MB NEWS: स्तंभलेखक प्रशांत भा. जोशी यांचा चिंतनीय लेख:सगळेच सारखे नसतात!!!

 सगळेच सारखे नसतात!!!


काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत होता, एका मंत्र्यांच्या पीए ने नोकरी लावण्यासाठी म्हणून पैसे घेतले आणि पैसे परत दिले नाहीत; म्हणून संबंधित व्यक्तीने त्याची धुलाई केली असा त्या व्हिडिओचा असा आशय होता....


पाहता पाहता व्हिडिओ व्हायरल झालाच! मात्र अनेक युट्युब चॅनेल,  वर्तमानपत्राच्या वेब पोर्टल आणि टीव्ही चॅनेल्सनी आणि आजच्या वर्तमानपत्रांनीही त्याबद्दलच्या बातम्या केल्या आहेत. मात्र याबद्दल कुणी खात्री केली का ? की घटना खरी आहे का खोटी, त्या मागचे सत्य काय ? 


इतकी मोठी जबाबदार माध्यमे कोणत्याही गोष्टीची खात्री न करता एखाद्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरून बातम्या कशा काय करू शकतात? याबद्दल आश्चर्य आणि खेदही वाटला...


 सहज कुणाची बदनामी होईल किंवा शिळ्या कढीला उत येईल अन एखाद्याचे आयुष्य पणाला लागेल असा विचार कुणी मीडिया मधील मित्रांनी केला का ?


इतरांप्रमाणे मीही किंवा आमच्या अनेक PA मित्रांनी जेव्हा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण या व्हिडिओमध्ये दिसणारा आमचा सहकारी मित्र होता; मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक आणि मोठा भाऊ होता!


अजय आम्हाला माहित आहे; तो असे काही करू शकत नव्हता, आम्हाला खात्री आहे.....


मला आठवते, सन 2010 मध्ये आम्ही पहिल्यांदा गेलो विधान भवनातील अधिवेशनाच्या कामकाजाचा अभ्यास करत असताना आम्ही अडखळत असायचो. असं असताना एक सात फूट उंचीचा, दिसायला अतिशय गोरापान आणि आकर्षक व्यक्तिमत्व असणारा एक व्यक्ति, विधिमंडळातील कामे अतिशय चोखपणे व शांतपणे करत होता......


सुरुवातीला थोडेसे भित भित त्याला दादा एक  शंका होती   म्हणत विचारले आणि त्याने सर्व माहिती सांगायला सुरू केली.... आणि पाहता पाहता तो विधिमंडळातला माझ्यासारख्या अनेक पीए मंडळींचा मार्गदर्शक झाला.


अतिशय हुशार , कष्टाळू,  प्रामाणिक असलेला अजय आम्हाला माहीत होता. अतिशय गोड बोलणारा नाट्य कलावंत,  नाटकांमध्ये विविध भूमिका करणारा आणि त्या नाट्य कलेला आपले विश्व मानणारा तो होता.


त्याचे पत्र लेखन ही कला तर अतिशय जगा वेगळी होती. त्याच्या साहेबांना येणाऱ्या प्रत्येक पत्राला, तसेच त्याच्या साहेबांना जे लोकांनी गिफ्ट वस्तू देतात त्यांना तो पत्र रूपाने आभार मानायचा; त्यातील त्या पत्राची भाषा ही अतिशय उच्च दर्जाची आणि वाचनीय असायची! ते वाचून हेवा वाटायचा.


काही वर्षांपूर्वी नागपूर अधिवेशनाच्या दरम्यानच्या काळात एके दिवशी त्याच्या ऑफिसला भेट देण्याचा योग आला; एखाद्या लोकप्रतिनिधीचे ऑफिस किती सुसज्ज आणि व्यवस्थित असावे याचे राज्यात दुसरे कोणतेही उदाहरण नसेल, इतके सुंदर ऑफिस मेंटेन केलेले होते. त्यांचे साहेब राजकारणात आल्यापासून त्या प्रत्येक गोष्टीची नोंद, सभागृहातील भाषणे,  सभागृहातील मांडलेले विषय, इत्यादी सर्व गोष्टी अगदी डोळ्याला पट्टी बांधूनही सापडतील अशा पद्धतीने मांडलेल्या होत्या.


अधिवेशन काळात सकाळी सगळ्यात लवकर येऊन रात्री सर्वात उशिरापर्यंत काम करणारा अजय दादा मला माहित आहे!


त्याचे साहेब मंत्री झाल्यानंतर त्याच्या वागण्या- बोलण्यात कोणताही कमी-जास्त बदल  जाणवला नाही. अगदी पहिल्यासारखा आणि सर्वांना मिळून मिसळून वागायचा बोलायचा आणि नेहमी जमिनीवर पाय असायचे.


शासकीय कामे घेऊन गेल्यानंतर अशा गोष्टी मी करत नाही, साहेब यांना भेटा असे म्हणून विनम्रपणे नकार देत चहा कॉफी पाजुन तो परत पाठवायचा.


त्याचा स्वतःचा अपूर्ण छंद असलेला नाट्यशास्त्र विषय! 


त्याच्या मुलीला एका चांगल्या नाट्यसंस्थेत शिक्षण घेता यावे यासाठी त्याची बराच काळ धडपड होती. त्यासाठी मोठी रक्कम लागणार होती. एका मंत्र्यांचा पीए म्हणून सहज त्याला ते शक्य होते. मात्र त्याने  आमच्यासारख्या मित्रांकडून मदतीची अपेक्षा केली. आम्हीही सर्वांनी शक्य ती मदत करून ते ऍडमिशन करून घेतले आणि आम्ही दिलेली उसनी रक्कम न चुकता न विसरता न मागता अजयने परत केली! हा अजय मला व माझ्या सारख्या अनेकांना माहीत आहे!


मागील काही मुश्किलीच्या काळात अजय दिसेनासा झाला होता, आठवण येईल तेव्हा चिंता वाटायची. 


माहिती घेतली तेव्हा कळलं आणि धक्काच बसला आणि डोळ्यात पाणीही आले; अजयला कॅन्सर असल्याचे कळले. आपल्या जीवन परिस्थिती अन त्यांच्या परिणामांशी झुंजनारा आमचा मित्र आपल्या आयुष्याशी सुद्धा झुंजतो आहे हे कळल्याने जीव व्याकुळ झाला. 


डोळ्याला पाणी आले तेच मित्राच्या प्रति कर्तव्याची जाणीवही झाली, आपल्याने शक्य आहे ते करायचे ठरवून त्याच्या उपचारासाठी जे जे शक्य ते करण्याचा आम्ही सर्व मित्रांनी मिळून आजवर प्रयत्न केला. आजही अजय उपचार घेत आयुष्याशी झुंजतो आहे, आपल्या शरीराच्या आतील शत्रूशी लढतो आहे, त्यातच बाहेरील देखील अनेक शत्रू त्याचा रक्तपात करत आहेत. 


उपचार घेण्यासाठी सतत पैश्यांची चणचण, कौटुंबिक आणि वैद्यकीय अडचणी, अजयला आता बाहेरच्या शत्रूची गरजच नाही बरबाद करायला!


त्यातच आजचा अजयचा कोणाकडून तरी नोकरी लावण्यासाठी पैसे घेतले म्हणून मारले अशा आशयाचा व्हीडिओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले; जो माणूस अनेक वर्षे एका मंत्री दर्जाच्या व्यक्ती साठी पीए म्हणून काम करतोय, तो स्वतःच्या कॅन्सर वरील आजार, पोटच्या मुलीला शिक्षणासाठी लागणारी रक्कम उभी करू शकत नाही, किंवा त्यासाठी लागणारी रक्कम कुणी मदत म्हणून दिली, ती परत करू शकत नाही, या गोष्टीवर विश्वास बसत नाही, अजिबात!


काल रात्री सोशल मीडियाचा व्हिडिओ पाहून, "अजय हे काय आहे?" असे म्हणून फोन केला, तेव्हा त्याने "तुला हे खरे वाटते का?" एवढा एकच प्रश्न विचारला आणि डोळ्यात पाणी आणले!


अर्थात माझा विश्वास नव्हताच, मात्र व्हीडिओ मध्ये आरोप करणाऱ्या व्यक्तीने, दुसरा एक व्हिडिओ पाठवला आणि पहिल्या व्हिडिओमध्ये काय आहे, ती घटना नेमकी काय आहे आणि साधारण दोन वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ आता कसा वायरस झाला याबद्दलचा खुलासा करत हा व्हिडिओ चुकीचा असल्याचा खुलासा केला आहे. पण तो दुसरा व्हीडिओ दाखवायची तसदी कोण घेणार?


आपल्याकडे चांगल्या कामांच्या पाढ्याची गिणती कमी अन चुकीची उजळनी पुन्हा पुन्हा गिरवण्याची पद्धत आहे! ही चूक लक्षात येई पर्यंत समोरचा माणूस बदनामीच्या गर्तेत बुडून उध्वस्त झाला असतो. 


आमचा अजय आज शरीरातील कॅन्सरशी लढताना मानसिक दृष्ट्या देखील खचला आहे नव्हे अगदी कोलमडून गेला आहे..... अशावेळी समाजाला आणि समाज अंधकारात असेल तर त्या समाजाला दिशा दाखवणाऱ्या माध्यमातून पत्रकारांना योग्य ती दिशा दाखवण्याची जबाबदारी असते.....  मात्र एका मिनिटाची breaking बातमी दाखवण्याच्या नादात आपण एखाद्या व्यक्तीची आयुष्य बरबाद करत आहोत याची काळजी घेण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार हा प्रश्न मला पडतो आहे.


सोशल मीडियावर अजयच्या बाबतीत व्हायरल झालेला व्हिडिओ हा दोन वर्षांपूर्वीचा होता आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधील घटनांच्या आधारावर नव्याने दिलेल्या बातमीची खातरजमा कोणीही केली नाही, ज्याने हे व्हीडिओ व्हायरल केले , त्यांनीहि हे चूकीचे व निरर्थक असल्याचे याआधीच सांगितलेलं आहे.

             

सगळेच सारखे नसतात, अजय तू खरा आहेस, आम्हाला माहीत आहे, एकीकडे शरीरातल्या कॅन्सरशी तुला लढायचे आहे, दुसरीकडे तुला तुझे कुटुंब सावरायचे आहे आणि त्यातच समाजातल्या पटकन नकारात्मकता दाखवणाऱ्या कॅन्सर शी देखील तुला लढायचं आहे, पण या लढाईत तू एकटा नाहीस, आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत व कायम राहू!


                    ✍️ प्रशांत  भा. जोशी

                            स्तंभलेखक 

----------------------------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !