MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आयसोलेशन सेंटर कोरोना रूग्णांसाठी ठरतेयं संजीवनी !*

 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आयसोलेशन सेंटर कोरोना रूग्णांसाठी ठरतेयं संजीवनी !*



*योगा, प्राणायाम, तज्ज्ञ डाॅक्टर्सची तपासणी, पौष्टिक आहारामुळे पांच रूग्ण ठणठणीत होऊन घरी परतले* 


परळी । दिनांक ०८ । 

नित्यनेमाने होणारे योगा, प्राणायामाचे धडे, तज्ज्ञ डाॅक्टर्सच्या टिमची मेहनत, आयुर्वेदिक काढयासह पौष्टिक आहार आणि पोषक वातावरण या सर्वांमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरमधील कोरोना बाधित रूग्णांमध्ये दिवसेंदिवस सकारात्मक उर्जा निर्माण होत असून हे सेंटर कोरोना रूग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. याचाच परिणाम म्हणून सेंटर मधील पाच रूग्ण ठणठणीत बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. 



   कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकारातून अक्षता मंगल कार्यालयात लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ३ मे पासून मोफत आयसोलेशन (विलगीकरण) सेंटर सुरू करण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे हया स्वतः बाधित असताना देखील दररोज सेंटरचा आढावा घेऊन रूग्णांची काळजी घेण्याच्या सूचना भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देत आहेत. अतिशय शिस्तबद्ध रितीने कार्यकर्त्यांची टीम याठिकाणी रूग्णांची संपूर्ण काळजी घेत आहे. याशिवाय डाॅ. हरिश्चंद्र वंगे, डाॅ. शालिनी कराड, डाॅ. एल.डी. लोहिया, डाॅ. विवेक दंडे, डाॅ. संदीप घुगे, डाॅ. दुष्यंत देशमुख, डाॅ. दिपक पाठक, डाॅ. वाल्मिक मुंडे, डाॅ. आनंद मुंडे असे तज्ज्ञ डाॅक्टर्स सुध्दा रूग्णांना कोरोना मुक्त करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.



*स्वतः सहभागी होऊन पंकजाताईंनी वाढवले रूग्णांचे मनोबल* 

----------------------------

आयसोलेशन सेंटरमध्ये सध्या महिला व पुरूषांसह ५३ रूग्ण उपचार घेत आहेत. रूग्णांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्यात सकारात्मक उर्जा निर्माण व्हावी यासाठी भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ॲड. अरूण पाठक हे त्यांना दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत योगा, प्राणायामाचे धडे देतात, त्याचबरोबर ओम् कारचा स्वर देखील येथे घुमतो. या सर्वामुळे वातावरण एकदम भारावून जाते व सकारात्मक उर्जा निर्माण होते. शुक्रवारी पंकजाताई मुंडे हया स्वतः यात रूग्णांसोबत ऑनलाईन सहभागी झाल्या. योगा, प्राणायामामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते, सकारात्मक उर्जा निर्माण होते त्यामुळे हे आवश्यक आहे असे सांगत त्यांनी यावेळी रूग्णांचे मनोबल वाढवले.



*असा आहे दैनंदिन क्रम* 

----------------------------

सेंटरमध्ये रूग्णांना सकाळी ८.३० वा. आयुर्वेदिक काढा, नाश्ता, दुपारी १२ वा. व रात्री ८ वा. पौष्टिक भोजन, नाश्ता व जेवणात दररोज वेगवेगळ्या भाज्या, उसळी, मोड आलेले धान्य, फळांचा ज्यूस हे दिले जाते. दिवसभरात डाॅक्टर्स चार वेळेस येऊन रूग्णांची तपासणी करून औषध देतात शिवाय आरोग्य कर्मचारी देखील चोवीस तास याठिकाणी हजर असतात. भाजपचे सर्व कार्यकर्ते रूग्णांची काळजी घेण्याबरोबरच बाधित रूग्णांच्या कुटुंबांना दररोज घरपोंच मोफत जेवण पुरविण्याचे देखील काम करत आहेत. एकूणच हे सेंटर रूग्णांसाठी संजीवनी ठरत आहे.



••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार