MB NEWS:महिला महाविद्यालयात काव्यरंगांची उधळण .... परळीकर मंत्रमुग्ध .

 खोटं बोलून त्यांची साखर तुमची झाली मळी,भुलथापाचे बळी तुम्ही रे भुलथापाचे बळी

 महिला महाविद्यालयात काव्यरंगांची उधळण .... परळीकर मंत्रमुग्ध 


परळी वैजनाथ....

        येथील कै . लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय प्रांगणात  निमंत्रितांचे काव्यसंमेलन उत्साहात संपन्न झाले . कवींच्या उत्तुंग कल्पनेला मनापासून दाद देणाऱ्या परळीकरांच्या उत्तम रसिकतेची प्रचीती आणणारा समारोप समारंभ आज पार पडला. स्व . श्यामराव देशमुख स्मृतिसमारोहांतर्गत आजच्या या तृतीय दिनाच्या सायंसत्रात निमंत्रितांच्या काव्य संमेलनाचा बहारदार सोहळा परळीकरांना दिव्य आनंद देऊन गेला . याप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख ,संस्थेचे सचिव  रवींद्र देशमुख आणि कोषाध्यक्ष प्रा . प्रसाद देशमुख , संचालक मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एल. एस. मुंडे   यांची  उपस्थिती होती . 

          दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या सत्कारानंतर कोषाध्यक्ष प्रा . श्री . प्रसादजी देशमुख  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले . यात त्यांनी या त्रिदिवसीय स्मृतिसोहळ्यात झालेल्या विविध कार्यक्रमाचा विस्तृत आढावा घेतला . काकांचा वारसा व वसा आम्हीं पुढे नेत आहोत , असे ते म्हणाले. कविसंमेलनांचा हेतू समाजप्रबोधन असून महर्षी वाल्मीकी ते गदिमा पर्यंत सर्वच कवींनी समाजाला आरसा दाखवला असे ते म्हणाले . तसेच स्व . श्यामरावजी देशमुख स्मृती समारोहाच्या निमित्ताने आम्ही प्रतिवर्षी परळी वासीयांना उच्च दर्जाची सांस्कृतिक , वैचारिक व भावनिक मेजवानी देऊन तृप्त करणार आहोत असेही प्रतिपादन केले .

      यानंतर बहारदार अशा कविसंमेलनास प्रारंभ झाला .  या कविसंमेलनामध्ये महाराष्ट्रातील  सामाजिक राजकीय तसेच जीवनाला अंतर्मुख करावयास लावणाऱ्या कविता करणारे  ख्यातनाम कवी उपस्थित होते . प्रा . डॉ . ललित अधाने , प्रा .डॉ .विनायक पवार , मा . विष्णू थोरे व सौ . अलका तालनकर यांची या संमेलनात उपस्थिती होती . 

या कार्यक्रमात आनंदनगरी व संगीत खुर्ची व फनीगेम स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या खालील विद्यार्थिनींना गौरविण्यात आले .आनंदनगरी - श्रद्धा कोकीळ (प्र .) मधुरा पाटणकर ( द्वि . ) गायत्री दीक्षित ( तृ.); बलून डान्स-निकिता पवार व आरती डाके - (प्र.)नेहा कोळी व रचना शिंदे - (द्वि.); संगीत खुर्ची-निकिता पवार - (प्र. )तर मयूरी जगतकर - (द्वि).; फनीगेम -अंकिता मुंदडा - (प्र.)पठाण सानिया - ( 'द्वि.)

               संमेलनाच्या प्रारंभास  कविता सादर करीत असताना प्रा. विनायक पवार यांनी *कवीपत्नीचे मनोगत -* ही कविता प्रस्तुत केली . त्यांत ती कविपत्नी न्यायाधीशाकडे तक्रार करते -

अहो जजसाहेब, रोज पाच पन्नास कविता ऐकवतो | पोरीला कविता अन् मला कादंबरी म्हणतो ॥ घराचं नांव सम्मेलन अन् पोराला   धडा म्हणतो॥ 

'तू नवरी बनून आली असतीस तर घराचा दरबार झाला असता .मी तासाला येणार म्हणून ती तासाला यायची .' 

अशा त्यांच्या अनेक हास्य कवितातून हास्यरस ओसंडून वहात होता .

'खोटं बोलून त्यांची साखर तुमची झाली मळी,भुलथापाचे बळी तुम्ही रे भुलथापाचे बळी

पैशासाठी चरले नेते रवंथ सुद्धा केला नाही | निवडून गेला पाच वर्ष पुनः परत आला नाही |

विकास मेला झूरुन त्यांच्या भरल्या माड्या I  तुमची स्वप्ने जळून गेली हातापायाच्या काड्या ॥'

या  कवितेतून त्यांनी राजकीय परिस्थितीचे भीषण वास्तव प्रदर्शित केले . तसेच गरिबीची दाहकता व्यक्त करणारी कविता 

 *रंग मातीचा दिसायला साधा भोळा | माझ्या बापानं पिकावली माझी शाळा*  ही कविता श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन गेली '

प्रा .ललित आधाने - यांनी त्यांच्या कविता सादर करीत असताना काव्यनिर्मिती कशी होते हे सांगितले . ते म्हणाले की,कवितेचा जन्म वेदनेतून होतो .  रडवण्याचे व हसवण्याचे  सामर्थ्य हे कवितेतच असते . यासाठी म्हणून त्यांनी बहिणाबाईंची 

अरे, घरोटा घरोटा

तुझ्यातून पडे पीठी

तसं तसं माझं गानं

पोटातून येतं व्होटीं

 ही कविता सादर केली .

     पोर्णिमेची रात्र - या कवितेनंतर-

 शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमिका असलेली व शेतकऱ्याच्या आयुष्याची धग व्यक्त करणारी कविता प्रेक्षकांना शेतकरी जीवनाच्या दैन्याची कल्पना देऊन गेली . 

        अठराविश्वे पंचरलेल्या आयुष्याची गणिते मांडतांना , माझा आत्मा हवेत दरवळतो आहे . 

शेतमळा सुद्धा पर्यटनस्थळ असू शकतो असे सांगून त्यांनी शेतात बांधावर सुचलेली ऊस व चवळी यांची प्रेमकथा सांगणारी _ - *चवळी* ही कविता सादर केली .

 *लाज लाजूनी कावळी झाली चवळीची शेंग | ऊस हालवून तुरा खुणवितो अशी ये गं .* 

तसेच लोकशाहीत समाजाची स्थिती सांगणारी खाकी ही कविता सादर केली .

 *खाकी* _ 

अस्मानीने मारलं सुल्तानीन मारलं तुम्हीच होता का बाकीI लढण्याचं बळ देवा कुठं होतं तुमच्यात ,मारायला पाठविली खाकी .॥ यानंतर

मुक्तछंदांत असलेली *अन्न अपूर्णांक* या कवितेतून भारतीय स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव चालू आहे तरी अजूनही सर्वांना अन्न मिळत नाही . या आशयाची वरील कविता ठसा उमटवून गेली .

सुप्रसिद्ध कवि श्री विष्णु थोरे यांनी आपल्या कविता सादर करताना  - महान भारतासाठी आज कवितेची गरज आहे . असे सांगितले 

 *देवा तुझ्या देवळात चोरट्याचा फड .*  ही कविता सादर करून चित्रपटासाठी केलेले

आयटम साँग - 

 *मनातल्या गुपिता चं खोल तू राज गं  , झ्श्काच्या इलाजाची दवा मला पाज गं .* हे ही सादर केले.

हर हर महादेवाची नौबत इथे झडेल काय , स्वराज्याला  शिवरायांचं सपान पुनः पडेल काय .? असे म्हणून त्यांनी शिवबाच्या स्वराज्य संकल्पनेची आठवण करून दिली. पुढे स्त्री शक्तीला वंदन करताना ते म्हणाले -

*लेक*  

तुझा जलम झाल्यावं

तुझा सुखावला बाप गं,

तुला सासरी धाडून

केलं गाय विकल्याचं पाप गं॥ ही त्यांची कविता बापलेकीच्या नात्यातले अनुबंध व्यक्त करुन श्रोत्यांची दाद मिळवून गेली .

ज्येष्ठ कवयित्री मा . अलका तालनकर यांनी वऱ्हाडी बोलीत सादर केलेली

मोबाईलचे दुष्परिणाम सांगणारी

'नशिब फुटलं  माहा गुन्हाच गुन्हा केला १०वीच्या पोट्यlले म्या मोबाईल घेऊन दिला I 

ही कविता सादर केली .

*सांजवात -* तिचं पाऊल नाजुक नाजूक चालतात काट्यालाच येती कीव घेती मान वळवूनी .

 मुलगी हवी घराला तितकीच आस आहे , धरतीमुळे तर या नभाला उंची खास आहे.

 *माहेर*  कविता . याद येते माहेराची मन झुरलं झुरलं .                       अशा या सर्व कवितांनी रसिकांना अंतर्मुख  केले .

परळीकरांना खास मेजवानी ठरलेल्या या काव्य संमेलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. विनोद जगीकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड यांनी मानले . या कार्यक्रमासाठी परळीकर रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !