साधा दिसणारा असाधारण माणूस : उपप्राचार्य प्रा.एन.जी. गायकवाड सर
छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्रा. नंदकिशोर गायकवाड सर, हे दि. ३१ मे २०२५ रोजी आपल्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. या गौरवशाली वाटचालीचा समारोप म्हणून, दि. २७ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिरात त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्व सेवागौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा केवळ एक औपचारिक समारंभ नव्हता, तर ते त्यांच्या ऋषितुल्य कार्याला, त्यांच्या त्याग आणि समर्पणाला वंदन करणारे एक हृद्य आणि प्रेरणादायी संमेलन होते. याप्रसंगी विद्यार्थी, पालक तसेच समाजातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक, वैद्यकीय आणि शासनाच्या प्रशासकीय सेवेतील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने गायकवाड सरांच्या जनमानसातील अढळ स्थानाची प्रचिती दिली. एक संवेदनशील माणूस म्हणून, एक समर्पित शिक्षक म्हणून, एक निस्सीम मित्र म्हणून आणि एक सक्षम प्रशासक म्हणून त्यांच्या कार्याचा झालेला गुणगौरव उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेला. आजच्या धावपळीच्या, स्वकेंद्रित जगात जिथे माणसांच्या गर्दीत खऱ्या अर्थाने माणूस शोधणे एक आव्हान बनले आहे, तिथे काही माणसे आपल्या तेजस्वी कार्याने आणि उदात्त स्वभावाने कायम स्मरणात राहतात. ती केवळ स्मरणात राहत नाहीत, तर भावी पिढ्यांना त्यांचे कर्तृत्व आणि जीवनकार्य दिशादर्शक दीपस्तंभ ठरते. याच पठडीतील एक देदीप्यमान व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. नंदकिशोर गायकवाड सर होय.
*दूरदृष्टीचा प्रशासक: एक कर्तृत्ववान निवड*
संकटकाळी सर्वांना सावरणारे, निरपेक्ष बुद्धीने सेवा करणारे, कुठल्याही प्रश्नांची उत्तरे शोधणारे, आणि सर्व समावेशक कल्याणाचा विचार करणारे व्यक्तित्व असलेल्या गायकवाड सरांच्या गुणांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मा. आ. सतीश भाऊ चव्हाण साहेब यांच्या नजरेत ते भरले. त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या सहृदयी स्वभावाचा आणि त्यांच्या प्रशासकीय क्षमतेचा विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच संस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा असे आदरणीय भाऊंना वाटू लागले. म्हणूनच, कर्तृत्व संपन्न असणाऱ्या गायकवाड सरांची त्यांनी उपप्राचार्य पदी निवड केली. हा निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचा आणि योग्य व्यक्ती निवडण्याच्या क्षमतेचा परिपाक होता.
*खडतर प्रवास ते शैक्षणिक उंची: एक प्रेरणादायी आलेख*
प्रा.गायकवाड सरांचा प्रारंभिक जीवन प्रवास हा संघर्षाचा आणि दुर्दम्य जिद्दीचा एक आदर्श नमुना आहे. कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असताना आणि सुरुवातीला नोकरी करताना तुटपुंज्या पगारातही त्यांनी आपल्या ध्येयापासून विचलित न होता क्लासेस घेऊन मुलांना शिकवणीचे काम केले. ही केवळ उपजीविकेची सोय नव्हती, तर ती ज्ञानदानाची त्यांची आंतरिक तळमळ आणि शिक्षकी पेशाप्रतीचे त्यांचे समर्पण होते. विशेष म्हणजे, ज्या देवगिरी महाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते, त्याच महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. हे त्यांच्या परिश्रमाचे आणि प्रामाणिकपणाचे द्योतक आहे. याच महाविद्यालयात पुढे त्यांनी उपप्राचार्य पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारीही स्वीकारली, जी त्यांनी अत्यंत निष्ठा आणि कार्यक्षमतेने सांभाळली. प्रशासनात काम करत असताना त्यांनी स्वतःला एक उत्तम प्रशासक, शिस्तप्रिय शिक्षक आणि अजोड कार्यतत्पर व्यक्ती म्हणून सिद्ध केले. त्यांची काम करवून घेण्याची अनोखी हातोटी केवळ अधिकार गाजवण्यावर आधारित नव्हती, तर ती प्रेरणेवर आणि विश्वासावर आधारित होती. त्यांच्या बोलण्यातील सोज्वळपणा, वागण्यातील साधेपणा, मनातील जिव्हाळा, कामासोबत स्नेहभाव जपण्याचा स्वभाव, माणुसकीचा ओलावा आणि अडचणीतील माणसाला मदतीचा हात देण्याची भावना त्यांना सर्वांसाठीच हवेहवेसे बनवते. हे गुण केवळ प्रशासकीय कौशल्ये नसून, मानवी मूल्यांचा परिपोष करणारे गुण आहेत, जे त्यांना इतरांपासून वेगळे ठरवतात.
*उपप्राचार्य म्हणून दूरदृष्टी आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रम:*
देवगिरी महाविद्यालयात उपप्राचार्य पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी सर्वांना अपेक्षित स्वातंत्र्य देण्याचे ठरविले. परंतु त्याचबरोबर त्यांनी एक स्पष्ट भूमिका घेतली: 'कोणीही नातीगोती काढून नीतिमत्ता धोक्यात आणू नका, कामाशीच आपले नाते ठेवा'. या मतावर ते ठाम राहिले. याशिवाय, गोरगरीब मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी अनेकविध उपक्रम तयार केले व मार्गी लावले. यापैकी त्यांनी घेतलेल्या अनोख्या 'आई मेळाव्या 'ची चर्चा तर संपूर्ण महाराष्ट्रात झाली. हा उपक्रम केवळ पालकांशी संवाद साधण्याचा नव्हता, तर तो शिक्षण आणि कुटुंब यांच्यातील पूल अधिक मजबूत करण्याचा एक प्रयत्न होता.
त्यांनी पालकांना परवडेल अशा अत्यल्प फीमध्ये महाविद्यालयामध्येच संस्थेच्या प्रेरणेने "नीट-जेईई, सीईटीचे" क्लासेस सुरू केले. सदरील क्लासला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत गेला, हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या तळमळीचे उत्तम उदाहरण आहे.
*ज्ञानदानाचा स्रोत आणि विद्यार्थी-पालकांशी संवाद*:-
कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करताना त्यांचा अभ्यासाचा व्यासंग सर्वांनाच जाणवणारा होता. त्यांचे ज्ञान केवळ पुस्तकी नव्हते, तर ते अनुभवसिद्ध आणि अद्ययावत होते. वर्गामध्ये विद्यार्थ्यांची होणारी अफाट गर्दी ही त्यांच्या अध्यापनशैलीची आणि विषयावरील प्रभुत्वाची खरी साक्ष ठरली. विद्यार्थीप्रिय असणारे गायकवाड सर अध्ययन-अध्यापन कौशल्यामध्ये निपुण आहेत. त्यांचे शिक्षण केवळ वर्गापुरते मर्यादित नव्हते. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचा पालकांशी असणारा संवाद हा शिक्षक-विद्यार्थी-पालक या त्रिमूर्तीला एका मजबूत बंधात जोडणारा ठरला. विद्यार्थ्यांशी त्यांचे असणारे नाते केवळ शिक्षक-विद्यार्थी असे औपचारिक नव्हते, तर ते शिस्तप्रियता आणि मूल्यांची पेरणी करणारे होते. त्यांच्या विषयाची खोली आणि सतत अद्ययावत राहण्याची त्यांची वृत्ती सर्व सहकाऱ्यांना नेहमीच भावणारी ठरली. वर्गात शिकवल्यानंतरही ते विद्यार्थ्यांना स्वतंत्र वेळ देत असत आणि विद्यार्थ्यांच्या घोळक्यात रमून जाताना दिसत. विद्यार्थ्यांना भेटण्याची दिलेली वेळ त्यांनी कधीही टाळली नाही. विद्यार्थ्यांसाठी ते आदर्श शिक्षक ठरले, याचा सहकारी म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो.
*मैत्रीचे अलौकिक विश्व आणि मानवी संबंधांचे मोल*:
प्रा.गायकवाड सरांनी मैत्रीचा भाव केवळ मित्रांपुरताच मर्यादित ठेवला नाही, तर आलेल्या पाहुण्यांनाही त्यांनी मित्र बनवले. हे त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाचे आणि सहज स्नेहाळू स्वभावाचे प्रतीक आहे. वैयक्तिक जीवनात मिळालेले यश हे केवळ एकट्याचे नसते; तर त्यात कुटुंबातील सदस्यांबरोबरच आपल्या मित्र-मैत्रिणींचा सुद्धा खारीचा वाटा असतो, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. मैत्रीची भावना निभावताना काही वैचारिक मतभेद झाले तरी, त्या मैत्रीला पूर्णविराम न देता समजूतदारपणाचे वळण देऊन पुढे नेणारे गायकवाड सर मित्रांमध्ये कुतूहलाचा विषय ठरले. मैत्रीच्या दुनियेत त्यांनी प्रामाणिकपणा, विश्वास आणि संवादाला नेहमीच महत्त्व दिले. मैत्री जपताना एकमेकांचे विचार, एकमेकांच्या मतांचा आदर करणे व्यवहार्य असते. मित्रांमध्ये सहकार्याची भावना असेल तर ती मैत्री अविरत टिकते, असा त्यांचा अनुभव होता. 'आपण कुणाच्यातरी कामी यावे' यातला आनंद मैत्रीमध्ये वाढ करणारा ठरत असतो, असे ते मानत. सुखदुःखात मित्रांचा सोबती होण्यातला आनंद काही वेगळाच असतो, हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले. अडल्या नडलेल्या मित्रांसाठी धावून येणारे गायकवाड सर सर्व क्षेत्रात आपल्या मैत्रीचा वावर ठेवणारे ठरले. मित्रांवर जिवापाड प्रेम करणारे गायकवाड सर मैत्रीच्या जगात खऱ्या अर्थाने श्रीमंत माणूस ठरले आहेत.
*एक आदर्श प्राध्यापक*:-
एक आदर्श प्राध्यापक म्हणून काम करतानाच त्यांनी शैक्षणिक संस्थाही उभी केली. संस्थाचालक झाल्यानंतरही त्यांनी अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. परंतु त्यांचा वावर संस्थाचालक म्हणून कमी आणि आपल्या मूळ नोकरी व्यवसायात शिक्षक म्हणूनच अधिक राहिला, हे विशेष. त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती असती तर 'मी संस्थाचालक आहे, आता नोकरी करणे कमीपणाचे वाटते' असे म्हणून नोकरी कदाचित सोडूनही दिली असती. परंतु आपल्या नोकरीतील कामाला पहिले प्राधान्य देणारे गायकवाड सर एक आदर्श ठरले यात नवल ते काय! स्वतःच्या संस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांना प्रतिवर्षी स्वखर्चातून देवदर्शनाची वारी घडवून अध्यात्मिक वारसा जपणारे संस्थाचालक आज घडीला क्वचितच बघायला मिळतात. जगण्यासाठी जशी आपल्याला विज्ञानाची गरज आहे, तसंच जगणं आनंदी आणि यशस्वी करण्यासाठी त्याला अध्यात्माचीही जोड त्यांना महत्त्वाची वाटते, हा त्यांचा प्रगल्भ विचार त्यांच्या कृतीतही दिसून येतो.
*उपप्राचार्य पदाची यशस्वी धुरा आणि प्रेरणादायी नेतृत्व*:-
उपप्राचार्य म्हणून त्यांनी प्रशासकीय जबाबदारी अत्यंत उत्तमपणे सांभाळली. कामातले उत्तम नियोजन, कामाला पहिले प्राधान्य, चांगले काम करणाऱ्यांचं कौतुक करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. कोणी काम करताना चुकला तर त्याला समजून घेणे, त्याच्या चुकीची वाच्यता न करता सुधारणेवर भर देणे त्यांना नेहमी महत्त्वाचे वाटले. माणूस सुधारणे हा त्यांचा मूळ हेतू होता. कधीही कुणाची बदनामी न करणारे गायकवाड सर उपप्राचार्य म्हणून देवगिरी महाविद्यालयामध्ये ऊर्जा स्त्रोत ठरले. काम करणाऱ्या माणसाला उभारी देण्याची त्यांची भावना असल्यामुळे त्यांचा सहवास त्यांच्या सहकाऱ्यांना हवाहवासा वाटला. प्रशासकीय जबाबदारी स्वीकारत असताना कोणाच्याही अडचणी ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. कोणी कोणाबद्दल चुकीचे विधान केले तर त्याची शहानिशा ते आवर्जून करायचे आणि अचूक निर्णय द्यायचे. माणसाला अडचणीतून सोडवण्याची त्यांची मूळ भावना असल्यामुळे त्यांच्यासारखे प्रशासक त्यांच्या सहकाऱ्यांना हवेहवेसेच वाटले.
*संस्थेचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद*:
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस माननीय आ. सतीश भाऊ चव्हाण साहेब यांनी त्यांच्यावर उपप्राचार्य पदाची जबाबदारी टाकली, आणि त्यांनी आपल्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवला. याचे आदर्शवत उदाहरण म्हणजे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद होय.
आज, जेव्हा प्रा. नंदकिशोर गायकवाड सर सेवानिवृत्त होत आहेत, तेव्हा त्यांचे हे कार्यकर्तृत्व, त्यांची निष्ठा आणि त्यांचे मानवी मूल्ये जपण्याचे कार्य निश्चितच अनेकांना प्रेरणा देत राहील. त्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य निरोगी व सुखा समाधानाचे जावो, हीच सदिच्छा!
@ डॉ. बळीराम पांडे
अर्थशास्त्र विभाग,देवगिरी महाविद्यालय,छत्रपती संभाजीनगर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा