MB NEWS-जेष्ठ साहित्यिक मा.श्री.प्रा.मधु जामकर यांचे ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन.....

जेष्ठ साहित्यिक मा.श्री.प्रा. मधु जामकर यांचे ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन.....



आपले मराठी साहित्य विश्वात मोठे योगदान राहिले आहे. आपल्या समृद्ध प्रतिभेने मराठी साहित्य समृद्ध केले असून ते सहजप्रतिभावान साहित्यिक  आहे.परळी वैजनाथ येथे झालेल्या 71 व्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनाचे  कार्यवाह  म्हणून आपण काम केलं.आपल्या सोबत काम करण्याचा अनुभव आमच्या गाठीशी आहे हे परमभाग्याच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले व साहित्यविश्वात भरीव योगदान असलेल्या आपल्या व्यक्तीमत्त्वाने परळीचा नावलौकिक केलेला आहे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.प्रतिभा दोन प्रकारची असते. उत्पात प्रतिभा आणि सहज प्रतिभा यातील उत्पात प्रतिभा  प्रयत्नपूर्वक निर्माण होते तर सहज प्रतिभा निसर्गदत्त असते. आपण सहज प्रतिभावान साहित्यिक आहात.चौफेर साहित्य संपदा असलेले आपण एक संवेदनशील साहित्यिक आहात. आपण आमच्या परळीचे वैभव आहात. प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्वाला जन्मदिनाच्या निमित्ताने लक्ष लक्ष शुभेच्छा.आपणांस दीर्घ आयुरारोग्य लाभो व आपल्या हातून मायमराठी साहित्य अधिकाधिक समृद्ध होवो हीच प्रभू वैद्यनाथाचे चरणी प्रार्थना.!

-------------------------------------------------

साहित्यसेवाव्रती : प्रा. मधु जामकर सरांचे अभीष्टचिंतन!                         

उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाचा व प्रख्यात विचारवंत (कै.) नरहर कुरुंदकर यांच्या स्मृतिनिमित्त (२०१४), तसेच पुणे साहित्य परिषदेकडून देण्यात येणारा, असे डझनाहून अधिक पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ समीक्षक, कविवर्य, आदरणीय प्रा. मधु जामकर सर (गुरुजी) हे आज, ५ एप्रिल रोजी ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. सरांचे अभीष्टचिंतन करताना त्यांना साहित्यसेवेसाठी आरोग्यदायी दीर्घायु लाभो, ही सर्व प्रथम मनोकामना!

परळीतील स्नेहनगर भागातील "दिलासा" हे सरांचे निवासस्थान. नरहर कुरुंदरकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, द. मा. मिरासदार, राजा मंगळवेढेकर अशा कितीतरी सारस्वतांची पायधूळ लागलेले आणि त्यांना परळी मुक्कामी प्रेम-आपुलकीचा "दिलासा" देणारी ही वास्तु. दिलासातून साहित्य प्रसवले. बहरले. या साहित्याचा गंध परळीच न0हे तर महाराष्ट्रभर दरवळला. क्षितिज, गार्गी, आपुलाचि वाद, नादरंग, दीपकळी, ग्रंथोपजीवे, रंग-अंग, मावळतीचे रंग, आदरांजली, ओंजळ अशी कितीतरी साहित्य संपदा याच दिलासात साकारली. 



दिलासा ही ग्रंथोपजीविये वास्तु. यातला चार हजारांपेक्षाही अधिकचा ग्रंथरुपी ठेवा ज्ञानसाऊली धरणारा होता. हा ज्ञानरूपी ठेवा अलिकडेच सरांनी विवेकानंद ग्रंथालयाकडे सुपूर्द केला. दिलासा हे एक आता साहित्यप्रेमींसाठी अस्वस्थ वर्तमान राहणार आहे. सर, येत्या काही दिवसात परळीतून सांस्कृतिक नगरी अर्थात पुण्यात स्थलांतरित होत आहेत. 

दिलासात प्रवेश करताच स्वच्छ अंगणच वास्तुची "कळा" सर्व सांगून जाते. गॅलरीतून आत प्रवेश करताच ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक नरहर कुरुंदकर यांचे दर्शनी भागात लावलेले छायाचित्र लक्ष वेधून घेते. या छायाचित्रामागचे मर्मही सर सांगतात. कुरुंदकरांचा अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम ठरलेले ते छायाचित्र. सरांची कुरूंदकरांवर निस्सीम श्रध्दा. कुरुंदकर जसे लिहिणाऱ्यांच्या पाठीवर कायम आशीर्वादरूपी हात ठेवून मनोत्साह वाढवायचे, तसेच सरही. हा माझा ताजा अनुभव. 

"तात्यायन" लिहिले पण त्यात किती साहित्य मूल्य असेल याचा अंदाज घेता येत नसल्यामुळे सरांपर्यंत पुस्तक पोहोचवावे का, नको, याविषयी माझी दोलायमान स्थिती होती. अखेर पुस्तक सरांपर्यंत पोहोचले. एका बैठकीतच वाचून हातावेगळे केले आणि दुसरे दिवशी पुन्हा एकदा वाचून तीन पानांचा अभिप्रायही लिहून दिला. लिहिणाऱ्यांच्या अंगी विश्वास निर्माण केला. प्रोत्साहन दिले. असा पाठबळाचा हात प्रत्येकाच्या पाठीवर राहण्यासाठी हवाहवासा आहे. सरांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना एक सन्मान त्यांच्या शिरपेचात खोवला जावा - जो कायम त्यांना हुलकावणी देत आलाय, तो मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा... !

 ही संधी सरांना मिळो, ही सदिच्छा, आजच्या अभीष्टचिंतनप्रसंगी.....!!

                                            - साभार ✍️ बिपिन देशपांडे


        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !