वैद्यनाथ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक दिलीप खिरे सर यांचे निधन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ महाविद्यालयात अनेक वर्ष सेवा बजावलेले व परळी शहरात सर्व परिचित असलेले व्यक्तिमत्व सेवानिवृत्त प्राध्यापक दिलीप खिरे सर यांचे काल दिनांक सहा रोजी रात्री पुणे येथे निधन झाले आहे.
प्राध्यापक दिलीप खिरे सर हे वैद्यनाथ महाविद्यालयात अनेक वर्ष कार्यरत होते. भूगोल विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी या महाविद्यालयात आपली सेवा बजावली. अतिशय अभ्यासु, सुसंस्कृत, मितभाषी व समाजसेवेची आयुष्यभर नाळ जोडून काम करणारे ते व्यक्तिमत्त्व होते. वैद्यनाथ महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय व शिक्षणाबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असणारे प्राध्यापक म्हणून दिलीप खिरे यांची परळीला ओळख होती. परळीच्या सामाजिक उपक्रमांमध्ये तसेच विद्यार्थी केंद्रित अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये ते हिरीरीने सहभागी असायचे. परळी शहरातील त्यांची कारकीर्द ही शैक्षणिक, सामाजिक दृष्टीने अतिशय उल्लेखनीय राहिलेली आहे. त्यामुळे ते परळी शहरात सर्व परिचित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे अतिशय सक्रियपणे काम केले. सेवानिवृत्तीनंतर ते पुणे येथे स्थायिक झाले होते. वयोमानापरत्वे काल दिनांक सहा रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दिनांक 7 रोजी सकाळी पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परळीतून सर्व स्तरात शोक संवेदना व्यक्त होत आहे. तसेच त्यांच्या आठवणींना अनेक जणांनी उजाळाही दिला आहे.
● आठवणीतील खिरे सर....
समाज सेवा, शिक्षण आणि आपुलकी यांची सर्वोत्तम सांगड घालणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरवले
मला आठवतो तो काळ, सन 1985 ते 2000. परळी मध्ये माणिक नगर, विद्यानगर अशा त्यावेळी लहान असलेल्या वसाहतींमध्ये बाळ गोपाळाना एकत्र करून खेळ भावना रुजविण्याचे काम त्या काळचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रा.दिलीप शंकरराव खिरे सर यांनी सुरू केले. या बाळ गोपाळ यांना कल्पनाही नव्हती की आमच्या वडिलांच्या वयाची व्यक्ति आम्हा लहान लहान मुलांसोबत का खेळत असेल? आणि तेही दैनंदिन म्हणजे रोजच. खेळाबरोबरच त्यांनी या मुलांना महापुरुषांच्या कथा सांगण्यास सुरुवात केली त्यांच्या पालकांना विश्वासात घेवून त्यांना सुसंस्कारी करण्याचे कार्य सुरू केले .पाच सहा महिन्यांचा काळ लोटल्यानंतर आपण याठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू करीत आहोत असे त्यांनी सांगितले येथून पुढे परळी नगरी मध्ये खरा प्रवास व खरे पर्व सुरू झाले ते रा. स्व. संघाचे.
साधारण पंचवीस ते तीस वर्षापुर्वी परळी चा विस्तार आज जेवढा विशाल दिसतो तेवढा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राणी लक्ष्मीबाई टावर येवढ्या भागात व लहान लहान वस्त्यांमध्ये परळी गजबजलेली दिसायची. माणिक नगर ,विद्या नगर , जुना गाव भाग आदी ठिकाणी शाखा वाढण्यास सुरुवात झाली. त्याकाळी जुने थर्मल सुरू असल्याने थर्मल कॉलनी ही कर्मचारी, नागरिकांनी बहरलेली असायची. शहरा बरोबरच थर्मल कॉलनी मध्ये संघाचे काम जोमाने वाढविण्यात खिरे सरांनी मोलाचा सहभाग घेतला. घरोघरी जाऊन प्रचार व प्रसार सुरु केला. शनिवार, रविवारी निवासी शिबिरे, मंडल स्थानी वर्ग, तालुकास्तरीय अभ्यासवर्ग व शिबिरे आदीं मध्ये लहान, तरुण मुलांचा सहभाग वाढू लागला. मुले स्व स्फुरतीने शाखा व शिबिरात सहभाग घेवू लागली प्रांत स्तरीय,विभाग स्तरीय संघाचे अधिकारी खिरे सरां समवेत शाखा शिबिरांना भेटी देत असत . या शिबिरा साठी लागणारे अन्न धान्य, शिदोरी घरोघरी जावून जमा केली जायची.शिबिरा मधून खरे कार्यकर्ते तयार होण्यास सुरुवात झाली.
परळीला संघाची खरी ओळख आदरणीय खिरे सर यांनी करून दिली. विविध जबाबदारी स्वीकारत त्यांनी अव्याहत पणे संघ कार्य वाढविण्याचे स्तुत्य उपक्रम सुरू ठेवले. 1985 साली ते परळी शहराचे तालुका संघ चालक झाले. केवळ शाखे वरच नव्हे तर सरांच्या घरी ही स्वयंसेवक जात असत या सर्वांची सर आस्थेने चौकशी व विचारपूस करीत असत
विजया दशमी दिनी आद्य सर संघ चालक डाॅ. हेडगेवार यांना प्रणाम करण्याची परंपरा असते. आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी खिरे सरांच्या घरी यासाठी जमत असत. येथील वैद्यनाथ महाविद्यालयात महाविद्यालय स्थापनेपासून ते भूगोलाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. स्वेच्छानिवृत्ती नंतर काही वर्षांनी ते पुणे येथे स्थायिक झाले
एकंदरीतच परळीला रा. स्व. संघाची खरी ओळख करून देणारे व सर्वांशी आपुलकीने वागणारे खिरे सर आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना
- सुधीर गोस्वामी,परळी वैजनाथ
-------------------------------------------
देह धरिता देवाला ही मृत्यू काही चुकला नाही !! म्हणोनिया ऐशा देही करा उज्वल ऐसे काही !!
या भुतला वर प्रभु श्री. रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण यांनी मानव रुपा मधे जन्म घेतला ते देव असले तरीही माणव रुप असल्याने त्यांना मृत्यू चुकला नाही पण त्यांचे कार्य भारत मातेच्या मानवी जिवना साठी युगे नी युगे जगण्याची एक गंगा धारा बनली. !!
अशीच एक विभुती परळी वैजनाथ च्या नगरी मधे साधारणपणे १९८३ च्या दशकात मला सहवास लाभलेले आमच्या सदैव स्मरणा मधे असलेले श्री. दिलीपजी खिरे सर , संघ स्वयंसेवक ते वैद्यनाथ महाविद्यालयातील माजी प्राचार्य व भुगोल विभागाचे प्रमुख असा प्रदिर्घ अनुभव असलेल्या देव मानसा चा सहवास लाभला.
श्री. खिरे सर म्हणजे सर्व जाती धर्मातील संघस्वयंसेवकांना प्रेरणा देणारे व राष्ट्र कार्या साठी युवकांना प्रेरित करणारं व्यक्तीमत्व बिड जिल्ह्या च्या रांगड्या भाषेत ही स्वतःची मितभाषा त्यांनी रुजवली फुलवली म्हणून सरां च्या सहवासातील प्रत्येक जण हा त्यांच्या च होऊन जायचा.
अशा या गोड स्वभावाच्या व्यक्तीमत्वाने स्वतःला अत्यंत साधेपणाने लहान ठेऊन समाज कार्यासाठी व शिक्षण कार्या साठी मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांची अजुन एक गोष्ट मला आठवते प्रत्यक्ष त्यांनी स्वतः सांगितलेली गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःचे विद्यानगर मधील घर बांधल्या नंतर नौकरी तुन मिळणारे वेतन स्वरुपात मिळणाऱ्या भत्या पैकी वेतानातील घरभाडे भत्ता हा स्वतःहुन प्राचार्य स्वं. मोहन जावळे सरांना अर्ज करुन घेण्यास नकार कळवला होता.
अशा या देव माणसा च्या सहवासाला आपण कायमचे मुकलोय ही खंत राहणार पण त्यांनी परळी मधे रुजवलेला संघ व कार्य कायम स्मरणा मध्ये राहील.
🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
✍🏻 सुहास कण्व
मी पण सरांचाच विद्यार्थी आहे सरांच्याच हाताखाली वैद्यनाथ महाविद्यालयात शिकलो. खिरे सर म्हणजे एक अद्भुत व अलौकिक असे व्यक्तिमत्व. आज खिरे सरांनी या जगाचा अखेरचा निरोप आज घेतला देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच देवाला प्रार्थना.
उत्तर द्याहटवावैद्यनाथ महाविदलयात 1975 ते 1978शिकत असताना आदरणीय खिरे सरसोबत राहून भूगोल हा विषय पदवी साठी घेंतल्यामुळे चार वर्षे सहवासात राहण्याचे भाग्य लाभले पदवी नंतरचे जीवन कसे जगावे या बाबत मार्गदर्शन लाभले.
उत्तर द्याहटवाखिरेसरांना भावपूर्ण श्रद्धांजली
शिवाजी चिपडे
माजी विधार्थी वैधनाथ महाविदलंय परळी वैजनाथ.