MB NEWS:भक्ती -कर्म -ज्ञान मार्गाचा त्रिवेणी समन्वय : संत भगवानबाबा

 भक्ती -कर्म -ज्ञान मार्गाचा त्रिवेणी समन्वय : संत भगवानबाबा


भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता.आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ,तेलंगना,आंध्रप्रदेश,कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते.

 बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव येथे श्रावण वद्य पाच शके १८१८ (२९ जुलै, इ.स. १८९६), सोमवार रोजी सूर्योदयाच्या समयी भगवानबाबांचा जन्म झाला. मुलाचे नाव 'आबा' किंवा 'आबाजी' ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप. ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते.गावात चौथीपर्यंत शाळा होती. तेव्हा गुरुजींच्या सांगण्यावरुन पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी लोणी, ता. शिरूर, जि. बीड येथे पाठवले गेले. अधिक शिक्षणसोयी नसल्याने आबाजी पुन्हा गावाकडे परत आले. ग्रामीणभागात रीतीरिवाजानुसार गुरेढोरे राखायला जात. आबाजीला शेती व गुरांची निगराणी राखायला फार आवडत असे. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे उपजतच आबाजीला आध्यात्मिक ज्ञानाची व विठ्ठलनामाची आवड निर्माण झाली. आबाजी घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठलभक्ती करीत असे. त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत प्रथम दिंडीस गेले. 'पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले तर जीवनाचे कल्याण होते' अशी त्यांच्या परिवारात आणि आसपासच्या समाजात समजूत असल्याने त्यांनी गीतेबाबा दिघुळकरांसोबत पंढरपूरची वारी केली. त्यासाठी ते वयाच्या ५-६व्या वर्षी घर सोडून पायी चालत पंढरपूरला गेले. पहिल्या वारीच्या शेवटीच पंढरपुरात पोहोचल्यावर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. त्यांनी गीतेबाबानाच आध्यात्मिक गुरू मानले.

                

आबाजींचे पूर्वज हे लहानपणापासून नारायणगडाचे उपासक होते. नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंशपरंपरागत गुरू होते. तत्कालीन नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा होते. आबाजीचे आईवडील नेमाने माणिकबाबाच्या दर्शनासाठी नारायणगडावर येत. एकदा आबाजीचे आईवडील त्याना घेऊन विजयादशमीच्या दिवशी नारायणगडावर आले. आबाजीने माणिकबाबांना गुरूपदेश द्या असे म्हटले. त्यावर अल्पवयात गुरूपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले, पण आबाजीच्या मनाचे समाधान झाले नाही. माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले म्हणून माणिकबाबांनी आबाजींना अनुग्रह दिला आणि गुरूपदेश केला. नंतर माणिकबाबांनी आबाजींचे नाव 'भगवान' ठेवले.असेही  सांगितले जाते की पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिकबाबांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले. माणिकबाबा हे त्यांचे गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील ह.भ.प. श्री बंकट स्वामी यांच्याकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले. त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.

●●●●●
जाज्वल्य जीवनकार्य .....
    अठराव्या शतकातील महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट होती. मराठवाड्य नजीकच असलेल्या प्रदेशात तर परिस्थिती फारच बिघडलेली होती. या प्रदेशावर मराठेशाहीच्या अस्तानंतर निजामाची राजवट प्रस्थापित झाली होती. या दशकाच्या उत्तरार्धात निजामाचे वर्चस्व वाढले. त्याबरोबर निजामाच्या आक्रमणामुळे धर्म, देवांचे उत्सव बंद पडले होते. त्यांच्या अमानुष अन्यायात, त्रासात आणि जुलमात समाज भरडला जात होता. बायका, मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती काहीच सुरक्षित नव्हते. धर्माचे साम्राज्य बुडाले होते. धर्माचे पालन करणे समाज विसरला होता. धर्म बाटविला जात होता. आकांत, कर्मकांड आणि कर्मठपणा यात अडकलेला समाज बळी पडत होता. अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, मांसाहार, धर्मांतरण अशा परिस्थितीत समाज पिचून निघाला होता. समाज हीन, दीन, त्रस्त व अपमानित अवस्थेत होता. अशा समयी राजकीय अस्थिरतेच्या काळात माजलेला हाहाकार संपवण्यासाठी, धर्मसंकट पार करण्यासाठी, समाजाचे चाललेले शोषण रोखण्यासाठी, अंधश्रद्धांनी जर्जर झालेल्या समाजाला सुधारण्यासाठी, समाजाकल्याणसाठी, भावनिक एकात्मता जपण्यासाठी आणि समाजाला दिशा दाखवण्यासाठी, अधर्माच्या अंधकारातून आध्यात्मिक प्रकाशाकडे जाण्यासाठी, रूढी-परंपरेला चिकटून बसलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी तसेच अंध:कारमय जीवनात प्रकाशाचा कवडसा निर्माण करण्यासाठी गीतेतील वचनाप्रमाणे भगवानबाबा अवतरले. त्यामुळे समाजपरिवर्तनास गती आली, भागवत धर्माचे पुनरुज्जीवनासाठी प्रेरणा दिली. आधुनिक समाजप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी झटणार्‍या बाबांनी आपल्या श्रद्धा व मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. बाबांनी जनतेच्या भक्तिसुरक्षाकवच म्हणून महारथीची भूमिका बजावली. त्यांनी कायम आदर्श महानायकाच्या, समाजसुधारकाच्या, सामाजिकसंतुलनाच्या भूमिकेत मार्गदर्शन केले.
●●●
भक्तिमार्गप्रसाराचे कार्य....
     भगवानबाबांनी भक्तिमार्गप्रसाराचा यज्ञ सुमारे इ.स.१९१८ साली चेतवला. त्यांनी आयुष्यभर भक्तिमार्गप्रसाराचे अस्मितेचा अंगार पेटता ठेवला. महाराष्ट्राच्या लाखो माणसांचे भगवानबाबा प्रमुख आधारस्तंभ होते तर वारकरी संप्रदायाचे तारणहार होते. भगवानबाबांची सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विचारांची बैठक एका श्रेष्ठ कृतिशील समाजसुधारकाची होती. त्यांनी असंख्य भाविकांना व्यसने, दुराचरण, दुरभिमान, कलह यांपासून सोडविले. गोरक्षण, अन्नदान, वैदिक अनुष्ठान, नामस्मरण, भजनसप्ताह, तीर्थयात्रा अशारीतीने भाविकांमध्यें धर्माबद्दल व भक्तीबद्दल जागृती केली. भगवानबाबांनी समाजात समता, बंधुता, एकात्मता, जागृती, हरिनामाची गोडी स्थापन करण्यासाठी रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कीर्तनात विठ्ठलावरील प्रेम, भक्तिभाव व भावसामर्थ्य ओतप्रोत भरलेले दिसत असे. त्यांचे कीर्तन सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडत असे. त्यांच्या कीर्तनाने भाविक भारावले जात. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भागवत धर्म व वारकरी संप्रदाय प्रसाराचे कार्य केले. भगवानबाबांनी वारकरी संप्रदायात राहून समाजपरिवर्तनाचे काम केले. त्यांनी धर्माच्या वचनांचा खरा अर्थ सांगून भाविकांना सन्मार्गाला लावले. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात स्वाभिमानाचे, धर्मचळवळीचे स्फुर्ती चेतवण्याचे काम केले. त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानामुळे कारकिर्दीलाही वेगळा आयाम प्राप्त झाला होता व त्यांनी स्वतःची अशी एक पकड सामान्य माणसांवर निर्माण केली होती. भागवत धर्मावरील निजामाचे आक्रमण कारणीभूत आहे अशी खात्री बाळगून भगवानबाबा यांनी कीर्तनच्या माध्यमातून लक्ष्य करण्यास सुरुवात केली व त्यातूनच धर्मचळवळ जन्मास आली.
●●●●●
अहिंसावादाची शिकवण...
      जिवंत प्राण्यांचा बळी देणे धार्मिक भावनेने हा धर्म नसून महान अधर्म आहे. मराठवाड्यात देवतांपुढे बोकडांची हत्या करण्याची रूढी-परंपरा त्यांनी बंद पाडली आणि समाजाला अहिंसावादाची शिकवण दिली. माजलगाव, पाथर्डी, धारूर, केज, शेगाव यांसह अनेक गावांतील पशुहत्या त्यांनी बंद केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !