रमीक मुलगा सगळ्या परिस्थिरतीवर मात करत, दगड धोंडे बाजूला करत, झाडं बघतो, पानं बघतो, धडपड धडपड करतो, शरीराचा फ्रत्येक अवयव अन अवयव वापरतो. आणि हा यंत्रावलंबी मुलगा भेदरुन गेलेला आहे. पण तो मुलगा, बाहेरचा श्रमिक मुलगा याला आधार देतो. तिथे झाड जे आहे, ते झाड उलटं झालंय आणि खडयात गेलेलं आहे. मुळं वर आलीयत. भगवत गीतेमध्ये जे वर्णन केलेलं आहे.उर्ध्वमूलअध शाखा, की त्याची मुळं वर गेलेलीयत. शाखा म्हणजे फांदया, खाली गेल्यायत, जमिनीमध्ये गेल्यायत. आणि त्या तिथे हा श्रमकरी मुलगा ङआहे. तो त्या  फांदया शोधत शोधत सरसर सरसर जातो आहे. आणि हा दुबळा मुलगा मात्र कुठेतरी चिकटून बसलाय. हा मुलगा त्याला मदत करतो. आणि चढ तू त्या फांदीवर चढ! पकड फांदी, पकड फांदी! पण त्याला अंगठाच नाहीय. अंगठाच नसल्याने त्याच्या हाताची पकड संपलेली आहे. आणि तरी तो कष्ट करतो, फांदीवर सरकण्याचा फ्रयत्न करतो. आणि तरी एका क्षणी जोरात ओरडतो, “ अरे माझ्या हाताला बोटं फुटायला लागलीयत, अरे माझ्या हाताला अंगठा फुटायला लागलाय. “

  निसर्गात तुम्ही वापर केलात तर, तुमच्या जैविक यंत्रणासुध्दा सुरक्षित राहतात. हा संदेश बहुधा त्या “ उल्टावृक्ष “  या कादंबरीमधूनं कृष्णचंद्र देताहेत असं मला वाटतं. त्याला बोटं उगवलीत. ऑटोमेशनचा आपण कितीही जरी उदोउदो केला तरी त्या ऑटोमेशनमध्ये स्वतचं आटोमेशन, शरीराचं हे जास्त महत्वाचं आहे. आजच आपण तक्रारी करतो. की पुढची पीढी मोबाईलच्या अधीन गेलेली आहे. मग अशा वेळेला भविष्यवेधी साहित्य दिलासा देतं, असं वाटतं. कारण निसर्ग तुम्हाला प्रतिकूल झाला आणि तो केव्हा होईल ते सांगता येत नाही. महापूर येईल, दुष्काळ येईल, थंडी येईल, हिमफ्रपात होईल, सूर्य आग ओकेल किंवा भूकंप होईल. एका अर्थाने हे फ्रलय आहेत. सबंध सृष्टी नाहीशी करणारे. जैविक सृष्टी नाहीशी करणारे. पण फ्रत्येक प्रलयानंतर नवनिर्मिती होत असते. तंत्रज्ञानाच्या अतिरेकाने दुसऱ्या टोकावर गेल्यावर कदाचित पुन्हा पुर्ननिर्मितीचं चक्र होईल असा संदेश हा “उल्टावृक्ष“ देतो असं मला वाटतं. आणि “उल्टावृक्षच“ नव्हे तर सगळेच कवी हे भवितव्य पाहतात. त्यांच्या दिव्यदृष्टीला ते दिसतं. अगदी केशवसुतांच्यापासून किंवा भगवतगीतेमधल्या“ उर्ध्वमूलअध शाखा“ ही कल्पना ज्याला सुचली असेल त्याच्या पासून. आणि मग परत नारायण सुर्वे आठवतात की माणसासारखा दुसरा सृजनात्मा भेटलेलाच नाही.

“ सृजनात्मा! निर्माण करणारा आत्मा, म्हणजे माणूस. हा सर्वश्रेष्ठ आहे. एखादा कुसुमाग्रज त्यावेळेला दिलासा देतो.“ “अखेर प्रेम आहे संस्कृतीचा सारांश.“ संस्कृती संस्कृती म्हणजे काय? एकमेकांना जोडून राहणं, प्रेम करणं. आणि म्हणूनच “ यंत्रमानवाला आपल्या मेंदुवर स्वार होऊ देणे उपयोगाचे नाही.“ हे सांगणारा महात्मा गांधी आठवतो. यंत्र माणसाच्या हातात पाहिजे.  माणसाच्या डोक्यावर जाता उपयोगी नाही. आणि अशा वेळेला तो जो रोबोट आहे. कितीही परिसीमा करुन तंत्रज्ञानामध्ये ऑटोमेशन आणंलं तर त्या रोबोटलाही जैविक हातांचे धुमारे फुटतांना आपल्याला दिसताहेत. कोवळे सृजनांकुर फुटत आहेत ही विश्वकर्म्याची बोटं होताहेत की काय असं वाटतं. कारण विश्वकर्मा हा सृष्टीचा निर्माता आहे. आणि तो माणूसच आहे. कारण अखेर यंत्र असो, तंत्र असो. कृत्रिम बुध्दिमत्ता असो, तिचा निर्माता, सृजनात्मा हा माणूसच आहे. कारण त्या कृत्रिम बुध्दीलाही माणसांनीच निर्माण केलेलं आहे. जसं केशवसुत म्हणाले होते, “ देवदानवा नरे निर्मिले “ देव निर्माण करणारा आणि दानव नष्ट करणारा. तेंव्हा हा सृजनात्मा आहे माणूस. आणि तो जोपर्यंत आहे, त्याच्यामधली सृजनशक्ती आहे. तोपर्यंत त्याची कविताही असणार आहे. त्याची कृतीही असणार आहे. त्याची कलाही असणार आहे. त्याचं साहित्यही असणार आहे. आणि आत्ता जसं कामगार साहित्य संमेलन भरलेलं आहे आपण आनंद भोगत आहोत तसे तुम्ही, मीपण असणार आहोत. अशी आपण अशा करुयात.

मनापासून धन्यवाद!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !