११ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड
समकालीन भवतालाचा अंतर्बाह्य वेध घेणारा लेखक: बालाजी सुतार
जागतिकीकरणामुळे जे आमूलाग्र बदल झाले त्या विविधांगी बदलांचा अंतर्बाह्य वेध आपल्या सकस लेखणीतून घेणाऱ्या साहित्यकाराची अर्थातच बालाजी सुतार यांची मराठवाडा साहित्य परिषद अंबाजोगाई शाखेच्या वतीने आयोजित ११ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.हे विलक्षण आनंददायी आहे. खराखुरा लेखक संमेलनाध्यक्ष होतो आहे. हे ऐकून-वाचून लई भारी वाटतंय!
अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीच्या प्रथा आणि परंपरेनुसार पुर्वाध्यक्ष प्रख्यात कवी-गीतकार डॉ.दासू वैद्य यांनी बालाजी सुतार यांचं नाव बंद लिफाफ्यात अंबाजोगाईच्या मसाप कार्यकारिणीला कळवलं. पूर्वाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक दासू वैद्य,मसाप कार्यकारिणी अध्यक्ष दगडू (दादा) लोमटे, सचिव गोरख शेंद्रे, अमर हबीब ,डॉ. राहुल धाकडे,सर्व सदस्य, स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांचं मनःपूर्वक अभिनंदन !
हा बहुमान ग्रामीण भागातील लिहित्या हातांचा नावलौकिक वाढवणारा आहे.या पूर्वीही महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूर व राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी, इस्लामपूर आयोजित २८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा सन्मानही साहित्यिक बालाजी सुतार यांना मिळलेला आहे .
कोण किती मोठा कलाकार - साहित्यकार आहे यापेक्षा त्याचे योगदान समाजात कसे रुजले आहे. मनामनांचा थांग त्याने कसा घेतला आहे हे महत्वाचे.
साहित्यिक-कलावंत हा कधीच लहान-मोठा नसतो. हा तो वेगळा असतो म्हणूनन त्यात स्थर नसतो असे मला वाटते.साहित्यिक बालाजी सुतार यांच्या सारखे संतुलित लेखन करणारा दुसरा साहित्यिक दुर्मिळच!आजच्या परिस्थितीतील अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांचा परामर्श त्यांनी आपल्या साहित्य लेखनात घेतला आहे.मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेले आश्वासक लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
एक संवेदनशील साहित्यिक असल्यामुळे देशातील प्रचलित वाढत्या असहिष्णुतेवर भाष्य करणारे लेखक म्हणून बालाजी सुतार सर्वपरिचित आहेत.
झुंडशाहीसमोर शरण न जाता तिला फाट्यावर मारणारे सडेतोड लेखक म्हणून बालाजी सुतार वाचकांना अधिक जवळचे वाटतात.
माणूसपणाची संकल्पना पूर्ण करणारा लेखक अशी ओळख असणारे व्यक्तिमत्त्व बालाजी सुतार यांच्या 'दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी' या कथासंग्रहाला बी. रघुनाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आजवर महाराष्ट्रातील अनेक महत्वाचे पुरस्कार प्रतिभावान लेखक बालाजी सुतार यांना प्राप्त झाले आहेत.यामध्ये नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण केंद्रामार्फत देण्यात येणारा सन २०२० चा 'बाबूराव बागूल कथा
पुरस्कार' बालाजी सुतार यांच्या 'दोन
शतकांच्या सांध्यावरची नोंदी' या कथासंग्रहाला प्रदान करण्यात आला आहे.गडहिंग्लज येथील पूज्य साने गुरुजी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे त्यांना साने गुरुजी साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लेखक बालाजी सुतार आजच्या
पिढीतले महत्त्वाचे लेखक आहेत.
शब्द प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या 'दोन शतकांच्या सांध्यावरची नोंदी' या पहिल्याच कथासंग्रहातून मराठी लघुकथेला एक नाव आयाम त्यांनी दिला आहे. आशययुक्त विलक्षण भाषाशैली, नव्या बदललेल्या जगाकडे पाहण्याची अनोखी दृष्टी, ग्रामीण भागातील बदलांचे सूक्ष्म निरीक्षण आणि कथावस्तूतील विषय वैविध्य
हा लेखक आपल्या कथांमधून
मांडतो. ज्येष्ठ साहित्यिक राजन
गवस या कथासंग्रहाबाबत म्हणतात,
की लघुकथेच्या बंदिस्त परिघातून
मराठी कथेला स्वतःचा मोकळा
अवकाश प्राप्त करून देणाऱ्या
आजच्या कथाकारांत बालाजी सुतार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.त्यांचा हा कथासंग्रह आजच्या मराठी कथेला नवा स्वर प्राप्त करून देणारा आहे. आधुनिकीकरणाच्या रेट्याने भारताचा ग्रामीण भाग ढवळून निघाला आहे. शेतीच्या समस्या दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहेत. कुटुंबे तुटत चालली आहेत. आणि तरीही गावांचा प्रवास सुरूच आहे.या प्रवासाचे अस्सल चित्रण म्हणजे बालाजी सुतार यांनी लिहिलेला 'गावकथा'हा दीर्घांक.
एकूणच नाटकाच्या सर्वसाधारण व्याख्येला फाटा देणारे नाटक म्हणजे गाव कथा. इथे सरळ धोपट कथा अशी काही नसताना नाटक तुमचा ताबा घेते. वेगवेगळ्या प्रसंगांतून नाटक सुरू झाल्यावर काही काळ या मांडणीमधून कथेमध्ये प्रेक्षक म्हणून प्रवेश करायला वेळ लागतो. पण एकदा तुम्ही कथेमध्ये प्रवेश केला की मात्र तुम्ही तेथून बाहेर पडू शकत नाही.
कथा लिहिताना लेखक बालाजी
सुतार यांनी गावातील अनेक गोष्टी
अतिशय वास्तव पद्धतीने मांडल्या
आहेत. कविमनाचा शेतकरी आणि
त्याचे सोयाबीन जळून जाते, भावकीचा वाद, कुणब्याची व्यथा, सावकारी फास,गावात एसटीमध्ये फुलणारी आणि तिथेच कोमजणारी प्रेम कहाणी, प्रत्येक प्रसंगात गाव व्यवस्थेतील व्यथा अगदी सहज आपल्यापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही. हे नाटक आपल्याला अस्वस्थ
करते. प्रत्येक पात्राची स्वतंत्र आशी कथा आपल्या समोर येते.
"भोवताल सोडुन कोणी संत होत नाही
गावकथा म्हणते माझा अंत होत नाही"
याची विलक्षण प्रचिती म्हणजे बालाजी सुतारांची 'गावकथा' होय.
एक संवेदनशील वाचक, लेखक, विचारवंत असलेल्या आमच्या सन्मित्राला साहित्य ११व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा बहुमान मिळणे हा आनंद शब्दातीत तर आहेच पण त्या साहित्य संमेलनाची उंची देखील साहित्यिक बालाजी सुतार यांच्यामुळे वाढेल हे निश्चितच! समकालीन भवतालाचा अंतर्बाह्य वेध घेणारे साहित्यिक आमचे सन्मित्र बालाजी सुतार (बासुदा) यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
✍️
प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे
९८२२८३६६७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा