MB NEWS:डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची लवकरच भरती : गिरीश महाजन

 डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची लवकरच भरती : गिरीश महाजन




नागपूर; वृत्तसेवा :  राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया टीसीएस कंपनीच्या माध्यमातून पार पाडली जाणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधानसभेत केली. तातडीच्या औषधे खरेदीसाठी वैद्यकीय संस्थांना आपल्या एकूण निधीतील 30 टक्के रक्कम वापरण्यास परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय औषधे खरेदीसाठी खरेदी महामंडळ स्थापन करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली.

अमीन पटेल यांच्या लक्षवेधी सूचनेवर त्यांनी ही घोषणा केली. महाजन म्हणाले, आम्ही लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 300 डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. यासंदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्थांना आवश्यक असणारी औषधे, सर्जिकल्स साहित्य व अन्य बाबींचा पुरवठा हाफकिन महामंडळाकडून करण्यात येतो. मात्र, औषधपुरवठा करण्यास विलंब होत असल्याने अशा संस्थांना त्यांच्या निधीतून 30 टक्के निधी औषधी खरेदीसाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापुढे औषध खरेदी करण्यासाठी खरेदी महामंडळ स्थापन करण्यात येईल. याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही गिरीश महाजन यांनी दिली.

सर जे. जे. रुग्णालयास सन 2022-23 या वित्तीय वर्षात औषधे व सर्जिकल्स साहित्याची खरेदी करण्यासाठी 24.31 कोटी इतक्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त स्थानिकस्तरावर महात्मा फुले जनआरोग्य योजना, सीएसआर फंड, पीएलए खात्यातून तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध निधीमधून तातडीची व आवश्यक खरेदी करून रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. या चर्चेत विधानसभा सदस्य मनीषा चौधरी, राजेश टोपे, झिशान सिद्दीकी आदींनी सहभाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार