MB NEWS- *मला विषाची नाही, अमृताची वेल लावायचीय ; परळीची मान खाली जाईल असं काम माझ्या हातून होणार नाही* *कोणावर टिका करून नव्हे तर सकारात्मक कामं करून शहराचं नाव उंचावणार* *दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात पंकजाताई मुंडेंनी जिंकली मनं*

 *मला विषाची नाही, अमृताची वेल लावायचीय ; परळीची मान खाली जाईल असं काम माझ्या हातून होणार नाही* 


*कोणावर टिका करून नव्हे तर सकारात्मक कामं करून शहराचं नाव उंचावणार*

*दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात पंकजाताई मुंडेंनी जिंकली मनं*


_मतदारसंघातील समस्त भावांकडून भाऊबीजे निमित्त झाले उत्स्फूर्त स्वागत_ 



परळी । दिनांक १४।

परळीतील जनतेचा मला नेहमी अभिमान वाटतो, त्यांच्यावर माझं खूप प्रेम आहे कारण गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखा लोकनेता त्यांनी देशाला दिलाय. मला कांहीही मिळवायची लालसा नाही, माझं ध्येय स्वच्छयं, माझा कारभार  स्वच्छयं आणि माझे कार्यकर्ते देखील स्वच्छ आहेत, त्यांना मला   ताकद द्यायचीयं. मला परळीत 

विषाची नाही तर अमृताची वेल लावायचीय.. परळीचं नांव खाली जाईल असं काम माझ्या हातून कदापिही होणार नाही अशा सकारात्मक संवादाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज जनतेची मनं जिंकली.

    हालगे गार्डन येथे आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मतदारसंघातील समस्त बंधूंनी पंकजाताई मुंडे यांना साडी-चोळी आणि भेटवस्तूच्या स्वरूपात भाऊबीज भेट देऊन  उत्स्फूर्त स्वागत केले. 


  पंकजाताई मुंडे यांनी यावेळी मतदारसंघातील जनतेशी अतिशय मनमोकळा संवाद साधला. त्या म्हणाल्या, पुर्वीच्या काळी राजाच्या मुलाला बदलण्याची मुभा जनतेला नव्हती.मात्र,आज लोकशाहीतून जन्मलेल्या राजाला दर पाच वर्षाला मतपेटीतून बदलण्याची जनतेकडे मोठी ताकद आहे. लोकशाहीमधील राजा हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे.आपले सैन्य शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून गेले तरी राजा हा आपल्या सैन्याला शिक्षा करणारा असला पाहिजे.राजा हा शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असणारा असला पाहिजे.राजा हा विरासत असणारा नाही तर जनतेचे अश्रू पुसणारा असतो.


यामुळेच तुम्ही मला दहा वर्ष मतदारसंघाचा आमदार केले.मी मुंडे साहेबांची कन्या म्हणून राज्य आणि देशभर मिरवले.मी कुठेही गेले तरी मला लोक विचारतात तुमचा मतदारसंघ कोणता आहे ? मी सांगते परळी वैजनाथ आहे.मुंडे साहेबाच्या राजकीय आयुष्याची सुरुवात परळी मतदारसंघातून झाली.विधीमंडळात बोलताना परळीचे नाव घेताना माझा उर भरून यायचा.आपल्यामुळे मतदारसंघाचे नाव खराब होऊ ही जबाबदारी माझ्या खांद्यावर असायची.आपल्यामुळे एखाद्याची मान उंच नाही झाली तर चालेल पण आल्यामुळे कोणाची मान खाली गेली नाही पाहिजे ही असं काम राजकारणात करायचं अशी शपथ मी घेतलेली आहे.आज मी कुठेही गेले तरी मी माझ्या सत्ताकाळात राबविलेल्या योजनेच्या नावाचा उल्लेख करून सांगतात. तुम्ही दिलेल्या संधीमुळे विकासाच्या अनेक योजना मी इथे  राबवू शकले. शासकीय योजनांसोबतच सामाजिक कामंही तेवढ्याच हिररिने केले. कोरोनातील सेवा यज्ञ असो की सामुदायिक विवाह सोहळा सर्वाधिक कार्यक्रम घेतले, त्यातून अनेकांचे आशीर्वाद मिळाले, हेच माझ्यासाठी मोठं आहे. 


*अजून लढाई संपलेली नाही*

-----------

राजाने संस्कार पाळले तरच जनता पाळेल. 'घार उडे आकाशी' याप्रमाणे माझं परळीवर लक्ष आहे. कुणी म्हणतात मला उचक्या लागतात. चांगल्या गोष्टींबद्दल ठिक आहे. पण आज शेतकऱ्यांना विमा नाही, अनुदान नाही, कोणती कामं होत नाहीत, टोल द्यावे लागतात, त्यामुळे जनतेला मी केलेल्या चांगल्या कामाची आठवण येते. मलाही  उचक्या लागतात. कांही जण म्हणतात खूप अवघडयं, आम्हाला नगरपरिषद निवडणूकीत उमेदवार मिळणार नाहीत, हो हे खरयं, कारण  दहशत आणि माफिया राजच तेवढा बोकाळलायं. रावणाला सुध्दा आपल्या शक्तीचा गर्व झाला होता पण श्रीरामाच्या वानर सेनेने त्याला पराभूत केलं. मला सुध्दा वानर सेना घेऊन लढता येतं. अजून लढाई संपलेली नाही, त्यांना घेऊनच ही लढाई लढायचीय..एकदा बघाच... नितिमत्ता गहाण ठेऊन मी कधी राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. मी असे उमेदवार देईल जे द्वारपाल बनून जनतेची कामं करतील.मतं खरेदी करून त्यांना देशोधडीला लावणार नाही असं पंकजाताई म्हणाल्या.


*मला टिका नाही कामं करायचीत*

----------

मला विरोधकांवर टिका करायची नाही, त्यासाठी त्या पातळीवर मला जायचं देखील नाही. मी सकारात्मक कामावर बोलणारयं. तुमच्यासाठी मला सतत लढायचयं. तुमच्या लेकीने मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी काम केलं, जलयुक्त शिवार, रस्ते, रेल्वे यावर काम केलयं. मी हरले नाही की खचले नाही, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, आपल्याला पुन्हा कामाला लागायचं आहे.ही लढाई संपलेली नाही. कांही लढाया हरू कांही जिंकू पण समाजाच्या हिताचं अमृत मिळवण्यासाठी हलाहल पचवावे लागेल त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे असे पंकजाताई म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचलन शिवाजीराव गुट्टे यांनी केले तर रवि कांदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

*क्षणचित्रं*

------

• पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या वतीने आयोजित या स्नेहमिलन व स्नेह-भोजन कार्यक्रमात मतदारसंघातील जनता, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती.


• पंकजाताईंचे आगमन होताच मंगलवाद्य व तुतारीच्या निनादाने कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.


• सर्व उपस्थित ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.


• प्रसिद्ध गायक  ज्ञानेश्वर मेश्राम व सुभाष शेप यांच्या सुश्राव्य 'अभंगवाणी' ने उपस्थितांची वाहवा मिळवली. पंकजाताईंनी कार्यकर्त्यांसमवेत व्यासपीठाच्या  खाली बसून अभंगवाणी ऐकली.


• परळी मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख, विविध संस्थांचे संचालक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उप सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, संचालक, शहरातील व्यापारी, डाॅक्टर्स, वकील, प्राध्यापक, पत्रकार यांनी 

हालगे गार्डन खचाखच भरले होते.


• माजी आमदार आर टी देशमुख, आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, फुलचंद कराड, बंकटराव कांदे, दत्ताप्पा इटके, राजेश देशमुख, सतीश मुंडे, अच्युत गंगणे, जुगलकिशोर लोहिया, विनोद सामत, रमेश कराड, माऊली फड, विकासराव डुबे, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, निळकंठ चाटे, उमाताई  समशेट्टे, शालिनी कराड, दत्ता कुलकर्णी, पवन मुंडे, प्रकाश जोशी,  आदींसह  व्यासपीठावर उपस्थित होते.


• भाऊबीज निमित्त मतदारसंघातील भावांकडून ओवाळणी म्हणून पंकजाताई मुंडे यांचे साडी चोळी व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. मुंडे साहेबांच्या पश्चात 'माहेरची साडी' मिळाल्याचा आनंद आपल्याला झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


• पंकजाताईंनी दसरा मेळाव्यात केलेल्या व्यसनमुक्तीच्या आवाहनानुसार मालेवाडी गाव सर्वात प्रथम व्यसनमुक्त झाले, त्याबद्दल सरपंच भूराज बदने व ग्रामस्थांचा पंकजाताईंनी यावेळी व्यासपीठावर बोलावून सत्कार केला. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !