मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास टाळाटाळ कशासाठी? कालमर्यादा ठरवून सोक्षमोक्ष लावा -अमित घाडगे
परळी l प्रतिनिधी
मराठा आरक्षण तथा शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर परळीत 8 ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चा व सकळ मराठा समाजाच्या वतीने रोखठोक आंदोलन करण्यात आले होते. सरकार राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यास तयार झाल्यामुळे या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र या गोष्टीची कालमर्यादा ठरवून सरकारने सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अमित घाडगे यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला होता. परळीत सुरु करण्यात आलेले आंदोलन काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे. मराठा आंदोलनाचा निर्णय कोर्टात लवकर व्हावा यासाठी राज्य सरकारने सक्षम पाऊले उचलावीत व तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा परळीचे आंदोलन पुन्हा सुरू करू असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा समाजासाठी आरक्षण हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अत्यावश्यक मुद्दा आहे. नोकरी आणि शिक्षणात आरक्षण नसल्यामुळे हजारो मुलांचे नुकसान होत आहे. आरक्षण मिळाले होते परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळेच मराठा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नेमका निर्णय घेणे तात्काळ अवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने ताकदीनं कोर्टात बाजू मांडावी अशी मागणी अमित घाडगे यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा