MB NEWS-माझ्या बाबतीतील "नाराजी" दूर करा- पंकजा मुंडे

 माझ्या बाबतीतील "नाराजी"  दूर करा- पंकजा मुंडे

 परळी वैजनाथ,एमबी वृत्तसेवा...

      राज्यात कोणतीही घडामोड झाली, विधान परिषद असो राज्यसभा असो, कोणती निवडणूक असो की अलीकडील मंत्रिमंडळ विस्तार असो या सर्वच बाबतीत नेहमी "पंकजा मुंडे नाराज" अशा प्रकारे माझ्या बाबतीत "नाराजी" शब्द वापरला जातो मात्र ती नाराजी नसते तर ती समर्थकांची आपल्या नेत्याविषयीची अपेक्षा असते. प्रसार माध्यमांना माझी नम्र विनंती आहे की माझ्या बाबतीत वापरल्या जाणारी ही नाराजीची बिरुदावली तुम्ही दूर करा असे आवाहन भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळीत प्रसार माध्यमांशी बोलताना केले.


         "घरोघरी तिरंगा" अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी भाजपच्या वतीने आज शहरात  तिरंगा रॅली काढण्यात आली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन जनतेला केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून ही रॅली काढण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंकजा मुंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांचा निनाद आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत  रॅलीला सुरवात झाली. " भारतमाता की जय, वंदे मातरम, स्वतंत्र भारताचा विजय असो", वंदेमातरम् अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. कार्यकर्त्यांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत होता. उघड्या जीपमध्ये हातात तिरंगा ध्वज फडकावत पंकजा मुंडे रॅलीमध्ये सहभागी झाल्या. 


या रॅली नंतर झालेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी दमदार भाषण केले आपण कधीही संघर्षाला घाबरत नाही असे सांगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगणे शिकवले आहे. त्यांचाच वसा आणि जनसेवेचा वारसा आपण पुढे चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. तुमचं आणि माझं नातं विश्वासाचं आहे. राज्यातील महिला, युवा , शेतकरी बांधव आदींचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी मी आग्रही आहे.ओबीसी व मराठा आरक्षण पुन्हा मिळाले पाहिजे यासाठी आणि समाजाच्या प्रत्येक प्रश्नांकरिता मी सतत संघर्ष करेन.  तुमच्यासारखे सच्चे मावळे सोबत आहेत तोपर्यंत मी कुठलीही लढाई हरणार नाही. फक्त तुमची साथ हवी असे त्यांनी सांगितले.




*क्षणचित्रे*

-----------

- तिरंगा रॅली सुरू होण्यापूर्वी पंकजाताईंनी यशःश्री निवासस्थानी तिरंगा झेंडा लावला. 


- छ. शिवाजी महाराज चौकापासून सुरू झालेल्या रॅलीत हातात तिरंगा ध्वज घेतलेले घोडेस्वार, ढोल पथक, फेटे घातलेल्या विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधले


- अतिशय शिस्तबद्ध वातावरणात रॅली पार पडली. पंकजाताई मुंडे यांच्यासोबत रॅलीत भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज,राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू आदी महापुरूषांची वेशभूषा केलेले विद्यार्थी होते.


- छ. शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंकजाताईंनी अभिवादन केले.


- रॅलीत पंकजाताईंनी स्वतः "भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय", जय भवानी, जय शिवाजी, वंदेमातरम च्या जोरदार घोषणा दिल्या.


- बार्शी येथील जय भगवंत ढोल - ताशा पथकातील मुला - मुलींनी थरारक आणि आकर्षक कवायती सादर करून परळीकरांचे लक्ष वेधले.


- पंकजाताई मुंडे यांनी अगोदर छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नंतर राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातच ढोल वादनाचा आनंद घेतला आणि पथकातील मुला - मुलींचे कौतुक केले.


- मिरवणूकीमध्ये ठिकठिकाणी महिलांनी पंकजाताईंचे उत्स्फूर्तपणे औक्षण केले, राख्या बांधल्या, पुष्पवृष्टी केली तर व्यापारी बांधवांनी स्वागत केले.


- शाळा, महाविद्यालयातील तिरंगा फेटाधारी मुलींनी आणि एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. 


- शहराच्या विविध चौकामध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. 


- भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्राध्यापक, वकील, शिक्षक, डॉक्टर्स, व्यापारी, विधिध सामाजिक कार्यकर्ते रॅलीत सहभागी 

••••



        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार