MB NEWS-#जोशींचीतासिका/ अनिरुद्ध जोशी>>>>>>>>मधाचे बोट आणि धर्ममार्तंडांचा कडवटपणा..!

 मधाचे बोट आणि धर्ममार्तंडांचा कडवटपणा..!

---------------------------------------------------
#जोशींचीतासिका/ अनिरुद्ध जोशी
---------------------------------------------------


        लिखाणाची सुरुवात करण्यापूर्वी हे स्पष्ट करू इच्छितो की मी स्वतः देव आणि धर्म या संकल्पनांवर "श्रद्धा" ठेवणारा आस्तिक आहे.

             आजच्या लिखाणाचे औचित्य म्हणजे आमच्या परळी वैजनाथ शहरांत जागतिक ख्यातीचे शिवकथाकार श्री. प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांचा शिव महापुराण कथेचा भव्यदिव्य कार्यक्रम सुरू आहे. एका धार्मिक वाहिनीद्वारे विविध देशांत त्यांचे थेट प्रक्षेपणदेखील सुरू आहे. त्यानिमित्ताने सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. अगदी माझी आईदेखील नित्यनेमाने कथेला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक सोशल मीडियावरदेखील मिश्राजींचे गुणगान करणाऱ्या विविध सुरस पोस्ट्स, क्लिप टाकण्याची चढाओढ सुरू आहे. त्यातील दोन क्लिप्स बघून मला आश्चर्याचा धक्का बसला.

    आदरणीय मिश्राजी यांनी एका क्लिपमध्ये कथन केले त्याचा आशय असा आहे की "राम मंदिर, कृष्ण मंदीर किंवा कोणत्याही देवळात खोटे बोला चालून जाईल पण भगवान शिव समोर चालणार नाही."

सर्व धर्म अभ्यासकांना विनंती आहे की त्यांनी याबाबत मार्गदर्शन करावे की "खोटे बोलण्याचे समर्थन कसे होऊ शकते. कोणी उदाहरण देईल की "कसायाने गाय कुठे चालली हे विचारले तर त्याला चुकीचे उत्तर देणे हे पुण्याचे काम आहे." हा क्षणिक युक्तिवाद मान्य केला तरी खोटे बोलण्याचे समर्थन योग्य कसे होऊ शकते?

आदरणीय मिश्राजींच्या दुसऱ्या क्लिपचा आशय असा आहे की "मुलांनी अभ्यास केला नाही तरी हरकत नाही, मधाचे बोट बेलाच्या पानाला लावून ते पान भगवान शंकराच्या पिंडीला चिटकवल्यावर मुलं परीक्षेत उत्तीर्ण होतील."

लगोलग आदरणीय मिश्राजींनी UPSC, MPSC, MBBS, MBA, Engineering, CA आदी परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती मधाचे बोटं आणि बेलाचे पान वापरावेत हे ही जाहीर करून टाकले असते तर बरे झाले असते.

आज योगायोगाने भगवान श्रीकृष्ण जयंती आहे. हा तोच कृष्ण आहे जो योद्धाही आहे आणि योगीही आहे. जो 16 विद्या अन 64 कलांचा अधिपती आहे. निष्काम कर्मयोगासाठी श्रीमद भगवतगीता सांगून  जगातला सर्वोत्तम तत्त्वज्ञानी जो बनला त्या कृष्णाने कर्माला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. महाभारतात स्वतः सर्व शक्तीमान असून त्या कृष्णाने अर्जुनाला लढायला भाग पाडले. जर अर्जुनाने शस्त्राभ्यास केला नसता तर तो जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी झाला असता का? की अर्जुनाला हे "मधाचे बोट अन बेलाचे पान" नामक तोडगा सांगायला कोणी गुरुजी भेटले नसावेत हे त्याचे दुर्भाग्य समजावे का?

कोणी म्हणेल की कथाकार कित्येक चांगल्या गोष्टी सांगतात तुम्ही छिद्रान्वेशी वृत्तीने फक्त काही मिनिटांच्या किंवा सेकंदांच्या क्लिप्स बघून कसे काय मत बनवू शकता? मुळात बासुंदी नासते ती दह्याच्या एका थेंबाने हे या मंडळींनी लक्षात घ्यायला हवे.

संत रामदास स्वामी म्हणतात;
*अभ्यासोनी प्रकटावे। नाही तरी झाकोनी* *असावे। प्रकटोनी नसावे| हे बरे नोहे||*

या पद्धतीने धर्मोपदेशकांकडून वर्तन अपेक्षित आहे.

जेव्हा राजदंड ढळतो तेव्हा समाज धर्मादंडाकडे अपेक्षेने पहातो. पण, जर धर्मदंड कर्मकांडात समाजाला अडकवू पहात असेल तर शांत बसणे म्हणजे पापाचे भागी होणे.

कविवर्य रामधारी सिंह दिनकर यांच्या भाषेत सांगायचे तर;
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध।
जो तटस्थ हैं समय लिखेगा उनके भी अपराध।।

माझ्या अल्पमतीप्रमाणे जर विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून फक्त आदरणीय मिश्राजी सांगत आहेत तो तोडगा वापरला तर फार फार म्हणजे त्या पिंडीला मुंगी आणि मुंगळे लागतील. यापुढे जर आदरणीय मिश्राजींचा उपदेश ऐकणाऱ्या एकाही विद्यार्थ्याने अभ्यास सोडून हे तोडगे वापरल्याने त्या विद्यार्थ्याच्या भविष्याला अंधश्रद्धेचे भुंगे आणि लागले तर त्याचे दायित्व कोणाचे?

जय हिंद!

✍️अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ
मो.क्र. 89835 55657

--‐-------------------------------------------
●तळटीप :

आदरणीय प्रदीपजी मिश्रा अथवा इतर कोणी मूळ शिव महापुराण कथेत खोटे बोलण्याचे समर्थन तसेच अभ्यास न करता उत्तीर्ण होण्यासाठी मध आणि बेलाच्या पानाचा तोडगा सप्रमाण दाखवल्यास कथामंडपात दंडवत घालत येण्याचे जाहीर करत आहे.
---‐--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार