जांबुवंतांचे महाराष्ट्रातील एकमेव स्थान !
जालना : जामखेडसह तेरा गावात हनुमानाचे मंदिरच नाही !
जांबुवंतांचे महाराष्ट्रातील एकमेव स्थान, पर्यटनदृष्ट्या उपेक्षितच
छत्रपती संभाजीनगर : हनुमान जयंती शनिवारी सर्वत्र साजरी केली जात असताना जालना जिल्ह्यात असणारा जामखेड परिसर मात्र त्यास अपवाद ठरतो. जामखेड (ता.अंबड) परिसरातील तेरा गावात हनुमानाचे मंदिरच नाही. जामखेड हे जांबुवंतांचे स्थान असल्यामुळे या परिसरातील लोक जांबुवंताला दैवत मानतात. या भागात पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची गरज आहे.
छत्रपती संभाजीनगर अथवा जालन्यापासून साधारण एक ते दीड तासाच्या अंतरावर हे स्थान आहे. धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अंबडकडे जाणारा रस्ता आहे, तेथे जामखेड गाव वसलेले आहे. जुन्या काळात दंडकारण्यात या भागाचा समावेश होता. डोंगरदर्यात असलेल्या या गावापासून दोन किमी अंतरावर असणार्या गुहेत जांबुवंत, नळ, नीळ यांचे मंदिर आहे. याशिवाय गणपती, महादेवाची पिंड आहे. रामायण, महाभारतकालीन संदर्भ या मंदिराला आहेत. जांबुवंतगढी असे नावाने हे स्थान ओळखले जाते.
एकांताची इच्छा
रामायणात सीतेला शोधण्यासाठी प्रभू रामाच्या फौजेत जांबुवंत सल्लागार म्हणून काम करीत असे. हमुमानाने समुद्रपार जावे म्हणून त्याला जांबुवतांनेचे प्रेरणा दिली. राम- रावण युद्ध संपल्यानंतर प्रभूने सगळ्यांना बक्षिसांचे वाटप केले. जांबुवंताला विचारल्यावर त्याने एकांतवास आणि रामाशी युद्धाची इच्छा व्यक्त केली. त्यावर रामाने एकांताचे स्थान म्हणून जामखेडची गुहा दिली. कृष्णावतारात युद्धाची इच्छा पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले. असे म्हणतात की रावणाशी युद्ध करताना जांबुवंत प्रत्यक्ष लढले नव्हते. त्यामुळे त्यांना शौर्य दाखविता आले नाही. आपण पराक्रमी असूनही शौर्य न दाखविल्याचा गर्व त्यांना झाला होता. श्रीरामाने ते ओळखले व पुढील जन्मात युद्ध केले.
28 दिवस कृष्णासोबत युद्ध
महाभारत काळात जांबुवंताची युद्धाची इच्छा पूर्ण झाल्याची आख्यायिका आहे. श्रीकृष्णाला सत्राजित व प्रसेनजित नावाचे बंधू होते. सत्राजितला सूर्य देवाने प्रसन्न होऊन स्यमंतक नावाचा तेजस्वी मणी दिला. मणी सुरक्षित रहावी म्हणून कृष्णाने तो मणी उग्रसेन महाराजांना देण्यास सांगितले; परंतु सत्राजिताने या गोष्टीला नकार दिला व तो मणी आपला भाऊ प्रसेनजित याला दिला. प्रसेनजित मणी गळ्यात घालून एकदा शिकारीला गेला असता वाघाने त्याला ठार केले. त्याचवेळी तेथे आलेल्या जांबुवंत अस्वलाने वाघाला ठार करून तो मणी घेऊन आपल्या गुहेत गेला व तो मणी आपल्या मुलीसाठी खेळण्याला दिला. बराच वेळ प्रसेनजित न आल्याने कृष्णानेच मण्यासाठी प्रसेनजितचा घात करून मणी घेतला असावा अशा आरोप सत्राजितने केला. हा आरोप धुवून काढण्यासाठी श्रीकृष्ण प्रसेनजितचा शोध घेण्यासाठी निघाला. तेव्हा एका ठिकाणी त्याला प्रसेनजित मृतावस्थेत दिसला. थोड्या दूर अंतरावर मेलेला वाघ ि व तेथेच एका अस्वलाची पावलेही दिसून आली. ती पावले एका गुहेत गेल्याचे दिसले. कृष्ण गुहेत शिरल्यावर आत लहान बाळ पाळण्यात त्या मण्याशी खेळताना दिसले. श्रीकृष्ण मणी घेण्यासाठी पाळण्याजवळ जाताच त्यांना जांबुवंताने अडविले. तेव्हा दोघांमध्ये 28 दिवस जामखेड येथे युद्ध झाले. या युद्धात दोघांच्या शरिरातून घाम निघू लागला, त्यातून नदीची निर्मिती झाली असे सांगतात. या नदीचे नाव घामवती नदी आहे. युद्धामुळे थकलेल्या जांबुवंताने आपला प्रतिस्पर्धी हा अवतारी पुरुष आहे, ओळखून त्याचे गुणगान केले. तेव्हा श्रीकृष्णाने मणी घेण्यासाठी आलो असून या मण्याच्या चोरीचा आळ माझ्यावर असून तो दूर करण्यासाठी मला हा मणी हवा आहे असे सांगितले. तेव्हा जांबुवंताने स्यमंतक मणी कृष्णाला दिला व आपली मुलगी जांबुवंतीचा विवाहही कृष्णासोबत लावून दिला.
मंदिराचा जीर्णोद्धार
पूर्वी गुहेत असणारे व जाण्यासाठी अतिशय अवघड असणार्या मंदिराचा 1993 साली जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात सभागृह व अन्य व्यवस्था आहेत. दर शुक्रवारी जामखेडचे ग्रामस्थ मंदिराला दर्शनासाठी येतात. रामायणात हनुमानापेक्षा जांबुवंत महाराजांचे स्थान मोठे असल्यामुळे या परिसरातील बारा वाड्या व जामखेडात हनुमानाचे मंदिर नाही. (जांबुवंत हे हनुमानाचे मोठे बंधू आहेत असे मानले जाते. शिवाय त्यांना काका असे सर्वजण म्हणत. त्यामुळे त्यांच्यापेक्षा कनिष्ठाचे मंदिर नसावे. ) जामखेड गाव व जोगेश्वरवाडी, बक्षाचीवाडी, किनगाववाडी, निहालसिंगवाडी, पागिरवाडी, लेंभेवाडी, ळेवाडी, भोकरवाडी, कौचलवाडी, विठ्ठलवाडी, नारळेवाडी, कोंबडवाडी या बारा वाड्या आहेत. या ठिकाणी हनुमानाचे मंदिर नाही. परिसरत मंगल कार्याच्या वेळी हनुमानाचे दर्शन घेण्याची प्रथा असताना या भागात मात्र जांबुवंतगढावर जातात...
✍️लेखन सौजन्य: उमेश काळे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा