MB NEWS:जीवन सुंदर आहे विषयावरील व्याख्यान

 गुणपत्रातील अंकांची सूज पाहण्यापेक्षा जीवनाला उत्सव बनवा




अन्यायाने मिळवलेला पैसा म्हणजे प्रेतावरची फुलं ,त्याने जीवन कधीच सुखी  होत नाही


 इतिहासात डोकावताना व भविष्याचा वेध घेताना वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा.


 साधनं आयुष्य सोपं करतील पण ते माणसाला सुखी करू शकत नाहीत -व्याख्याते श्री गणेश  शिंदे



 प्रतिभासंपन्न व्याख्याते श्री गणेश  शिंदे यांचे प्रतिपादन



परळी, दि. 17/01/2023 (प्रतिनिधी)

 

 कै . लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्व . श्यामराव देशमुख  यांच्या स्मृतिसमारोहाच्या दुसऱ्या दिवसाच्या  सायंकालीन सत्रात श्री गणेशजी शिंदे यांनी ' *जीवन सुंदर आहे* ' या विषयावर प्रभावी विचार मांडले. 

       या सत्राच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष , संजय देशमुख हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे सचिव  रवींद्र देशमुख , कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख तसेच  संचालिका सौ . छायाताई देशमुख , सौ .विद्याताई देशमुख , श्री मंगेश देशमुख , हेमंत कुलकर्णी , मनोहर कांबळे यांची उपस्थिती होती .

        सरस्वती पूजन व मान्यवरांच्या स्वागतानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक मा. श्री अनिलराव देशमुख यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. त्यात ते म्हणतात - ' नमस्कार , काकांचा विचारवारसा पुढे नेणाऱ्या महाविद्यालयपरिवाराचा मला सार्थ अभिमान आहे.आपल्या या महत्कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा.' कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मुंडे एल.एस. यांनी केले . त्यांत - महाविद्यालयाच्या अनेक वैशिष्ट्यांसह  यशाची गौरवगाथा यथार्थ शब्दात मांडून संस्थेच्या भावी उपक्रमांबद्दलही माहिती दिली. या अत्यंत विचारप्रवण कार्यक्रमात सर्वप्रथम भगवंताच्या अपार कृपेचे वर्णन करताना संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत प्रमुख व्याख्याते श्री गणेश शिंदे म्हणाले -

 हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥ गुण गाईन आवडी । हीच माझी सर्व जोडी ।।

 पुढे ते म्हणाले की , जीवन जगताना प्रत्येकाची स्वतंत्र नजर असावी . दुसऱ्याच्या नजरेने पाहू नका.  स्वामी विवेकानंद म्हणायचे ,जगात कुणीच कुणाला शिकवू शकत नाही . पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची व संस्थांची आहे . माणसाने चिकित्सक व्हावे . दुसऱ्याच्या हो मध्ये हो मिसळू नये. माणसाने वर्तमानात जगावे.इतिहासात डोकावताना व भविष्यचा वेध घेताना वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करावा. केवळ उदरनिर्वाहासाठी जगणं म्हणजे जगणंच नाही. इतरांसाठी जगावं व त्यायोगे जगण्याचा उत्सव करावा. माणूस ही परमेश्वराची सर्वोत्तम निर्मिती आहे याची सतत जाणीव ठेवावी. माणसाला व्यक्त होता येतं. आपलं सुख- दुःख व्यक्त करता येतं .  जन्माला येण्याचे संकेत माणसाला ९ महिने पूर्वीच मिळतात ; पण मृत्यूचे संकेत मात्र ९ मिनीटे आधीसुद्धा मिळात नाहीत . हे देवाचे खूप उपकार आहेत . आजचे भीषण वास्तव मांडताना ते पुढं म्हणाले , मुलं मैदानं सोडून मोबाईलमध्ये रमली. मुलांचे भावविश्व व संवेदनशीलता यामुळे मावळते आहे. त्यांना एकांतात चुका सांगा चारचौघात शाबासकी द्या.मुलांशी स्पर्श ठेवा. गुणपत्रांतील अंकांची सूज पाहू नका , मुलांच्या जगण्याला उत्सव करा. त्यांना संकटाला सामोरे जायला  शिकवा . आधुनिक यांत्रिक युगावर भाष्य करताना ते म्हणाले , कृतज्ञता सांभाळा, साधनांच्या आहारी जाऊ नका . ते आयुष्य सुखी करत नाहीत . यंत्रांमुळं आपण आनंदापासून दूर जातो आहोत.आपला आनंद लोकांवर अवलंबून आहे . आपण यंत्रवत जगत आहोत . संवेदना असलेला तोच माणूस आहे . नातेसंबंधाबद्दल बोलताना ते म्हणाले , नात्यांत जीवंतपणा हवा . नात्यांना महत्व द्या. आपल्या अंतर्मनात डोकवा आणि विचार करा. जगणं सुंदर होतं ते विचारांनी व कृतींनी .आपल्याला साह्य करणारी माणसं शोधा . तुम्ही किती लोकांना मदत केली याची यादी वाढवा .तुम्ही किती जणांकडून मदत घेतली त्याची यादी कमी करा म्हणजे तुमचं जीवन सुंदर होईल . देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे ,घेता घेता घेणाऱ्याने देणार्‍याचे हातही घ्यावे. अशी दातृत्ववृत्ती जोपासावी हे सांगताना त्यांनी संत तुकोबांचे उदाहरण दिले. तुकोबांनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली. आणि तुकोबा म्हणत जोडोनिया धन उतम व्यव्हारे । उदास विचारे वेच करी ।।  वाईट मार्गाचे धन प्रेतावरची फुलं आहेत.कृतघ्नता सोडा जीवन  सुंदर होईल.आयुष्य थोडं आहे आनंद घ्या. इतरांचं जगणं सुंदर करा तुमचं जीवन सुंदर होईल .  जगण्यांतली समृद्धता पहा.आयुष्य सुंदर आहे. अशा प्रकारे जवळपास दीड तास श्री गणेश शिंदे यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले व त्यांचे प्रबोधन केले. या दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रात महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या आनंदाला उधाण आणणारा आनंद नगरी चा उपक्रम आणि त्यानंतर फनी गेम व संगीत खुर्ची यांचे आयोजन केले होते यातही विद्यार्थिनींनी  मोठ्या आनंदाने सहभाग घेतला .

         प्रस्तुत सायंकालीन व्याख्यान सत्राचे सूत्रसंचालन हे मराठी विभाग प्रमुख प्रा .डॉ .यल्लवाड व इतिहास विभाग प्रमुख प्रा .डॉ विनोद जगतकर यांनी केले .तर आभार प्रा . प्रवीण फुटके यांनी मानले .या कार्यक्रमात  महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी . सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि  महाविद्यालयावर प्रेम करणारे परळी आणि परळी परिसरातील अनेक नामवंत सूज्ञ श्रोत्यांची उपस्थिती लाभली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !