कृषिमंत्री धनंजय मुंडे राहणार उपस्थित*
राज्यस्तरीय कृषी महोत्सव : परळीतील कृषी महोत्सवाचा सोमवारी समारोप
गोविंद महाराज गायकवाड यांच्या विनोदी भारुडातून समाज प्रबोधन या कार्यक्रमाने होणार समारोप
कृषी महोत्सवाच्या पाचव्या दिवशीही राज्यातून हजारो शेतकरी बांधव परळीत
खरेदी-विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल
तांत्रिक सत्रात रेशीम शेती, पशुपालन, उत्ती संवर्धन रोपे, भाजीपाला लागवड, सोयाबीन-हरभरा तंत्रज्ञान, रुंद वरंबा व सरी तंत्रज्ञान आदी विषयी सखोल मार्गदर्शन
परळी वैद्यनाथ (दि. 25) - बीड जिल्ह्याच्या परळी वैद्यनाथ शहरात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या कृषी महोत्सवाचा सोमवार (दि. 26) रोजी दुपारी एक वाजता समारोप होणार असून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
कृषी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी आळंदी देवाची येथील प्रसिद्ध टीव्ही कलाकार व लोकप्रबोधन पर विनोदी भारुड सादरकर्ते गोविंद महाराज गायकवाड यांच्या विनोदी भारुडातून समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या समारोप समारंभास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी चे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी मिश्रा, बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, आत्माचे संचालक अशोक किरनाळी विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, डॉ.तुकाराम मोटे, ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
*पाचव्या दिवशीही राज्यातून गर्दी*
दरम्यान रविवारी कृषी महोत्सवाच्या पाचव्या दिवशीही राज्यभरातून हजारो शेतकरी बांधव परळीत दाखल झाले असून कृषी महोत्सवास आजही उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन यासह उमेदअंतर्गत उभारण्यात आलेल्या बचत गटांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची खरेदी विक्री उलाढाल झाली असून शेतकरी बांधव तसेच विविध कंपन्या आणि महिला बचत गटांना याचा लाभ मिळाला आहे.
*तांत्रिक चर्चा सत्र ०४*
*दिनांक २५/०८/२०२४*
अध्यक्ष : डॉ. के. एस बेग, संचालक
संशोधन, व. ना. म. कृ. वि., परभणी
संकलक : डॉ. सचिन सूर्यवंशी, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर.
*रेशीम शेती*
डॉ. चंद्रकांत लटपटे, प्रमुख, रेशीम शेती संशोधन केंद्र, वनामकृवि, परभणी
यांनी रेशीम शेती व्यवस्थापन या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सोयाबीन, कापूस, ऊस इ. एकच पीक पद्धती धोकादायक असून त्यासाठी रेशीम शेती ही एक पर्यायी पीक पद्धत आहे. या मार्गदर्शनात रेशीम शेती करीता शेड उभारणी, कोष काढणी व महाराष्ट्रातील कोष खरेदी केंद्र आणि तसेच रेशीम शेती करिता शासकीय योजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
*शेतीमध्ये जोडधंदा म्हणून पशुधनाचे महत्व*
डॉ. दत्ता बैनवाड, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी
यांनी शेतीस जोडधंदा म्हणून गोवंश, म्हैसवंश, शेळीवंश, मेंढीवंश व कुक्कुटपालन या शेतीपूरक व्यवसायाची सविस्तर माहिती दिली. गोवंश हा खात्रीलायक शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. या मार्गदर्शनात त्यांनी गाय, म्हैस, शेळी, मेंढी व कोंबडी यांच्या देशी व विदेशी जाती विषयी माहिती दिली. तसेच पशुधन संगोपन, आहार व आरोग्य व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.
*उत्ती संवर्धन रोपे*
श्री. रवी गवळी, जैन इरिगेशन प्रा. लि. जळगाव यांनी जैन कंपनीमार्फत तयार करण्यात येणारे केळी, डाळिंब, व मोसंबी, या फळ पिकांच्या विविध वाणांचे उत्ती संवर्धित रोपे याविषयी माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांना फळबाग लागवडी करिता रोग विरहित उत्ती संवर्धित रोपे व ठिबक सिंचन संचाचा वापर करावा असे आवाहन केले.
*भाजीपाला संरक्षित शेती*
डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख, उद्यानविद्या विभाग,वनामकृवि, परभणी
यांनी बदलत्या हवामानमध्ये भाजीपाला लागवडीकरीता उपयुक्त संरक्षित शेती/नियंत्रित शेती याविषयी मार्गदर्शन केले.
संरक्षित शेतीमुळे नियंत्रित तापमान, आर्द्रता, वनस्पती आवश्यकता नुसार प्रकाश, उत्पादन वाढ, उत्तम उत्पादन, कीटक व रोगापासून संरक्षण, लवकर परिपक्वता, प्रतिकूल हवामानात लागवड शक्य इ. गोष्टी सहज शक्य असल्याचे नमूद केले. या मार्गदर्शनात त्यांनी शेडनेट उभारणीसाठी लागणारा खर्च व शेडनेटची विविध प्रकार याविषयी माहिती दिली.
*सोयाबीन व हरभरा लागवड तंत्रज्ञान*
डॉ. वसंत सूर्यवंशी, कृषिविस्तार विद्यावेत्ता, अंबाजोगाई यांनी सोयाबीन पिकांची वाढ नियंत्रित करण्याकरिता संजीवकांचा वापर व सोयाबीन मधील कीड व रोग नियंत्रण या विषयी मार्गदर्शन केले. तसेच हरभरा पिकातील मर रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्याकरिता आवश्यक पंचसूत्री शेतकऱ्यांना सांगितली.
*कोरडवाहू शेतीकरिता आवश्यक रुंद वरंबा व सरी तंत्रज्ञान*
डॉ.सचिन सूर्यवंशी, कार्यक्रम समनव्यक, कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर यांनी कोरडवाहू शेतीमध्ये सोयाबीन पिकाकरिता जास्त व कमी पावसामध्ये उपयुक्त रुंद वरंबा व सरी पेरणी पद्धती बाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच रुंद वरंबा व सरी पद्धत्तीमुळे उत्पादन खर्चात १५ ते २० टक्के घट होऊन उत्पादन २० ते २३ टक्के पर्यंत वाढते असे नमूद केले व शेतकरी बांधवाना या पद्धतीचा वापर करावा असे आवाहन केले.
*सदरील परिसंवाद दरम्यान प्रगतशील शेतकऱ्यांचा त्यांनी शेतीमध्ये राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाकरिता सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले*
या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. वसंत सूर्यवंशी, विस्तार कृषि विद्यावेत्ता, अंबाजोगाई यांनी तर संकलन व आभार प्रदर्शन डॉ. सचिन सूर्यवंशी, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा