अष्टांग-योगाच्या अनुष्ठानाने जगात सुख- शांतता नांदेल !
वैद्यनाथ" मधील ‘ग्रंथ चर्चा’ उपक्रमात प्रा. डॉ.आचार्य यांचे विचार
*परळी, दि.११-* सद्ययुगात वाढत चाललेल्या सर्व समस्यांवर अष्टांगयोगाचे अनुष्ठान हाच उपाय असून योगतत्वांच्या आचरणाने जगात सुख शांतता नांदेल.यासाठी मानवाने नेहमी योगसाधनेला जीवनाचे अंग बनवावे, असे आवाहन अभ्यासक प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांनी व्यक्त केले. . येथील वैद्यनाथ महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने काल (दि.१०) "ग्रंथचर्चा" हा अभिनव उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफतांना प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आचार्य बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ए. आर. चव्हाण होत्या. तर व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डी. के. आंधळे, डॉ.व्ही.बी. गायकवाड, नॅक समन्वयक डॉ. व्ही. जे. चव्हाण, ग्रंथपाल डॉ.एस. ए.धांडे उपस्थित होते. . श्री आचार्य यांनी बी. के. एस. अय्यंगार यांच्या *योगदीपिका* या पुस्तकावर आधारित *"योग हा शाश्वत सुखाचा मार्ग"* या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले- योग म्हणजे मनाच्या विविध वृत्तींना व इंद्रियांच्या दोषांना दूर सारून त्यांना श्रेय मार्गाकडे जोडणे व पवित्र तत्वांचा अंगिकार करणे होय. योगाच्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या आठ अंगांचे मनोभावे अनुष्ठान करून त्यातील सत्य मूल्यांवर आचरण करणे इष्ट ठरते. यांच्या अभावी आजच्या युगातील माणूस स्वैर होत चालला असून विपुल प्रमाणात सुखसाधने मिळूनही त्याची दुःखांकडे वाटचाल सुरू आहे. आपल्या भाषणात त्यांनी योगाच्या मंत्रयोग, लययोग, हठयोग, राजयोग यांपैकी महर्षी पतंजली प्रतिपादित राजयोग सर्वोत्तम असल्याचे सांगितले. समग्र योगाच्या आचरणातून मानवाने आपले मानसिक, शारीरिक, बौद्धिक व आत्मिक संतुलन कसे राखावे , यासंदर्भात समर्पक उदाहरणे देऊन योगाचे महत्व उलगडले. . प्राचार्या डॉ. ए.आर. चव्हाण यांनी वाचन संस्कृती जपण्यासाठी ग्रंथचर्चा हा उपक्रम अतिशय स्तुत्य व मौलिक स्वरूपाचा असून यामुळे वाचनापासून दुरावत चाललेल्या प्राध्यापक व विद्यार्थी घटकाला ग्रंथाकडे वळण्याची सत्प्रेरणा मिळू शकते, असे सांगितले व इतरांनीही याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार या उपक्रमाचे संयोजक ग्रंथपाल डॉ. एस. ए. धांडे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. एम. जी. लांडगे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा