MB NEWS- श्री.दिनकरराव मुंडे (गुरुजी) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कन्या विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते यांनी व्यक्त केलेल्या भावना... शब्दबद्ध : अभिष्टचिंतन लेख>>>आमचे कुटुंबवत्सल 'अण्णा'

 आण्णांचा आज ७४ वा वाढदिवस आणि अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण ! 🌹

ण्णा मागील ५० वर्षांपासून आमच्या मोठ्या कुटु्ंबाचा आधारवड. आमचे आजोबा 'साधू नारायण' म्हणून पंचक्रोशी मध्ये विख्यात होते. त्यांच्या अध्यात्मिक संस्कारात अण्णांची जडणघडण झाली. अण्णांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. कमी वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागली ती आजपर्यंत जबाबदारीने पाळतात. नातीगोती कशी जपावीत हे अण्णांकडून शिकावे. इतक्या वयातही सगळ्या बहिणींकडे राखी पौर्णिमेला, भाऊबीजेला आवर्जून जातात. खूप लांबपर्यंतची नाती अण्णा लक्षात ठेवून सुख-दुःखात जवळीक साधतात. 


मुंडे साहेब आणि अण्णा चुलत बंधू, शाळा कॉलेज मध्ये सोबत आणि अतिशय जवळचे मित्र. स्व मुंडे साहेबांना राजकीय क्षेत्रात साथ देण्यासाठी क्षणाचाही विचार न करता अण्णांनी सरकारी नोकरी सोडली व अतिशय धावपळीचे जीवन पत्करले. मुंडे साहेब विरोधी पक्ष नेते असतांना सहज नांदेडपर्यंत सोबत गेले आणि मुंडे साहेब म्हणाले, 'चला माझ्यासोबत मुंबईला'. अण्णांजवळ शिल्लक कपडेही नव्हते. मुंबईत पोहचल्यास मुंडे साहेबांनी दोन ड्रेस घ्यायला लावले आणि, 'आजपासून तुम्ही माझे स्वीय सहायक,' असे सांगून टाकले. पुढे साहेब उपमुख्यमंत्री झाले. अण्णांमुळे परळी पंचक्रोशीतील सामान्य माणसांना साहेबांना भेटता येत असे, रामटेक बंगल्यावर सगळ्यांचा पाहुणचार व्हायचा. मुंडे साहेबांच्या सत्तेचा लाभ सर्व समाजाला व्हावा ही अण्णांची तळमळ. साहेब उपमुख्यमंत्री असतांना अण्णा मुंबई ते परळी एसटी बसने प्रवास करायचे. हे आज कुणाला सांगून खरे वाटेल का ?


जनसंपर्क कसा वाढवावा हे अण्णांकडून शिकावे. एकदा भेटलेला माणूस नंतर कितीही गर्दीत ओळखायचा, त्याची अडचण समजून घ्यायची, साहेबांकडून काम करून द्यायचे आणि माणसं जोडायची. साहेबांवर कुणी नाराज असेल तर त्याचे घर गाठायचे नाराजी समजून घायची आणि उशीर न करता साहेबांची भेट किंवा बोलणं करून आश्वासन देऊन नाराजी दूर करायची. बघता बघता आपण साहेबांचे 'जनसंपर्क अधिकारी' झालात. साहेबांचे दोन साखर कारखाने उभारताना हा जनसंपर्क कामी आला. अण्णांनी फक्त माणसं कमावली आणि तीच माणसं सुख-दुःखात आज आपल्या भोवती दिसतात.  


मुलींना अण्णांनी मुलांपेक्षा जास्त प्रेम दिले, लाड केला, हट्ट पुरवला. सगळ्या मुलींना चांगले शिक्षण दिले. दहा वर्षात चार मुलींचे लग्न करताना आर्थिक तारांबळ झाली. प्रसंगी कर्ज काढले, मित्रांची मदत घेतली पण मुलींच्या लग्नाची हौस पूर्ण केली. (आण्णांच्या पारखी नजरेतून जावयाच्या रुपातील ‘हिरा’ ही सुटला नाही आणी त्यामुळे त्यांनी माझी लग्नगाठ लवकर बांधण्यातही उशीर केला नाही😀)


२००२ साली अण्णांना पहिला हृदयविकाराचा अटॅक आला. मुंडे साहेबांनी वेळेत हेलिकॉप्टर पाठवून बॉम्बे हॅास्पीटल मध्ये स्वतः बसून ॲापरेशन करून घेतले. मोठया कुटुंबाचे करते-धरते अण्णांना आजार झाला म्हणून सगळ्यांचे चेहेरे बारीक झाले; घरचे, पाहुणे सारखे काळजीत असायचे. पण अण्णांनी आपली जीवनशैली बदलली, स्वतः काळजी घेत, सावध राहून मागील वीस वर्षात तब्येत जोपासली. 


यजमान असावं तर अण्णांसारखं. मित्र, नातेवाईक, शेजारी सगळ्यांना बोलावून गप्पा मारणे आणि खाऊ घालणे हा अण्णांचा आवडता छंद. आंब्यांच्या दिवसांत तर आम्हाला पर्वणीच असते.अलीकडे नाजूक तब्येतीमुळे अण्णांना बऱ्याच गोष्टी वर्ज्य आहेत. पण त्यामुळे खाऊ घालण्याचा छंद काही कमी झाला नाही. (आणी गोड खाण्याचाही,डायबेटिक असुनही नजरचुकीने गोड खातातच.😀आमरस हा त्यांचा आवडता पदार्थ ) आजही सगळ्या नातवंडांना खेळवण्यात आणि खाऊ घालण्यांत अण्णांचं मन रमतं. 


२०१४ साली साहेबांचा अपघात झाला त्याचं सर्वात जास्त दुःख अण्णांना झालं. शब्दात न मांडता येणारं दुःख आपण सहन केलं. तुम्ही हे दुःख कुणाला सांगणार ? साहेब स्वतःचं सुख-दुःख तुम्हाला सांगायचे. पण तेच तुम्हाला एकटे सोडून गेले हे गाऱ्हाणं तरी तुम्ही कुणाला सांगणार. तेंव्हा पासून अण्णांनी सार्वजनिक जीवनाचा त्याग केला.   


राजकीय क्षेत्रात २४ तास व्यस्त असणारे अण्णा ते आज नातवंडात रमणारे अण्णा, असा प्रवास बघून आपण मनमुराद जीवन जगलात याचा आम्हाला अभिमान वाटतो. आपल्या स्वभावातील गोडवा, विनोद आणि प्रसंगावधान आम्ही नेहमीच अनुभवतो. आपल्या अनुभवातून, मदतीतून अनेकांचे आयुष्य घडले. ती पुण्याई आपल्यासोबत नेहमीच असेल. आजच्या वाढदिवसानिमित्त अमृतमहोत्सवी पदार्पण करत असतांना आपणांस आरोग्य, सुख-समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैद्यनाथाचरणी प्रार्थना ! 🙏🏻🌹

 ✍️उषा किरण गित्ते

-----------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !