खळबळजनक:ऊस तोडणीला येत नाही म्हणून महिलेस जीवे मारण्याचा प्रयत्न
केज :- एका ऊस तोड करणाऱ्या महिलेस तू आमच्या सोबत ऊस तोडणीच्या कामाला का येत नाहीस म्हणून तिला बळजबरीने विषारी द्रव्य पाजून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे.
केज तालुक्यातील जोला येथे दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:३० वा. राहीबाई अशोक ढाकणे ही ३६ वर्षीय महिला एकटी घरात असताना अशोक ढाकणे व दैवशाला ढाकणे हे तिच्या घरी गेले आणि आमच्या सोबत ऊस तोडणीसाठी चल असे म्हणाले. तेव्हा राहीबाई त्यांना म्हणाली की मागच्या वर्षीचे तुमच्याकडे असलेले ४४ हजार रु द्या. असे म्हणताच अशोक ढाकणे व दैवशाला ढाकणे यांनी राहीबाई ढाकणेच्या केसाला पकडुन खाली पाडले. तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने अच्युत अण्णासाहेब ढाकणे याने विषारी औषधाची बाटलीचे बुच उघडून काढुन बाटली तोंडात टाकुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या महिलेवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात पोलिसांना दिलेल्या जबाबा वरून केज पोलिस ठाण्यात अशोक ढाकणे, दैवशाला ढाकणे, अच्युत अण्णासाहेब ढाकणे या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. ४९५/२०२२ भा. दं. वि. ३०७, ४५२, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा