MB NEWS-निमंत्रितांच्या कविसंमेलनाने कोजागिरीला आली रंगत

 'अरे प्रचार प्रचार , खोटा कधी म्हणू नये,

दिल्या घेतल्या प्रेमाला , नोटा कधी म्हणू नये ".

निमंत्रितांच्या कविसंमेलनाने कोजागिरीला आली रंगत

• म.सा.प परळी शाखेचा उपक्रम 

परळी वैजनाथ, दि. १०/ १० / २०२२, (प्रतिनिधी)ः-

येथील मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने कोजागिरीनिमित्त खास परळीकर रसिकांसाठी ' कविता रंगते कोजागिरी'त या निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन रविवार दि. ०९ / १० / २०२२ रोजी सायं . ७ : ० ० वा. ' बन्सल क्लासेस माधवबाग ' येथे करण्यात आले होते .मा.विभाश्री दीदी यांच्या  शुभहस्ते उद्‌घाटन झालेल्या या कविसंमेलनात -

 विविध रसांची अनुभूती रसिक श्रोत्यांना अनुभवता आली. हास्य , टाळ्या याबरोबरच सामाजिक विषयाच्या अनुषंगाने अंतर्मुखता ही या कविसंमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. या कविसंमेलनात ज्यांच्या कवितेने रसिकमनात कायमचे घर केले असे चित्रपट कलावंत ,हास्यसम्राट , विनोदाचे बादशहा 'नारायण सुमंत (खुंटे पिंपळगाव) यांनी -

      " अरे प्रचार प्रचार , जसा मेवा हातावर

       आधी पुडके आणि गुटखे

         मग कार्यकर्ते फार

         अरे प्रचार प्रचार

          खोटा कधी म्हणू नये

          दिल्या घेतला प्रेमाला

         नोटा कधी म्हणू नये ".

हे विडंबन सादर करून  उपस्थित रसिक श्रोत्यांना खळखळून हसवले. अंगिक अभिनयाच्या साह्याने त्यांनी सादर केलेल्या कवितांनी कविसंमेलनाला रंगत आली. यावेळी त्यांनी -

     ' पिकाची राखण झाली सुरु ' ही लावणीही गेय पातळीवर सादर केली. प्रा.डॉ.प्रतिभा अहिरे यांनी -

   "चांदण्यांत फिरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही

कळ्यांना बहरण्याचे

स्वातंत्र्य उरले नाही"

 प्रत्येक श्वास  बनतो आहे 

जात आणिक धर्म 

निधर्मी राहण्याचे स्वातंत्र्य उरले नाही"

अशी स्त्रियांच्या वास्तव जगण्याची स्थिती मांडतानाच समाजातील एकंदरीत विसंगतीवर भाष्य करणारी कविता सादर केली. याशिवाय त्यांची -

     "पंख पसरीन म्हणते

      निळ्या नभात मी

      रंग उधळीन या 

      आसमंतात मी " ही कविताही रसिक श्रोत्यांची विशेष दाद मिळवून गेली.

    गेय अभिव्यक्ती व हास्याचे फवारे उडवत रसिक मनावर कायम अधिराज्य करणारे राजा धर्माधिकारी यांनी -

"मंग म्हटलं देवा,तुमी इचार करा असा

का महाराष्ट्राच्या राजकारनात

जाऊन तुमी धसा!

खाते वाटप चालू हाय,फायदा असा होईन 

का मंत्र्याची जागा तुमाले बिलकुल भेटून जाईन!

त...मारोती म्हने मंत्र्याच काम काय असते.?

म्या म्हटलं महाराष्ट्रात मंत्र्याहीले काहीच काम नसते! " ही हनुमंताची नोकरी कविता सादर केली उपस्थितामध्ये हशाच पिकला .कविसंमेलनाला त्यांनी वैदर्भी तडकाच दिला.

     गोड गळ्याचा व सक्षम काव्यविष्कार असलेले सखाराम डाखोरे यांनी त्यांच्या ' गाव ' या कवितेतून

     "गाव मनात घेऊन, इथं आलो मी दुरून

सुख पेरता पेरता, जावं जगणं सरुन "

     असा सुंदर भावाविष्कार केला. त्याचबरोबर नोटाबंदी व जीएसटीवर भाष्य करणारी कविताही आशयपूर्ण होती.

   कवी प्रदीप ईक्कर यांनी -

       "जणू सांडलं रानात, शुभ्र चांदणं दुधाळ

कसी फाटक्या झोळीला, माय जोडते आभाळ" ही जाणीव 'वेचणी ' या कथेतून वास्तवाच्या पातळीवर मांडली. मातीचं महत्त्व विशद करणारी त्यांची कविता विशेष भाव खाऊन गेली.

.उत्कृष्ट निवेदक  अशी महाराष्ट्रभर ख्याती असलेले आपल्या रांगड्या वाणीने रसिक मनावर अमीट छाप उमटवणारे व कवितेच्या प्रांतातही आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे  राजेसाहेब कदम  यांनीही यावेळी हुंडा यासारख्या सामाजिक विषयावर संवेदनशील मनाला अंतर्मुख करायला लावणारी कविता सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांची विशेष दाद मिळविली. 

                          Video 


विविध रसांची अनुभूती देता देता वाङ्मयीन गुणांनी परिपूर्ण कविता असलेल्या या निमंत्रितांच्या कविसंमेलनाने परळी पंचक्रोशीतील  रसिकांची कोजागिरी आनंदात संपन्न झाली. 

   कविसंमेलनाच्या उद्‌घाटन सत्राचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी तर प्रमुख पाहुणे म्हणून बन्सल क्लासेसचे संचालक प्राचार्य डॉ. बांगड सर व संचालक बद्रिनारायण बाहेती हे उपस्थित होते. उद्‌घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड यांनी तर सूत्रसंचालन श्री अनंत मुंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड, कार्याध्यक्ष अनंत मुंडे, उपाध्यक्ष अरुण पवार , कोषाध्यक्ष प्रा.संजय अघाव,  बंडू अघाव  सहसचिव सुनिता कोमावार  ,उपाध्यक्ष चेतना गौरशेटे, प्रसिद्धी प्रमुख बालाजी कांबळे , प्रा. अर्चना चव्हाण ,सिध्देश्वर इंगोले ,दिवाकर जोशी ,  मुक्तविहारी ऊर्फ केशव कुकडे, विजया दहिवाळ, प्रा .डॉ . राजाभाऊ धायगुडे , चंद्रशेखर फुटके ,ॲड. दत्तात्रय आंधळे, रंगनाथ मुंडे  ,  गणपत गणगोपलवाड , प्रा .नयनकुमार विशारद, प्रा.डॉ. रा .ज. चाटे  यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !