MB NEWS: वाढदिवस अभिष्टचिंतन लेख:हातगुण, हातखंडा व अभ्यासाचा सुरेख संगम: डॉ. गुरूप्रसाद देशपांडे

हातगुण, हातखंडा व अभ्यासाचा सुरेख संगम: डॉ. गुरूप्रसाद देशपांडे



हातगुण आणि हातखंडा ही व्यक्तीची कौशल्य निपुणता दर्शवणारी गुणवैशिष्ट्य. *हातगुण* हस्तस्पर्शावरून तर एखादे कार्यच सिध्दीस नेण्यापर्यंतचे कौशल्य *हातखंडा* म्हणून ओळखले जाते. या दोन्ही गुणांचा मिलाफ क्वचितच एखाद्याच्या ठायी सापडेल. एका व्यक्तिमत्त्वामध्ये सापडणे तसे दुर्मिळच म्हणावे असे हे द्विगुण. सोबतीला अनुभवाधारे मिळवलेले ज्ञान व त्यासोबत आलेली विनयशीलता, अंगभूत माणुसकीचा हस्तस्पर्श ही व्यक्तिमत्त्वातील गुणं

पुरूषोत्तमता दर्शवणारी आहेत.

या वर्णनाचा उहापोह करण्याचे प्रासंगिक म्हणजे परळीतील प्रसिद्ध बाल-शिशू तज्ज्ञ डॉक्टर गुरूप्रसाद देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व !

उपरोक्ती गुण-वैशिष्ट्ययुक्त व्यक्ती म्हणूनच डॉक्टरांचा अनेकांना अनुभव आलेला असेल, यात संदेह नाही. त्यांचा हातगुणच असा की, बालरुग्ण असो की तरूण, ज्येष्ठ, त्यांच्या सल्ला-उपचाराने ठणठणीत होऊनच घरी परततात. 

हातखंडा असा की एखादा आजार किंवा समस्या दीर्घकाळ चिटकून राहणारी असेल तर त्याचे मुळासकट निराकरण करणारे कौ"शल्य"ही दिसेल !

सामाजिक उत्तरदायित्व निभावतानाही त्यांचा हातखंडाचा गुण अनुभवण्यास येतो. सुहृदयी दानत असल्याशिवाय माणूस सामाजिक उत्तरदायित्व निभावू शकत नाही. पण दान हे गुप्त आणि सत्पात्री असावे, हे सूत्र कटाक्षाने डॉक्टर जपतात. त्याची अनेक उदाहरणे देता येतील. त्याचा येथे उल्लेख करणे म्हणजे दान सूत्राचा भंग केल्यासारखे होईल.

रुग्ण आणि त्याला आजारपणातून बरे करून पाठवताना नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील समाधान हे प्रत्येक डॉक्टरांसाठी अधिक महत्वाचे.  डॉक्टर गुरूप्रसाद हेही त्यातलेच. पण त्यापुढे जाऊन विचारही करतात. एखाद्याला त्याच्या बिकट परिस्थितीमुळे अन्य सत् मार्गाने मदत करता येईल का ? हा औदार्यभाव ते अंतरी जपतात. 

वाडवडिलांची पुण्याई, गुरूकृपा आणि तीन पिढ्यांपासून झिरपलेल्या अंगभूत सेवाभावी गुणांमुळेच कदाचित डॉक्टरांमध्ये हातखंडा, हातगुणासारखी कौशल्य निपुणता आली असणार हे निर्विवादच आहे.

अशा या गुणांनी युक्त शल्य (चिकित्सा या अर्थाने) व कौशल्य डॉक्टरांच्या हाती आणि व्यक्तिमत्त्वात सामावलेली आहेत. हे सर्व करत असताना त्याचा वारा तुम्हाला न लागणे हा तर अत्यंत दुर्मिळ गुणयोग मानायला हवा.

डॉक्टरांचा आज (४ सप्टेंबर) वाढदिवस. अभीष्टचिंतन करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वरील गुणात्मक चर्चा प्रासंगिक असली तरी ती निरर्थक मात्र नाही, कारण प्रत्येकाला गुणांचा धागा अंतरी विणून घ्यावा वाटण्याइतपत त्याची उजळणी करण्याचा मनोदय म्हणून हा लेखनप्रपंच. 

हातखंडा, हातगुण, कौशल्य निपुणता ही ठायी येण्यासाठी माणुसकी आणि सेवाभावही तेवढाच महत्त्वाचा असतो, हे विसरून चालणार नाही. डॉक्टर गुरूप्रसाद यांचेही काम सेवावृत्तीनेच अविरत सुरू असते. 

डॉक्टर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त म्हणूनही कार्यरत आहेत. घराण्याची गुरू परंपराही त्यांनी निष्ठेने आणि श्रद्धेने अखंडितपणे सुरू ठेवली आहे. आजोबा - डॉ. जीवनराव देशपांडे यांचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू. श्री माधवाश्रमस्वामींचा पाऊण शतकाहून अधिककाळ चालत आलेला पुण्यतिथी सोहळा डॉक्टर देशपांडे परिवाराकडून त्यांच्या नंदागौळ मार्गावरील मळ्यामध्ये भक्तिभावाने आयोजिला जातो. 

करोनाकाळात डॉक्टरांनी स्वतःची ओपीडी सांभाळून कॉरन्टाईन सेंटरमध्ये जाऊन सेवा दिलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रात शिकलेले ज्ञान जन्मभूमीत उपयोगात आणण्याची तळमळ ठेवून ते कार्यमग्न आहेत. आजही डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन ज्ञान शिकण्यास उत्सुक असतात. प्रसिद्धी परांङमुख स्वभावाच्या या सेवाव्रती व्यक्तिमत्त्वाला दीर्घायु लाभो, हीच  प्रभु वैद्यनाथ चरणी प्रार्थना. 

लेखन:अनंत  कुलकर्णी  

पञकार  परळी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार