सार्थ निवड: सर्व स्तरातून अभिनंदन!!!!!

 मसापच्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.अनिलकुमार साळवे




येत्या 23 एप्रिल रोजी फुले पिंपळगाव येथे मसाप शाखा माजलगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात लेखक-दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे यांची निवड करण्यात आली आहे.

साहित्य सेवेतील योगदानाबद्दल डॉ.अनिलकुमार साळवे या माजलगावच्या भूमीपुत्राचा हा सन्मान आहे.आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त साहित्यिक म्हणून डॉ. अनिलकुमार साळवे सर्वपरिचित आहेत. प्रा.डॉ. अनिलकुमार साळवे यांना वाचन लेखनात विशेष रस आहे. माजलगावच्या मातीत त्यांच्यावर साहित्यिक संस्कार झाले.त्याच काळात नाट्यलेखन सुरू झाले.कसलीही पार्श्वभूमी नसतांना उपजत प्रतिभेतून नाट्यनिर्मिती ते करू लागले.अनेक स्पर्धेत, महोत्सवात त्यांच्या लेखनाला -सादरीकरणाला प्रतिसाद व पारितोषिके लाभली. त्यांनी बीड जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील माजलगाव या गावी  झाला . त्यांचे शालेय शिक्षण माजलगाव येथे तर, महाविद्यालयीन शिक्षणही माजलगावात झाले.पदव्युत्तर पदवीसाठी  त्यांनी नाट्यशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे प्रवेश घेतला. सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर प्रोफेसर डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.प्राप्त केली.  त्यांनी देवगिरी महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागप्रमुख  म्हणून नोकरी केली व अनेक मानसन्मान मिळवून आपल्या कार्याचा ठसा उमटवला.माजलगाव ते अमेरिका हा त्यांचा कला प्रवास थक्क करणारा आहे.


वास्तवाचे भान ठेवत सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्वच स्थित्यंतरांची वैशिष्ट्ये डॉ.अनिलकुमार साळवे यांनी आपल्या एकांकिका-नाटक या साहित्यप्रकारांमधून जपली आहेत. सामाजिक परिवर्तनांचे ग्रामीण व नागरी समाजजीवनावर होणारे चांगले व वाईट परिणाम टिपत नाटक, लघुपट आणि चित्रपट माध्यमातून आकारास आलेल्या त्यांच्या निर्मितीने आपले वेगळेपण जपले आहे.


विपुल प्रमाणात नाट्यलेखन करून त्यांनी मराठवाड्याचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचवला

आहे.कविता, नाटक, एकांकिका, लघुपट, चित्रपट लेखन करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.साहित्यिक डॉ. अनिलकुमार साळवे यांना महाराष्ट फाऊंडेशन अमेरिका यांच्या वतीने मानाच्या  रा. श.दातार नाटय लेखन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. अनिलकुमार साळवे यांचे नाटय व चित्रपट लेखन-दिग्दर्शन  पुढील प्रमाणे  ४१ एकांकिकाचे लेखन,०६ नाटकाचे लेखन,

०४ शॉर्ट फिल्मचे लेखन व दिग्दर्शन,'ग्लोबल आडगाव' मराठी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अभिनेता सयाजी शिंदे,उषा नाडकर्णी, उपेन्द लिमये, अनिल नगरकर यांच्या प्रमुख भूमिका, लवकरच प्रदर्शित होणार आहे.ग्लोबल आडगाव चित्रपटाला मिळालेले पुरस्कार :-न्यु जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, अमेरिका : बेस्ट राईटर अवॉर्ड,एआयएफएफ अजंटा-वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल : बेस्ट सपोर्टींग अॅक्टर अवॉर्ड,

कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल :  नॉमिनेशन) बेस्ट डायरेक्टर, बेस्ट फिल्म अवॉर्ड,

 पीआयएफएफ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल : स्पेशल स्क्रीनिंग.

नाट्यक्षेत्रातील उत्तुंग भरारी घेऊन ०५ वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ युवक महोत्सवाचे सांघीक पारितोषीक.

०९ वेळा नाट्यगटाचे सांघीक पारितोषीक.०१ वेळा नॅशनलच्या नाट्यगटाचे पारितोषीक.अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार - २०१७.

१५ ऑगष्ट' लघुपटास लंडन, अमेरिका यासह दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम यासह ४० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार,' शिरमी ' लघुपटास १८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार. एकूण २६५ पुरस्कारांनी सन्मानीत.

४१ एकांकिकांचे लेखन:-

 शापित : प्रथम पुरस्कार - ललित कला केंद्र,औरंगाबाद.

 गांधीजींचा चष्मा हरवला आहे : प्रथम पुरस्कार,

 राज्यकर्ता : प्रथम पुरस्कार - युवक महोत्सव,

 ग्लोबल आडगाव : राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण ५२ पुरस्कार,अघटित : द्वितीय पुरस्कार - युवक महोत्सव,

 शांतता दंगल चालू आहे : राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण १८ पुरस्कार,रणसंग्राम : तृतीय पुरस्कार - युवक महोत्सव, आक्रोश : प्रथम पुरस्कार - युवक महोत्सव,

 अमृता : तृतीय पुरस्कार - युवक महोत्सव,

 स्त्री : प्रथम पुरस्कार - ललित कला केंद्र, औरंगाबाद.,

 तिच्यासाठी वाट्टेल ते...  राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण २८ पुरस्कार,

 सूरज के बुलंद हौसले राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण २२ पुरस्कार,

. शेख मुहम्मद मराठी माध्यम... व इतर एकांकिका.

*नाटकांचे लेखन*:-

 उद्ध्वस्त : राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय पुरस्कार.

 अग्निकुंड : राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार.

ओयासीस : राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय पुरस्कार. कथा खैरलांजी : व्यावसायिक रंगभूमीवर एकूण ७१ प्रयोग. वतन के लिये : व इतर नाटके.


प्रहसन लेखन (विनोदी लघुनाट्य):-

 कुत्र्याची शेपटी : प्रथम पुरस्कार - डॉ. बा. आं. म. विद्यापीठ, युवक महोत्सव.कुपोषित राष्ट्राचे उपाशी राजे : प्रथम पुरस्कार - डॉ. बा. आं. म. विद्यापीठ, युवकमहोत्सव, द गेम ऑफ ब्लू व्हेल : प्रथम पुरस्कार - डॉ. बा. आं. म. विद्यापीठ, युवक 'महोत्सव, कब होगी सुबह... : राष्ट्रीय पुरस्कार - कोल्हापुर २०१६., जोकर : प्रथम पुरस्कार - डॉ. बा. आं. म. विद्यापीठ, युवक महोत्सव,उच्च शिक्षणाच्या आईचा घो : प्रथम पुरस्कार - डॉ. बा. आं. म. विद्यापीठ, युवक महोत्सव.

पथनाट्य लेखन:-

आझादी दो (१२८ प्रयोग)

 असिफा तू जिंदा है । (१७२ प्रयोग),

 हमे आझादी चाहीये। ( ७५ प्रयोग), मुक्या बाहुल्या ( २१० प्रयोग, बीड), मृत्यू छाया (३१२ प्रयोग, बीड),

आम्ही बंदिस्त पाखरे (५१२ प्रयोग, बीड), जोकरांचे राज्य (५२ प्रयोग).


लघुपटांना मिळालेले पुरस्कार:-

 '१५ ऑगस्ट' लघुपटाची अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे निवड.शिरमी, डोंब, कोंदण लघुपटास दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार, दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट लेखन पुरस्कार,व्ही. शांताराम सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार,सर्वोत्कृष्ट लघुपट  मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सन्मान प्राप्त झाले आहेत.तसेच  द्रोणाचार्य नाट्यलेखन पुरस्कार, जगदीशचंद्र माथुर पुरस्कार,समता पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार,म. फुले आदर्श शिक्षक पुरस्कार,नाटकांसाठी एकूण २६६ पुरस्कार,एकांकिका व नाटकांना राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण २६६ पुरस्कार, एकांकिकांचे ५००० पेक्षा जास्त प्रयोग. पथनाट्याचे ३३०० प्रयोग.केंद्रीय युवक महोत्स डॉ. बा. आं. म. विद्यापीठ,औरंगाबाद ४ वेळा जनरल चॅम्पियनशिप सन्मान.अशा प्रकारे उत्तुंग भरारी त्यांनी घेतली आहे.विविध मानसन्मान प्राप्त असूनही त्यांचे पाय जमिनीवर घट्ट आहेत.


समाज आणि माणूस यांच्यातील परस्पर अवलंबत्वाचा गोफ व त्यातील विरोधाभासी नातेसंबंधांची सर्जनशील मांडणी डॉ. साळवेंच्या एकूण साहित्यातून जागोजागी डोकावते. म्हणूनच कदाचित त्यांचे साहित्य वाचकांच्या मनाचा तळ गाठते. त्यांच्या लेखनात लोकांच्या मनातील आवाजाचा सूर गवसतो.आज लोकांच्या मनातील आवाज चिरडून टाकण्याचा डाव राज्यव्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणांनी आपापल्या स्वार्थासाठी बेमालूमपणे स्वीकारल्याचे आपल्या सर्वांना मान्य करावे लागेल. साम-दाम-दंडाच्या जोरावर निर्माण झालेली ही सामाजिक विषमतेची दरी कायमची बुजवून टाकण्यासाठी आजच्या लेखकांना फुले-शाहू-आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांच्या मार्गानेच जावे लागणार आहे.हाच मार्ग डॉ.अनिलकुमार साळवे यांनी अंगिकारला आहे. डॉ. अनिलकुमार साळवे हे समाजाच्या दुःखांनी व्यथित होणारे मूल्यनिष्ठ साहित्यिक आहेत. त्यांच्या समग्र साहित्य लेखनात आत्मनिष्ठे पेक्षा समाजनिष्ठेचे दर्शन अधिक प्रभावीपणे घडते. त्यांची लेखणी आत्मविष्काराचे एक प्रभावी शस्त्र झाली आहे. त्यांचे लेखन समाजातील कटुता, भ्रष्टाचार, दंभ यांच्यावर प्रहार करते. माणुसकीला जागावे, जोपासावे. भांडवलशाही,गुलामगिरी नष्ट करण्यासाठी एकजुट हवी, हे सत्य ते निर्भीडपणे मांडतात. नवा समर्थ भारत उभारण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.

साहित्य वेदनेतून जन्माला येते. स्वकोषात असणारी अनुभूती जेव्हा सामाजिक होते,तेव्हा साहित्यिकास सामाजिक भान असते तर काही लेखकांना हे भान फाडून फेकून देण्याची दाट उर्मी असते. तीरावरील सर्व विषय ती वाहत नेते.सर्वांना सामावून घेते. आणि साहित्यिकांचे हे बहुउद्देशीय,बहूस्पर्शी प्रगटीकरण एक इतिहास बनते आहे. डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या साहित्यसेवेबद्दल शिवार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद देऊन गौरविण्यात येत आहे .हे आनंददायी आहे. शिवार साहित्य संमेलनाच्याअध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल  डॉ. अनिलकुमार साळवे यांचे सर्वत्र  अभिनंदन होत आहे.

        मराठवाडा साहित्य परिषद शाखा माजलगावच्या वतीने आयोजित 15 व्या शिवार साहित्य संमेलनाचे उद्घाटन, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक तथा पत्रकार आसाराम लोमटे यांच्या हस्ते ना. धो. महानोर साहित्य नगरी मध्ये दिनांक 23 मंगळवार रोजी होणार आहे. माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या फुले पिंपळगाव शिवार ,नवीन मोंढ्याच्या पाठीमागे स्वागत अध्यक्ष तथा पत्रकार जगदीश पोफळे यांच्या शेतात ना. धो. महानोर साहित्य नगरी कडे सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीचे प्रयान होईल. ह.भ.प. रामराव महाराज फुलगे यांच्या हस्ते यावेळी ग्रंथाचे पूजन होणार आहे.

        पंधराव्या शिवाय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजलगाव चे भूमिपुत्र प्रा. डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या उपस्थितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक तथा पत्रकार आसाराम लोमटे, (परभणी) यांच्या हस्ते सकाळी 9.30 वाजताशिवार साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी शिवार साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष राही फपाळ, स्वागत अध्यक्ष जगदीश पोपळे, मसाप शाखा माजलगाव चे पदाधिकारी यांची विचारपीठावर उपस्थिती असेल. सकाळी 11.30 वाजता कथाकथनाचे दुसरे सत्र सुरु होईल.प्रसिद्ध कथाकार विलास सिंदगीकर यांच्या बहारदार कथाकथनाच्या या कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय साने गुरुजी कथामला चे कोषाध्यक्ष, कांतराव गाजरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असतील. दुपारी 1.00 वाजता च्या भोजन सत्रानंतर, कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून प्रा.संगीता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली, दुपारी 2.00 वाजता ते सुरु होईल.कवी संमेलनातील सहभागी कवी - भा. य. वाघमारे, गोरख शेंद्रे, गोविंद गोचडे, राजेश रेवले, आत्माराम कुटे, विठ्ठल चव्हाण, गौरी सु. देशमुख, प्रतिभा थिगळे, सुरेखा कोकड, प्रेमा कुलकर्णी, दुर्गा राऊत, स्मिता लिमगावकर, स्मिता कोथाळकर, डॉ. मानसी देशमुख, गौरी अ. देशमुख, तेजश्री देशमुख, प्राणेश पोरे,प्रा. डॉ. सिध्दार्थ तायडे, रानबा गायकवाड, बा. सो. कांबळे,प्रा. रावसाहेब देशमुख, डॉ. अंगद गायकवाड, अतुल मुगळीकर, डॉ. ज्ञानेश्वर गवते,डॉ. सारंग कुलकर्णी, सखाराम जोशी, उध्दव विभुते, बालाप्रसाद चव्हाण, प्रकाश पत्की, कैलास सोळंके, भगवान धरपडे, शरद रांजवण, सुमंत गायकवाड, प्रणव पटवारी, मीना तौर, अनुराधा खुर्पे, पद्माकर कातारे, केरबा शिंदे, संजय सपाटे, पुरूषोत्तम जाधव, अरूण देशमुख, दत्ता जाधव, वैभव सोळंके, भारत सोळंके, प्रवीण काळे, विशाल वायाळ, शिवराम होके, नंदकुमार कुलकर्णी, खेलबा काळे, रेश्मा आळणे, गीता सोळंके, शुभांगी आनंदगावकर, अश्विनी वाकणकर, स्मिता आनंदगावकर, प्रा. अशोक टोळे, अशोक वाडेकर, डॉ. विठ्ठल वाघ, रामदीप डाके, ना. मा. पडलवार, प्रा. संजय बागुल, योगेश कानडे हे कवी कविता सादर करणार आहेत .सूत्रसंचालन- मोहन राठोड, प्रमोद काळे तर आभार वैभव सोळंके व्यक्त करतील 

 सायंकाळी 5.00 वाजता संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या उपस्थितीमध्ये व समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. वैशाली गोस्वामी यांच्या मनोगता नंतर या शिवार साहित्य संमेलनाचा समारोप होईल. साहित्यिक व साहित्यप्रेमी यांच्यासाठी मेजवानी ठरणाऱ्या या शिवार साहित्य संमेलनात सहभागी होऊन नागरिकांनी आनंद घ्यावा अशी विनंती स्वागताध्यक्ष जगदीश पोपळे, मराठवाडा साहित्य परिषद शाखा माजलगाव चे अध्यक्ष मुकुंदराज सोळंके, प्रा.स्नेहल पाठक (उपाध्यक्ष), प्रा. डॉ. भाऊसाहेब राठोड (कार्यवाह), किशोर गुंजकर (कोषाध्यक्ष), बाळासाहेब झोडगे (सहकार्यवाह ), प्रा. डॉ. उमेश साडेगावकर (सहकार्यवाह ) यांच्यासह, कार्यकारणीने केले आहे.



*डॉ. सिद्धार्थ तायडे*

(निमंत्रित कवी-शिवार साहित्य संमेलन)

   ९८२२८३७७७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !