रंगकर्मींचे विद्यापीठ गुरुवर्य मार्गदर्शक स्मृतिशेष प्रा.केशवराव देशपांडे सरांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र वंदन..!!
आदरणीय गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे सरांचं असणं आमच्यासाठी लाखमोलाचं होतं..!निष्ठावान प्राध्यापक कसा असावा आणि त्या पेशाला पूर्णत्वाने कसे वाहून घ्यावे, हे जर का कुणाला शिकावयाचे असेल तर त्यांनी आमचे आदरणीय
गुरुवर्य स्मृतिशेष प्रा. केशवराव देशपांडे यांच्या जीवनकार्यावरून शिकावे. सरांचे, मार्गदर्शन आम्हांस लाभले हा आनंद शब्दातीत आहे.अनेक पिढ्यांवर उत्तम संस्कार करून त्यांचे आयुष्य घडविणाऱ्या प्रा.केशवराव देशपांडे सरांना 'रंगकर्मींचे विद्यापीठ'असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतलेले प्रा. केशव देशपांडे प्रारंभी ( १९७४) योगेश्वरी महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक होते. त्यानंतर योगेश्वरी संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख झाले. त्यांनी आपल्या कार्यकालात अनेक विद्यार्थी घडवले. याबरोबरच त्यांनी अंबाजोगाईची नाट्यचळवळ वृध्दींगत करण्याचे काम केले. १९७३ मध्ये त्यांच्या पुढाकारानेच योगेश्वरी नाट्य मंडळाची स्थापना झाली. या मंडळामार्फत विविध नाटकं त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेत नेऊन अंबाजोगाईच्या नाट्य चळवळीला उभारी दिली. नामवंत लेखकांची नाटकं बसवून त्याचे दिग्दर्शन त्यांनी केले. शं. ना. नवरे यांचे ' सूर राहु दे', यासह 'बेईमान', 'ससा आणि कासव', 'नाती गोती' यासह जयकेतू या नाटकाचे दिग्दर्शन करून स्वत: जयकेतूची भुमीका त्यांनी केली.
ज्येष्ठ संगीतकार व कवी राम मुकदम (काका) यांच्या पुढाकाराने अंबाजोगाईत मेळे चालत असत, राष्ट्रसेवा दलाचे डॉ. व्दारकादास लोहिया व डॉ. शैला लोहिया यांच्या पुढाकाराने समाज जागृतीवर आधारीत नाटकं व्हायची ही चळवळ आणि परंपरा पुढे वाढवण्याचे काम प्रा. केशव देशपांडे यांनी केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सूर राहु दे या नाटकात, नाट्य कलावंत डॉ. दिलीप घारे, प्रा. प्रकाश प्रयाग, प्रा.सुधीर वैद्य, विजया मुकदम यांनी त्यांच्यासोबत भुमीका केलेल्या होत्या.
त्यांच्या माध्यमातून योगेश्वरी महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातून अनेक कलावंत घडले. अंबाजोगाईच्या नाट्यचळवळीची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली.
आज आपण जे काही आहोत ते प्रा.केशवराव देशपांडे सरांमुळे आहोत अशी भावना आजही आमच्या मनात जागृत आहे. साधेपणाने जगताना जीवनावरची,माणूसकीवरची ,कलेवरची श्रद्धा कशी वाढवावी याचे मार्गदर्शन आमच्या पिढीला लाभले ते सरांकडूनच.आदरणीय सरांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!🙏🏵️🙏
- प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा