MB NEWS-विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचा विशेष लेख

 खमके नेतृत्व - अजितदादा

       ✍️विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचा विशेष लेख.✍️

--------------------------------------------------------

 राज्यात दुसऱ्यांदा अनपेक्षित सत्तांतर झाले, पूर्वी महाविकास आघाडीत असलेले अनेकजण नव्या सरकारात सामील झाले, या सर्व घडामोडीत अनेकांनी आपला मूळ उद्देश किंवा कारण बाजूला ठेवत 'निधी'चे कारण पुढे केले व मागील सरकारातल्या अर्थमंत्र्यांना टार्गेट केले. बरं सभागृहात जेव्हा माजी अर्थमंत्र्यांनी प्रत्येकाला दिलेल्या निधीची आकडेवारी जाहीर केली, त्यावर कुणी ब्र सुद्धा काढला नाही, उलट सकाळच्या 6 - 7 वाजल्यापासून दादांच्या काम करण्याच्या शैलीचे जाहीरपणे कौतुक करत जुन्या व नव्या विरोधकांनी त्यांचे जाहीर आभार भरल्या सभागृहात मांडले! होय नव्याने व प्रथमच विरोधीपक्ष नेते या भूमिकेत आलेल्या अजितदादा पवार यांच्या बद्दल आपण बोलत आहोत.


कोविडच्या अत्यंत कठीण काळातील पहिली स्टेज आठवली की आजही आठवते की बऱ्याच वेळा मंत्रालय सकाळी 6-7 वाजता उघडले जायचे आणि सरकारमधील एकच मंत्री सकाळी 7 ला बैठकांचा सिलसिला सुरू करत असे, ते मंत्री दुसरे कोणी नाही तर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते. त्या कठीण काळात पूर्वी ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेला सर्व शक्ती पणाला लावून दादांनी नवी उभारी देण्याचे काम अत्यंत आत्मविश्वासाने पार पाडले. 


कोणत्याही परिस्थितीत मास्क न काढणे, दोन बैठकांच्या मधील वेळ आलेल्या लोकांच्या भेटीला देऊन सर्व वेळेचा सदुपयोग करणे, दिलेली प्रत्येक वेळ पाळणे, या दादांच्या आदर्श सवयी, शिस्तप्रिय व वक्तशीरपणा उभ्या महाराष्ट्राने त्या काळात पाहिला. 


कधी न पाहिलेले संकट राज्य आणि देशावर आले होते, या काळात पुढे येऊन सेवा करणाऱ्या प्रत्येकाला संधी व सुविधा देण्याचं काम अजितदादा व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबानी केलं. कदाचित कोरोनाच्या कठीण काळाशी लढण्यासाठीच महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले असावे! 


हे महाराष्ट्राचे सरकार आहे, इथल्या 12 कोटी जनतेचा मी उपमुख्यमंत्री आहे, असा विचार मनाशी बाळगत दादांनी निधी देताना, कामे मंजूर करताना कधीच कुठल्याही आमदारांचे पक्ष बघितले नाहीत. उलट अन्य कोणी तसे करत असेल तर त्याला सूनवण्यातही दादा मागे पुढे पाहत नसत. सर्वांना लोकांनी निवडून दिलंय, त्यामुळे ते आमदार जे प्रश्न मांडतात, ते त्यांच्या मतदारसंघातील जनतेचे असतात, म्हणून त्या आमदारांचा पक्ष न बघता, ते प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, अशी प्रामाणिक भूमिका दादांनी नेहमीच निभावली आहे व हे आजही कोणी नाकारणार नाही!


माझ्या परळी मतदारसंघात व आमच्या बीड जिल्ह्यात दादांनी त्या काळात निधी देण्याची कोणीतही कसर बाकी ठेवली नाही, दादांची कणखर पाठराखण मला नेहमीच लाभलेली आहे, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या अस्तित्वाचे व कायमस्वरूपी निधीचे माझे स्वप्न दादांच्या निर्णयक्षमतेमुळेच साकार होऊ शकले, हे सांगताना आज अभिमान वाटतो. 


आमदार फंडाला देखील दादांनी या काळात अडीच पट बळ दिले, 2 कोटींवरून वाढवून आमदार फंड 5 कोटी केला. आमदारांचे स्वीय सहाय्यक ते वाहन चालक आदींचे मानधन वाढवले, स्व. ए आर अंतुले यांच्या नंतर आमदारांच्या हक्कांचा विचार करणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.अजितदादा म्हटलं की प्रशासनावरील मजबूत पकड आणि कामांचा धडाका हे समीकरण ठरलेलेच असते. घड्याळाच्या काट्यावर चालणारे दादा निवांत गप्पा मारत बसलेले क्वचितच कधी कुणी पाहिले असतील! 


दरम्यान मध्यंतरी आलेल्या एका लहरीचे राज्याच्या सत्तांतरामध्ये रूपांतर झाले, आता सरकार बदलताच स्वाभाविकरित्या भूमिकाही बदलणार. आम्ही विरोधकांच्या भूमिकेत आलो, आयुष्यात प्रथमच अजितदादा आता विरोधीपक्ष नेते म्हणून राज्याच्या कारभारात लक्ष घालणार आहेत. 


सध्या अस्तिवात आलेल्या रद्द आणि स्थगिती सरकारवर अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी दादांवर असणार आहे. दादांना रिकामी जाहिरातबाजी कधीच आवडत नाही आणि जे आहे ते होच म्हणणार, कुणाला कधी खोटे आश्वासन देऊन किंवा बघतो करतो म्हणून आशेला लावणार नाहीत... एखादी गोष्ट शक्य नसेल तर ती स्पष्टपणे तोंडावर सांगणार, एखादी गोष्ट हो म्हणल्यास, काहीजरी झाले तरी तो दिलेला शब्द पूर्ण करणारच, ही दादांची प्रतिमा सबंध महाराष्ट्राला श्रुत आहे.


एका गोष्टीचे समाधान आहे की, विरोधक म्हणून खमकी भूमिका घेण्याची जबाबदारी आदरणीय पवार साहेबानी अजितदादा पवार यांच्यावर दिली आहे. महाराष्ट्राच्या जनतेशी इमान राखत दादा या पदाला 100% न्याय देतील यात दुमत नाहीच, परंतु स्थगिती सरकारचा अंकुश देखील दादा त्यांच्यातील खमक्या वृत्तीने स्वतःकडे ठेवतील, यात तिळमात्र शंका नाही. अत्यंत लोकाभिमुख व पवार कुटुंबातील एक स्पष्टवक्ता चेहरा म्हणून दादा आगामी काळात महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी नव्या सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांना पाठिंबा देतीलच पण चुकीच्या निर्णयांवर सामान्य जनतेचा आवाज बुलंद करून सरकारला वठणीवर आणण्याचे काम देखील करतील, असा ठाम विश्वास आहे. 


खरेतर लिहिणे हा माझा पिंड नाही, पण मागील अनेक वर्षांच्या दादांच्या लाभलेल्या सान्निध्यात माझ्या आयुष्यात जे काही सकारात्मक बदल घडले, आम्ही सोबत जो काही संघर्ष पाहिला, अनुभवला त्याचे कागदावर वर्णन करायचे म्हटल्यास एक ग्रंथ लिहून होईल. दादांचेही आयुष्य अनेक चढ-उतार, अनेक संघर्ष, अनेक गोड व कटू आठवणींनी भरलेले आहे, परंतु त्या सर्व गोष्टींना बाजूला ठेऊन आपला प्रत्येक क्षण जनतेला देणाऱ्या आमच्या खमक्या नेतृत्वाला जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...


       ■
- धनंजय मुंडे



----------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !