बीडचे भूमिपुत्र:माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन, अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपलं



माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं आज (25 जानेवारी) निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.


चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती होते. ते वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते.

साहित्यविश्वातून दुःख व्यक्त

ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी चपळगावकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले, "नरेंद्र चपळगावकर हे बलदंड वैचारिक लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक होते. त्यांनी मराठी वैचारिक लेखनाला प्रतिष्ठा मिळवून दिली. तसेच महाराष्ट्राला वैचारिक वळ देण्याचं काम केलं."

"चपळगावकर यांचं लेखन वैचारिक स्वरुपाचं होतं. त्यांनी अनेक उत्तम पुस्तकं लिहिली. 'गांधी आणि संविधान' या पुस्तकात त्यांनी संविधान कसं गांधी विचाराचं होतं यावर संशोधनपर लेखन केलं. वर्ध्याला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी जे भाषण केलं ते अतिशय परखड होतं. त्यात त्यांनी लेखक आणि राज्यकर्त्यांनी कसं वागलं पाहिजे यावर भाष्य केलं होतं," असंही देशमुख यांनी नमूद केलं.

नरेंद्र चपळगावकर यांचा प्रवास

नरेंद्र चपळगावकर यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव असले, तरी त्यांच्या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळे ते मूळचे बीडचेच झाले.


नरेंद्र चपळगावकर यांचा बीडमध्येच 14 जुलै 1938 रोजी जन्म झाला. त्यांचे चुलत आजोबा आणि वडील हैदराबाद संस्थानामध्ये वकिली करत असत. हैदराबाद संस्थान भारतात सामील झाल्यावरही त्यांच्या वडिलांनी बीड येथे वकिली सुरू ठेवली होती. त्यांच्या कुटुंबातील काही लोक संस्थानच्या सरकारी नोकरीतही होते.

नरेंद्र चपळगावकर यांचं शिक्षण बीडमधील चंपावती विद्यालय, मदरसे फोकानिया येथे झाले. त्यानंतर त्यांनी अमरावती येथे इंटर, औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय येथे पदवीचे शिक्षण घेतले.


त्यानंतर औरंगाबादमध्येच त्यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले तर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए पदवी संपादन केली.


शालेय जीवनात त्यांना लागलेली भाषेची गोडी महाविद्यालयीन शिक्षणाच्यावेळेस वृद्धिंगत होत गेली.


सुधीर रसाळ यांच्यासारखे समिक्षक मित्र आणि अध्यापक म्हणून त्यांना लाभले त्याचप्रमाणे वा. ल. कुलकर्णी यांच्याकडूनही त्यांनी मराठी साहित्याचे धडे गिरवले.


लेखनाची सुरुवात

लहानपणापासून वाचन, वक्तृत्व याची आवड असणाऱ्या चपळगावकर यांनी शिक्षणाबरोबरच इतर अनेक क्षेत्रातील मित्र जोडले.


सुरुवातीपासून कायदा आणि मराठी भाषा या दोन्ही विषयांवर त्यांचं एकाचवेळी एकसमान प्रेम राहिले. यामुळेच ते पत्रकारिता, अध्यापन, लेखन, वकिली, संपादन अशा विविध प्रकारचं काम करू शकले आहेत.


चंपावती विद्यालय, लातूरचे दयानंद महाविद्यालय, औरंगाबादचे माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय येथे त्यांनी काहीकाळ अध्यापनाचे काम केले.

बीडमधून केसरी, सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. सकाळ आणि केसरीसाठी त्यांनी नियमित बातमीदारीचं कामही केलं.


याशिवाय किर्लोस्कर मासिक, मनोहर साप्ताहिक तसेच प्रतिष्ठान, स्वराज्यसारख्या नियतकालिकांमध्ये त्यांनी लेखन केलं.


मुकुंदराव किर्लोस्कर, शांताबाई किर्लोस्कर, प्रभाकर उर्ध्वरेषे यांच्याशी त्यांना दीर्घकाळ स्नेह राहिल्यामुळे अनेक साहित्यिक उपक्रमात त्यांना मोलाचा वाटा उचलता आला.


नरेंद्र चपळगावकर यांचे वडील पुरुषोत्तम चपळगावकर हे काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सहभाग घेतला होता.


त्यांना अनेकवेळा कारावासही भोगावा लागला. परंतु त्यांच्या या राजकीय आणि स्वातंत्र्य चळवळीतील सहभागामुळे चपळगावकर कुटुंबाचा अनेक नेत्यांशी संबंध आला.


या नेत्यांमध्ये अनंत भालेराव, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.


राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आणि अशा महान नेत्यांचा जवळचा सहवास याचे संस्कार त्यांच्यावर झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार