सचोटी,निष्ठा व सरळमार्गी व्यवसायाचे तत्व जपणारे व संस्कारात करणारे व्यक्तिमत्व हरवले!
उदगीरकर परिवाराचा खऱ्या अर्थाने आधारवड कोसळला!
अण्णा म्हणून ज्यांना उदगीरकर परिवार संबंधतो ते श्री शंकर वैजनाथअप्पा उदगीरकर हे माझे मोठे मामा. त्यांना स्वतःला धरून पाच भाऊ आणि चार बहिणी. ते शालेय वयात असताना घरची परिस्थिती जेमतेम होती. जेव्हा वडिलोपार्जित व्यवसायात म्हणजे खाद्य तेल व पेंडीचे उत्पादनात लक्ष घातले तेव्हा त्यांच्या बुद्धीची चुणूक दिसून आली. त्यांनी आपल्या कौशल्याच्या आधारे अगदी काही वर्षांतच भरारी घेतली आणि परळी शहरात या व्यवसायातील सर्वात मोठे व्यापारी म्हणून नाव कमावले.
निश्चितच त्यांच्या सर्व बंधूंनी या यशात त्यांच्या मेहनतीचे योगदान दिले; परंतु सर्वांनीच अण्णा जे सांगतील तसेच केले आणि अण्णांनी घालून दिलेल्या तत्त्वांनी, मार्गाने जाणे पसंद केले. त्यांच्यासह चार भावांच्या मुला-मुलीची लग्न होईपर्यंत हा परिवार एकत्र नांदत होता आणि ती संख्या जवळपास पन्नास सदस्यांची होती! आज चारपेक्षा अधिक सदस्य एकत्र राहू शकत नाहीत; त्याकाळी अण्णांनी ते कसे शक्य करून दाखवले याचे नवल वाटते!
मी जेव्हा सातवी आठवीत शिकत होतो तेव्हा दिवाळी साजरी करण्यासाठी आईसोबत मामाच्या घरी जायचो. त्यावेळी उदगीरकर परिवाराचे सदस्य आणि पाहुणे मिळून शंभरपेक्षा अधिक लोक उपस्थित असायचे! आम्हा भाच्यांची धमाल उडायची, खेळायला, जेवायला, आंघोळीला अक्षरशः रांगच असायची! दरवर्षी दिवाळीला त्या मोठ्या इमारतीला संपूर्ण रंग दिला जायचा, आकर्षक विद्युत रोषणाई असायची आणि फराळ, माणसांची रेलचेल यामुळे अगदी गोकुळात असल्याचा आनंद वाटायचा.... तो सगळा खर्च किती होता हे आज मोठेपणी जेव्हा मी स्वतः संसारात पडलो तेव्हा कळायला लागला आणि आमचे सगळे मामा तो कसा आनंदात करायचे याचे आश्चर्य आज वाटते आहे.
अण्णांनी स्वतः व्यवसाय हाती घेतला तेव्हा दुकानाची जागा स्वतःची नव्हती, घर नव्हते. आज उदगीरकर परिवार परळीतील मुख्य असणाऱ्या मोंढ्यात स्वतःची मोठी जागा बाळगून असून चार फर्म तेल व पेंडीचे व्यापारी म्हणून तर प्रिंटिंग प्रेसची एक फर्म सुरू आहे. गाढे पिंपळगाव येथे शेती आहे. मी साधारणतः अठरा - वीस वर्षांचा असताना सेल टॅक्स अधिकारी पथक मामांचा व्यवसाय तपासण्यासाठी आले होते, हे यासाठी सांगतोय की तुम्हाला त्यांचा व्यापार किती मोठा झाला होता याचा अंदाज येऊ शकतो!
आपल्या भावांना व मुलांना व्यवसायात खंबीर ठेवण्याचे धडे अण्णांनी घालून दिले. त्यांनी व्यवसाय निष्ठेने आणि तत्वांनी करावा यासाठी अण्णांची करडी नजर असायची. त्यांचा एकप्रकारचा हा दरारा सर्वांना सरळमार्गी व्यवसाय करण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारा तर ठरलाच; शिवाय या परिवारातील एकही सदस्य वाममार्गाने गेला नाही याचे बहुतांशी श्रेय अण्णांना द्यावे लागेल.
"अण्णा आले!" असा आवाज कोणीतरी दिला की धिंगाणा घालणारे सगळे बालगोपाळ क्षणात गप्प तर व्हायचेच पण मोठी माणसेही शांतपणे, शिस्तीत आपापली कामे करायची, अण्णांचा हा धाक त्यांच्याविषयी असलेला आदरभाव व्यक्त करणारा असायचा.
९४ वर्षे वय असताना अण्णा सर्वांना सोडून गेले. फक्त व्यापारच नाही तर व्यक्तिगत आयुष्यात 'जगावे कसे' याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. भरपूर पायी चालणे, मोजके आणि वेळेवर खाणे, कमी आणि अर्थपूर्ण बोलणे, नातेगोतेच नाहीत तर परिचयाच्या सर्व व्यक्तींची आपुलकीने चौकशी करणे, कारखान्यात कार्यरत असणाऱ्या सर्व कामगारांना मायेने बोलणे यासह अनेक आदर्श अण्णांकडून आम्ही घेतले आहेत.
अगदी दोन दिवस अगोदर सुद्धा त्यांना त्यांच्या बालपणापासून सर्व काही लख्ख आठवायचे! मी शिक्षक आहे हे त्यांना माहिती होते म्हणून त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी ते सांगायचे आजच्या शिक्षणाची आणि त्या काळात असणाऱ्या शिक्षण व्यवस्थेची तुलना करायचे!
मी त्यांच्याशी जेव्हा जेव्हा संवाद साधायचो तेव्हा त्यांच्या बालपणीच्या, तारुण्याच्या गोष्टी मुद्दामून विचारायचो. व्यापारात वृद्धी करत असताना कशा अडचणी यायच्या, त्यावर कशी मात केली हे अण्णांना सविस्तर आठवायचे.
परळी शहरातील अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असायचा. त्यांनी सचिव म्हणून श्री शनी मंदिर, परळी, विश्वस्त श्री गुरुलिंग स्वामी संस्थान बेलवाडी, परळी, तात्कालीन संस्थापक अध्यक्ष श्री कोलूघाणा तेली सहकारी संघ, परळी, माजी संचालक जवाहर एज्युकेशन सोसायटी, परळी, नवगण महाविद्यालयात स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अशा विविध धार्मिक व शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी म्हणून काम केले. परळी शहरात होणारे वीरशैव समाजातील अनेक कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण व्हायचे. विविध पीठातील महाराजांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असायचे. कार्यक्रमांच्या निमित्ताने महाराजांचे परळीत येणे झाल्यानंतर उदगीरकर परिवाराच्या घरी त्यांची आवर्जून भेट असायची. अहमदपूर येथील राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे अगदी घरोब्याचे संबंध असायचे. महाराज परळी भागात आले की मुक्कामी येथेच असायचे.
राजकारण्यांशी मात्र अण्णांनी कामापुरते मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते. आजही उदगीरकर परिवारातील कोणताही सदस्य सक्रिय राजकारणात सहभागी नाही. अण्णांनी दाखवलेल्या मार्गावरच परिवारातील सदस्य आजही मार्गक्रमण करत असल्याचे यावरून दिसून येते.
अण्णा हे सर्वार्थाने आदर्श होते फक्त उदगीरकर परिवार आणि नातलगच नव्हे तर परळी पंचक्रोशीतील व्यापारी आणि महाराष्ट्रातील तमाम वीरशैव समाज बांधव त्यांना त्यांच्या कार्यामुळे ओळखून होते. अण्णांशी बोलले म्हणजे प्रत्येकाला एक वेगळी ऊर्जा मिळायची... ही ऊर्जा अण्णांचे बोलणे ऐकणाऱ्या त्या व्यक्तीतील नकारात्मकता संपवायची... म्हणूनच मी सुरुवातीला म्हटले आहे की खऱ्या अर्थाने उदगीरकर परिवाराचा आधारवड अण्णांच्या जाण्याने कोसळला आहे...
✍️चंद्रशेखर फुटके (भाच्चा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा