MB NEWS:जानेवारी-फेब्रुवारीतच निवडणुकीचा धुराळा उडाणार.. पहिल्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका

 जानेवारी-फेब्रुवारीतच निवडणुकीचा  धुराळा उडाणार.. पहिल्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका





 राज्यातील २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या, १८ महापालिका आणि १६४ नगरपालिका, नगरपंचायतींची मुदत मार्च २०२२मध्येच संपली आहे. मागील नऊ महिन्यांपासून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज आहे.


आता जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारीत महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १७ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर पुढील नियोजन अवलंबून आहे.


विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपण्यापूर्वी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्यावी लागते. परंतु, राज्यातील सत्तासंघर्ष आणि महापालिका, जिल्हा परिषदेच्या नवीन प्रभागरचनेला सर्वोच्च न्यायालयात दिलेले आव्हान, यामुळे मागील नऊ महिन्यांपासून निवडणूक घेता आलेली नाही. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकांच्या नवीन प्रभागरचनेचे आराखडे यापूर्वीच पूर्ण झाले आहेत. त्यानंतर आरक्षण देखील निश्चित झाले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुढील कार्यवाही अंतिम होईल. तत्पूर्वी, शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले आणि चिन्हाचा पेच निर्माण झाला. पण, आता बाळासाहेबांची शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, असे दोन गट तयार झाले आहेत. त्यांना चिन्ह देखील मिळाले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चिन्हाचा वाद (पेच) नसणार आहे. आता फक्त प्रभागरचना पूर्वीची की नवीन, यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. त्यानंतर निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल, असेही विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. राज्यातील एक हजार २४९ ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी ते मे २०२३ या कालावधीत संपणार आहे. या ग्रामपंचायतींची प्रभागरचना, आरक्षणाची कार्यवाही आता लवकरच सुरु होईल. महापालिका व जिल्हा परिषदांची निवडणूक झाल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्याची देखील तयारी ग्रामविकास विभागाकडून सुरू झाली आहे.


आता निवडणुकीचे दोनच टप्पे

पंचातयराज व्यवस्था अंमलात आल्यापासून पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका व नगरपालिकांवर तब्बल नऊ महिने प्रशासकराज आहे. लोकशाहीला ते अभिप्रेत नाही. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्या टप्प्यात महापालिका व नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने त्याची पूर्णत: तयारी केली आहे. निवडणूक प्रोग्राम जाहीर करून निवडणुकीची प्रक्रिया राबविणे एवढीच कार्यवाही होईल. दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षांचा काही अडसर आला, तर दोन आठवडे निवडणूक पुढे जाईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची निवडणूक होईल.


उमेदवारीचा सर्वच पक्षांसमोर पेच

सध्या भाजपसोबत शिंदे गट असून आता पिपल्स रिपब्लिकन पार्टीने शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, संभाजी ब्रिगेड असे पक्ष निवडणुकीत उतरतील. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी असावी, असे बहुतेक स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत आहे. पण, कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत उमेदवारीवरून बंडखोरी उफाळेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आघाडी, युती होईल की सर्वजण स्वबळावर निवडणूक लढवतील, याची उत्सुकता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !