MB NEWS-भागवताचार्य बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मृती सप्ताहाची सांगता

 *भागवताचार्य बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मृती सप्ताहाची सांगता*

*अण्णांनी स्वाभिमान शिकवला, कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करा, अशी शिकवण दिली. मातीशी इमान राखेन हा शब्द त्यांना दिला होता, तो पाळतोय - धनंजय मुंडे*


*धनंजय मुंडे यांचे पित्याला भावूक होत नमन;*...अण्णा तुम्ही दाखवलेल्या वाटेवरच चालतोय - धनंजय मुंडे*


 अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नाथ शिक्षण संस्थेमार्फत दत्तक घेण्याची घोषणा

परळी (दि. 07) - शेतकरी, कष्टकरी, सर्व सामान्य वर्गाला आपलेसे वाटणारे लोकाभिमुख नेते म्हणून ओळख असलेल्या स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या नेतृत्वात अनेक नेते घडले, आज त्यांचे सुपुत्र धनंजय हे त्यांचा लोकाभिमुख वारसा समर्थपणे चालवत आहे, असे गौरवोद्गार भागवताचार्य बालयोगी ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगावकर यांनी आज काल्याच्या किर्तनानिमित्त नाथरा येथे बोलताना व्यक्त केले.


स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने नाथरा या त्यांच्या जन्मगावी मुंडे कुटुंबाच्या वतीने हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. आज हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली. 


स्व. पंडित अण्णांचा मला सहवास व सान्निध्य लाभले. अण्णांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, अहंकार बाजूला ठेवून आपल्या मातीतील लोकांची सेवा करण्याची शिकवण दिली. स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करून दाखवा हा कानमंत्र त्यांनी दिला. आजही स्वर्गीय अण्णांच्या मातीशी इमान राखण्याच्या शब्दाला मी कायम आहे. अण्णांचा मातीशी इमान राखण्याचा वारसा मी जोपासला आहे, असे धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.


शेतकऱ्यांना पीकविमा लागू व्हावा अशी पहिली मागणी तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे करणारे अण्णा होते. शेतकऱ्यांची त्यांना कणव होती, त्यामुळे पुढील वर्षीपासून उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देण्याचेही नियोजन आम्ही करत आहोत. मुलांच्या शिक्षणावर त्यांचा भर असायचा, म्हणूनच अण्णांच्या पुण्यतिथीचे निमित्त साधून नाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोर गरीब कुटुंबातील शिक्षणासाठी गरजू असलेले विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेणार असल्याची घोषणा देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केली आहे. 


तत्पूर्वी धनंजय मुंडे यांनी स्व. पंडित अण्णा यांच्या कन्हेरवाडी शिवारातील स्मृती स्थळी जाऊन अण्णांच्या स्मृतीला अभिवादन केले. 


धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावरून देखील स्व. पंडित अण्णा मुंडे यांना अभिवादन करत भावनिक साद घातली आहे. "अण्णा... तुम्ही शिकवलंत शेतकरी-कष्टकरी, सर्वसामान्य माणसाच्या न्यायासाठी लढणं; तुम्ही दाखवलेल्या त्याच वाटेवर प्रामाणिकपणे चालतोय, बस बघायला तुम्ही नाहीत... तुमच्या पुण्यतिथी निमित्त नतमस्तक होऊन सांगतो, तुम्ही दाखवलेली लोकसेवेची वाट कधीच सोडणार नाही! पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन अण्णा..." अशी भावनिक पोस्ट श्री. मुंडे यांनी केली आहे. 


पुण्यतिथीच्या निमित्ताने आज मुंडे कुटुंबातील सर्व सदस्यांसह धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे, सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे,  मा.आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, ज्येष्ठ भगिनी सौ. उर्मिलाताई केंद्रे, श्री. त्रिंबकराव केंद्रे, सौ. शकुंतलाताई केंद्रे, श्री. पुरुषोत्तम केंद्रे, सौ. प्रमिलाताई केंद्रे व  बंधू अजय मुंडे, अभय मुंडे, रामेश्वर मुंडे, विजय मुंडे यांसह नाथरा येथील गावकरी, धनंजय मुंडे यांचे सहकारी, पदाधिकारी, तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गोविंद महाराज केंद्रे यांनी केले.


*स्व. गोपीनाथराव मुंडे व पंडित अण्णा यांच्या नात्यातील ओलावा धनंजय मुंडे यांनी उलगडला*


*स्व. गोपीनाथराव मुंडे हे राज्याच्या व देशाच्या राजकारणात सक्रिय असताना मतदारसंघात अण्णांकडे महत्वाची जबाबदारी असायची. आपला लहान भाऊ राजकारणात मोठा होतोय, हे पाहून अण्णांचा उर भरून यायचा. भावाचे जोडे उचलायला सुद्धा त्यांनी कधी मागे पाहिले नाही, किंवा त्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. पुढच्या पिढीत राजकारणात आमच्यात जरी कटुता असली तर साहेबांच्या व आमच्या कुटुंबात सदैव संवाद असायला हवा. कुटुंबात या पिढीतील मोठा म्हणून, अर्थातच ही माझी अधिक जबाबदारी आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी स्व. मुंडे साहेब व स्व. अण्णांच्या नात्यातील ओलावा उलगडून सांगितला.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !