MB NEWS:अंबाजोगाईत बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्नांतील तरुण जेरबंद; साथीदार फरार* *धक्कादायक : शहरात बनावट नोटांचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय*

 *अंबाजोगाईत बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्नांतील तरुण जेरबंद; साथीदार फरार*

 


*धक्कादायक : शहरात बनावट नोटांचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय*

 

अंबाजोगाई : शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या परिसरात दोन तरुण कारमध्ये बसून बनावट नोटा शहरात वटविण्याच्या उद्देशाने खरेदी करत असल्याची गुप्त माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून बनावट नोटा आणि कारसह एका तरुणास ताब्यात घेतले. यावेळी त्याचा साथीदार पलायन करण्यात यशस्वी झाला. ही कारवाई सोमवारी (दि.१६) रात्री करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून बनावट नोटांच्या कथित रॅकेटची पाळेमुळे कुठवर पसरलेली आहेत याचा पोलीस कसून तपास करत आहेत. 

 

स्वाराती रुग्णालय परिसरात संजय सखाराम चौधरी (वय २९) आणि संजय बाळासाहेब पांचाळ (दोघेही रा. चनई, ता. अंबाजोगाई) हे दोघे तरुण बनावट नोटा बाळगून असल्याची गुप्त माहिती अंबाजोगाई शहरचे प्रभारी ठाणेप्रमुख संदीप दहिफळे यांना सोमवारी रात्री ९ वा. मिळाली. सध्या हे तरुण स्विफ्ट कारमध्ये (एमएच ४४ जी १९९३) बसलेले असून त्यांच्यात सदरील नोटा शहरात वटविण्यासाठी व्यवहार होत असल्याचेही गुप्त माहितीदाराने पोलिसांना सांगितले होते. माहितीची खातरजमा झाल्यानंतर एपीआय संदीप दहिफळे, पीएसआय गोपाळ सूर्यवंशी, एएसआय घोडके, पोलीस कर्मचारी कुंडगीर, घोळवे, पठाण यांनी स्वाराती परिसरात फिरून पाहणी केली असता रात्री १० वाजता जनरल अरुणकुमार वैद्य चौकात त्यांना सदरील कार दिसून आली. पोलीस जवळ येत असल्याचे पाहताच संजय पांचाळ याने पलायन केले तर संजय चौधरी हा अलगद पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी त्याच्या जवळून ५ हजार २५० रुपयांच्या बनावट नोटा, दोन मोबाईल आणि कार असा एकूण २ लाख १५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एपीआय दहिफळे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही तरुणांवर कलम ४८९-ब, ४८९- क, ३४ अन्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पीएसआय गोपाळ सूर्यवंशी करत आहेत. आतापर्यंत शहरात काही बनावट नोटा वितरीत झाल्या आहेत का आणि यामागे एखादे रॅकेट कार्यरत आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक स्वाती भोर आणि उपअधीक्षक सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 

*नाशिकच्या छापखान्यात होणार तपासणी :*

पोलिसांनी संजय चौधरी याच्याकडून दोनशे रुपयांच्या २३ आणि पन्नास रुपयांच्या १३ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा हुबेहूब खऱ्या नोटासारख्या दिसतात. फक्त त्याचा कागद जाड असून त्यावर वाटरमार्क आणि चमकती तार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या नोटा नाशिकच्या सरकारी नोटा छापण्याच्या कारखान्यात तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्यांच्या अहवालानंतर पोलीस कार्यवाहीला बळ येणार आहे.  

 

*तीन दिवसांची पोलीस कोठडी :*

दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी दुपारी संजय चौधरी यास न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाच्या आदेशानंतर तीन दिवसांसाठी त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. 

 

*फरार आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना :*

पोलिसांना पाहताच पलायन करण्यात यशस्वी झालेल्या संजय पांचाळ याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. संजय पांचाळ हा स्थानिक पातळीवरील मुख्य सूत्रधार असून त्याच्याकडून संजय चौधरी बनावट नोटा खरेदी करत होता अशी माहिती आतापर्यंतच्या तपासातून पुढे आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पांचाळच्या अटकेनंतरच या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !