कला आणि समाजप्रबोधनाचा संगम हरवला !
भावपूर्ण आदरांजली:भीम ललकारी देणारे शाहीर प्रभाकर पोखरीकर
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात आपल्या लेखणीतून आणि वाणीतून क्रांती घडवणारे ज्येष्ठ गीतकार, संगीतकार, समाजप्रबोधनकार आणि आंबेडकरी चळवळीतील आधारस्तंभ प्रभाकर पोखरीकर (दादा) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक महान कलावंत आणि प्रखर प्रबोधनकार गमावला आहे.
कला आणि समाजप्रबोधनाचा संगम:-
विविध कलेच्या माध्यमातून कलाकारांनी आंबेडकरी विचार चळवळ तळागाळात पोहोचविण्याचे काम केले आहे. भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच जनजागृतीचे आणि प्रबोधनाचे अत्यंत महत्त्वाचे महान कार्य केले. ते केवळ कवी-गायक नव्हते, तर एक प्रखर समाजसुधारक आणि आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या कविता आणि गाण्यांमधून त्यांनी सामाजिक विषमता, अन्याय आणि अंधश्रद्धा यांवर जोरदार प्रहार केला. त्यांनी आपल्या कलेचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता, समाजप्रबोधनासाठी केला. ज्येष्ठ गीतकार प्रभाकर पोखरीकर यांच्या कविता आणि गाण्यांमध्ये समाजातील दुर्बल घटकांच्या वेदना आणि व्यथांना वाचा फोडली. त्यांच्या रचनांमधून त्यांनी समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश दिला. त्यांच्या गाण्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रोत्साहित केले.
संघर्षमय जीवन:-
भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांचे वडील टेलर होते. त्यामुळे वडिलांचा हा वारसा पोखरीकरांकडे आला. पण त्यात ते रमले नाही. सुरुवातीला त्यांनी टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम केले. त्यानंतर बीएमसी आणि एमटीएनएलमध्येही नोकरी केली. नोकरीमुळे त्यांना गाण्याच्या कार्यक्रमाला जाता येत नसायचे. त्यामुळे सारख्या दांड्या व्हायच्या. तर कधी कधी उशिरा कामावर यायचे. तर कधी कामावरून लवकर कार्यक्रमासाठी पळायचे. त्यामुळे कामातील सहकारी आणि साहेबांचे टोमणे सुरू झाले. एके दिवशी एमटीएनएलच्या साहेबांनी त्यांना थेट ‘गानाही गाओ, नोकरी क्यों करते हो, हमे आपका इंतजार करना पडता है’, असं सुनावलं. पोखरीकर यांना हा अपमान जिव्हारी लागला. साहेबांच्या प्रश्नांचा भडिमार संपताच, ‘कल से आपको मेरा इंतजार नही करना पडेगा’, असं ठणकावत पोखरीकरांनी राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने घरचे मात्र घाबरून गेले होते. घरच्यांनी त्यांना नोकरीला जाण्याचा तगादा लावला होता. मात्र, पोखरीकरांच्या वडिलांनी त्यांना दोनदा शेकडो लोकांसमोर गाणं गाताना पाहिलं. पोखरीकर यांना लोक भरभरून पैसे देत असल्याचंही त्यांनी पाहिलं. त्यानंतर पोखरीकरांच्या वडिलांनी त्यांना कधीच नोकरीसाठी तगादा लावला नाही.
समाजसेवेला वाहून घेतलेले जीवन:-
भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर हे अविवाहित होते. त्यामागे एक कारण होते. त्यांच्या हृदयाच्या डाव्याबाजूची झडपं खराब झाली होती. त्यावर त्यांनी केईएममध्ये उपचारही घेतले होते. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करायला सांगितलं. पण ऑपरेशनचा खर्च जास्त होता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांनाच थेट विचारलं, ऑपरेशन न करता मी किती वर्षे जगेन? त्यावर काही वर्षेच तुम्ही जगू शकाल असं त्यांना सांगण्यात आलं. त्यावर माणसाचे जीवन क्षणभंगूर असते हे बुद्धाने अडीच हजार वर्षांपूर्वीच सांगितलंय, तुम्ही नवीन काय सांगता, अशी कोटी करत पोखरीकर यांनी बळेच विनोद करण्याचा प्रयत्न केला. पैशा अभावी त्यांनी ऑपरेशन करायचं टाळलं आणि लग्नही. एखाद्या मुलीशी लग्न करून तिला विधवा करून भिकेला लावण्यापेक्षा लग्न न केलेले बरं, असं म्हणून त्यांनी लग्न करणं टाळलं. त्यानंतर त्यांनी गाणं आणि आंबेडकरी चळवळ या दोन गोष्टींमध्ये स्वत:ला वाहून घेतलं.
आंबेडकरी चळवळीतील योगदान:-
भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर हे गायकच नसून कार्यकर्तेही होते. दलित पँथर चळवळीपासून त्यांनी गाण्याची प्रेरणा घेतली. त्यांनी अनेक गायक आणि कार्यकर्तेही घडवले. फुले-आंबेडकर आणि बुद्धाच्या विचाराने ते भारून गेलेले होते. त्यामुळेच त्यांनी पुण्यात धम्म यात्रा काढली होती. या यात्रेला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसादही मिळाला होता. यात्रेच्या निमित्ताने ते गावागावात गेले होते. बौद्ध धर्माबाबत जागृती निर्माण करणारी ही यात्रा त्यांनी वर्षभर स्वखर्चाने चालवली. पुढे पैशाअभावी त्यांनी ती बंद करावी लागली होती.
अविस्मरणीय गाणी:-
प्रबोधनकार प्रभाकर पोखरीकरांची गाजलेली आंबेडकरी गाणी आजही लोकप्रिय आहेत:
* "छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्ववान होणार नाही, कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही…"
* "जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने, माणसाला माणूसपण दिलं प्रेमाने"
* "हे पाणी आणिले मी माठ भरूनी, हे घोटभर जाहो पिऊनी"
त्यांची असंख्य गाणी अजरामर राहतील. "श्रम माझे बाळांनो आठवूनी, वाट किती मी पाहू, तुझ्या विना रमा, भिमाई याद तुझी, मातीचं सोने झाले, भीमा तुझ्यामुळे" अशा एकापेक्षा अनेक दर्जेदार, लोकप्रिय गीतांनी प्रभाकरदादांनी महाराष्ट्राला वेडं लावले.त्यांची गाणी प्रेरणादायी आहेत.
वारसा आणि आदरांजली:-
भीम ललकारी देणारे प्रभाकर पोखरीकर हे आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचे कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि वाणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार केला. त्यांनी वंचित आणि उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांचे जीवन संघर्षमय होते, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीसह सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
प्रबोधनकार प्रभाकर पोखरीकर (दादा) यांनी आपल्या गीतलेखनातून आणि कार्यातून सामाजिक न्यायाचा आणि समतेचा जो विचार मांडला, तो विचार आणि त्यांनी समाजासाठी केलेले कार्य कायमच स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, आणि त्यांचा वारसा पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील.
प्रबोधनकार प्रभाकर पोखरीकर (दादा) यांना अखेरचा जयभीम!
भावपूर्ण आदरांजली!
✍️ प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे
(९८२२८३६६७५)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा